सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!

१७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


स्पायडर मॅनसह अनेक सदाबाहर सुपरहिरोंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या सुपरहिरोंनी अनेक पिढ्यांना अशक्य ते शक्य करण्याची उमेद दिली. जोवर ती स्वप्न जिवंत आहेत, तोवर स्टॅन ली काही मरणार नाही.

स्पायडर मॅन

पीटर पार्कर नावाचा एक अनाथ मुलगा म्हाताऱ्या आजीआजोबांबरोबर राहतोय. एक रेडियोअॅक्टिव कोळी त्याला चावतो आणि त्याच्यात सुपरनॅचरल पॉवर्स येतात. तो स्पायडर मॅन बनतो. तो आपल्या मनगटातून लांबच लांब कोळ्याचं जाळं सोडू शकतो. उंच इमारतींना लोंबकळू शकतो. बलाढ्य शत्रूंना मारू शकतो. खरा सुपरहिरो ठरतो.

स्पायडर मॅनचं पहिलं कॉमिक्स आलं ऑगस्ट १९६२ मध्ये. आता त्याला ८५ वर्षं होऊन गेली. पण आजही किरकोळ बाजारात सर्वाधिक विक्री होणारा सुपरहिरो ब्रांड स्पायडर मॅनच आहे. साठच्या दशकातल्या अमेरिकेतल्या सर्वार्थाने हतबल पिढीला स्पायडर मॅन आपला वाटला. जग जिंकण्याची पॉवर मिळवण्याच्या स्वप्नांचं तो मूर्तरूप ठरला. तोच स्पायडरमॅन आजच्या पिढीलाही आपला वाटतोय. 

 

द फंटास्टिक फोर

कॉमिक्सची ही सिरीज स्पायडर मॅनच्याही आधीची. १९६१ची. चार सुपरहिरो एकत्र येऊन टीम बनवावी, असं त्याआधी कधीच कुणाला वाटलं नव्हतं. वेगवेगळे आकार घेणारा नवरा, त्याची अदृश्य होऊ शकणारी बायको, ज्वाळा फेकणारा मेहुणा आणि दगडासारखा शरीर असणारा अवाढव्य मित्र अशा चार जणांचं हे टोळकं सुपरहिरोंचं कुटुंबच होतं. माणसाच्या कुटुंबात असतात तसे सगळे रागलोभ यांच्यातही असतात. पण शेवटी ते मिळून विलनचा खात्मा करतातच. आजकालच्या मुलांनी डोक्यावर घेतलेल्या अवेंजर्स या सुपरहिरो टीमची मूळ कल्पना इथेच आहे.

 

थॉर

हा सुपरहिरोही १९६२ सालचाच. एका प्राचीन देवतेवरून त्याची निर्मिती झालीय. त्याचा  विविध शक्ती असलेला हातोडा ही त्याची ओळख. विशेष म्हणजे तो हवामानही बदलू शकतो. शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासातली ही देवता आजच्या मुलांमधे कार्टून बनवून लोकप्रिय करण्याचा तो विलक्षण प्रयोग होता. कॉमिक्सपासून टीवीवरचं अनिमेशन, सिनेमे आणि वीडियो गेम असा प्रवास एक पुराणातली देवता आजही करतेय.

 

आयर्न मॅन

स्पायडर मॅनच्या पुढच्याच वर्षी जन्म घेतलेला आयर्न मॅन हा स्पायडर मॅनच्या उलट. पीटर पार्कर गरीब, लाजाळू, भोळा तर टोनी स्टार्क उद्योगपती, शास्त्रज्ञ, बाईलवेडा. त्याला किडनॅप करून त्याच्याकडून शस्त्रास्त्र बनवून घेण्याचा विलन लोकांचा प्लान असतो. पण घडतं भलतंच. त्याच्या हातून एक लाल रंगाचं लोखंडी चिलखत बनतं. ते घातल्यावर तो सुपरहिरो बनतो. हा आयर्न मॅन आजही अवेंजर्सच्या टीमचा भाग आहे.

 

द हल्क

हिरव्या रंगाचा, भयंकर आडदांड शरीराचा, राक्षसी ताकद असणारा द इन्क्रेडिबल हल्क मे १९६२ पासून बच्चेकंपनीचा आवडता आहे. गेल्याच वर्षी अवेंजर्सच्या नव्या सिनेमात त्याचा मृत्यू दाखवलाय. आता तो पुढच्या सिनेमात नसणार हा जगभर बातमीचा विषय बनला होता. हडकुळ्या अशक्त डॉक्टर रॉबर्ट बॅनरवर गॅमा किरणं पडतात आणि तो सुपरहिरो द हल्क बनतो, अशी त्याची गोष्ट आहे. अभ्यासकांनी त्याचा संबंध साठच्या दशकात विएतनाम युद्धामुळे अमेरिकेत आलेल्या नैराश्याशी जोडलाय. अमेरिकेतल्या निराश तरुण पिढी प्रत्यक्षात हरत होती. त्या तरुणांनी हल्कच्या ताकदीत स्वतःला पाहिलं.

 

या सगळ्या सुपरहिरोंचा बाप एकच होता. त्याचं नाव स्टॅन ली. हेच नाहीत तर एक्स मॅन, डॉक्टर स्ट्रेंज, डेअर डेविल, ब्लॅक पँथर, अँट मॅन, सिल्वर सर्फर, शी हल्क असे इतरही अनेक सुपरहिरोंना त्यांनीच जन्म दिला. ही त्यांची सुपरहिरो लेकरं पडद्यावर मोठमोठ्या विलनना संपवत असली. तरी प्रत्यक्षात त्यांच्या बापालाही मरावं लागलंच. सोमवारी १२ नोव्हेबरला ९५ व्या वर्षी स्टॅन लींचं निधन झालं. साऱ्या जगभरातून हळहळ व्यक्त झाली. वॉशिंग्टन पोस्टपासून सकाळपर्यंत सगळ्यांना संपादकीय पानांवर मृत्यूलेख छापावेसे वाटले.

अख्खं नाव स्टॅनली मार्टिन लिबर. ते रुमानियातून अमेरिकेत आलेल्या ज्यू कुटुंबातले. जन्म २८ डिसेंबर १९२२. बालपण गरिबीतच गेलं. तो काळ जागतिक महामंदीचा होता. ते लिहितात, `आमची छोटीशी खोली होती. मी आणि माझा धाकटा भाऊ एका छोट्या खाटेवर झोपायचे. आईबाबा एकाच सोफ्यावर.` अशाही परिस्थितीत हा मुलगा पुस्तकं आणि सिनेमात रमायचा. त्याला लेखक बनायचं होतं.

स्टॅन द मॅन

काकाने स्टॅनलीला टाइमली कॉमिक्स या नव्याने सुरू झालेल्या प्रकाशन संस्थेत चिटकवलं. तिथे तो हरकाम्या होता. कॉमिक्स रेखाटणाऱ्या कलाकारांना जेवण आणून दे. चित्रावरच्या नको त्या रेषा खोड. शाईच्या दौती भरून ठेव. प्रूफरिडिंग कर. अशी सांगितली जातीत ती कामं तो करायचा. दोनच वर्षांनी त्याला पहिली कथा लिहायची संधी मिळाली. त्यात त्याचं पूर्ण नाव आडनाव छापून आलंच नव्हतं. नावही त्याने दोन तुकड्यात लिहिलं. स्टॅन आणि ली वेगवेगळं. जेव्हा एखादी महान कादंबरी लिहेन, तेव्हा पूर्ण नाव वापरेन असं त्याने ठरवलं होतं. पण त्याने स्टॅन ली या नावाने जे लिहिलं, ते महान ठरलं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आर्मीत जाण्यापासूनचे काही उपद्व्याप सोडले, तर स्टॅनली कायम टाइमली कॉमिक्समधेच रमला. कंपनीचं नाव बदलून आधी अॅटलास कॉमिक्स झालं आणि नंतर मार्वल कॉमिक्स. स्टॅन ली तिथेच राहिला. एकेक पायऱ्या चढत मुख्य संपादक बनला. साठच्या दशकात त्याने कमाल केली. त्याचे सगळेच सदाबहार सुपरहिरो त्याने याच काळात जन्माला घातले. त्याच्या जोरावर तो मार्वल कॉमिक्सचा प्रकाशक आणि चेअरमनही बनला. कॉमिक्सच्या दुनियेतला तो बापमाणूस बनला. `स्टॅन द मॅन` म्हणून प्रसिद्ध झाला. 

 

हसणारे रुसणारे सुपरहिरो

स्टॅन लींचे सगळेच हिरो माणसाळलेले होते, हे त्यांचं वेगळेपण होतं. ते महानायक असले तरी परिपूर्ण नव्हते. त्यांच्यात माणसाच्या भावभावना असायच्या. त्यांच्यात काही ना काही कमतरता असायच्या. त्यामुळे लोकांनी स्टॅन लींच्या कार्टूनमधे स्वतःला शोधलं. गोष्ट सांगायची नवी पद्धतच त्यांनी जन्माला घातली होती. त्यामुळे बदलत्या जगात गोष्ट सांगायची नवी माध्यमं आली. नव्या माध्यमांत स्टॅन लींचे सुपरहिरो अधिक जिवंत होत गेले. रेडियो, टीवीवरचे अॅनिमेशन शो, अॅनिमेटेड सिनेमे, बिगबजेट रिअल लाईफ सिनेमे ते वीडियो गेम, यू ट्यूब अशा सगळ्या माध्यमांना ते सुपरहिरो पुरून उरले. स्टॅन लींनी एका छोट्या प्रकाशन संस्थेला कोट्यवधींची उलाढाल असलेली आंतरराष्ट्रीय मल्टिमीडिया कंपनी बनवलं.

मार्वल एंटरटन्मेंटचे सध्याचे एडिटर इन चीफ सी. बी. सेबुलस्की यांनी स्टॅन लींना श्रद्धांजली वाहताना लिहिलंय, ` स्टॅन लींनी स्वतःच्या आयुष्याचे तुकडेच आपल्या पात्रांच्या कहाण्यांमधे जागा मिळेल तसे थोडे थोडे चपखल बसवलेत. वाचकांना त्यात आपलं प्रतिबिंब पाहण्याची आणि सर्व शक्यता आजमावून पाहण्याची मोकळीक होती. त्यामुळे ते त्यात आपल्याही समस्या दूर करण्याची आशा शोधू लागले.`

 

वाचकांना जोडण्याची सुपरपॉवर

स्टॅन लींचा स्वभाव विनोदी आणि संवादी होता. ते सतत वाचक, प्रेक्षकांमधे रमले. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवायचे. पत्रं लिहायचे. आपल्या सुपरहिरोंच्या प्रत्येक सिनेमात आपल्याला छोटासा तरी रोल द्यावा, अशी त्यांनी अटच घातली होती म्हणे. त्यामुळे आपल्या विनोदी भूमिकांतून ते आपल्या प्रेक्षकांच्या नजरेसमोर राहिले. त्याचसोबत त्यांनी कार्टून कन्वेंशन नावाचं संमेलनही भरवायला सुरवात केली होती. ते संमेलन आता स्टॅन ली कॉमिक कॉन म्हणून ओळखलं जातं.

मार्वलचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या वॉल्ट डिस्ने कंपनीचे चेअरमन बॉब इगर यांनी श्रद्धांजली वाहताना स्टॅन ली यांच्या लोकप्रियतेचाच उल्लेख केलाय. ते म्हणतात, `स्टॅन ली त्यांच्या पात्रांमुळे अद्वितिय होतेच. पण ते मार्वलच्या जगभरातल्या चाहत्यांसाठी स्वतःच सुपरहिरो होते. त्यांच्याकडे प्रेरणा देण्याची, करमणूक करण्याची आणि लोकांना जोडण्याची सुपरपॉवर होती.`

स्टॅन लींचे सुपरहिरो काळानुरूप थोडे थोडे बदलत जात आहेत. पण त्यांच्यात स्टॅन लींनी भरलेला स्वभाव मात्र तसाच टिकून आहे. त्या स्वभावांमुळेच पुढची अनेक वर्षं सर्वसामान्य माणूस या सुपरहिरोंमधे स्वतःला शोधत राहणार आहे. तोवर स्टॅन ली मरणार नाही.