कलेतल्या रेनेसान्सची सुरवात करणारं फ्लॉरेन्स जगाची कलापंढरी ठरलं

२३ जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


इटलीतल्या टस्कनी भागाची राजधानी असलेलं फ्लॉरेन्स हे शहर. फ्लॉरेन्समधे कलेच्या रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो.

७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस. इटलीतल्या एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅवानारोला नावाच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे', 'मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातल्या प्राचीन पुस्तकं, हस्तलिखितं, शेकडो चित्रं, रेखाटनं, ऑईल पेंटिंग, शिल्प, हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते.

एका कलासंपन्न शहराचं वैभव धगधगत्या अग्नीज्वाळांमधे बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती. या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुणही होता. जो या प्रकाराने अत्यंत दुःखी आणि हतबल अवस्थेत अश्रू ढाळत होता. हे शहर होतं जगाची कलापंढरी म्हणून ओळखलं जाणारं फ्लॉरेन्स आणि हा तरुण होता, कलेच्या इतिहासावर सूर्यासारखा चिरंतन तळपणारा मायकेल अँजेलो.

व्यापारासाठी धर्मयुद्ध

जगाच्या आणि कलेच्या इतिहासात 'बॉर्नफायर ऑफ द वेनिटिस' म्हणून ही घटना प्रसिद्ध आहे. दहाव्या-अकराव्या शतकात अब्राहमिक धर्माची पवित्र भूमी जेरूसलेमला भेट देणाऱ्या यात्रा आणि ख्रिश्चन-मुस्लिम धर्मयुद्ध यांनी युरोपात व्यापाराचं युग निर्माण झालं. व्यापार वृद्धीसाठीच खरंतर धर्मयुद्धांचं आयोजन करण्यात आलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

वाढत्या व्यापाराने युरोपचं कृषिकेंद्रित, सरंजामदारी आणि धर्मनियंत्रित समाजजीवन बदलू लागलं. व्यापाराने भांडवलशाहीचं आगमन युरोपात झालं. यामुळे फ्लॉरेन्स, मिलान, वेनिस यासारखी व्यापारी शहरं उदयाला आली. फ्लॉरेन्स शहरात व्यापार उदिमासोबतच कला क्षेत्राचा विकास होत गेला. कलेला उत्तेजन आणि संरक्षण देणारे राज्यकर्ते या शहराला लाभल्यानं फ्लॉरेन्समधे कलाक्षेत्र बहरू लागलं.

हेही वाचा : हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

प्रबोधन काळाचा प्रारंभ

फ्लॉरेन्स हे इटलीच्या टस्कनी भागातलं मुख्य शहर. ज्युलियस सीझरने इसवीसन पूर्व ५९ ला आर्ना नदीच्या सुपीक खोऱ्यात वसवलेलं. भरभराट होणारं शहर म्हणून फ्लॉरेन्स हे नाव ठेवण्यात आलं. युरोपाच्या इतिहासातल्या मध्ययुगीन कालखंडात म्हणजेच इसवीसन ६०० ते १५०० मधे राजकीय आणि आर्थिक आघाडीवर आणि कलात्मकदृष्टया नावाप्रमाणेच फ्लॉरेन्सची भरभराट झाली.

हा काळ व्यापारीदृष्टीने फ्लॉरेन्सच्या भरभराटीचा काळ होता तसाच तो त्याच्या राजकीय सामर्थ्याचाही काळ होता. लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य यामुळे कलेकडे बघण्याचा अधिक उदार दृष्टिकोन इथल्या नागरिकांमधे वृद्धिंगत होत गेला. जुन्या ग्रीक आणि रोमन कलेचे अवशेष, शिल्प यांच्याकडे आधुनिक दृष्टीतून पाहिलं जाऊ लागलं. नवे कलावंत आणि बुद्धिवंत त्यात पुन्हा लक्ष घालू लागले. दुस-या शब्दात पुनरुज्जीवन म्हणजेच रेनसान्स किंवा प्रबोधन काळाचा प्रारंभ इथं झाला.

रेनेसान्स ही १४ व्या ते १७ व्या शतकातल्या कलात्मक, तत्त्वज्ञानात्मक, वैज्ञानिक, धार्मिक, सामाजिक या क्षेत्रातली चळवळ बनली. अनेक बुद्धिवाद्यांच्या मते, मध्ययुग आणि आधुनिक काळ यांना जोडणारा दुवा किंवा आधुनिक काळाची पायाभरणी करणारी चळवळ म्हणजे रेनेसान्स.

सर्वश्रेष्ठ कलावंतांचा वावर

फ्लॉरेन्समधे रेनेसान्सची सुरवात होऊन नंतर पूर्ण युरोपभर ही चळवळ पसरली. रेनेसान्स चळवळीचा आज विचार केला जातो तेव्हा तिच्या बुद्विवादी, वैज्ञानिक, धार्मिक आणि सामाजिक अंगानाच अधिक प्राधान्य देण्यात येतं. मात्र फ्लॉरेन्सच्या कलाविश्वातून या चळवळीचा खऱ्या अर्थाने जन्म झाला, हा इतिहास काहीसा दुर्लक्षित केला जातो.

फ्लॉरेन्समधे वास्तवतावादी, तसंच रेखाटनातून परिप्रेष्य दाखवणारी, छाया-प्रकाशाद्वारे घनता दाखवणारी चित्रकला सुरू झाली. ही ख्रिस्त चरित्र, बायबल आणि चर्च या तीन केंद्रांभोवती फिरणाऱ्या युरोपीयन कलेतली क्रांतीच होती. लिओनार्दो दि विंची आणि मायकेल अँजेलो हे जगातले सर्वश्रेष्ठ कलावंत एकाच काळात फ्लॉरेन्सच्या भूमीवर वावरले, त्यामुळे कलाविश्वाची सर्व परिमाणं फ्लॉरेन्सने बदलवली.

हेही वाचा : फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

कलाकारांचे बोटेगो

कलाकाराची क्षमता पूर्ण ओळखून, त्याच्या कलेचा विकास तिच्या सर्वोच्च शिखरापर्यंत होण्यासाठी भोवतालची परिस्थिती, लोकाश्रय आणि राजाश्रय यांचीही भूमिका तेवढीच महत्त्वाची असते. कलेसाठी फ्लॉरेन्सचा हा सुर्वणकाळ होता. त्यामुळे लिओनार्दो, मायकेल अँजेलो, राफाएल अशा कलावंतांची क्षमता ओळखली गेली आणि विकसित होऊ शकली. यामुळेच हे तीन कलावंत एका अर्थाने कलेतले रेनेसान्सचे जनक आणि अनभिषिक्त सम्राट ठरले.

एखाद्या शिल्पकाराला किंवा चित्रकाराला त्यानं जगाच्या पाठीवर कुठं जन्माला यावं याची निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळालं असतं, तर त्याने हा काळ आणि फ्लॉरेन्सचीच निवड केली असती. फ्लॉरेन्समधे ठिकठिकाणी कलावंतांचे 'बोटेगो' होते. यालाच आजच्या भाषेत आपण स्टुडियो म्हणतो.

या बोटेगोंमधे विविध स्वरूपाची सौंदर्यपूर्ण आणि सजावटीची कामं केली जात होती. पोशाखावर लावायच्या कलाकुसर असलेल्या पिनांपासून चर्चमधल्या कलाकुसरीनं नटलेलं लाकडी फर्निचर, मोठमोठे फ्रेस्कोंपासून इमारत-हॉल यांच्या बाहय-अंतर्गत सजावटीचं काम बोटेगोने व्हायचं. चर्च, सरकारी अधिकारी, सावकार, श्रीमंत व्यापारी, सरंजामदार इत्यादी लोक बोटेगोकडून ही कामं करून घेत.

चित्रांची क्रांती

या सर्वांमुळे फ्लॉरेन्स शहर कला शिकण्याचं जागतिक केंद्र बनलं. विंची- अँजेलो यांच्यापूर्वी लॉरेन्झो गिबर्टी, ब्रुनेलेस्की, मॅसॅचिओ, जिओटो या कलावंतांनी फ्लॉरेन्सचे कलाविश्व बहरवलं होतं. गिबर्टीचे ब्रॉन्झ शिल्पांनी नटलेले चर्चचे दरवाजे, ब्रुनेलेस्की डयुओमोचा घुमट यांच्या या कलाकृती आजही फ्लॉरेन्सच्या प्रमुख आकर्षणांमधे गणल्या जातात.

१४०१ नंतरच्या अल्पायुषी मॅसॅचिओ या चित्रकाराची संख्यने थोडी असलेली चित्रं शंभर वर्षांनंतर आधुनिक शैलीची चित्र संबोधण्यात येऊ लागली. त्रिमितीचा आभास चित्रांमधे देणारा तो पहिला चित्रकार. जिओटोने छायाप्रकाशाच्या प्रभावी वापरातून चित्रांमधे मानवी अवयवांना घनता प्राप्त करून दिली. 

या दोघांनीही पारंपरिक चित्रकलेतल्या मनुष्याकृतींच्या अंगावरचा भारी पोषाख, दागदागिने यांच्यापेक्षा कपड्यांच्या आतल्या मानवी देहाचं चित्रण करण्यावर भर दिला. सिन्योरेली या चित्रकाराने नग्न देहाचं चित्रण करण्याचं धाडस पहिल्यांदा दाखवलं. भविष्यात मायकेल अँजेलोनं चर्चमधल्या मृत शरीराच्या पोस्ट मार्टेममधून मानवी शरीर रचनेचा केलेला अभ्यास त्याच्या शिल्पांमधे जिवंत केला.

त्याने केलेली बॅकस, डेविड ही नग्न शिल्प ही मॅसॅचिओ -जिओटो यांच्यानंतरची संपूर्ण क्रांतीच म्हणावी लागेल. विंचीने मोनालिसा चितारून देव-धर्म यांच्या बाहेर येऊन मानवी प्रतिमेला आपल्या प्रतिभेनं अजरामर केलं. अँजेलो असो किंवा विंची यांना कलेला अलौकिकाच्या पातळीवरून लौकिक जगात आणताना, एक कलावंत म्हणून प्रचंड ताण-तणाव पेलावा लागला.

हेही वाचा : ...तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

जगाची कलापंढरी

नवनिर्मितीचा आणि नवजागृतीचा हा काळ फ्लॉरेन्समधे सांस्कृतिक प्रगतीसाठी धर्मावर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वाने ज्ञानाची नवनवीन क्षितीजं शोधणाऱ्या कलावंतांसाठी आव्हानात्मक होता. विंची- अँजेलो-राफाएल यांच्या कलाकृतींमधे त्यांची घुसमट-तणाव स्पष्टपणे जाणवते. मानवी समाजाच्या संक्रमण काळात त्यांच्यासारख्या कलावंतांनी जुन्या चौकटीत राहून नवीन जगाची बीजं अशा सफाईनं पेरली होती,की नजीकच्याच भविष्यात ही जुनाट चौकटच उद्ध्वस्त झाली.

फ्लॉरेन्समधील ही कलाक्रांती शिल्पकला, चित्रकला, स्थापत्य या कलांमधे प्रामुख्याने झाली असली, तरी काळाच्या ओघात सर्वच कलांना या क्रांतीने कवेत घेतलं. धार्मिक दहशहतावादाच्या बळावर फ्लॉरेन्सच्या सांस्कृतिक वैभवाची होळी करणाऱ्या सॅवानारोला या धर्मगुरूला त्याच पियाझा डेला सिन्योरिया चौकात फासावर लटकवण्यात आलं.

त्यानंतर फ्लॉरेन्सने आपलं कलावैभव केवळ प्राप्तच केलं नाही, तर शिखरावर नेलं. यामुळेच सर्वाथाने जगाला बदलवणाऱ्या रेनेसान्सच्या चळवळीची सुरवात कलेच्या क्षेत्रातून करणारं फ्लॉरेन्स खरोखर जगाची कलापंढरी ठरली.

हेही वाचा : 

धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी