जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

१७ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


‘मी कधीही लेखक होण्याचं ठरवलं नव्हतं. मी जे बोललो ते लिहिलं. आपलं बोलणं वेगळं असलं की आपलं लिखाणंही आपोआप वेगळं होतं. माझं लिखाण साहित्य म्हणून ओळखलं जावं असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी लिहित होतो. माझ्यामुळे कुणालातरी मदत व्हावी.’ साहित्य अकादमीच्या लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमात अनिल अवचट बोलत होते.

कार्यक्रमः लेखक आपल्या भेटीला
ठिकाणः साहित्य अकादमी सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत, दादर, मुंबई
वेळः १४ नोव्हेंबर, सायंकाळी ६ वाजता
वक्ते: अनिल अवचट
विषयः माझ्या लेखक होण्याची गोष्ट

 

१. चांभारकाम, सुतारकाम करायचो

माझं बालपण पुण जिल्ह्यातल्या ओतूर या गावी गेलं. लहानपणी मी महारवाड्यात फार वेळ घालवत असे. तेव्हा धर्मपरिवर्तनाचा विचार बाबासाहेबांनी मांडला नव्हता. आमच्या शाळेतले एक शिक्षक चांभार होते. या शिक्षकांकडे माझी शिकवणी चालू होती. मी शिकवणीला जाई तेव्हा त्यांचे भाऊ घरात चांभारकी करत असायचे. माझं अभ्यासात लक्ष लागायचं नाही. मी ते कसं काम करतायत हे बघत बसायचो.

एकदा मोठा झाल्यावर मी चांभारकामाचं सगळं सामान आणलं आणि बसून चप्पल दुरुस्त करायला लागलो. चप्पलेचा सोल व्यवस्थित घालता येत होता. अंगठा शिवता येत होता. टाचा लावता येत होत्या. हे सगळं व्यवस्थित जमतंय हे कळल्यानंतर मी बाहेर पाटी लावली ‘इथं चपला दुरूस्त केल्या जातील’ अशी.

सुतारकामाचंही असंच. सुताराच्या दुकानात मी जाऊन बसायचो. त्या लाकडाचा वास मला फार आवडायचा. सुतार लाकडाला कसं तासतो, त्याला आकार कसा देतो हे मी फार निरखून पाहत बसायचो. लोहाराकडे साखळी ओढायला बसायचो. माझं अभ्यासात कधीच डोकं चाललं नाही. पण अशा गोष्टीत मला फार रस होता. त्याचा फायदा मला नंतर छंद जोपासताना झाला.

२. ते तुला एवढं सगळं कसं सांगतात?

एकदा माझ्या एका महार मित्राच्या मैत्रिणीला कांजण्या आल्या. त्याला महार समाजात देवी म्हटलं जायचं. देवी आली म्हणून त्याच्यासोबत आम्ही त्याच्या घरी देवीची भजनं गायला जायचो.

आज मला लोक विचारतात. अनुभव नसताना तू एवढं दलितांवर कसं लिहू शकतोस? ते तुला एवढं सगळं कसं सांगतात? मला या प्रश्नाचं आश्चर्यच वाटतं. कसं सांगतात म्हणजे? ते माझेच लोक आहेत. त्यांना मी किंवा मला ते परके वाटतंच नाही. उलट वाणी, ब्राम्हण लोकांसोबत मी फारसा घरोबा ठेवला नव्हता.

एखाद्याच्या घरी गेलं की त्याची आई प्रेमानं म्हणायची, ‘बस रे बाळा जेवायला.’ मी लगेच बसायचो. हा कोणत्या जातीचा, कोणत्या पोटजातीचा असला विचार कधी करत बसलो नाही. त्यामुळेच या गावानं मला खूप काही दिलं. पण या सगळ्यात मी कधी काही लिहिन, लेखक होईन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. माझं ते कधी स्वप्नच नव्हतं.

हेही वाचा : प्रसिद्धीच्या झोतात असलेला बालकुमार तैमूर

३. जे बोलतो ते लिहायचं

माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. मला कधीच कोणत्या महत्वाकांक्षा नव्हत्या. अजूनही नाहीत. मला कधीही स्पर्धा करावीशी वाटली नाही. ज्याला पहिलं यायचंय त्याला पुढे जाऊ दे. मी शांतपणे, माझ्या गतीने चालणार. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याचं कधी वाईट वाटलं नाही.

डॉक्टर झाल्यावर बिहारमधे काम करण्यासाठी जायचो. बिहारमधे जाता यावं यासाठी आम्ही पैसे जमवायचो, बुट पॉलिश करायचो, वेटरचं काम करायचो. असे त्या काळी म्हणजे १९६६ मधे आम्ही २३ हजार रूपये जमवले. मो. स. साठे हे तेव्हा सकाळचे सहसंपादक होते. ते माझ्या शेजारीच रहायचे. आम्ही बिहारमधे काय काय पाहिलं हे मी त्यांना एकदा सांगितलं. ऐकल्यावर ते म्हणाले आत्ता जे बोलला, ते लिहून आणून दे. मला काही लिहिता वैगरे येत नाही, मी काही लेखक नाही हे मी त्यांना सांगितलं. ते म्हणाले आत्ता जे मला सांगितलंस तेच लिहून दे.

मी घरी गेलो. मला वाटलं काहीतरी कामासाठी त्यांना याची गरज असेल. मी ते सगळं लिहिलं आणि त्यांना नेऊन दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळमधे हाच मजकूर माझ्या नावावर छापून आला. अरे हे तर सोपंय! जे बोलतो ते लिहायचं. माझं लिखाणाविषयीचं भयच गेलं. लेखनाला शैली असावी लागते, अमुक असावं लागतं, तमुक गरजेचं असतं असं मला वाटायचं. पण तसं काहीही नव्हतं. आपण जे बोलतो ते लिहायचं. आणि आपण बोलतो ते वेगळं असेल तर आपलं लिखाणही आपोआप वेगळं होतं हे मला कळलं.

४. हा कसला भारत आहे?

बिहारमधे रस्त्यावरून छोटी छोटी पोरं जायची. अन्न-पाण्यावाचून एकदम वाळून गेली होती. कुपोषणाचा महोत्सवच तिथं चालूय असं वाटावं. ही पोरं रस्त्यानं जायची तेव्हा सांगाडे चालले आहेत असं वाटायचं. एकदा एका सकाळी दार उघडलं तर एक बाई दारात मरून पडली होती. डॉक्टरचं घर म्हणून तिनं मदत मागायला दार वाजवलं असणार. पण आम्हाला कळलंच नाही. त्यावेळी त्या बाईला एक घास जरी मिळाला असता तरी तिचा जीव जगला असता.

बिहारमधे अर्भकाच्या खाणी होत्या. पोरं १०-१२ वर्षाची झाली की या खाणीत कामाला लागायची. त्यातल्या कणांनी त्यांना टीबी व्हायचा. आणि ३० व्या वर्षीच माणूस मरून जायचा. सगळ्या गावात २५-३० वयाच्या पुढचा एक माणुस नाही. आम्ही टीबीची औषधंही नेली नव्हती. आणि नेली असती तरी एवढ्या लोकांना वर्षभर तरी पुरली असती का?

एकदा कसलंस औषध देताना तिथला एक म्हातारा माणूस म्हणाला, ‘पोटात नाही अन्न आणि औषध कसलं देताय डॉक्टर?’ माझ्यासमोर एक भयाण सत्य उभं राहिलं. हा कसला भारत आहे? ही आपली माणसं आहेत. पण यांचं भवितव्य काय? मी फार अस्वस्थ होत असे.

हेही वाचा : आणि डोक्यावरचे केस काढून मी खरंखुरं सौंदर्य मिळवलं!

५. गरिबी हा विषय फार जवळचा

डॉक्टरकीची प्रॅक्टिस करायची. छोटंसं क्लिनिक काढायचं अशी स्वप्न मी आणि माझ्या घरचे रंगवत होतो. बाबा मला फार सुंदर मुलगी बघून देणार होते. ही स्वप्न मागं सोडली. आपलं छोटं आयुष्य आहे. त्यात जी काही थोडी फार क्षमता असेल ती या लोकांसाठी खर्च करायची असं मी ठरवलं.

गरीबांकडे माझ्यासाठी न संपणारा ओढा होता. आजही आहे. हॉस्पिटलमधे शिकताना आजारी व्यक्ती असायची. त्यांच्याजवळ कुणी नसायचं. त्यांना धाप लागलेली असायची. मी सिस्टरला सांगायचो. सिस्टर म्हणायची. ‘मरने वाला है वो.’ मी त्या माणसाचा हात हातात घेऊन बसायचो. आणि अशी माणसं माझ्या समोर जायची. त्यांच्या आसपास कुणी एक अश्रु ढाळायलासुद्धा नव्हतं. आपल्याकडे मृत्यूचे सोहळे होतात. इथं एक अश्रू गाळला जात नाही.

रक्ताची बाटली आणायला जमलं नाही म्हणून एक बाळ आईच्या मांडीवर मेलं. ही दुनियाच वेगळी आहे. आपल्याकडे किती झगमगीत हॉस्पिटल्स आहेत आणि इथं एक बाटली आणण्याइतकाही पैसा नाही. जात-पात, धर्म यापेक्षा गरिबी हा विषय मला फार जवळचा वाटतो. मी त्याबद्दल लिहित होतो.

६. जे पटलं, ते माझं मत

या सगळ्यात एक गोष्ट लक्षात आली. बाहेरचं एक वास्तव आहे. तसं आतही एक वास्तव आहे. तेही निरखून बघायला हवं. आपण काय आहोत हे शोधायला हवं. मी दहावीला हॉस्टेलमधे रहायला आलो. आणि तिथल्या मुलांच्या संगतीनं बिघडलो. मी त्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी केल्या त्याची मला लाज वाटायची. नंतर कळलं त्या वर्षानं काही तरी शिकवलंय. काय शिकवलंय? तर  बिघडणं म्हणजे काय हे शिकवलं. त्यातून मी जे बाहेर आलो ते कायमचा.

आत येणाऱ्या आठवणी, आत येणारे विचार यांच्यावर मी लिहित गेलो. ‘स्वतःविषयी’ असं एक पुस्तक लिहिलं. माझ्या दोन मुलींनी मला खूप शिकवलं. मी त्याबद्दलही लिहिलं. देवाच्या बाबतीत मी फारच उदासीन आहे. पण आपले संत जे सांगतात ते जगण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी त्यांच्यावर लिहिलं. कबीर, तुकोबा, ज्ञानेश्वर यांच्याबद्दल मला काय वाटतं ते लिहिलं.

कधी कुठल्यातरी एका पक्षासाठी किंवा विचारधारेविषयी लिहावं असं मला वाटलं नाही. मला जे पटेल ते माझं मत असलं पाहिजे, असा माझा आग्रह होता. आणि मी तेच लिहिलं. छंदांविषयी लिहिलं. ओरीगामी हा माझा आवडता छंद. इतर कोणत्याही कलेपेक्षा ही कला वेगळी आहे. ही कला दुसऱ्यांना शिकवता येते, देता येते. त्यातून त्याचा आनंद द्विगुणित होतो. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो अशा सगळ्या प्रसंगाविषयी मी लिहिलं.

हेही वाचा : आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?

७. लेखनाने इतरांना मदत होणं हाच मोठा बहुमान

रस्त्यावरून स्कूटरने जाताना हातगाडी ओढणारे आजोबा दिसायचे. सिग्नलवर भीक मागणारी मुलं दिसायची. मला वाईट वाटायचं. हे असं सगळं मी पाहत होतो. जे पाहत होतो ते सगळ्यांना सांगत होतो. जे सांगत होतो ते लिहित होतो. माझ्या लिखाणाला कधी कोणती पद्धत नव्हती. मी साहित्य लिहावं असं कधी मला वाटलं नाही. किंवा मी लिहितोय त्याला साहित्याचा दर्जा द्यावा, असंही माझ्या मनात नव्हतं.

माझ्या लेखनाला पुरस्कार मिळावेत अशी माझी इच्छा नव्हती. एकदा रस्त्यात विं. दा. करंदीकर त्यांच्या नातीला घेऊन उभे होते. माझी नातीशी ओळख करून देताना हे फार मोठे लेखक आहेत. यांच्या पुस्तकाला खूप पुरस्कार मिळालेत असं ते म्हणाले. मला काही पुरस्कार मिळाले नव्हते. पण करंदीकरांनी माझं कौतूक केलं तेव्हा मला पुरस्कार मिळाला.

बाबा आढाव यांच्यासोबत काम करताना दलित महिला पत्र लिहून मला त्यांची समस्या सांगायच्या. मग मी आणि बाबा त्यांना मदत करायला जायचो. या महिला मला भाऊ म्हणायच्या. माझ्यासाठी हाच सर्वात मोठा बहुमान होता. समाजतल्या लोकांना आपण आपले वाटतो यापेक्षा मोठा कुठलाही बहुमान मला वाटत नाही.

८. आपल्याला असं जगायचं!

सुनंदा म्हणजे माझी बायको गेली तेव्हा सुनंदाला आठवताना असा एक लेख मी लिहिला. एका कॅन्सरग्रस्त बाईंनी तो वाचला. त्यांच्या नवऱ्यालाही वाचून दाखवला आणि नवऱ्याला म्हणाल्या, ‘असं जगायचं.’ आपल्या लिखाणाचा दुसऱ्यांना उपयोग होतो यापेक्षा आणखी मोठा कुठला पुरस्कार असेल? आणखी कसलं साहित्य अकादमी असतं?

मी फक्त एकाच कारणासाठी लिहित होतो. ते म्हणजे या गरीबांचं जगणं मांडता यावं म्हणून. मी लिहिल्यावर त्यांचं जगणं कुणातरी संवेदनशील माणसापर्यंत पोचेल. त्या माणसाची संवेदना जागी होईल आणि ते या माणसांना मदत करण्यासाठी पुढे येतील.

हेही वाचा : 

अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?

मार्वलच्या सुपरहिरोंना मार्टिन स्कॉर्सेसी सिनेमा का मानत नाही?

स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

भाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं