कॅम्पा कोला : एका देशी ब्रँडची वापसी

१३ मार्च २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


७०च्या दशकात कॅम्पा कोला या सॉफ्ट ड्रिंकनं भारतीय बाजारात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पुढे परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत हा ब्रँड कायमचा बंद झाला. आता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं कॅम्पा कोलाला खरेदी केलंय. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली त्याला बाजारात उतरवत कोकाकोला, पेप्सीसारख्या परदेशी ब्रँडना टक्कर देण्याची तयारी अंबानी करतायत.

१९७७ची गोष्ट. आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींचा पराभव करत लोकांनी जनता पक्षाचं सरकार सत्तेत आणलेलं होतं. ही सगळी मंडळी समाजवादी विचारांची होती. यातल्याच जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे नव्या सरकारमधे उद्योग खात्याचा प्रभारी कारभार आलेला होता. कारभार हाती घेताच त्यांनी फेरा कायद्याचं पालन बंधनकारक केलं. या कायद्यानं परदेशी कंपन्यांची चांगलीच गोची होणार होती.

त्याकाळी भारतातल्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाजारात कोकाकोला या अमेरिकन ब्रँडची हवा होती. सॉफ्ट ड्रिंक म्हटलं की हमखास कोकाकोलाचं नाव घेतलं जायचं. कोकच्या बॉटल हे त्यावेळच्या तरुणांचं 'स्टाईल स्टेटमेंट' बनत होतं. पण कोकाकोलानं फेरा कायदा धुडकावून लावला आणि कंपनीवर भारतातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. एक जगप्रसिद्ध कंपनी भारतातून बाहेर पडली.

कोकाकोलाच्या जाण्यानं भारताच्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाजारात देशी कंपन्यांना संधी निर्माण झाली. हीच संधी हेरत बिस्कीट बनवणाऱ्या पार्ले कंपनीच्या चौधरी बंधूंनी लिम्का, गोल्डस्पॉट अशी कोल्ड्रिंक बाजारात आणली. पुढे प्रचंड लोकप्रिय ठरलेलं 'थम्सअप'ही आलं. त्याला टक्कर मिळाली ती भारतातल्या प्युअर ड्रिंक समूहाच्या कॅम्पा कोलाची. एकेकाळी अनेकांचं मार्केट खाल्लेल्या या देशी ब्रँडला उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्सनं विकत घेतलंय.

हेही वाचा: आरएसएस आणि रिलायन्सच्या ब्रँड वॅल्यूला मोदींमुळे धोका?

गोष्ट कॅम्पा कोलाची

भारताला स्वातंत्र्य मिळून अवघी दोन वर्ष झालेली होती. कोकाकोला हा ब्रँड जगभर पोचलेला होताच पण भारतीयांना त्याची चव चाखायला मिळाली ती १९४९ला. त्यावेळी कोकाकोलाचा जगभरातला बोलबाला पाहून प्युअर ड्रिंक समूहाचे मालक चरणीजीत सिंग यांनी हा ब्रँड भारतभर पोचवायचं ठरवलं. त्याचं लायसन्सही घेतलं. साहजिकच कोकाकोलाच्या बॉटलिंग आणि वितरणाची जबाबदारीही या समूहाकडे आली.

त्यातच सरकारच्या फेरा कायद्यामुळे कोकाकोला भारतातून बाहेर पडलेला होता. त्यामुळे प्युअर ड्रिंकवर आर्थिक संकट येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण कंपनीनं यातच संधी शोधली. कोकाकोला भारतातून गेल्यामुळे सॉफ्ट ड्रिंकच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झालेली होती. त्यातून चरणीजीत सिंग यांनी एक स्वत:चा देशी ब्रँड बाजारात आणायचं ठरवलं. ब्रँडचं नावही ठरलं कॅम्पा कोला

तत्कालीन केंद्र सरकारनंही 'डबल सेवन' नावाचा एक सरकारी कोला बाजारात आणला. पण कॅम्पा कोलासमोर त्याचं काहीच चाललं नाही. त्यातच १९७९ला जनता पक्षाचं सरकार कोसळलं आणि पुढे सरकारी कोलाही. त्याचवेळी चरणीजीत सिंग यांनी कॅम्पा कोलाला स्वदेशीचा मुलामा दिला. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या टॅगखाली त्याचं ब्रँडिंग होऊ लागलं. बघता बघता ब्रँड घरोघरी पोचला. १९७०-१९८० या दशकभराच्या काळात कॅम्पा कोलानं सॉफ्ट ड्रिंकच्या बाजारात अक्षरशः धुमाकूळ घालता होता.

देशी कंपन्यांमधे स्पर्धा

हळूहळू कॅम्पा कोलानं भारतीय बाजारात आपलं वर्चस्व मिळवायला सुरवात केली. सलमान खाननं कॅम्पा कोलाची पहिली जाहिरात केली होती. या जाहिरातीमुळे त्यालाही सिने क्षेत्रातल्या करियरसाठी ब्रेक मिळाला. दुसरीकडे वेगवेगळ्या पार्टी, कार्यक्रमांमधे कॅम्पा कोलाची मागणी वाढत होती. अल्पावधीतच कॅम्पा कोलाची चव भारतीयांच्या जिभेवर रेंगाळू लागली.

त्याचवेळी पार्ले कंपनीनं थम्सअप हे कोल्ड्रिंक बाजारात आणलं होतं. कॅम्पा कोलाला एक तगडी टक्कर मिळू लागली. दोघांमधे स्पर्धा निर्माण झाली. त्यातच पार्ले कंपनीनं थम्सअपच्या बॉटलची साइज वाढवली. 'महाकोला' या नावानं थम्सअपचं नव्यानं ब्रँडिंग केलं. 'द ग्रेट इंडियन टेस्ट' विरुद्ध 'महाकोला' अशी थेट टक्कर होऊ लागली. त्यातच प्युअर ड्रिंक समूहाचे बाजारातले शेअर्सही गडगडू लागले. कंपनीसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं.

१९९०नंतर भारतात उदारीकरणाचं वारं वाहू लागलं होतं. अर्थव्यवस्था पटरीवर येण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी काही धाडसी निर्णय घेण्याचं ठरवलं. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी उदारीकरणाचं तत्व स्वीकारणं हा त्याचाच एक भाग होता. त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतात एण्ट्री झाली.

हेही वाचा: यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

आणि कॅम्पा कोला बंद पडलं

तोपर्यंत जगभरात ब्रँड म्हणून उभ्या राहिलेल्या कोकाकोला आणि पेप्सीको या दोन्ही कंपन्यांना पुन्हा एकदा भारतात यायची संधी मिळाली. १९९३नंतर कोकाकोला आणि पेप्सी या दोन्ही कंपन्यांनी सॉफ्ट ड्रिंकचं ८० टक्के मार्केट आपल्या ताब्यात घेतलं. आता त्यांच्यासमोर भारतीय कंपन्यांचा टिकाव लागणं कठीण होतं. अशातच कोकाकोलानं पार्ले कंपनीचा थम्सअप हा ब्रँड विकत घेतला. एक स्पर्धक कमी झाला.

हळूहळू कोकाकोला आणि पेप्सीकोनं भारतीय बाजारात आपलं वर्चस्व मिळवलं. चव हीसुद्धा या ब्रँडची जमेची बाजू होती. शिवाय ब्रँड म्हणून पूर्वीचा अनुभवही गाठीशी होता. दोघांच्याही जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि जाहिरातीनं कॅम्पा कोलासमोरची आव्हानं अधिकच वाढली. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेत कॅम्पा कोलाचा बाजार कोळसू लागला. १९९२पर्यंत भारतीय बाजारात एकछत्री अंमल असलेल्या कॅम्पा कोलाला उतरती कळा लागली ती लागलीच!

एक ब्रँड उभा करणाऱ्या प्युअर ड्रिंक समूहाचा कारभार एकेकाळी मुंबईतून चालायचा. २००१ उजाडलं तसं कंपनीचा दिल्लीतला बॉटलिंगचा प्लांट आणि कार्यालयही बंद करावं लागलं. काहीकाळ त्याचं थोडंथोडकं उत्पादन हरियाणातून व्हायचं. पण २०१२च्या दरम्यान प्युअर ड्रिंक समूहावर मालकी हक्क नेमका कुणाचा यावरून वाद निर्माण झाले आणि एकेकाळी एक टॉप ब्रँड म्हणून ओळखला जाणारा कॅम्पा कोला इतिहास जमा झाला.

एका देशी ब्रँडचं रिलॉन्चिंग

७०च्या दशकातल्या या लोकप्रिय ब्रँडला पुन्हा एकदा नव्यानं बाजारात आणायची तयारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहानं केलीय. ऑगस्ट २०२२ला रिलायन्सनं २२ कोटींमधे हा ब्रँड विकत घेतलाय. दिवाळीपर्यंत हा ब्रँड बाजारात उतरवायचं नियोजनही केलं जातंय. तसंच येणाऱ्या आयपीएलमधेही कॅम्पा कोलाचं जोरदार मार्केटिंग आणि प्रचार केला जाईल. तसं सूतोवाचही कंपनीकडून करण्यात आलंय.

कॅम्पा कोलाच्या ऑरेंज, लेमन आणि कोला या फ्लेवरची घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय. त्यामुळे नक्कीच कॅम्पा कोलाबद्दल उत्सुकता आहे. याआधीच जिओ मार्टच्या माध्यमातून रिलायन्सनं भारतीय बाजारात मोठं नेटवर्क उभं केलंय. त्याचाच फायदा घेत हे सॉफ्ट ड्रिंक नव्या अंदाजात लोकांपर्यंत पोचवलं जाईल. इतरांच्या तुलनेत कॅम्पा कोलाची किंमतही कमी असेल असं रिलायन्सनं आधीच जाहीर केलंय.

कधीकाळी भारतात कोकाकोला विकण्यावर बंदी होती. आजही कोकाकोलानं आपल्या रेसिपीबद्दल मौन बाळगलंय. त्यामुळेच  कोकाकोलाला भारतातून बाहेर जावं लागलं होतं. कोका इंडस्ट्रीबद्दल लोकांच्या मनामधे शंका असल्याचं दिसतं. त्याचा सॉफ्ट ड्रिंकच्या बाजाराला मध्यंतरी फटकाही बसला होता. अशातच आता अंबानी कॅम्पा कोला घेऊन येतायत.

आर्थिक धोरणविषयक थिंक टॅंक असलेल्या 'इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स'च्या रिपोर्टनुसार, भारतातला सॉफ्ट ड्रिंकचा बाजार २०३०पर्यंत १.४७ ट्रिलियनवर पोचायची शक्यता आहे. सध्या यातल्या ७० टक्के बाजारावर कोकाकोला आणि पेप्सीकोचं वर्चस्व आहे. त्यामुळेच कॅम्पा कोलाला 'द ग्रेट इंडियन टेस्ट' या जुन्याच टॅगखाली बाजारात आणत 'देशी मार्केटिंग'चा फंडा मुकेश अंबानी वापरताना दिसतायत. तो किती चालेल हे येणाऱ्या काळात कळेलच!

हेही वाचा: 

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल