रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा

३१ ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला रेडीचा श्री गजानन खरंतर अवघा ४५ वर्षांचा. पण भाविक आणि पर्यटकांचा ओघ पाहता, येत्या काळात पर्यटकांच्या वाढत्या पावलांनी या गावचा चेहरामोहराच बदलून गेला तर नवल वाटू नये.

काही व्यक्तींची पिढीजात 'श्रीमंत' म्हणून खास ओळख असते. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचंही तसंच काहीसं! निसर्ग संपन्नतेसोबत आलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची वेंगुर्ले तालुक्यातल्या रेडी गावालाही अशीच श्रीमंती लाभलीय. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेलं हे गाव गेल्या ४५ वर्षांपासून तेथील श्री गजानन देवस्थानामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलंय.

अवघ्या ४५ वर्षांचा इतिहास

गणेशाची मंदिर तर अनेक ठिकाणी असतात. सामान्यतः तिथली गणेशमूर्ती चतुर्भुज असते. पण रेडीच्या या देवस्थानातली गणेशमूर्ती स्वयंभू आणि द्विभुज आहे. देशभरात अगदी मोजक्याच ठिकाणी द्विभुज गणेशाच्या मूर्ती आढळतात. म्हणूनच रेडी इथल्या गणेश मंदिराचं महत्त्व अधिक.

शिवाय मंदिराशेजारी असणारा अथांग समुद्राचा विस्तीर्ण किनारा आणि उंच उंच नारळाची झाडं असं निसर्गरम्य, शांत 'कॉम्बिनेशन' भाविकांसह पर्यटकांचा ठावं घेणारं आहे. रेडीमधील गणेश मूर्तीचा लागलेला शोध आणि त्याची प्रतिष्ठापना याबाबत जी माहिती सांगितली जाते तीदेखील अचंबित करणारी आहे. आज महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील लाखो भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या द्विभुज गणेशाचा इतिहास खरंतर प्राचीन नाही; केवळ ४५ वर्षापूर्वीचा आहे.

हेही वाचा  : देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!

गणपती अचानक कसा प्रकट झाला? 

१९७३ मधला एप्रिल महिना. तारीख अठरा. रेडी इथल्या लोहखनिजाच्या खाणीवर ट्रक ड्रायवर म्हणून कामाला असलेल्या सदानंद कांबळी यांनी रात्री काम संपल्यावर आपला ट्रक आणून डोंगरावर लावला. थोड्या वेळाने ट्रक नेहमीच्या जागी लावून ते घरी जाण्याच्या विचारात होते. पण ट्रक काही केल्या सुरू होईना. खूप वेळ प्रयत्न करूनही यश येत नव्हतं. म्हणून ते ट्रकमधेच झोपी गेले. त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडलं.

स्वप्नात गणपतीने दृष्टांत दिला. 'मी इथे आहे, मला बाहेर काढ.' सदानंदना जाग आली. पाहतात तर पहाटेचे चार वाजलेले. त्यांना भीती वाटली. गावात जाऊन या संदर्भात सांगावं म्हणून त्यांनी ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर अनेकदा प्रयत्न करूनही सुरू न झालेला ट्रक क्षणार्धात सुरू झाला. दुसऱ्या दिवशी गावात त्यांनी हा सारा प्रकार सांगितला.

ग्रामस्थ मुळातच श्रद्धाळू होते. तातडीने ग्रामदेवता 'श्री माऊलीचा' कौल प्रसाद घेण्यात आला आणि स्वप्नात संकेत मिळालेल्या जागी खोदकाम सुरू झालं. आठ फूट खोल खणल्यावर गणेश मूर्तीचा मुखाकडील भाग दिसू लागला. एक मे १९७६ ला संपूर्ण मूर्ती दिसू लागली. ती स्वयंभू अन द्विभुज होती. असं सांगतात की या घटनेनंतर रेडी इथे स्वयंभू द्विभुज गणेशाचं 'श्री गजानन' देवस्थान उदयास आलं. या घटनेचे साक्षीदार असणारे स्वतः सदानंद कांबळी आणि त्यांची पिढी आज या गणेशाची मनोभावे सेवा करते.

जांभ्या दगडात कोरलेली मूर्ती

रेडी इथल्या गणेश मंदिरातली ही मूर्ती जांभ्या दगडात कोरलेली आहे. मूर्तीच्या बाहेर मकराकृती कोरीव काम केलेलं आढळतं. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेलाय. मूर्तीला दोन हात आहेच, एका हातात मोदक आहे. तर दुसरा हात आशीर्वाद देतो. मूर्तीच्या समोर मोठा मूषक आहे. गणेश मूर्ती मिळाल्यानंतर सव्वा महिन्याने तिथूनच अर्ध्या किलोमीटरवर तो सापडल्याचे सांगतात.

१९८० चा तो काळ. तेव्हा आत्तासारखा 'सबसे तेज' म्हणवणारा मीडिया नव्हता. सावंतवाडीचे वैनतेय, वेंगुर्ल्यातील किरात अशा साप्ताहिकांनी रेडीच्या द्विभुज गणेशाची दखल घेतली. पण या ठिकाणाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती १९९५ ते २००० या काळात. तेव्हा सिंधुदुर्गात दक्षिणेकडून कूच करू पाहणाऱ्या 'गोमांतक'सह बेळगावचा 'तरुण भारत' प्रामुख्याने सिंधुदुर्गातील घराघरात येऊ लागला होता.

महाराष्ट्रातील एकमेव द्विभुज गणेशाची माहिती या दैनिकांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह बेळगाव कर्नाटक, घाटमाथा आणि गोमंतकात पोचली. मुंबईत चालणाऱ्या प्रादेशिक वृत्तपत्रांनीही कानोसा घेतला. कोकणातील पर्यटनाचा वेध घेणाऱ्या मासिक पुस्तकांनी समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या दुर्मिळ गणपतीला अक्षरशः उचलून घेतलं. 'झी मराठी' वाहिनीवरील 'भटकंती'सह अन्य मालिकांतूनही रेडीचा गणेश चमकला. हा हा म्हणता सर्वदूर पोचला.

हेही वाचा  : मुंबईच्या सिद्धिविनायकाचा महिमा कसा पसरला?

गेल्या पंधरा वर्षांत वाढली वर्दळ

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव, कारवार इथून सिंधुदुर्गात येणारे पर्यटक महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवर असणार्‍या या गणपतीला भेट देऊ लागले. काहीजण श्रद्धेपोटी तर काहीजण उत्सुकतेपोटी. स्थापनेपासूनच रेडीचा हा गणपती नवसाला पावतो, मनोकामना पूर्ण करतो अशी अनेकांची निस्सीम श्रद्धा. हा महिमा कानोकानी सर्वदूर पोचला आणि इवल्याशा रेडीमधे २००५ नंतर भाविकांची वर्दळ वाढू लागली.

रेडी इथल्या गणेश मंदिराच्या स्थापनेनंतर जानेवारीत माघी गणेश जयंती, १८ एप्रिलला वर्धापन दिन या दिवशी मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम होऊ लागले. आता 'अंगारकी'च नाही, तर प्रत्येक संकष्टीला हजारोंच्या संख्येने तिथे भाविक येतात. अंगारकीला ही संख्या ३० ते ४० हजारांच्या घरात असते. एक किलोमीटर होऊन लांब भाविकांची रांग लागते. जणू यात्रेचंच स्वरूप येतं. सिंधुदुर्गातील बहुतांश दैनिकांतून भाविकांच्या गर्दीची छायाचित्र अगदी पहिल्या पानावर झळकतात.

रेडी हे तसा पाच ते सहा हजार लोकसंख्या असणारा छोटासं गाव. गावात रस्तेही चिंचोळेच. इथे १९५७ पासून खाण व्यवसाय चालतोय. त्यातून गावाला रोजगाररुपी आधार मिळालाय. पण आता अर्थार्जनाचा पर्यटनस्वरूपी एक नवा प्रशस्त मार्ग तिथे तयार होतोय. साधारण दहा गावात एखादं ऐतिहासिक स्थळ अथवा लौकिक अर्थाने प्रसिद्ध ठिकाण असलं की तिथे आपोआप 'अतिथी' म्हणून 'लक्ष्मी' हजर होते. 

महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या या रेडी गावाचं भविष्य त्याअर्थाने उज्ज्वल आहे. कारण आज बहुतांश मोठी देवस्थानं पाहिली तर त्यांच्यामागे काही शतकांचा इतिहास आहे. पण रेडीचा गणपती अवघ्या ४५ वर्षांचा आहे. देवस्थानामुळे येणाऱ्या भाविक, पर्यटकांमुळे होणाऱ्या भौतिक विकासाला गेल्या दहा वर्षात चालना मिळू लागलीय.

सेलिब्रिटींचंही श्रद्धास्थान बनत चाललंय

पर्यटकांचं खानपान आणि निवासाची सुविधा यासाठी आता व्यावसायिक पातळीवर ग्रामस्थांतून प्रयत्न चाललेत. मंदिराशेजारील समुद्राचा पर्यटनासाठी कसा उपयोग होईल, याचाही विचार सुरू झालाय. सध्या या मंदिराच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. देवस्थान मंडळ हे समस्त ग्रामस्थ, भाविकांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण करतंय. पुढे जाऊन इथे भक्त निवास बांधण्याचं प्रयोजन आहे. त्यासाठी एमटीडीसीनेही पुढाकार घेतलाय.

देवस्थान समितीतर्फे सामाजिक कार्यही केलं जातं. आज बुजुर्ग मंडळींचं मार्गदर्शन घेत तरुण पिढीतले विनायक सदानंद कांबळी, पुजारी सचिन कांबळी आणि त्याचे सहकारी या देवस्थानचा कारभार पाहताहेत. नजीकच्या काळात स्थान महात्म्यामुळे आपल्या गावात भाविकांचा सागर लोटेल आणि गणेश मंदिरासमोरील सागराच्या लाटा भाविकांच्या मनो किनाऱ्यावर भक्तीच्या लाटा निर्माण करतील, अशी आशा रेडीकर बाळगून आहेत.

रेडीच्या द्विभूज गणेशाच्या चरणी अनेक सेलिब्रिटीज येऊन गेल्यात, येत आहेत. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी दरवर्षी इथे येऊन सचिन तेंडूलकरच्या नावे गणपतीवर अभिषेक करतात. अजित वाडेकर, सुनील गावस्करही इथे येऊन गेलेत. सर्वधर्मसमभावाचा एक अनोखा आदर्शही इथे आपल्याला बघायला मिळतो. दरवर्षी गणेश चतुर्थीवेळी मंदिरात हिंदूंसह मुस्लिम आणि ख्रिश्चनधर्मीय भाविक गणेशासमोर नतमस्तक होतात.

हेही वाचा  : 

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

बाप्पाचा प्रवासः सोवळ्यापासून ग्लोबल फ्रेंड गणेशापर्यंत

दगडूशेठ हलवाई गणपती खरोखर श्रीमंत झाला, त्याची गोष्ट

आपल्या मुलांना वाचायला आवडतील अशा गणपतीच्या पाच गोष्टी

गणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

 

(गोवादूत गणेशोत्सव विशेषांकातून साभार)