म्हशीचे कबाब खाणारा लहानपणीचा मित्र गोरक्षक बनला

१३ मार्च २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. या हिंदूराष्ट्रात मला आणि किसान आंदोलनानंतर आमच्या शीख मित्रांसाठीही कोणतीही जागा राहिली नाही. फरीदी तनवीर यांच्या फेसबुक पोस्टचा हा अनुवाद.

२०१४ नंतर राजकीय विचारावरून दोन गट पडलेले तर स्पष्ट दिसतात. या गटात आपण सगळे विभागलो आहोत. आपले लहानपणीचे मित्रं विभागले आहेत. गळ्यात गळे घालून फिरणारे हिंदू मुस्लिम मित्र आज एकमेकांना देशद्रोही म्हणताना दिसतात. शेतकरी आंदोलनापासून शीखही देशद्रोही, आतंकवादी झाले आहेत. यासगळ्याविषयी सांगताना किसान इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्यूकेशनचे माजी प्राध्यापक फरीदी उल हसन तनवीर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्याचा रेणुका कल्पना यांनी केलेला हा अनुवाद.

टीनएजमधे एक मित्र होता. राजेश अलवानी त्याचं नाव. सिंधी होता. गुड लुकिंग, स्मार्ट आणि अतिशय नम्र. उत्तर प्रदेशातल्या इटावामधल्या इस्लामिया कॉलेजचा मी विद्यार्थी होतो. तिथंच कॉलेजसमोरच्या बाजारात त्याच्या मामाचं प्रसिद्ध ड्रायक्लीनिंगचं दुकान होतं. उत्तर प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री मुलायम सिंगपासून त्यांचा भाऊ शिवपाल सिंग यादवपर्यंत कुटुंबातल्या सगळ्यांचे कपडे आणि माणसाएवढ्या उंचीचे टेडी बियर तिथं धुवायला येत असत. शेजारीच राजेश अलवानी म्हणजेच जोधू भाईचं चपलेचं दुकान होतं.

तोपर्यंत माझी त्याच्याशी ग्राहक दुकानदार, दुआ सलाम आणि हसू परत करण्यापर्यंतच ओळख होती. माणूस खूप प्रेमळ आणि सदाबहार होता. हळूहळू त्याच्याकडून आणि इकडून तिकडून ऐकून त्याच्या आयुष्याची गोष्ट कळाली. त्याच्या आईनं कोणत्यातरी लो प्रोफाईल माणसासोबत लव मॅरेज केलं होतं. त्या माणसानं पुढे सोबत केली नाही. त्यामुळे तो आईच्या माहेरीच जन्मला.

वडील बेजबाबदार होते म्हणूनच बायको आणि मुलांना सोडून कुठेतरी पळून गेले. तो जन्मताच दुःखात बुडालेल्या आईचाही वेदनेनं आणि आजारपणानं मृत्यू झाला. तेव्हा या छोट्या मुलाचं पालनपोषण आईच्या आईनं म्हणजे आजीनं केलं. आता तिचाही मृत्यू झाला होता.

ज्या मामाच्या घरी जोधू रहात होता त्या घरातली माझ्या वयाची, माझ्यापेक्षा मोठी आणि नंतर पुढची पिढीतलीही सगळी मुलं सेंट मेरी कॉन्वेंट शाळेत होते आणि नंतर इस्लामिया कॉलेमधे माझे सिनीयर, ज्यूनियर किंवा काही माझ्याच वर्गात आले. पण जोधूची शिक्षा हीच की त्यानं पहिल्यांदा आपल्या मामाच्या चपलेच्या दुकानात काम केलं आणि नंतर ते स्वतःच चालवू लागला. 

हेही वाचा : मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल

शिक्षण सोडलं तर आमच्यात अनेक गोष्टी सारख्या होत्या. दोघंही कौटुंबिक घटनांमुळे आजोळी आणि मामाच्या घरी रहात होतो. गरिबी, कमतरता आणि एकटेपणातून जात होतो. समाज, व्यवस्था आणि देवाच्या अन्यायापूर्ण वाटपावर नाराज होतो. माझी आई शिक्षिका होती. त्यामुळे शिकण्याचं विशेष सुख मला मिळालं. त्याकडे त्याचीही कमतरता होती. पण व्यावसायिक बुद्धी त्याला अगदी लहानपणापासून मिळाली होती.

तो फाडकन बोलणारा होता. पण मनातलं सगळं खरंखरं सांगून टाकायचा. पैसे कमवणं आणि साठवून ठेवणं त्याची कमजोरी होती. पण एकूणातच प्रेमळ माणूस होता.

त्याच दिवसात इस्लामिया कॉलेजच्या समोर असणाऱ्या उर्दू गल्लीतला ताजुद्दीन रंगबाजी हा मुस्लिम पहिलवान वसुली, गुन्हे, अपहरण इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. मुलगा फारच धाडसी! पोलिसही त्याला घाबरत असत. तो बाजारातल्या छोट्या, कमजोर दुकानांतून सुरक्षा हफ्ता वसुल करत असे. एका महिन्याला त्यानं जोधू भाईकडे पैशाची मागणी केली. ताजुद्दीनची माणसं जोधूला रोज त्रास देऊ लागली. यातून वाचायचं असेल तर हफ्ता द्यायचा आणि सरळमार्गी दुकानदारी करायची असा प्रस्ताव ताजुद्दीनकडून आला होता.

माझा छोटा भाऊ समी याचे जोधूसोबत संबंध माझ्यापेक्षाही चांगले होते. एकदा आम्ही दोघं त्याच्या दुकानासमोरून जात असताना दोन तीन गल्लीतले मुस्लिम गुंडं जोधूला मारहाण करत, शिव्या देत, धमकावत होते. आम्ही दोघे भाऊ मधे पडलो. चौकात लोकांना तमाशा बघायला मिळाला. आम्ही दोघांनी ताजुद्दीनच्या या चमच्यांना रस्त्यावर पाडून पाडून मारलं. माफी मागायला लावली आणि मगच सोडलं. ‘आता हे दुकान आमचं आहे, बघूच कोण हफ्ता वसूल करायला येतंय किंवा कोण तोडफोड करतंय,’ असं म्हणत जोधूला न घाबरण्याचा विश्वास दिला. 

या घटनेनंतर आम्ही नेहमी त्याच्या दुकानावर बसू लागलो. नंतर ताजुद्दीनने आपला बाजार खराब होतोय म्हणून जोधू आणि आमच्यासोबत तडजोड केली. बाकी दुकानं हातातून सुटू नयेत, असं त्यांना वाटत असावं. एकदा ताजुद्दीन रात्री स्टेशन रोडवर चोरी करताना साध्या कपड्यात आपल्या मुलासोबत घरी येणाऱ्या पोलिसाशीच जाऊन भिडला. मुलाच्या डोक्यावर पिस्तुल रोखत सगळा माल बाहेर काढ, असं म्हणाला. इन्स्पेक्टरने मालाच्या ऐवजी आपली रिवॉल्वर काढली. पिस्तुल गळून पडली आणि साध्या वेशातल्या पोलिसानं त्याला गोळी मारली, असं म्हटलं जातं. ती गोष्ट पुन्हा कधी तरी सांगतो.

हेही वाचा : आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

तर, अशा प्रकारे जोधू भाई आणि माझ्यामधली तोंडओळख हळूहळू मैत्रीत बदलली. त्याच्या कुटुंबात सगळे लोक असतानाही तो अनाथासारखं जगत होता. माझ्या कुटुंबात त्याला आई मिळाली, बहिणी मिळाल्या, छोटा भाऊ मिळाला. तो आजही माझ्या आईच्या पाया पडतो. माझ्या बहिणींकडून राखी बांधून घेतो. 

त्याच्या पहिल्या अफेअरवेळी मुलीशी बोलायची त्याची हिंमत होत नव्हती. तर मीच त्याच्या पहिल्या क्रशला पहिल्यांदा त्याच्या दुकानावर बोलावलं आणि त्याच्यावतीने प्रपोजही समोर ठेवलं. भेटणं, भेटवणं, कार्ड, वॅलेंटाईन, बर्थ डे गिफ्टची खरेदी सगळ्यात मीच सोबत होतो.

व्यापारतही पार्टनर झालो. एकमेकांच्या मित्रांचे मित्र बनलो. आमच्या मित्रांचा एक खास गट तयार झाला होता. यात हिंदू होते, मुस्लिम होते, शीख होते, पंजाबी होते, सिंधी होते आणि ख्रिश्चन मित्राची कमतरता एक मित्र पूर्ण करत होताच. त्याचं आजोळ ख्रिश्चन होतं. आडवाणींचा उदय होत होता तेव्हा जोधू सिंधी असूनही मुलायम सिंग यादव राजकीय कुटुंबात होता. 

आम्ही पहिली दारू सोबत पिली. ड्रिंक सेशन सोबतच सुरू केले. रात्री उशीराचे हिंदी सिनेमाचे शो पाहिले आणि अडल्ट, पॉर्न फिल्मही लपूनछपून पाहिल्या. बीफ बिर्याणीच्या बाबतीत मात्र आधी फक्त भात घेण्यापासून सुरवात केली. नंतर कबाब आणि म्हशीच्या पायांपर्यंत सोबत पोचलो. या सगळ्यात तो त्याच्या मर्जीनुसार सामील झाला आणि मी माझ्या मर्जीनुसार. 

सुरवातीच्या संघर्षातले सोबती आणि साक्षी झालो. त्याच्या दुसऱ्या मुस्लिम आणि पंजाबी पार्टनरसोबत त्याने ट्रक बनवायचा व्यवसाय करण्याचा घाट घातला होता. त्यात त्याला मिळालेल्या धोक्याचाही मी साक्षी आहे. मी त्याला सूचना दिली होती. यात गुंतू नकोस, पैसे बुडतील हे सांगितलं होतं. पण त्याने माझ्यापासून लपवून त्यात पैसे गुंतवले. नंतर दिवाळखोर होऊन परत आला. तेव्हाही मी त्याच्या सोबत होतो.

माझा अपघात झाला. माझ्या सोबत असणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. जवळपास एक वर्ष माझ्या पायावर वेगवेगळी प्लॅस्टर घालणं आणि ऑपरेशन करणं चाललं होतं. पाय वाचणारच नाही, असं वाटत होतं. आयुष्यभर अपंगत्वासोबत जगावं लागलं असतं. अनेक मित्र तेव्हा साथ सोडून गेले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी माझ्या घराऐवजी जोधूच्याच भाड्याच्या वन रूम किचनमधे राहिलो. वेड्याने कित्येक महिने पॉटमधून माझी लघवी करायला लावी. पॉटमधली माझी घाणही तोंडावर फडकं बांधून साफ केली.

हेही वाचा : उत्तर प्रदेशचा लव जिहाद कायदा संविधान विरोधी का ठरतो?

माझ्या अफेअर्सची गुपितं त्याच्याकडे होती. माझ्यावर लागलेले गुन्हे, खटले, जामीन, जेल... सगळ्या दुःखात तो माझ्या सोबत उभा राहून आधार देत होता. काळ गेला तसा एका चांगल्या सर्जनच्या कृपेनं मी परत माझ्या पायांवर उभा राहिलो. एनबीएफसी कंपनीत नोकरी केली. कोट्यवधीचा व्यवसाय केला. कंपनी डबघाईला आली. पुन्हा गुन्हे, खटले यांना सामोरं गेलो.

त्या कंपनीच्या खटल्यातून बाहेर पडण्यासाठी, पैशाची जमवाजमव करण्यासाठी, नेते, कोर्ट, लखनऊ, अलाहाबाद, दिल्ली, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या मी चकरा मारत होतो. तेव्हाच जोधूने लग्न केलं. दोन मुलंही झाली आणि आपला इटावामधला व्यवसाय बांधून तो जयपूरमधे स्थलांतरित झाला.

ही तेव्हाची गोष्ट जेव्हा यूपीएचं दुसरं सरकार शेवटच्या घटका मोजत होतं. या दरम्यान मी पुन्हा शिकायला सुरवात केली. आग्रा युनिवर्सिटीतून बीएड, मेरठ युनिवर्सिटीतून एमएड, बुंदेलखंड युनिवर्सिटीतून एम फिल आणि बनारसमधून पीएचडी करण्यासाठी, वेगवेगळे कॉलेज आणि संस्थांमधे शिकवण्याच्या नोकरीसाठी खूप काळ वेगवेगळ्या शहरात राहिलो. या काळात आमची साथ भौतिकदृष्ट्या सुटली. करिअरमधली आमची ध्येय वेगवेगळी होती. त्यामुळे आम्ही दूर झालो. व्यवसायात प्रगती करून तो लखपती, करोडपती झाला आणि हिंदुत्वाकडे त्याचा कल झुकला.

मी माझा अभ्यास, संशोधन, वेगवेगळ्या युनिवर्सिटीमधलं विवेकवादी वातावरण यामुळे थोडा नास्तिक होतो तो संपूर्णच नास्तिकतेकडे झुकलो. या दरम्यान देशात मोबाईल क्रांती होत होती. आम्ही फोनवर जोडलेले होतो. एकमेकांची विचारपुस करत होतो. मग सोशल मीडिया आणि वॉट्सअपचा काळ आला.

हा मोदीजींना खोट्या स्तुतींच्या माध्यमातून राष्ट्रीय क्षितिजावर स्थापन करायचा काळ होता. दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होताना आरक्षणविरोधी तत्त्व, संघाचे स्टॉल आणि प्रचार बघून माझे स्वतःचे भ्रम दूर झाले होते. पहिले गुजरात मॉडेलची वाहवा सुरू झाली. नंतर संघाने मुस्लिमांविरोधात आक्रमक कुप्रचार सुरू केला. डाव्या विचारांचे आयटीसेलही याच दिवसांत अस्तित्वात आले.

मोदीजींच्या उदयासोबत माझे तो मित्र आणि दुसरे शीख मित्रही संघी वॉट्सअपवरचं ज्ञान फक्त आपल्या फेसबुक वॉलवरच पोस्ट करत नव्हते तर वॉट्सअपवरून मला पर्सनलवरही पाठवत होते. तेव्हा मी फेसबुकवर काहीही लिहीत किंवा पोस्ट करत नव्हतो. आता लहानपणीचा मित्र देशद्रोही झाला होता. कश्मीरी होता. आतंकवादी होता. गौ भक्षक होता. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती भवनात रोजानंतरचा नाष्टा का ठेवतायत असे प्रश्न फक्त सिंधी दोस्तच नाहीत तर काँग्रेसशी नाराज झालेले शीखही विचारात होते.

आता शेतकरी आंदोलनानंतरचं शीख मित्रांचं मत काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. मी त्यांना शोधतोय. पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतोय. त्यांचे नंबर शोधतोय आणि सिंधी मित्रांचं सकारात्मक परिवर्तन कधी होतंय याची वाट बघतोय. म्हशीचे कबाब आणि पायांमधे नल्ली मटणाच्या गराची मागणी करणारा मित्र गोरक्षक बनला होता. तो अखलाखच्या हत्येचं समर्थन करत होता.

मुस्लिम मुलींशी सेटिंग लावण्यात ज्याची मी मदत करत होतो तो राजस्थानमधल्या अफराजूलच्या हत्येला लव जिहादची प्रतिक्रिया म्हणत होता. कश्मिरी मुलगी आसिफाच्या बलात्कार आणि हत्येला तिरंगात झाकून ठेवत होता. माझ्या कुटुंबातल्या म्हाताऱ्या आज्यांना शाहीनबागमधे बसलेलं बघून आईबहिणीवरून शिव्या देत आतंकवाद्यांच्या आया म्हणत होता.

हेही वाचा : कोकणी मुसलमानांचे पूर्वज होते तरी कोण?

मोदीजींचा उदय करण्यासाठी उभारलेल्या द्वेषाच्या निवडणूक स्ट्रॅटेजीने देशातल्या लोकांकडून लहानपणातल्या, टीनएजमधल्या, तारुण्यातल्या गोड धर्म निरपेक्ष आठवणी हिसकावून घेतल्यात. या आठवणींमुळेच तर भारत समृद्ध होता.

माझ्या लहानपणीचे दुसऱ्या धर्माचे, जातींचे ते सगळे हिंदू मित्र तितक्याच सहजतेनं मिळावेत आणि हिंदुत्वचा प्रसार व्हायचा आधी आम्ही जगत होतो तसंच जगावं, असं नेहमी वाटतं. बाबरी उद्ध्वस्त झाली आणि राम जन्मभूमीच्या यात्रा निघाल्या तेव्हाही मित्रांचे धर्मनिरपेक्ष ग्रुप तुटले नव्हते...एका माणसाला देशावर थोपवण्यासाठी आयटीसेलने खोट्याची माळ रचली. 

लहानपणी जोधू कल्पना करायचा की आपण पाच सहा मजल्यांची अशी इमारत बांधू जिथं प्रत्येक मजल्यावर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन मित्र भविष्यात आपल्या बायका पोरांना घेऊन एकत्र राहू शकतील. तोच जोधू आजकाल हिंदू राष्ट्राची मागणी करतोय. जिथं कमीतकमी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कोणतीही जागा नाहीय. आता किसान आंदोलनानंतर कदाचित त्यात परविंदर सिंग संधू म्हणजेच गोल्डी आणि हरमिंदर सिंग किंद्रा म्हणजेच बिट्टूसाठीही कोणतीही जागा राहिली नसेल.

हेही वाचा : 

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?

कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय झालं?