कोरोनानंतर व्यावसायिक सिनेमा झपाट्यानं बदलतोय. दर सिनेमागणिक स्टारडमच्या व्याख्या बदलतायत. कालचा स्टार आज शिळा होतोय, तर आजच्या स्टारला पुन्हा चमकण्यासाठी अवाढव्य बजेटच्या कुबड्या लागतायत. या सगळ्या कोलाहलात आपणच या व्यावसायिक सिनेसृष्टीचे खरे बाप आहोत, हे काही जुने स्टार छातीठोकपणे दाखवून देतायत. ‘गदर २’ आणि ‘जेलर’ला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद हेच सांगतोय.
ऑगस्टमधला गेला वीकेंड हा व्यावसायिक सिनेमांसाठी वरदानच ठरलाय. कमाईच्या अनेक वेगवेगळ्या विक्रमांनी या आठवड्यात तिकीटबारी गाजवली. साधारणतः मोठमोठ्या सिनेमांना एकत्र रिलीज झाल्याने फटका बसताना दिसतो. पण गेल्या आठवड्यात आमनेसामने रिलीज झालेल्या 'गदर २', 'जेलर' 'ओएमजी २' आणि 'भोला शंकर' या चारही मोठ्या सिनेमांनी दणक्यात कमाई केलीय.
त्यातही 'गदर २' आणि 'जेलर'ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद अक्षरशः अद्भुत आहे. स्टारडमच्या प्रस्थापित व्याख्यांना सुरुंग लावत या सिनेमांनी आपलं वर्चस्व तिकीटबारीवर जमवलंय. प्रमोशन आणि मार्केटिंगच्या वेगवेगळ्या आयडिया लढवत, आपलं नसलेलं स्टारडम उगाच मोठं करून दाखवणाऱ्या युवा पिढीला अस्सल स्टारडम काय असतं हे सध्या 'गदर २'मधून सनी देओल आणि 'जेलर'मधून रजनीकांत दाखवून देतोय.
२००१मधे 'गदर: एक प्रेम कथा' रिलीज झाला. सनी देओल, अमरीश पुरी आणि अमिशा पटेल हे तिघे यात मुख्य भूमिकेत होते. फाळणी, भारत-पाक वैर, आंतरधर्मीय प्रेमकथा आणि देशप्रेमाची झालर लावलेला हा सिनेमा त्यावेळी तुफान चालला. यातले कित्येक संवाद आणि प्रसंग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत, याची पोचपावती म्हणजे 'गदर २'ची कमाई.
आपल्या बजेटच्या चारपट कमाई करणारा 'गदर २' हा 'गदर: एक प्रेम कथा'चा सिक्वेल आहे. ही कमाई पाहता, देओल कुटुंबाचा लाडका दिग्दर्शक अनिल शर्मा २२ वर्षांनंतरही पहिल्या 'गदर'सारखं यश मिळवण्यात यशस्वी ठरलाय, असंच म्हणावं लागेल. दिवंगत अभिनेते अमरीश पुरींची सीजीआयच्या मदतीने साकारलेली व्यक्तिरेखा हे या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य.
'गदर २'ची कथा पहिल्या 'गदर'च्या सतरा वर्षांनंतर सुरू होते. १९७१च्या तिसऱ्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी या कथेला लाभलीय. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या आपल्या लेकाला वाचवायला जाणारा बाप ही या सिनेमाची साधीसरळ कथा. पण या बापलेकाच्या कथेला देशप्रेमाचा बूस्टर डोस पाजला गेल्यामुळे हा सिनेमा तिकीटबारीवर करोडोंची उलाढाल करताना दिसतोय.
सनी देओलने साकारलेला तारासिंग आता म्हातारा झालाय. पण त्याच्या मनातली देशभक्ती अजूनही जवानच आहे, हे पदोपदी जाणवत राहतं. 'गझवा-ए-हिंद', युद्धकैद्यांची परिस्थिती, पाकिस्तानातली राजकीय अनागोंदी अशा अनेक संवेदनशील विषयांना हात घालत 'गदर २' देशप्रेमाचा निखारा शेवटपर्यंत धगधगता ठेवतो. पहिल्या 'गदर'मधला 'हिंदुस्थान जिंदाबाद'चा गाजलेला प्रसंग इथेही आहे, पण त्याला 'वंदे मातरम' जोडल्याने देशभक्तीचा मीटर आणखीनच उंचावला गेलाय.
एकीकडे तिकीटबारीवर लागलेला देशभक्तीचा मीटर जोरात पळतोय, तर दुसरीकडे रजनीभक्तीच्या लाटेत तिकीटबारी दिवसरात्र धुवून निघतेय. सुपरस्टार रजनीकांतची मध्यवर्ती भूमिका असलेला जेलर हा मूळचा तमिळ सिनेमा कन्नड, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम भाषेत रिलीज केला गेलाय. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमारचा हा चौथा सिनेमा. आता 'जेलर'च्या निमित्ताने ओळीने चार हिट देत नेल्सन आता महत्त्वाच्या तमिळ दिग्दर्शकांपैकी एक बनलाय.
काही वर्षांपूर्वी जेलर असलेल्या बापाने आपल्या एसीपी असलेल्या पोरासाठी एका कुख्यात तस्कर टोळीशी घेतलेला पंगा, ही 'जेलर'ची मूळ कथा. या अगदीच साधारण वाटणाऱ्या या कथेला खास रजनी टच लाभलाय. कन्नड, तेलुगू आणि मल्याळम सिनेसृष्टीतल्या मोठमोठ्या नावांचा आणि तितक्याच जबरदस्त कॅमिओंचा यात भरणा असला, तरी 'जेलर'च्या कमाईचं सर्वाधिक श्रेय जातं ते यातल्या 'रजनी टच'लाच.
तमिळनाडूमधे रजनीकांत 'तलैवा' म्हणून ओळखला जातो. तलैवा म्हणजे बॉस, स्वामी. साडेचार दशकांहून अधिक काळ रंगलेली रजनीकांतची सिनेकारकीर्द कोणत्याही सिनेकलाकाराला हेवा वाटावी अशीच आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर रजनीकांत तमिळ अस्मितेचं एक महत्त्वाचं प्रतीक बनलाय. तमिळ सिनेरसिकांच्या प्रेमामुळे जिवंतपणीच देवत्व लाभलेल्या रजनीकांतचा कुठलाही सिनेमा आजही एक लोकोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. 'जेलर'ही त्याला अपवाद नाही.
'जेलर' कॉर्पोरेट विकेंडच्या एक दिवस आधीच म्हणजेच १० ऑगस्टला रिलीज झाला. त्या दिवशी तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईत लोकोत्सव होणं साहजिकच होतं. पण त्याचबरोबर हैद्राबाद, बंगळुरूतही ऑफिसला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. रजनीकांतची लोकप्रियता आणि भक्ती ही कुठल्याही प्रादेशिक-भाषिक चौकटीपुरती मर्यादित नाही हेच या सुट्ट्या छातीठोकपणे सांगतायत.
'गदर २' आणि 'जेलर'ला सर्वच आर्थिक वर्गातल्या प्रेक्षकांचा लाभलेला प्रतिसाद हा स्टारडमच्या प्रस्थापित व्याख्यांना सुरुंग लावणारा ठरलाय. पन्नाशीनंतरही तरुण दिसण्यासाठी सीजीआयची मिनतवारी करणारे, पिकलं पान असलं तरी आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करणारे, मार्केटिंग आणि पीआरवर भरमसाठ खर्च करणारे सगळेच स्वयंघोषित स्टार आणि त्यांचा तथाकथित स्टारडम या दोन सिनेमांनी प्रश्नांकित केलाय.
सनी देओलने पासष्टी ओलांडलीय. रजनीकांतही सत्तरीच्या पलीकडे गेलाय. त्यांचं वय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतंय. अर्थातच, त्यांना ते लपवणंही सहज शक्य आहे. पण प्रेक्षकांना काय आवडतं हे दोघांनाही बरोबर समजलंय. त्यामुळे तरुण असण्याचं खोटं आवसान न आणता, वयाचा मान ठेवत त्यांनी बापाची भूमिका साकारलीय. साहजिकच, त्यांच्या अभिनयाच्या करिष्म्यामुळे त्यांच्या स्टारडमचं 'बाप'पण सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरलेत.
'तुका म्हणे नेदी गांजू आणिकांसी। उदार जीवासी आपुलिया।।' या तुकोबांच्या ओळींना साजेसा बाप सनी आणि रजनीकांतने पडद्यावर उभा केलाय. तो हळवा आहे, जरासा भोळसटही आहे, पण आपल्या कुटुंबाला धक्का लागू नये यासाठी प्रसंगी कणखर होण्याची ताकदही तो बाळगतो. सिनेमातल्या आयांना प्रेक्षकांनी आजवर प्रचंड प्रेम दिलंय. पण सिनेमातले बाप मात्र त्या तुलनेत बरेच उपेक्षित राहिलेत.
हे चित्र आता हळूहळू बदलतंय. सिनेमातली आई जशी 'केजीएफ'मधे सांगितल्याप्रमाणे योद्धा म्हणून गौरवली जातेय, तसाच सिनेमातला बापही आता सुपरहिरोंच्या रांगेत जाऊन बसतोय. कुणी कितीही स्टारडमच्या गप्पा मारल्या तरी खरा स्टार हा बापच असतोय. आपल्या बाप असण्याचा सोहळा दिमाखात साजरा करणारे सनी आणि रजनीकांत त्यांच्या 'गदर २' आणि 'जेलर'च्या कमाईमधून हेच सांगतायत.