सुमनताईंना पद्मभूषण देण्यात उशीरच झालाय, पण...

०६ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय.  सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. या साधर्म्यामुळे सुमनताईंना फायद्याऐवजी त्रासच झाला. त्यांच्या उगवतीच्या काळात लतारुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमनताईंच्या निर्विवाद गुणवत्तेची ताकद ओळखायला संगीताची ही मायानगरी तोकडी पडली, हे मान्य करायलाच हवं.

एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत इतर वृक्षांचं बीज रुजत नाही. सृष्टी नियमच आहे. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमनताई या अश्याच अपवाद ठरल्या. नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, लता, आशा या सारख्या डेरेदार वृक्ष असलेल्या नंदनवनात, चिरकाल, तजेलदार निर्मळ सुवास देणार्‍या बकुळ सुमनांचं हे झाड, केवळ रुजलंच नाही तर बहरून आलं. आता तर  पद्मभूषण रुपी राजमुद्रा विलसत असल्यानं, पुरस्कार हेच गुणवत्तेचं प्रमाण मानणार्‍यांनाही हा सुमनहार गळ्यात मिरवायला हरकत नसावी.

हेही वाचा: प्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे

मंगू सिनेमातून गायिकीला सुरवात

सुमन ताईंच्या आणि लता दीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. अस्सलशी साधर्म्य हे कमअस्सल कलाकारासाठी तर वरदान ठरू शकतं. पण तेवढ्याच ताकदीच्या दुसर्‍या एखाद्या अव्वल कलाकारासाठी ते अस्मितेच्या संकटा सारखं घातक ठरतं. सुमन ताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांच्या उगवतीच्या काळात लता रुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमन ताईंच्या निर्विवाद गुणवत्तेचं चीज करायला मायानगरी तोकडी पडली.

हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या 'चांद' या सिनेमासाठी शैलेंद्र यांच्या लेखणीतून झरलेलं 'कभी आज कभी कल कभी परसो ऐसे ही बीते बरसों' हे, समदर्शी सुमन लतेच एकमेव युगुल गीत ऐकताना या एक सूरत्वाची प्रचिती येते. हे नृत्यगीत हेलन आणि शीला वाज यांच्यावर चित्रित झालंय.  कुणी कुणाला आवाज दिला हे ओळखणं निव्वळ अशक्य आहे किंवा आता फक्त सुमन ताईंनाच शक्य आहे.

जे जे स्कूल ऑफ आर्टमधे शिकत असताना दुसर्‍या वर्षी त्यांना टरपेंटाईनची एलर्जी असल्याचं लक्षात आलं. त्याचवेळी १९५४ला पार्श्वगायनाची संधीही चालून आली. मंगू या सिनेमातल्या 'कोई पुकारे धीरे से आए' या गीतानं त्यांच्या संगीत कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. आजतागायत रसिकांचा त्यांच्या गाण्यांसाठी पुकारा सुरू आहे. रेखाचित्राचं स्वरचित्रात झालेलं हे रूपांतरण संगीताच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरलं.

सुमन ताईंच्या गाण्यातला गोडवा

सुमन कल्याणपूर या पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी. सीता-शंकरराव हेमाडी हे त्यांचे मातपिता. मंगलोरच्या हेम्माडी इथलं हे सारस्वत ब्राह्मण कुटुंब. सेंट्रल बँकेत उच्च पदावर असणार्‍या शंकरराव यांची ढाका इथं बदली होण्यापूर्वी २८ जानेवारी १९३७ला तत्कालीन कलकत्ता इथं सुमन ताईंचा जन्म झाला. पुढे ढाका इथं काही काळ राहिल्यानंतर त्यांच्या वडलांनी मुंबईत बदली करून घेतली. लग्नानंतर व्यवसायी पती रामानंद यांनी घरगुती कामात वाटा उचलून पत्नी सुमनला गायन व्यासंग सुरू ठेवण्यास सक्रिय प्रोत्साहन दिलं.

केशवा माधवाच्या नामातल्या गोडव्या इतका गोडवा सुमन ताईंच्या गाण्यातून अनुभवायला मिळतो. परमेश्वरानं जणू नीरक्षीर विवेकानं मधुमक्षिकेचा स्वर वगळून मधुरस तेवढा त्यांच्या कंठात, व्यक्तित्त्वात भरून दिला. 'शब्द शब्द जपून' ऐकत, कानी पडणार्‍या त्यांच्या स्वरांनी श्रुती धन्य होतात.गीत समोर आलं की त्यात ओतप्रोत भाव मिसळून, शब्दार्थ, भावार्थ नीट समजून ते कसं सर्वांग सुंदर होईल या कडेच त्यांचा कटाक्ष असे. विशेषतः त्यांच्या मराठी भावगीतं, भक्तीगीतांतून पदोपदी याची अनुभूती येते.

हेही वाचा: आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

अक्षर गीतांचा ठेवा

सुमन कल्याणपूर यांची सांगितिक कारकिर्द मुख्यत्वे तिरंगी आहे. एक तर हिंदी पार्श्वगायन, नंतर मराठी वगळता इतर भाषेतलं पार्श्वगायन आणि सुगम संगीत आणि कदाचित सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे मराठी पार्श्वगायन आणि सुगम संगीत. हिंदी पार्श्वगायन हे त्यांच्याकडे केवळ गुणवत्तेच्या जोरावर कुणालाही काम न मागता विनासायास चालत आलं; पण ते राजकारणानं ग्रासलं गेलं.

'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जूबान पर', 'मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है', 'तुमने पुकारा और हम चले आये', 'गरजत बरसत सावन आयो रे', 'ठेहरिये होष मे आऊ तो चले जाइयेगा',  'न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने', 'अजहुं न आए बलमा', 'बाद मुद्दत के ये घड़ी आई' 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, 'इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार', 'ये दुनिया के बदलते रिश्ते', 'जिंदगी इम्तिहान लेती है', या सारख्या असंख्य अक्षर गीतांचा ठेवा रसिकांना सुपूर्द करतांना 'रहे ना रहे हम मेहेका करेंगे' असा दिलासा देऊ करत ८० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीला त्यांनी निरोप दिला.

बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, असमिया,मैथिली, राजस्थानी, ओडिया अशा अन्य भाषांत ही त्यांनी गायलेली कितीतरी गीतं गाजली. मराठीतली भावगीतं, भक्तिगीतं, सिनेगीतांच्या रूपानं त्यांनी अपार स्वर दौलत उधळलीय.  'पहिलीच भेट झाली', 'असावे घर ते अपुले छान', 'आला ग सुगंध मातीचा', 'एकदाच यावे सखया तुझे गीत कानी', 'वार्‍यावरती घेतं लकेरी', 'नाविका रे वारा वाहे रे', 'झिमझिम झरती श्रावण धारा', 'दिन रात तुला मी किती स्मरू', 'नकळत सारे घडले', 'पिवळी पिवळी हळद', 'रे क्षणांच्या संगतीने', 'विसरशील तू सारे' या सारखी अभिजात भावगीतं गायली.

भक्तिगीतं आणि चित्रगीतांच्या आठवणी

'देवगृही या भक्त जनांना गौरी नंदन पावला', 'चल उठ रे मुकुंदा', 'एक एक विरतो तारा', 'कृष्ण गाथा एक गाणे', 'मधुवंतीच्या सूरा सूरातून', 'मृदुल करांनी छेडीत तारा', 'हरी भजनी रंगली राधिका', 'ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते', 'सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले' ही निवडक भक्तिगीतं त्यांनी गायली.

तसंच 'दीपका मांडीले तुला सोनियाचे ताट' 'या लाडक्या मुलांनो' ही गीतं किंवा 'एक एक पाऊल उचली चाल निश्चयाने', 'सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला', 'अरे संसार संसार', 'निंबोणीच्या झाडामागे', 'गेला सोडूनी मजसी कान्हा', 'कशी गवळण राधा बावरली', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'कशी करू स्वागता', 'बघत राहू दे तुझ्याकडे', 'आनंद मनी माईना', 'आई सारखे दैवत सार्‍या जगतावर नाही', 'समाधी घेऊन जाई ज्ञानदे'’ या काही चित्रगीतांच्या आठवणीही कानामनाला भारावलेपणाची अनुभूती देतात.

सुमन ताईंचा आवाज नुसताच गोड नाही तर त्यात भाव प्रकट करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. अर्जुनाला जसा माश्याचा फक्त डोळाच दिसत होता त्याप्रमाणेच, गातांना त्या इतक्या तन्मय होतात की त्यांना फक्त शब्दस्वरावली व्यतिरिक्त इतर कशाचं भान उरत नसावं. म्हणूनच त्यांची, विशेषतः मराठी भावगीतं, भक्तीगीतं अजोड परिणामकारक झाली आहेत. त्यांच्या गायकीच्या प्राजक्त सुमनगंधाची मोहिनी निश्चितच पद्मभूषणावह आहे.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या

पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

(साभार - पुढारी)