जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल

१७ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातले तरुण संशोधक सुरज येंगडे यांचं कास्ट मॅटर्स हे इंग्रजी पुस्तक सध्या जगभर गाजतंय. बेस्टसेलर ठरतंय. एकविसाव्या शतकातल्या भारतीय दलितांचं जग ते जगासमोर मांडतंय. सुरज मुंबईत आले असताना निवडक पत्रकारांशी भेट घेतली. त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याच शब्दांत.

युरोप, अमेरिकेतल्या चळवळी खूप पुढारलेल्या, फॉरवर्ड आहेत. त्यांनी तिथे एखादं आंदोलन, मोर्चा काढला की लगेच ते आपल्याला मराठीमधे कळतं. त्यांच्याबद्दल जगभरात वेगवेगळ्या माध्यमातून लिहिलं, बोललं जातं. पण असं काही भारतातल्या चळवळींबद्दल होत नाही. भारताल्या दलितांबद्दल, चळवळींबद्दल तर जगाला खूप त्रोटक माहिती आहे.

एकमेकांच्या चळवळींबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे जागतिक पातळीवर दोन समाजांमधे, वर्गांमधे बांधिलकीची भावना तयार होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जगभरात गेलेले भारतीय आपल्या देशात जातिभेद आहे, ही गोष्ट मान्य करत नाहीत. ते जातीचा फॅक्टर अस्तित्वातच नसल्याचं सांगत असतात. 

काहीजण जातीचं अस्तित्व मान्य करतात. पण ते सांगतात, ‘हो जात आहे. पण त्यांच्यासाठी सुविधाही आहेत.’ जातीचं अस्तित्व मान्य करायला हिंमत लागते. परदेशांत राहणारे भारतीय लोक जातीचं अस्तित्व मान्य करण्याबद्दल डरपोक आहेत. जात नाकारण्याची मानसिकता ध्यानात आल्यावर मी `कास्ट मॅटर्स` लिहायचं ठरवलं.

आम्हाला फुले, आंबेडकरांसोबतचा ब्राह्मण हवाय

एकेकाळी आपल्याकडे अनेक पुरोगामी ब्राह्मण हे फुलेवादी सत्यशोधक चळवळीत, आंबेडकरवादी चळवळीत दिसायचे. गोवंडेंपासून चिटणीसांपर्यंत लोकांनी आपल्या जातीतल्या कट्टर ब्राम्हणांविरुद्ध लढले. लोकमान्य टिळकांचा मुलगा श्रीधरपंत टिळक हे आंबेडकरांचे सहकारी होते. या लोकांनी अगोदर स्वतःच्याच कुटुंबाशी संघर्ष केला. आता मात्र आपल्याला आंबेडकरवादी, फुलेवादी ब्राह्मण शोधायचा असेल तर दुर्बिण लावून शोध घ्यावा लागतो. तरीही ते आपल्याला भेटत नाहीत.

ब्राह्मणांमधे एक पिढी होती, जी ब्राह्मणशाहीच्या विरोधात लढायला तयार होती. आता ती आम्हाला दिसत नाही. फुले, आंबेडकरांसोबत होते, तशा ब्राम्हणांची आताही तेवढीच गरज आहे. मी याला कल्चरल सुसाईड बॉम्बर म्हणतो. जात, सांस्कृतिक लाभ मिळालेल्यांनी स्वतःच्याच जातीमधे चळवळ सुरू केली पाहिजे. सामाजिक सुधारणेसाठी स्वजातीविरोधातच लढलं पाहिजे. इतर समाजांसाठी नंतर लढलं पाहिजे.

जात संपवण्यासाठी मला दलितांची मदत करायची, ही मानसिकता चालणार नाही. इथे आपल्याला अगोदर स्वतःच्या जातीतच लढाई लढावी लागणार आहे. क्रांतिकारक बनण्यासाठी आधी आपल्याला स्वतःच्या जातीत, वर्गात क्रांती घडवून आणावी लागेल.

हेही वाचाः वाजपेयींचे सहकारी दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद

जात आणि रॅगिंग सारखं कसं?

अनेकदा भारतातल्या कॉलेजमधे कास्ट अट्रॉसिटीच्या प्रकरणांना रॅगिंगचं वळण दिलं जातं. मुंबईतलं डॉ. पायल तडवी प्रकरण त्याचं उदाहरण आहे. असं वळण दिलं तरी त्या प्रकरणांमधलं कास्ट रॅगिंग कायम असतं. रॅगिंगची प्रकरणं सर्रासपणे न्यूट्रल कॅटेगरीमधे ढकलून दिली जातात. याला सरकार, युनिवर्सिटी, कॉलेज जबाबदार आहेत.

सरकारने जातीबद्दल लोकांमधे, विद्यार्थ्यांमधे जाणीवजागृतीच तयार केली नाही. आता कंडोमचंच बघा. आजकाल कंडोमबद्दल कुणी बोललं की त्याच्याकडे आता कुणी डोळे विस्फारून बघत नाही. पण दहाएक वर्षांआधी कंडोमकडे बघण्याचा एक स्टिरिओटाईप दृष्टिकोन होता. हा दृष्टिकोन सरकारने वेगवेगळ्या जनजागरण कार्यक्रमांतून मोडून टाकला. सरकारने एक मिशन म्हणून कंडोमबद्दल जनजागृती केली. आणि आता कंडोम फॅमिली हेल्थचा भाग झालाय.

जात संपवण्यासाठी काय करू शकतो?

असंच सरकारने सामाजिक, आर्थिक न्यायाबद्दल जाणीवजागृती करायला हवी. विद्यार्थ्यांमधे जातीबद्दलची जाणीवजागृती होणार नाही तोपर्यंत त्यांना सामाजिक न्याय कळणार नाही. आरक्षण म्हणजे देशसेवा आहे, हे देशाच्या फायद्यासाठीच आहे, ही गोष्ट आपण लोकांना समजावून सांगितली पाहिजे. एससी, एसटी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना रॅगिंग देणं ही गोष्ट आपल्या राष्ट्रवादाच्या विरोधात आहे. असे डिस्कोर्स मांडून आपण विद्यार्थ्यांमधे सामाजिक न्यायाबद्दल एक सकारात्मक जाणीव तयार करू शकतो.

पण सध्या जातीचा प्रश्न दलिताचा मृत्यू झाल्यावर, नाल्यात सापडून एखादा दलित मेल्यावरच चर्चेत येतो. चॅनेलवाला पॉलिटिकली जागृत असेल तर तो राजकारणाच्या अंगाने दलिताचा मुद्दा पुढे नेतो. नाही तर दलितांचं या मुद्यांशिवाय दुसरं जगच नाही, असं दिसतं. जातीची चर्चा खूप मर्यादित मुद्दे आणि प्रकरणांभोवतीच फिरते. दलितांची स्वतःची संस्कृती आहे. संगीत आहे. खाद्यसंस्कृती आहे. अनेक प्रकारचं विश्व त्यांच्याकडे आहेत. दलितांचं हे जग सांगण्यासाठी सरकारने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले पाहिजेत. 

एकेकाळी रॅगिंगने खूप उग्र रूप घेतलं होतं. रॅगिंगमुळे मुलांना जगणं महाग झालं होतं. रॅगिंगच्या जाचाला कंटाळून शेकडो मुलांनी जीव दिलाय. पण आता रॅगिंगचे प्रकार जवळपास बंद झालेत. कॉलेज, युनिवर्सिटी पातळीवरच्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे हे यश मिळालं. अशाच पद्धतीने आपण जातीवादी टॉटिंग, अपशब्द वापरण्याच्या प्रकार थांबवू शकतो.

हेही वाचाः माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!

कॉलेजमधे ओरिएंटेशन प्रोग्रॅम हवेत

कॉलेजमधे एडमिशन घेतलं की सुरवातीला विद्यार्थ्यांना आपण सामाजिक न्यायाचे फायदे सांगितलं पाहिजेत. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जातीधर्मांच्या संस्कृतीबद्दल जागृत करायला हवं. अशा उपक्रमांमुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, ट्रान्सजेंडर यासारख्या समूहांमधे आपलं स्वागत होतंय, अशी भावना तयार झाली पाहिजे.

सध्याच्या परिस्थितीत मला जय भीम म्हणायलाही भीती वाटते. समोरचा व्यक्ती दहावेळा जय श्रीराम म्हणून जातो. त्याचं समोरच्याकडून स्वागतही होतं. पण मला माझी आयडेंटिटी सांगता येत नाही. कारण माझी आयडेंटिटी कळल्यास समोरचा व्यक्ती माझ्याशी कसा वागेल, याची भीती माझ्या मनात आहे. आपण कमकुवत लोकांच्या संस्कृतीची कत्तल केलीय. ही कत्तल थांबवायला हवी. ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपण हे थांबवू शकतो.

युरोप, अमेरिकेमधे विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्रॅम होतात. मी हॉर्वर्डमधे आहे. तिथे विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातल्या प्रत्येकाच्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते. शिक्षकांसाठीही असे ओरिएंटेशन प्रोग्रॅम घेतले जातात. स्त्री, पुरुष समानतेच्या जाणीवजागृतीसाठी झाडून सगळ्या शिक्षकांना हजर राहावं लागतं. इथे अशा पद्धतीचं शिक्षण, प्रशिक्षण दिलं जातं, की अनेकदा आपल्याला वाटतं की बापरे, असं तर मी आजूबाजूच्या लोकांशी वागतोय. पुढच्या वेळी असं वागायला नको, अशी भावना उपस्थितांमधे तयार होते. एवढंच नाही तर या प्रोग्रॅमनंतर परीक्षा असते. या परीक्षेमधे तुम्हाला पास व्हावं लागतं.

अशाच पद्धतीने आपण जातीबद्दलची संवेदनशीलताही तयार करू शकतो. त्यासाठी आधी वेगवेगळ्या जातींमधे आपण संवाद सुरू केला पाहिजे.

हेही वाचाः 

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!

डॉ. पायल तडवीमुळे आपल्या समाजातलं जातींचं विष पुन्हा दिसलंय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार