जो मजा साथ दौड़ने में है...

०६ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आपल्या सगळ्यांना जिंकायचंय. अव्वल बनायचंय. सबसे आगे जायचंय. या अव्वलपणाचा ताण आपण आपल्या मुलाबाळांवर टाकतोय. मग तीही सबसे आगेचा धोशा लावतात. या नादात आपण उत्तम बनणं सोडून देतोय. याविषयी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी आंदोलन मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात लेख लिहिलाय. या लेखाचा हा संपादित अंश.

मागे कधीतरी सचिन तेंडुलकरचा म्हणजे त्याच्यावरचा सिनेमा आला आणि गेला. तो काही मी पाहिला नाही. पण त्यातील लहानपणच्या सचिनची भूमिका करणाऱ्या बालकलावंताची टीवीवरची एक मुलाखत रात्री जेवताना पाहिली. नेहमीच्या रीतीने तुला पुढे काय व्हायचंय, असा प्रश्न त्याला विचारला गेला. त्यावर अपेक्षित असं मला सचिन तेंडुलकर व्हायचंय, असं उत्तर त्या मुलाने दिलं. इथवर ठीक. मात्र पुढच्या एका प्रश्नाला त्याने दिलेलं उत्तर मला लक्षवेधक वाटलं. कारण त्यामुळेच हे उदाहरण इथे नोंदवायला मी प्रवृत्त झालो. तुला सचिन तेंडुलकरच का व्हायचंय, असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला ‘मुझे सबसे आगे जाना है.’

त्याच्या या उत्तराने प्रश्नकर्ते आणि त्या मुलासोबत असलेल्या त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर कौतुक झळकलं. मात्र या ‘सबसे आगे’ने माझ्या घशात घास अडकला. म्हणजे हाही मुलगा ‘सबसे आगे’च्या बेछूट, दमछाकी स्पर्धेच्या चरकात कोंबला जाणार याचं वाईट वाटलं. या लहान मुलाच्या मनात मला सचिन तेंडुलकरसारखं उत्तम खेळायचंय, असं का नाही आलं मनात? ‘सबसे आगे’ हे त्याचं ध्येय का बनावं? 

कारण भोवताल. कारण घर. कारण शाळा. या सर्व ठिकाणी तुला कोणाच्या तरी पुढे जायचंय. त्यासाठी सतत धावत राहायचंय, त्यातच जीवनाचे साफल्य आहे, हे सतत बिंबवलं जातं. मुलाचं मूलपण आणि एकूण माणसाचं माणूसपण मारुन टाकणारी ही शिकवण आहे. या शिकवणीने माणसांना घेरुन टाकलंय.

जिंकण्यासाठी पालकांचा आटापिटा

आता गणपती येतील. गल्लोगल्लीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मुलांच्या स्पर्धा होतील. निबंध, वक्तृत्व, चित्रकला यापेक्षाही हल्ली या बहुतेक स्पर्धा टीवीवरील गाणी, नाचांच्या स्पर्धांचे अनुकरण असतं. शाळांमधेही असंच असतं. या स्पर्धांत आपल्या मुलाने फक्त भाग नाही, तर जिंकण्याच्या इर्ष्येनेच उतरलं पाहिजे, यासाठी पालकांच्या जीवाचा आटापिटा चाललेला असतो. अशी जिगर आपल्या मुलात नसणं म्हणजे आजच्या ‘स्पर्धेच्या’ जगात तो टिकायला लायक नाही, अशी त्यांची खात्री असते.

हल्ली टीवीच्या प्रादेशिक, राष्ट्रीय वाहिन्यांवर चालणाऱ्या रिअॅलिटी शोमधून अनेक सामान्य, गरीब, पीडित समूहांमधून आलेली मुलं चमकताना दिसतात. त्यामुळे तर सामान्य स्तरातील पालकांच्या आशा आणखी पालवतात.

रिअलिटी शोचा धंद्याचा फंडा बाजूला ठेवू. त्याची चिकित्सा आता नको. पण या सगळ्याच्या परिणामी प्रगतीचे आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचे जे मापदंड ठरलेत, ते जीवघेणे आहेत. ज्या गरीब मुलाकडे उपजत प्रतिभा आहे, तो या शोमधून टॉपला जातो. तो एका रात्रीत लखपती किंवा करोडपती होतो. हा केवळ आणि केवळ अपवाद आहे, हे सामान्यांना कळत नाही.

हेही वाचाः माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!

सचिन टॉपर बनण्यासाठी क्रिकेटमधे आला?

सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला आवडायचं. त्यात त्याला गती होती. ती ओळखून तिचा विकास करणारे आचरेकर सर त्याला लाभले. आणि तो टॉपला गेला. टॉपला जायचंच म्हणून काही तो क्रिकेट खेळायला आला असं नाही. अशा पद्धतीने ज्या मुलांना ज्यात गती असेल ती विकसित करून टॉपला वा त्याच्या आसपास ती गेली तर उत्तमच आहे. पण असं टॉपला, सबसे आगे जाणं या घेऱ्यात अडकता कामा नये.

आज समाज त्या घेऱ्यात अडकलाय. कुत्रा मागे लागला तर त्याच्यापेक्षा वेगाने धावता आलं पाहिजे, नाहीतर तो चावेल. इथे कुत्र्याशी स्पर्धा गरजेची आहे, हे मला समजू शकतं. पण जो चावणार नाही, मारणार नाही अशा माणसाशी स्पर्धा कशासाठी? दुसऱ्यापेक्षा मी उत्तम गायला हवं, नाचायला हवं, वाजवायला हवं, खेळायला हवं असं का? त्यातून सर्वोत्तम ही मान्यता वा प्रतिष्ठा आणि असलेच तर बक्षीस मिळते. ही प्रतिष्ठा आणि बक्षीस यांचं महत्व आणि समाधान मर्यादित आहे.

शिवाय ज्याला हरवून ही प्रतिष्ठा आणि बक्षीस मिळालेलं असतं, त्याचं असमाधान ही नाण्याची दुसरी बाजू या समाधानाबरोबरच जन्माला येते. दुसऱ्याला दुःखी, नाराज करुन मिळवलेली प्रतिष्ठा आणि बक्षिसाचा आनंद निर्भेळपणे कसा काय घेता येईल? तो घ्यायला हवा, जो हरतो त्याने खिलाडूवृत्तीने हार कबूल करायला हवी, पुढे कोणालातरी हरवायची तयारी आताच सुरु करायला हवी, हे शिक्षण, संस्कार आपल्यावर सतत होत राहतात.

सबसे आगेची मर्यादा का?

माणसं खिलाडूवृत्तीने हार स्वीकारत असती तर रिअलिटी शोमधे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळांमधे हरणारे सर्वस्व गमावल्यासारखे रडतात का? खेळ हा खेळ आहे. हारजीत असणारच हे फार थोडे कबूल करतात. भारत-पाक क्रिकेट सामना असला की त्यावर राष्ट्रवादाची वारुळं चढतात. दोन देशांच्या युद्धासारखीच स्थिती लोकांच्या मनात असते. जो उत्तम खेळेल तो दुसऱ्या देशाचा अगदी पाकिस्तानचा असला तरी त्याचं कौतुक करायचा उमदेपणा आपल्यात नसतो.

स्पर्धेमुळे माणसांच्या क्षमतेचा विकास होतो. कबूल. मला काहीतरी गाठायचंय, अमक्याच्या पुढे जायचंय या प्रेरणेने मी जोरात प्रयत्न करतो. माझं कौशल्य, क्षमता वाढवतो. पण कोणाच्या तरी वा सबसे आगे या रेषेची मर्यादा का? माझी आज जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा मी पुढे जायला हवं ही शरीर, मनाला अनावश्यक न ताणता स्वतःशीच स्पर्धा का नको? काही जण ती करतातही.

पण मुख्य इच्छा असते ती कोणाच्या तरी वा सगळ्यांच्या पुढे असण्याची. तो किंवा ते जिथे असतील त्याच्या एक मिलिमीटरनेही मी पुढे असलो तरी पुरे. पुढच्या वेळी ते जिथे आहेत त्याच्या खाली आले तर मीही खाली आलेला चालेल. त्यांच्या पुढे असलो म्हणजे झालं. आपल्या मुलाला या चाचणीत मिळालेले गुण मागच्या चाचणीतल्यापेक्षा अधिक असणं पुरेसं नसतं. ते इतरांपेक्षा अधिक असायला लागतात.

कमी गुणांच्या मुलांसाठी हवे चांगले कॉलेज

दहावी-बारावीच्या गुणांशी कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळणार ही एक व्यावहारिक बाबही जोडलेली असते. त्यामुळे ती एक अपरिहार्यताही असते. अर्थात चांगल्या कॉलेजला चांगले गुण मिळवणाऱ्यांना, म्हणजे हुशार मुलांना, म्हणजे ज्यांना कमी चांगले शिक्षण मिळाले तरी ते त्यांच्या क्षमतेमुळे शिकू शकतात अशांना प्रवेश मिळतो.

कमी गुणांच्या, म्हणजे कमी हुशार मुलांना कमी चांगले कॉलेज मिळते. म्हणजे इथे कमी चांगलं शिकवलं जातं. तसंच कमी सुविधा आहेत असं गृहीत आहे. वास्तविक कमी गुणांच्या मुलांना पुढे येण्यासाठी अधिक चांगलं शिकवणारे, अधिक सुविधा असलेलं कॉलेज मिळायला हवं हे न्याय्य नाही का? पण असं होत नाही. सगळेच स्पर्धा, प्रतिष्ठा, मान्यता आणि त्यातून मिळणाऱ्या कृतक आनंदाच्या सापळ्यात अडकलेत.

स्पर्धेने होणारा विकास आणि त्यातून मिळणारा आनंद यांना ही मर्यादा आहे. व्यक्ती वा संघ- एकक काहीही असो, दोहोंना हे लागू होते. स्पर्धा हे उत्तेजक काही ठिकाणी कामी येत असेल. पण मानवी जीवनाचा गाडा त्यावर चालत नाही. तो चालतो सहकार्यावर. केवळ मानवीच नाही, तर प्राणी वा अन्य जिवांच्या बाबतही शास्त्रज्ञ हा हवाला देतात. पण तो माझा प्रांत नाही.

हेही वाचाः मोदी लोकशाही मार्गाने सत्तेत आलेत, त्यांना हरवण्यासाठीही तोच मार्ग वापरावा लागेल

मोदींचा विजयही सहकार्यातूनच

मानवाच्या प्राथमिक अवस्थेत टोळी अवस्थेत शिकार हा सहकार्याने करण्याचा प्रकार होता. वैयक्तिक पातळीवर काही शिकारी होऊ शकतात. पण मुख्यतः त्या सहकार्यानेच व्हायच्या. राजे-महाराजे किंवा सामान्य गावकरीही शिकारीला जायचे ते सहकार्यानेच. एकमेकांना पूरक असं कामाचं नियोजन शिकारीतही असतं.

सध्या ज्यांची जोरदार चलती आहे असे नरेंद्र मोदी आणि आता अमित शहा या दोहोंच्या नेतृत्वाखाली अनेक उलथापालथी देशात होत आहेत. त्यांची शैली आणि त्यामागची भूमिका याचं वहन करणारे, त्याला आधार देणारे असंख्य हात, खांदे आणि डोकी खाली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या परिवारातील लाखो प्रशिक्षित, प्रेरित, अनाम कार्यकर्ते त्यांच्या साथीला आहेत. या सगळ्यांच्या चिवट सहकार्यानेच मोदी आणि शहा यांना प्रचंड बहुमत मिळाले. या दोन व्यक्ती कर्तृत्ववान आणि हुशार आहेतच. पण केवळ त्यामुळेच सर्व काही चाललंय, अशा भ्रमात कुणी राहू नये.

गायक एकटा गात असेल. पण त्यासाठीचं संगीत, सुरावटी यासाठी अनेकजण वाद्यांचा योग्य तो मेळ घालत असतात. कुणीही कलावंत, चित्रकार, गायक, शिल्पकार ही मंडळी कलेतून नवनिर्मिती करत असतात. ही नवनिर्मिती अनेकांच्या सहकार्याने जे बनलेलं आहे, त्यातून योग्य निवड, योग्य प्रमाण आणि त्यांचा कलात्मक वापर वा रचना यांतून होत असते. हे नवसर्जन एकट्या-दुकट्याच्या नावाने लागत असलं तरी त्यामागे ज्ञात-अज्ञात अगणित माणसं असतात.

कुणी एक हरत नाही, जिंकत नाही

जीवनाचं कुठलंही क्षेत्र घेतलं तरी हे सहकार्य तिथे दिसेल. या सहकार्याचा नाद अनाहत आहे. जो प्रत्यक्ष दिसणारेच निर्माण करत आहेत असे नाही. तर असंख्य, अनंत लोक त्यात स्वर भरत आहेत. तोच सृष्टीचा, मनुष्यजातीचा मूलभूत नाद आहे.

गप्पाष्टके करत वा निसर्गाची साद ऐकत, चढावर एकमेकांना हात देणारे ट्रेकिंग, विद्यार्थ्यांचे एखाद्या प्रकल्पासाठी चाललेले गटकार्य, शेतीची कापणी वा झोडणी, एखादा जड ओंडका एका सूरात तोंडाने विशिष्ट आवाज करत सर्वांनी मिळून उचलणे, सैनिकांचा कदमताल, देवळातली वा शाळेतली प्रार्थना, चौकात म्हटलेली चळवळीची गाणी आणि घोषणा या सगळ्यांत एक शांत नाद आहे. त्यात माझं एकट्याचंच नाव स्पर्धेसाठी पुकारताना आणि निकाल ऐकताना उरात होणारी धडधड आणि त्याच्या तयारीवेळचे धपापलेपण नाही.

सहकार्यात कोणी एक विजयी नसतो. पराजितही कोणी एक नसतो. त्यातला आनंद आणि दुःख यांची गती संथ असते. एकाचवेळी अनेकजण वल्हे मारत असतात. त्यामुळे वादळातही कोणा एकालाच नाव तिरी लावण्याचा आकांत करावा लागत नाही.

तो हम कैसे आगे जाएगा?

सहकार्याचा हा नाद ऐकण्यासाठीचे कान तयार व्हायला आजची व्यवस्था मोठा अडसर आहे. त्यासाठी व्यवस्था बदलाचे अनेक बारीक, मोठे संघर्ष करत राहावे लागतील. या संघर्षासाठी प्रेरित करणाऱ्या काही घटना, काही प्रसंग, काही विचार, काही कलात्मक आविष्कार आपल्या वाट्याला येत असतात. ते टिपत राहायला हवेत.

सुमारे तीस वर्षांपूर्वी ‘उड़ान’ नावाची मालिका दूरदर्शनवर खूप गाजली. नुकतेच ज्यांचे निधन झाले त्या देशातील पहिल्या पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांच्यावरुन या मालिकेतले इन्स्पेक्टर कल्याणी हे मध्यवर्ती पात्र बेतले होते. या मालिकेतील एक प्रसंग मला असाच प्रेरित करुन गेला. त्यातले बारीक तपशील वा शब्द जसेच्या तसे मला आता आठवत नाहीत. पण मुख्य सूत्र मनावर कोरलं गेलंय.

त्यातील मुलगी आणि तिचे वडील हातात हात घालून धावत आहेत.

मुलगी म्हणते, ‘बाबा, इसी तरह हात पकड़कर दौड़ेंगे, तो हम में से कोई आगे कैसे जाएगा?’

बाबा म्हणतो ‘जो मजा साथ दौड़ने में है, वो आगे निकलने में कहाँ?’

हेही वाचाः 

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा