सुषमाताई अंधारे, सनातनी वारकरी आणि पुरोगामी(?)

१७ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुषमाताई अंधारे यांनी आपल्या भाषणात संतांविषयी केलेल्या टीकेचा वीडियो वायरल झाला. त्यावरून मोठी खळबळ उडाली. सनातनी वारकरी विरुद्ध पुरोगामी अशा दोन गटांमधे हा वाद विभागला गेला. सुषमाताई अंधारे आणि या दोन्ही गटांच्या संतसाहित्याच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या सोयीस्कर भूमिकांबद्दल वारकरी परंपरेचे तरुण अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर केलेली मांडणी समजून घायला हवी.

सुषमाताई अंधारे यांनी त्यांच्या भाषणात संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथांविषयी चुकीची मांडणी केल्याचे वीडियो वायरल झाले. त्यात त्या म्हणतात, ‘रेड्याला शिकवण्याचं सामर्थ्य इथल्या संतांमधे आहे म्हणून चमत्कार. अरे तुम्ही रेड्याला शिकवलं रे पण माणसाला कुठं शिकवलं. यांची संस्कृती कशी तर रेड्याला शिक शिक म्हणून मागं लागतायत. माणसाला शिकू द्यायचं नाय.’

त्या पुढे म्हणतात, ‘यांची संस्कृती काय तर कुत्रं भाकर घेवून गेलं तर तुपाची वाटी राहिली म्हणून एकनाथ महाराज त्याच्यामागं. आरं तूप खा. आरं तूप खा. नुसतीच भाकर कशी खातो. तूपपण खा.’ ताईंच्या व्हायरल वीडियोतले हे मुद्दे आहेत. त्यात त्यांच्या अनेक गफलती झाल्या आहेत. या गफलतीमागे अनेक कारणं आहेत. त्याचा शोध घ्यायला हवा.

संत आणि वेदाधिकार

पहिली गफलत ज्ञानेश्वर माऊलींविषयी झालीय. त्यांच्या बोलण्याचा रोख असा होती की ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले पण माणसांना म्हणजेच महिला आणि शूद्रांना शिकू दिलं नाही. इथं ताईंची गडबड झालीय. त्यांनी ज्ञानदेवांना महिला आणि शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणाऱ्या धर्मव्यवस्थेचा भाग मानलंय. खरंतर माऊली महिलांना आणि शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेतले दोष दाखवत होते. त्या व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करत होते.

‘वेदु संपन्न होय ठायी। परी कृपणू ऐसा आन नाही। जो कानी लागला तिही। वर्णाचिया॥’ या ओवीतून माऊली वेदांना कंजूष म्हणतात. महिला आणि शूद्रांसाठीच त्यांनी गीतेवर मराठीत भाष्य लिहीलं. गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं सांगून त्यावेळच्या बहुजन समाजाला न्यूनगंडातून बाहेर काढण्याचं काम केलं. स्वतः ज्ञानदेवांची मुंज झाल्याची नोंद कुठेच नाही.

मुंजीसाठी त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा अपार छळ झाला होता. त्यामुळे पैठणच्या धर्मपीठासमोर माऊलींनी प्रत्येक जीवाला वेदाचा अधिकार आहे या अर्थाने रेड्यालाही तो अधिकार आहे हे सिद्ध करुन दाखवलं. त्यामुळं वेदाच्या विशेषाधिकारातून वर्चस्व गाजवणाऱ्या ब्राह्मणांचा माज उतरला. तुकोबाराय म्हणतात, ‘रेड्यामुखी वेद वदवीला। गर्व द्विजांचा हरवला॥’

संतांच्या कथेतला चमत्कारिक भाग हा त्या कथेला पौराणिक रुप देण्यासाठी आलेला असतो. त्यामागचा मूळ आशय आपण समजून घ्यायला पाहिजे. माऊलींच्या या कथेतला मूळ आशय हा समतावादीच आहे. माऊलींच्या साहित्यातही बहुजनांना वेदाचा अधिकार नाकारणाऱ्या धर्मव्यवस्थेचा निषेधच आहे. 

हेही वाचा: संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

चुकलेली कथा आणि अन्वयार्थ

सुषमाताईंची दुसरी गफलत एकनाथ महाराजांविषयी झालीय. कुत्र्याच्या मागे तूपरोटी घेऊन धावण्याची कथा नामदेवरायांच्या संदर्भाने सांगितली जाते. तीच कथा ताईंनी एकनाथ महाराजांच्या नावाने सांगितली. त्या कथेचा त्यांनी चुकीचा अन्वयार्थ लावला. त्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं नाही. त्या कथेचा मूळ हेतू प्राणिमात्राविषयीच्या दयाभावाचा आहे.

पण त्याचा अर्थ संतांच्या मनात माणसांविषयी दयाभाव नव्हता असं नाही. ज्या एकनाथ महाराजांच्या नावाने ती कथा ताईंनी सांगितली त्या एकनाथांच्या आयुष्यातला एक प्रसंग महत्त्वाचा आहे. एकनाथ महाराजांनी श्राद्धासाठी बनवलेलं जेवण त्यांच्या जातभाईंच्या अगोदर अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना दिलं. त्यासाठी त्यांनी जातभाईंच्या रागाची पर्वा केली नाही. 

वारकरी संप्रदायाचं ब्राम्हणीकरण

ताईंच्या संतांविषयी अशा गफलती झाल्या याची कारणं शोधायला हवीत.  त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वारकरी मुखंडांची सनातनी भूमिका. गेल्या शतकापासून वारकरी संप्रदायाचं झपाट्यानं ब्राह्मणीकरण झालं. संतांचा मूळ समतावादी विचार लोप पावला. त्यामुळं वारकरी संतांची समतेची आणि दयाभावाची भूमिका कीर्तनकारांकडून मांडली गेली नाही.

संतविचाराला अनुसरुन कृतीकार्यक्रम करण्यात वारकरी मुखंड कमी पडले. उलट काही वारकरी नेत्यांनी वारकरी संप्रदायाचं ब्राह्मणीकरण करण्यातच धन्यता मानली. त्याचा परिणाम म्हणून संतांविषयी गैरसमज पसरले. दलित, आदिवासी आणि भटके विमुक्त यांच्यापर्यंत संतविचार पोचवण्यात वारकरी कमी पडले.

आजही वारकरी संप्रदायात भटके विमुक्त, दलित आणि आदीवासी जातीतले प्रमुख फडकरी नाहीत. या जातीतल्या कीर्तनकारांना आणि दिंडीप्रमुखांना अगदी अलीकडच्या काळापर्यंत विषमतेची वागणूक मिळत होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतल्या लोकांची वारकरी संप्रदायावर निष्ठा असूनही त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही अशी तक्रार साने गुरुजींनीही केली होती.

एकूणच संतविचाराशी विसंगत असा विषमतावादी वर्तनव्यवहार करणाऱ्या वारकऱ्यामुळं संतांविषयी गैरसमज निर्माण होत गेले. गाडगेबाबा, दादा महाराज सातारकर आणि गणपती महाराजांसारखे जे समतावादी वारकरी होते ते अपवादात्मक होते. शिवाय गाडगेबाबा आणि गणपती महाराजांना वारकरी मुखंडांनी वारकरी म्हणून मान्यता दिली नाही.

हेही वाचा: सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

पुरोगाम्यांचा भ्रम

आज संतांविषयी नवं संशोधन समोर आलंय. राजारामशास्त्री भागवत, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठल रामजी शिंदे, न्या. रानडे, गं. बा. सरदार आणि बा. रं. सुंठणकर अशा अनेक अभ्यासकांनी संतांचा खरा समतावादी विचार समोर आणण्याचा प्रयत्न केला. प्रबोधनकार ठाकरे यांनी संत एकनाथ महाराजांवर 'खरा ब्राह्मण' नावाचं नाटक लिहीलं. त्यातून एकनाथांची अस्पृश्यता निवारणाची भूमिका त्यांनी मांडली. त्याला सनातन्यांनी जोरदार विरोध केला.

अगदी अलीकडच्या काळातही संतांविषयी अशीच नवी मांडणी होतेय. पण अनेक पुरोगामी ही मांडणी समजून घ्यायला तयार नाहीत. संतांविषयी आपल्याला झालेलं आकलन अंतिम आहे अशा भ्रमात अनेक पुरोगामी असतात. त्यांची वारकऱ्यांशी चर्चा करण्याचीही तयारी नसते. ते वारकऱ्यांना सरसकट ‘सनातनी’ म्हणतात. 

सुषमाताईंची सारवासारव

सुषमाताई त्यापैकीच एक होत्या. आता त्यांच्यात बदल झाला असल्यास माहित नाही. ताईंचा हा वादग्रस्त वीडियो वायरल झाल्यानंतर वारकरी संप्रदायातून त्यांचा निषेध करण्यात आला. त्यात काही वारकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली. अशी टोकाची भूमिका घेतल्यानंतर सुषमाताईंनी सारवासारव करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यात आपण आधीच्या मतांवर ठाम असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं.

हे वीडियो २००९च्या आधीचे आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. आपल्याला संतांविषयी आदर होता आणि आहे असंही त्या म्हणाल्या. खरंतर सुषमाताईंनी याच प्रकारचं मत अगदी अलीकडे म्हणजे २०२२च्या जून महिन्यातल्या एका चर्चेत मांडलं होतं. लोकशाही न्यूज या चॅनलवर ही चर्चा झाली होती. त्यामुळं त्यांचा वीडियो २००९च्या आधीचा आहे हा मुद्दा निकालात निघतो.

ताईंनी आपल्या विधानाची जबाबदारी झटकू नये. खोटं बोलून चर्चा सोडू नये. आपण केलेल्या वादग्रस्त वक्तव्यातली चूक लक्षात घ्यावी. त्यासाठी संतांचे ग्रंथ वाचावेत. सुषमाताई महाराष्ट्रातल्या एक जबाबदार सामाजिक वक्त्या आणि आता राजकीय नेत्या आहेत.

त्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मुख्य प्रवाह असलेल्या वारकरी संप्रदायाच्या नामदेवरायांसारख्या थोर संतांविषयी सांगितली जाणारी कथा माहित असू नये ही गोष्ट निश्चितच विचार करायला लावणारी आहे. संतसाहित्याविषयी काही मुलभूत माहिती महाराष्ट्रातल्या ताईंसारख्या सगळ्याच राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समजून घ्यावी ही माझी नम्र अपेक्षा आहे.

हेही वाचा: वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

वारकऱ्यांची सनातनी बांधिलकी

ताईंविरोधात बोलणाऱ्या अनेक कीर्तनकारांनी पातळी सोडली होती. प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यापासून घाणेरड्या शिव्या देण्यापर्यंत अनेक प्रकार या कीर्तनकारांनी केले. त्यातल्या अनेक कीर्तनकारांनी भिडे गुरुजींनी संतांचा अपमान केल्यानंतर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. भिडे गुरुजींनी मनू हा संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांपेक्षा एक पाऊल पुढं असल्याचं म्हटलं होतं.

त्याविषयी यातल्या बहुसंख्य कीर्तनकारांनी साधी नाराजीही व्यक्त केली नव्हती. त्यामुळं या कीर्तनकारांच्या भूमिका प्रामाणिक नाहीत हे उघडच आहे. त्यांचा ताईंना असलेला विरोध हा राजकीय आणि सामाजिक विचारधारेच्या आकसातून आहे. या वारकरी कीर्तनकारांनी ताईंशी संवाद साधून आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्नही केला नाही. ताईंना त्यांच्या जातीमुळं जी विषम वागणूक मिळाली त्या वेदनेतून होत असलेला त्यांचा आक्रोश समजून घ्यायला हवा.

नामदेवरायांनी परिसा भागवताचं आणि तुकोबारायांनी रामेश्वर भटाचं मनपरिवर्तन केलं. एकेकाळी संतांविषयी प्रतिकूल असलेल्या या दोघांनाही वारकरी संप्रदायात संत म्हणून मान्यता मिळाली. जर उद्या ताईंना खरोखर त्यांची चूक लक्षात आणून देण्यात आपण यशस्वी झालो तर तो खऱ्या अर्थाने संतविचारांचा विजय होईल हे या कीर्तनकारांनी समजून घ्यायला हवं. पण यातल्या बहुतांश कीर्तनकारांची बांधिलकी संतांपेक्षा सनातन्यांशी अधिक आहे.

पुरोगाम्यांसाठी महत्त्वाचे प्रश्न

हे सगळं खरं असलं तरी ताईंच्या या विधानाशी संयत भाषेत असहमती दाखवणारे वारकरी नाहीत असं नाही. पण अनेक पुरोगामी याबद्दल गफलत करतायत. सनातनी कीर्तनकारांना विरोध करण्याच्या नादात ताईंची चूक लक्षात घेत नाहीत. त्यांच्यासाठी काही प्रश्न:

आज ताईंच्या समर्थनासाठी वारकऱ्यांवर टीका करणाऱ्या पुरोगाम्यांनी आधी ताईंच्या या विधानाविषयी आपली भूमिका का स्पष्ट केली नव्हती?

भिडे गुरुजींच्या संतांविषयीच्या अवमानकारक वक्तव्यांवर तुटून पडणारे पुरोगामी यावेळी गप्प का होते? 

आजही अनेकजण संत ज्ञानेश्वर माऊली आणि एकनाथ महाराजांविषयी धादांत खोटी माहिती सांगतात त्याविरोधात पुरोगामी का बोलत नाहीत?

संतांच्या अवमानानंतर सोयीने निषेध करणारे सनातनी वारकरी आणि पुरोगामी दोघांनीही आपल्या भूमिकांचा पुनर्विचार करायला हवा. यानिमित्ताने संतविचारांवर व्यापक चर्चासत्र खुलं व्हायला हवं.

हेही वाचा: 

पंढरीची वारीः माऊलींच्या दिंडीतला एक दिवस

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

ज्ञानाचा एकाः महाराष्ट्राचा जीवनधर्म घडवणारा वारसा

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव