रत्नागिरीतलं पावस हे आज तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालंय. रत्नागिरीत येणारे पर्यटक पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला नक्कीच जातात. तसंच नियमित येणारे भक्तगणही खूप आहेत. पावसच्या स्वामींचं चरित्र वाचताना, ते गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते असा ओझरता उल्लेख येतो. अध्यात्मिक क्षेत्रातल्या संतपदापर्यंतच्या प्रवासाआधीचा त्यांच्या आयुष्यातला हा टप्पा अनेक अर्थानं महत्त्वाचा आहे.
भारतीय तत्वज्ञानाचं हॅण्डबूक असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांना कळावी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ती संस्कृतमधून प्राकृतात आणली. पण, आता विसाव्या शतकात प्राकृतातली ज्ञानेश्वरीही लोकांना कळत नाही. म्हणूनच पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी ती अधिक सोप्या अशा अभंग रचनेमध्ये आणून लोकांना कळेल अशा नेहमीच्या मराठीत आणली. 'अभंग ज्ञानेश्वरी' या नावानं हा महाग्रंथ लिहिणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांना अनेकजण आज ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार म्हणून ओळखतात.
विसाव्या शतकातले ज्ञानेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेले स्वामी स्वरूपानंद यांचं मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले. रत्नागिरीपासून साधारणतः १९ किलोमीटरवर असलेल्या पावस या गावी त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ला झाला. पावस आणि रत्नागिरी इथं झालेल्या प्राथमिक शिक्षणानंतर ते १९१९ मधे मुंबईतल्या आर्यन शाळेत शिक्षणासाठी गेले. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा आणि त्यातल्या स्थित्यंतराचा होता. लोकमान्य टिळकांकडून स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्त्व गांधीजींकडे जात असतानाचा हा कालावधी आहे.
१९२० मधे मुंबईतल्या सरदारगृहात लोकमान्य टिळकांचं निधन झालं. त्यांच्या अंत्ययात्रेला गांधीजी उपस्थित होते. लोकमान्यांच्या अंत्ययात्रेला गांधींनी खांदा दिला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याची सूत्रं गांधीजींकडे आली. स्वामी स्वरूपानंद म्हणून नावाला आलेल्या रामचंद्र गोडबोले यांच्या तरुण मनावर स्वातंत्र्य चळवळीतल्या या घटनांचा प्रचंड प्रभाव पडत होता.
त्यांना घरातले आणि नातेवाईक अप्पा म्हणून ओळखत. अप्पा मुंबईला राहायला आले आणि त्यांचे शेजारी असलेले विनायक गोपाळ लिमये आणि विश्वनाथ दत्तात्रय गोखले यांचं त्रिकुट जमलं. गिरगावातल्या चाळीच्या गॅलरीच्या कठड्यांवर बसून या तिघांची राजकारणावर चर्चा झडायची. अप्पांना लेखन-वाचनाची दांडगी हौस होती. त्यातच त्यांना गांधीजी सापडत गेले.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव वाढू लागला. अप्पांनीही खादीचा स्वीकार केला. परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला. घराच्या मंडळींचा विरोध असूनही अप्पा 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या विद्यालयावर बहिष्कार घालून राष्ट्रीय शाळेत दाखल झाले. खादीचं व्रत घेतल्यामुळे चरखा, पेळू, तकल्या या वस्तू खरेदी केल्या. १९२२ मधे टिळक महाविद्यालयाची परीक्षा पास होऊन ते पुन्हा पावसला परतले.
हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते
अप्पा पावसला आले तेव्हा घरची आर्थिक स्थिती बरीच ढासळली होती. वडील मुंबईला नोकरी करू लागले होते. पण इकडे अप्पांची मनस्थिती बदलली होती. त्यांचा संपूर्ण खादीचा वेष, ध्येयनिष्ठ, विरक्त आयुष्य पाहून गावात त्यांच्याविषयीचा आदर वाढला होता. मुंबईतून आल्यानंतर त्यांचे विचार व्यापक झाले होते. देश, धर्म, स्वातंत्र्य या बद्दलच्या नव्या विचाराने नवी पिढी घडावी म्हणून त्यांनी पावससारख्या गावात १९२२ला 'स्वावलंबनाश्रम' नावाने राष्ट्रीय शाळा सुरू केली.
या स्वावलंबनाश्रमाची सर्व जबाबदारी अप्पांनी स्वतःच्या शिरावर घेतली होती. अप्पा विद्यार्थ्यांशी सलगीने वागत असले तरी विद्यार्थ्यांवर अप्पांचा वचक होता. एकीकडे विद्यादानाचं आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचं कार्य सुरू असताना, अप्पांचं वाचन-चिंतनही सुरू होतं. या चिंतनामधून त्यांचा मन अध्यात्मिक दिशेत रमू लागलं होतं.
त्याचाच परिणाम म्हणून पुढे मामा केशवराव गोखले यांच्या पत्रानुसार अप्पांनी पुण्यात जाऊन सद्गुरू श्रीबाबामहाराज वैद्य यांच्याकडून अनुग्रह घेतला. अनुग्रहानंतर एकीकडे ध्यानधारणा आणि नंतर स्वावलंबनाश्रमात मुलांना शिकवण्याचं कार्यही जोरात सुरु होतं. शाळेतल्या मुलांची संख्या वाढत असतानाच अप्पांनी सामाजिक सुधारणेसाठी उत्सवांमधे राष्ट्रीय मेळे काढायला सुरवात केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यात अप्पा स्वतः राष्ट्रभक्तीपर विचार मांडायचे.
राष्ट्रीय शाळांमधे होत असलेल्या या स्वातंत्र्य चळवळीचा अंदाज इंग्रज सरकारला येऊ लागला. त्यांनी या शाळा कशा बंद पडतील, त्यांना कसा त्रास होईल असं पाहायला सुरवात केली. सरकारच्या या धोरणांमुळे घाबरून स्वावलंबनाश्रमातल्या मुलांची संख्या कमी होऊ लागली. देशातल्या इतर शाळा सुद्धा बंद पडू लागल्या. दुसरीकडे अप्पांच्या घरची परिस्थिती सुद्धा खूप खालावली होती.
मग अप्पांनी शाळेतल्या तीन विद्यार्थ्यांना टिळक विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसवण्याचं ठरवलं आणि त्या तिघांसोबत अप्पा परत पुण्याला आले. पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून अप्पा 'समर्थ भारत छापखान्या'त नोकरीला लागले. सोबतचे विद्यार्थी सुद्धा परीक्षा संपल्यावर छापखान्यात लहान मोठं काम करत होते. कमवा आणि शिका या संकल्पनेनुसार अप्पा आणि त्यांचे विद्यार्थीही पुण्यात राहत होते.
या गोंधळातही त्यांनी नोकरीतून साठवलेल्या रकमेतून मुलांसाठी लेझीम खरेदी केले. मुलांची आजारपण, त्यांना पुन्हा पावसला आणणं, पुन्हा पुण्यात नेणं असे उद्योग करत अप्पांनी आपल्या वाड्मय विशारद या पदवीचा अभ्यास सुरू ठेवला होता. नोकरी, स्वतःचा अभ्यास, मुलांचा अभ्यास आणि सोबत राष्ट्रीय चळवळीकडे लक्ष अशी कसरत करताना त्यांची ध्यानधारणाही सुरूच होती.
हेही वाचा: महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!
नंतर अप्पांना टिळक विद्यापीठाच्या "वैदिक संशोधन मंडळा"मधे काम मिळालं. प्रेसमधल्या कामात बरा पगार आणि हाताशी वाचणारा वेळही होता. यावेळात अप्पांनी 'ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखिता'चं काम मार्गी लावलं. पुण्यात सद्गुरू बाबा महाराज यांचा सहवासही वाढला. त्यामुळे अप्पांची परमार्थाच्या मार्गावर वेगाने प्रगती होऊ लागली.
नोकरी, लेखन, ध्यान, शिक्षण हे सारं सुरू असताना १९३० मधे गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली. त्यावेळी टिळक विद्यापीठातल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत अप्पा अभ्यास बाजूला ठेवून मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले. सत्याग्रह मागे घेण्यात आल्यानंतर अप्पा परत पुण्याला येऊन टिळक विद्यापीठात नोकरीवर रुजू झाले.
हे सगळं सुरू असताना, आता वाड्मय विशारद ही पदवी पूर्ण करण्याकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रीत केलं. सद्गुरू सेवा आणि ध्यानधारणा हे सांभाळून काहीही करून पदवी पूर्ण करायची असं त्यांनी ठरवलं होतं. पण पारतंत्र्यातला देश आणि त्यासाठी चाललेलं आंदोलन काही त्यांना शांत राहू देत नव्हतं. त्यातच देशात सविनय कायदेभंगाची चळवळ पेटली.
अप्पांनी १९३०ला रत्नागिरीमधे सत्याग्रहात भाग घेतला. त्यावेळी त्यांना पहिल्या दोन महिन्यांसाठी स्थानबद्धतेची शिक्षा देण्यात आली. पण अप्पांनी हा हुकूम मानायचा नाही असं ठरवलं आणि ते रत्नागिरीला जात असताना वाटेतच भाट्ये इथं अटक करण्यात आली. स्थानबद्धतेचा भंग केल्याबद्दल तीन महिने कारावास किंवा ५० रुपये दंड अशी शिक्षा झाली.
कारावास नको असेल तर दंड भरायला हवा होता. पण दंडाची रक्कम भरण्याइतके पैसेही जवळ नव्हते. शेवटी स्वामींच्या आईने हातातली सोन्याची पाटली पोलिसांना दिली. त्यातून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. स्वामींची कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्या 'पाटलीतला उरलेला सोन्याचा तुकडा त्यांना परत देण्यात आला. यानंतर अप्पा पुण्याला गेले तिथं त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
कारागृहात मिळालेला वेळ अप्पांनी ध्यानधारणेत आणि साधनेत घालवला. तिथंच त्यांना लोक कौतुकाने स्वामी म्हणू लागले. कारागृहात इतर उद्योग बंद असल्यामुळे अप्पांना वेळच वेळ मिळत होता. त्यामुळे साधकावस्थेच्या प्रगतीच्या पायऱ्या झपाट्याने आक्रमित अप्पा आता सिद्धावस्थेच्या प्रांतात प्रविष्ट झाले. याच काळात अप्पांनी 'नवरत्नहार' नावाचं ९ ओव्यांचं काव्य रचलं आणि गुरूचरणी अर्पण केलं.
हेही वाचा: संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ
कारावास संपल्यानंतर तुरुंगातून परत आलेल्या आपल्या शिष्याची प्रगती पाहून बाबामहाराज प्रसन्न झाले होते. त्यांनी संप्रदाय चालवण्याचं मोठं कार्य अप्पांवर सोपवलं. स्वरूपाच्या ठिकाणी नेहमी लक्ष लागत असल्यामुळे बाबामहाराज आता अप्पांना 'स्वरूपानंद' या सार्थ नावाने संबोधू लागले. दिवसेंदिवस त्यांचं वाचन-मनन-चिंतन वाढू लागलं आणि आता अध्यात्माच्या क्षेत्रात नवी ओळख मिळाली.
गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीलाच अध्यात्माचं अधिष्ठान होतंच. त्यामुळेच भीतीवर मात करून प्रत्येकजण या चळवळीत सहभागी झाला होता. त्यातूनच बळ मिळालेल्या अप्पांनी स्वतःचा हा शोध अधिक गांभीर्यानं करण्याचं ठरवलं. कायदेभंगांच्या वेळीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठावर बंदी घातली गेल्याने पदवीही बाकी राहिली होती. घरचे लग्नाच्या पाठी लागले होते. प्रपंच आणि परमार्थ एकत्र करण्याचं त्याच्या आधी मनात होतं. पण अनेक कारणांनी लग्नाच्या बंधनात अडकण्याचं त्यांना काही रुचत नव्हतं. नियतीलाही ते मान्य नव्हतं.
अखेर १९३२ मधे टिळक महाराष्ट्र विद्यापाठावरची बंदी उठली आणि १९३४ला अप्पांना वाड्मय विशारद ही पदवी मिळाली. पुढे मलेरियाच्या जीवघेण्या आजारानं गाठलं. हा आजार एवढा वाढला की सहा महिने ते अंथरूणात होते. त्यावेळी अक्षरशः मरण काय असतं हे देहानं अनुभवलेल्या अप्पांचा अध्यात्माचा प्रवास त्यामुळे सोपा झाला.
स्वातंत्र्य चळवळ आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. भगवद्गीता हा लोकमान्यांच्या आणि पुढे गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. स्वामी विवेकानंद, आचार्य विनोबा भावे, महर्षी अरविंद यांनीही या पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यातून आत्मोन्नतीचा मार्ग शोधण्यासाठी अध्यात्माची कास धरली. स्वामी स्वरूपानंदही याच परंपरेतून पुढे येत त्यांनी अध्यात्माकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला.
मलेरियातून उठलेल्या स्वामींना आता अध्यात्मिक प्रवासाची दिशा सापडली होती. त्यांनी आता कुठेही न जाता अध्यात्मिक साधना करण्याचं ठरवलं. खरं तर स्वातंत्र्याच्या चळवळीतून मिळालेली ही आत्ममुक्तीची दिशा होती. व्यक्ती आणि समष्टीच्या मुक्तीसाठीचा हा प्रवास स्वरुपानंदांसाठी उलगडला तो अध्यात्मिक ज्ञानाला सर्वसासाधारण माणसापर्यंत पोहचविण्याच्या ध्यासाच्या मार्गाने. म्हणूनच त्यांनी परंपरेतील अध्यात्मिक ज्ञान सोप्या मराठीत लोकांना सांगायचं ठरवलं.
त्यासाठी स्वामी स्वरुपानंदांनी पावसच्या बाबा देसाई यांच्या अनंत निवास या घरातल्या एका खोलीत राहून चिंतन-लेखन केलं. जवळपास चाळीस वर्षांच्या या साधनेत त्यांनी 'अभंग ज्ञानेश्वरी’, ‘श्रीभावार्थगीता’, ‘अभंग अमृतानुभव’, ‘संजीवनी गाथा’, ‘चांगदेव पासष्टी’ यांसारखे ग्रंथ सोप्या मराठीत आणले. सोबत प्रवचनं आणि पत्रांमधून ते साधकांशी संवाद साधत होते.
स्वामींच्या या साधनेची ख्याती दूरपर्यंत पोचली. त्यातून अनेक थोरामोठ्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. पण स्वामी शेवटच्या काही काळात ध्यानमग्न असत. एकीकडे शरीर दुर्धर आजारपणानं थकलं तरी त्यांची प्रज्ञा तेजस्वीरित्या आयुष्याचं सार सांगत राहिली. अखेर १५ ऑगस्ट १९७४ला स्वातंत्र्यदिनाच्या मूहुर्तावर या संन्यासी स्वातंत्र्यसैनिकानं आपला इहलोकीचा प्रवास थांबवला.
हेही वाचा:
बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं
युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?