बॉलीवूडची प्रथितयश अभिनेत्री स्वरा भास्करने फरहाद अहमद या समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्नगाठ बांधलीय. तिच्या या निर्णयाबद्दल तिचं कौतुकही होतंय आणि त्याचबरोबरीने तिला ट्रोलही केलं जातंय. स्वरा-फरहादच्या या लग्नाला आता काही मुसलमान धर्मगुरूंनीही आक्षेप घेतला असून, तिचं लग्न धर्ममान्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या बॉलीवूडमधल्या लोकप्रिय जोडीने लग्न केलं आणि सोशल मीडियावर या जोडीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरदार रंगू लागली. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची मिठाई ताजी असतानाच अभिनेत्री स्वरा भास्करनेही आपला प्रियकर फरहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
हेही वाचा: खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!
समान नागरी कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनांमधून मुंबईच्या फरहाद अहमदचा चेहरा देशभर पोचला. अलीगढ युनिवर्सिटीचा पदवीधर आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजेच ‘टिस’मधून एम फिल पदवी मिळवणाऱ्या फरहाद अहमदने ऑगस्ट २०२२मधे समाजवादी पक्षात प्रवेश केला. सध्या तो महाराष्ट्रातल्या समाजवादी युवजन सभेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतोय.
२०१७-१८मधे ‘टिस’कडून वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ केली गेली. या शुल्कवाढीचा निषेध म्हणून फरहादने ‘टिस’विरोधात जोरदार आंदोलन पुकारलं. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही त्याला पाठींबा जाहीर केला होता. पुढे मुंबईतल्या क्रांती मैदानावर समान नागरी कायद्याविरोधात जे धरणे आंदोलन झालं, त्यातही फरहादने मोलाचं योगदान दिलं होतं.
लग्नानंतर स्वराने फरहादसोबतच्या आजवरच्या प्रवासाचा एक वीडियो शेयर केला. त्या दोघांच्या प्रेमकहाणीचा लेखाजोखा मांडणाऱ्या या वीडियोनुसार, २०१९च्या एका आंदोलनात स्वरा घोषणाबाजी करत असताना फरहाद तिच्याकडे बघून करत असलेलं स्मित ही यांच्या प्रेमाची पहिली निशाणी मानली जातेय. चळवळीतल्या या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत, मग प्रेमात आणि आता लग्नात झालंय.
१६ फेब्रुवारीला आपण फरहादसोबत कोर्ट मॅरेज केल्याचं जाहीर करताच सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांनी जोर धरला. ‘आणखी एक लव जिहाद’ म्हणत हिंदुत्ववाद्यांनी स्वरा आणि फरहादला ट्रोल करायला सुरवात केली. श्रद्धा वालकर हत्याकांड झाल्यापासून ‘लव जिहाद’चा मुद्दा सतत चर्चेत उगाळला जातोय. आता या यादीत स्वरा भास्करचंही नाव ट्रोलकडून जोडलं जातंय.
एकीकडे, हिंदुत्ववाद्यांची ट्रोलधाड सुरु असतानाच अनेक मुसलमान मौलवी आणि विचारवंतांनीही या लग्नाला आपला विरोध दर्शवलाय. बरेलीतल्या दर्गा आला हजरतचे मौलाना शहाबुद्दीन यांनी स्वराचं लग्न इस्लामला मान्य नाही असं म्हणत तिच्यावर टीकेची झोड उठवलीय. स्वतःला इस्लामी विचारवंत म्हणवून घेणाऱ्या शिकागोतल्या यासिर नदीम अल वाजिदी यांनीही मौलानांच्या निर्णयाला दुजोरा दिलाय.
त्यांच्या मते, जोवर बहुदैववादी महिला इस्लामवर विश्वास ठेवत नाही तोवर तिच्याशी लग्न करू नये. त्या महिलेने फक्त लग्नाच्या कारणासाठी जरी इस्लामचा स्वीकार केला असला तरीही अल्ला तिचा कधीही स्वीकार करणार नाही. त्यामुळे हे लग्न इस्लामला धरून नाही असं म्हणत मुसलमानी कट्टरपंथीयही या लग्नाला विरोध करताना दिसतायत.
हेही वाचा: तुमचं आमचं सेमच असतं
धर्म, समाज आणि सनातनी विवाहसंस्थेच्या ट्रोलधाडीची शिकार ठरलेल्या स्वराच्या मदतीला देशाचं संविधान धावून आलंय. या संविधानानेच स्वराला ‘विशेष विवाह कायद्या’च्या स्वरुपात पाठबळ दिलंय. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ फेब्रुवारीला स्वराने ट्विट करत तिच्या निर्णयाचं कौतुक करणाऱ्यांचे आभार मानलेत. त्याच ट्विटमधे ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’चा हॅशटॅग टाकत तिने टीकाकारांनाही उत्तर दिलंय.
१९५४चा विशेष विवाह कायदा म्हणजेच एसएमए हा कायदा आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता देतो. सामान्यतः हिंदू विवाह कायदा आणि मुसलमान विवाह कायदा या धार्मिक कायद्यांनुसार लग्न, घटस्फोट आणि दत्तक अधिकारांचं पालन करण्यात येतं. पण या कायद्यांनुसार केलेल्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी लग्नाआधी किंवा लग्नानंतर धर्मांतर करणं गरजेचं असतं.
पण एसएमए मात्र आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता देतो आणि तेही धर्मांतराशिवाय! त्यामुळे नवरा आणि बायको दोघेही लग्नानंतर विनाअडथळा आपापल्या धार्मिक परंपरांचं पालन करू शकतात. या लग्नानंतर विवाहित व्यक्ती ही कुटुंबापासून विभक्त मानली जाते आणि त्या व्यक्तीला वारसाहक्काने मिळणारे अधिकारही संपुष्टात येतात.
अशा लग्नासाठी किमान एक महिना आधीच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यापासून पुढच्या ३० दिवसांमधे जर कुणीही या लग्नावर रास्त आक्षेप घेतला नाही तर या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळते आणि तसं प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्याकडून नोंदणीदारांना दिलं जातं. या प्रक्रियेचे आभार मानताना स्वराने आपल्या ट्विटमधे आणखी एक गोष्टही अधोरेखित केलीय.
ती म्हणजे ३० दिवसांचा सूचना कालावधी. हा सूचना कालावधी धोकादायक ठरू शकतो. नोंदणी केल्याची प्रत ही सूचना कालावधीपुरती लोकांसाठी खुली ठेवली जाते. या प्रतीवर नोंदणीदारांचे महत्त्वाचे तपशीलही असतात. या तपशीलांचा वापर करून समाजविघातक, कर्मठ व्यक्तींना या लग्नावर आक्षेप घेणं, येनकेनप्रकारेन लग्न मोडणं अगदीच सोपं जातं. कधीकधी हे नोंदणीदारांच्या जीवावरही बेतू शकतं.
उत्तरप्रदेशमधे ‘लव जिहाद’विरोधी कायदा अंमलात आणण्याचं पाठबळ याच तरतुदीने तथाकथित संस्कृतीरक्षकांना दिलं होतं. अलाहाबाद उच्च न्यायालयाने जेव्हा ही तरतूद मोडीत काढायचा प्रयत्न केला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मात्र ‘एसएमए’नुसार लग्न करणाऱ्यांना आपली माहिती जाहीर करावीच लागेल असा आदेश दिलाय. प्रेमीयुगुलांसाठी धोक्याची टांगती तलवार बनलेली आणि गोपनीयतेचा, विवाह स्वातंत्र्याचा भंग करणारी ही तरतूद निश्चितच रद्द व्हायला हवी.
हेही वाचा:
‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
क्रिकेटच्या पिचवर रंगतोय सतरंगी प्रेमाचा किस्सा
कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!
एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?