तैवान कोरोना डायरी २: विलगीकरणात क्रिएटिव जगता येतं

२९ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनामुळे विलगीकरण झालंय. म्हणून टेन्शन घेण्याचं कारण नाही. ते आपल्या आणि सगळ्यांच्याच भल्याचं असतं. तो वेळ सत्कारणी लावला तर खूप काही करता येतं. डॉ. डेविड यांनी तैवानमधे त्याचा आदर्श घालून दिला. सांगत आहेत, तैवानच्या भेटीच्या आठवणी सांगणारे डॉ. कैलाश जवादे.

डॉ. चाव लाँग चेन हे तैवानमधले एक प्रसिद्ध सर्जन आहेत. १९८३ मधे त्यांनी आशियातलं पहिलं लिवर ट्रान्सप्लांट केलं. त्यानंतर लिवर ट्रान्सप्लांट ऑपरेशनमधली गुंतागुंत कमी करण्यासाठी त्यांनी अनेक शोध लावले. त्यांच्या शिस्तप्रिय वागण्यामुळे तसंच उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया पद्धतीमुळे त्यांच्या चँग गुंग मेमोरियल हॉस्पिटलमधला लिवर ट्रान्सप्लांट कार्यक्रमाचं जगभर कौतूक झालं.

२००९ मधे मी आणि माझी बायको डॉ. वैशाली लिवर ट्रान्सप्लांट आणि ट्रांसप्लांट पॅथॉलॉजी या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यासाठी तिथं गेलो होतो. माझ्यासोबत फिलिपाइन्स या देशातून आलेले डॉ. एलन आणि डॉ. टोनी हे दोन फेलो होते. तसंच बेल्जियम या देशातून आलेला डॉ. डेविड हा एक फेलो होता. डेविड तसा मूळचा तलावांमधला. तो स्थानिक भाषेत बोलायचा. त्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी त्याच्याकडूनच माहिती करून घ्यायचो.

तेव्हा स्वाईन फ्लू घाबरवत होता

एप्रिल २००९ मधे मेक्सिकोमधे स्वाईन फ्लू नावाचा आजार सुरू झाला. एच१एन१ या वायरसमुळे होणारा हा आजार मेक्सिकोमधून जगभर पसरला. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार हा वायरस मेक्सिकोतल्या डुकरांमधे निर्माण झाला. जानेवारी २००९ च्या सुमारास काही जणांमधे या आजाराची लक्षणं दिसली.

एप्रिल २००९ मधे या आजाराविषयी सविस्तर माहिती सादर करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जानेवारी २००९ ते १० ऑगस्ट २०१० तब्बल २० महिने जगभरात ही साथ चालली. या साथीनं विविध देशातल्या ११ ते २१ टक्के लोकांना बाधित केलं. अभ्यासकांच्या मते, जगभरात ७० ते १४० कोटी लोकांना याची बाधा झाली असावी आणि जवळपास एक लाख रुग्ण या आजाराने दगावले असावेत. जागतिक साथ घोषित केल्यानं त्यावर्षी सगळीकडेच आवश्यक काळजी घेतली जात होती. विलगीकरण हा तेव्हाही सगळ्यात महत्त्वाचा पर्याय होता.

डॉ. डेविड त्यावेळी आपल्या बायकोसोबत हॉंगकॉंगला जाऊन आले. आल्यानंतर त्यांना फ्लूची लक्षणं दिसली आणि तपासणीमधे एच१एन१ ची बाधा झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांना दोन आठवडे स्वविलगीकरण करण्यास सांगण्यात आलं. डॉ. डेविड १५ दिवस हॉस्पिटलमधे आले नाहीत. १५ दिवस घरी राहून प्रत्यारोपणाची माहिती कंम्पुटराईज कशी करावी, याबाबतचा प्रोग्राम विकसित केला. विलगीकरणाचा त्यांनी एका चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून घेतला. सगळ्यांनीच त्याचं कौतूक केलं.

हेही वाचा : विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

विलगीकरणाचा सदुपयोग केला

दहा वर्षानंतर मिटिंगच्या निमित्ताने प्रोफेसर चेन यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलावलं होतं. मी, डॉ एलन आणि डॉ डेविड पुन्हा एकदा एकत्र आलो. अन्य काही फेलोदेखील आले होते. आमच्यातल्या काही जणांनी मिटिंगनंतर एक ते दोन आठवडे प्रोफेसरांसोबत राहायचं ठरवलं होतं. मीसुद्धा एक आठवडा थांबणार होतो. डॉ डेविडलाही राहण्याची इच्छा होती. पण बेल्जियमवरून येताना तो काही तास हॉंगकॉंग विमानतळावर होता. त्यामुळे त्याला पुढचे पंधरा दिवस स्वविलगीकरण करावं लागणार होतं.

परत एकदा १० वर्षांपूर्वीचं विलगीकरण त्याच्या वाट्याला आलं. त्याचं बोलणं एकून बरीच थट्टामस्करी करण्यात आली. फेलोशिप काळात त्याला झालेल्या इन्फेक्शनची आठवण निघाली. खरंतर विलगीकरणाच्या काळात त्यानं चांगलं काम केलं होतं. पण, ‘इट वॉज अ बॅड एक्सपिरीयन्स’ म्हणजेच तो एक वाईट अनुभव होता, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. खरंच विलगीकरण हा एक वाईट अनुभव असतो का, असा प्रश्न यावेळी निर्माण झाला.

गेले काही दिवस भारतातही कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रशासनानं सोशल डिस्टन्सिंग आणि विलगीकरण पाळा असं वारंवार सांगितलंय. पण नियमांची पायमल्ली करणं जणू भारतीयांच्या रक्तातला गुणधर्म बनलाय. कित्येक जण या नियमांचं उल्लंघन करतायत. विलगीकरणाचा आदेश असणारं नवी मुंबईच्या कामोठे इथलं कुटुंब, ट्रेनमधून प्रवास करणारं गुजराती किंवा यूपीमधले काही प्रवासी, तर चक्क यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून बाहेर पडलेली कनिका कपूर ही सारी मंडळी सुशिक्षित असूनही चुकीचं वागताहेत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरणाचे चार प्रकार

विलगीकरणाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. विलगीकरण करण्याची गरज असलेल्या व्यक्ती बाधित झालेला असतो किंवा बाधा झालेल्या इतर रुग्णांच्या संपर्कात आलेला असतो. पण त्याला रोगाची लक्षणं दिसत नसतात. त्यामुळे आपल्यावर विनाकारण बंधनं येतात असं त्या व्यक्तीला वाटतं.

क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला घरात एकटं राहणं कठीण वाटतं आणि त्याचा कंटाळाही येतो. काहीजणांना बळजबरीचं विलगीकरण म्हणजे तुरुंगवासाची शिक्षा वाटते. काही जणांना तो आपल्या जीवनाला लागलेला ठपका वाटतो. खरं पाहता विलगीकरणामागचा उद्देश माहीत नसल्यामुळे समाजात हे गैरसमज पसरतात.

साथरोग पसरत असताना लोकांचं चार प्रकारे वर्गीकरण करण्यात येतं. पहिला प्रकार बाहेरच्या देशातून येणारे प्रवासी. त्यांना आपण ‘अ’ असं म्हणू. त्यांच्या माध्यमातून रोग पसरू शकतो. त्यामुळे त्यांच्यातल्या साथरोगाची लक्षणं दिसणाऱ्यांना म्हणजेच अ१ वाल्यांना विशिष्ट केंद्रांमधे विलगीकरणासाठी पाठवलं जातं. इतरांना म्हणजे अ२ वाल्यांना घरात किंवा इतरत्र स्वविलगीकरण करायला सांगितलं जातं.

स्वविलगीकरण करणारे लोक त्यांच्या घरी पोचण्यापूर्वी टॅक्सीचालक, सहप्रवासी इत्यादींच्या संपर्कात येतात. त्यांना नकळत बाधा होऊ शकते. या व्यक्ती म्हणजे ‘ब’ प्रकार. यानंतर तिसरा अर्थात ‘क’ प्रकार म्हणजे पहिल्या प्रकारातल्या व्यक्तींना भेटणारी किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणारी माणसं. चौथ्या म्हणजेच ‘ड’ प्रकारात समाजातले उरलेले सगळे येतात.

विलगीकरण पहिल्या आणि तिसऱ्या वर्गाचं केलं जातं. त्यांनी ते व्यवस्थित पाळलं तर साथरोग पसरत नाही. दुसऱ्या प्रकारातल्या व्यक्ती शोधणं कठीण असतं. त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून काम करता येऊ शकतं. कोरोनासारख्या साथ रोगात दुसऱ्या प्रकारातल्या व्यक्तींचं प्रमाण मोठं असतं आणि त्यांचा चौथ्या प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येऊ नये म्हणून संपूर्ण शहराचं विलगीकरण करणं म्हणजेच शहर लॉकडाऊन करणं गरजेचं असतं.

हेही वाचा : लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक

विलगीकरण कठीण नाही

विलगीकरण झाल्यानंतरचा काळ कठीण असला तरी त्या काळात आपलं आत्मपरीक्षण करणं, प्रार्थना करणं, आपला व्यक्तिगत छंद जोपासणं, व्यायाम करणं अशा गोष्टींचा अवलंब केला तर तो कालावधी पार करणं सहज जमतं. या कालावधीत संयम पाळणं महत्त्वाचं असतं.

संयम पाळून डॉ डेविड यांनी एक नवीन प्रकल्प घेऊन काम केलं. आपणही तसं काही केलं तर विलगीकरणाचा कालावधी म्हणजे वेळेचा अपव्यय न ठरता वेळेचा सदुपयोग होईल. त्यातून काहीतरी नवीन घडतं आणि साथीच्या प्रसाराला थांबवताही येतं.

हेही वाचा : 

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

कोरोनाला हरवण्यासाठी जग वेगवेगळे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?