नुकत्याच झालेल्या ‘टाटा स्टील मास्टर्स’ या बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी आपल्या उत्तमोत्तम खेळाचं प्रदर्शन करत जगाला आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. विश्वनाथन आनंदने आपल्या कौशल्यामुळे भारतात बुद्धिबळाचं युग निर्माण केलं. विश्वविजेतेपद मिळवण्याचा त्याचा हा वारसा पुढे कोण चालवणार या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
आपल्या देशातल्या क्रीडा क्षेत्रात बऱ्याचदा असं दिसून येतं की जगात श्रेष्ठ कामगिरी करणारा एखादा खेळाडू त्या खेळामधे आपलं युग निर्माण करतो. त्याच्या विश्वविजेतेपदाचा वारसा पुढं कोण चालवणार, हा प्रश्न असतो.
मात्र बुद्धिबळामधे पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणार्या विश्वनाथन आनंदच्या पावलावर पाऊल ठेवत देशाचा नावलौकिक कायम राखण्याची क्षमता विदित गुजराथी, अर्जुन एरीगेसी, रमेशबाबू प्रग्याननंदा अशा युवा खेळाडूंमधे आहे हे सिद्ध होऊ लागलंय.
बुद्धिबळ क्षेत्रात ‘टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा’ ही विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानली जाते. या स्पर्धेत भाग घेण्याची संधी विदित आणि प्रग्याननंदा यांना मिळाली. या स्पर्धेमधे विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याच्यासह जगातले श्रेष्ठ खेळाडू भाग घेत असल्यामुळे स्पर्धेतली प्रत्येक लढत रोमांचकारी आणि उत्कंठापूर्ण असते.
या स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांमधे भारतीय खेळाडूंना स्थान मिळवता आलं नाही. पण त्यांनी या स्पर्धेत नोंदवलेले निकाल हीच त्यांच्या भावी यशाची झलक मानली जाते. या स्पर्धेबरोबरच ‘टाटा स्टील चॅलेंजर स्पर्धा’ आयोजित केली जाते. या स्पर्धेतल्या कामगिरीच्या आधारे ‘टाटा मास्टर्स स्पर्धे’साठी खेळाडूंना संधी मिळते. या चॅलेंजर स्पर्धेत १८ वर्षांच्या अर्जुन एरीगेसीने अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकावलं. त्यामुळे येणाऱ्या ‘टाटा मास्टर्स स्पर्धे’साठी तो पात्र ठरलाय.
हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?
बुद्धिबळात अव्वल दर्जाचं यश मिळण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही. आनंदने वयाचं अर्धशतक ओलांडलं तरीही या खेळातलं त्याचं कौशल्य अजिबात कमी झालेलं नाही. भारतासाठी बुद्धिबळाचा युगकर्ता मानला जाणार्या या खेळाडूने या खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारांमधे विश्वविजेतेपद मिळवलंय. आनंदचं कौशल्य संपलं अशी टीका करणार्या टीकाकारांना त्यानं चाळीशीनंतरही ‘डॉर्टमुंड कप’सारख्या काही स्पर्धांमधे अजिंक्यपद मिळवत चोख उत्तर दिलंय.
ही कामगिरी करत असतानाच त्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला आहे. वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच बुद्धिबळात करिअर करण्याच्या ध्येयाने सराव करणार्या अनेक मुलामुलींनी वेगवेगळ्या वयोगटांमधे जागतिक विजेतेपदावर आपली मोहर नोंदवलीय. विदित, प्रग्याननंदा, अर्जुन हे याच मालिकेतील नैपुण्यवान युवा खेळाडू आहेत.
२८ वर्षांचा विदित हा नाशिकचा खेळाडू फिडे मानांकनात आनंदच्या खालोखाल भारताचा दुसरा खेळाडू आहे. सध्या त्याचे मानांकन गुण २७२७ आहेत. आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधराशेपेक्षा जास्त डाव खेळलेत. त्यातले फक्त १८ टक्के डाव त्याने गमावलेत. व्हॅसिली इव्हानचूक, मॅक्झिम व्हॅचिएर लाग्रेव अशा अव्वल दर्जाच्या खेळाडूंवर त्याने मात केलीय तर विश्वविजेता मॅग्नस कार्लसनविरुद्ध प्रत्येक डावात त्याने बरोबरी घेतलीय.
त्याशिवाय लिवॉन आरोनियन, अनीष गिरी, सर्जी कर्याकिन अशा खेळाडूंविरुद्धचे काही डाव बरोबरीत ठेवत सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय. आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुप देशमुख, अभिजित कुंटे, रोक्तिम बंडोपाध्याय, लन ग्रीनफिल्ड अशा मार्गदर्शकांच्या तालमीत तयार झालेला विदित हा विविध मोहरांच्या कल्पक व्यूहरचनेबाबत माहीर खेळाडू मानला जातो. आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत.
२०१८च्या ‘स्वीडन खुल्या स्पर्धे’त त्याने अनेक सनसनाटी विजय नोंदवत अजिंक्यपद पटकावलं होतं. २०१९च्या ‘बिएल कप’ या मानांकित स्पर्धेत दुसर्या क्रमांकाच्या खेळाडूंपेक्षा अडीच गुणांच्या फरकाने त्याने विजेतेपद पटकावलं होतं. त्याच वर्षी ‘फिडे विश्व अजिंक्यपद स्पर्धे’त त्याने क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. दोन वर्षांपूर्वी ‘फिडे ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धे’त भारताने सनसनाटी विजेतेपद मिळवलं होतं. त्यात विदितच्या नेतृत्वाचा मोठा वाटा होता.
हेही वाचा: लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
प्रग्याननंदा हाही उज्ज्वल भवितव्य असलेला खेळाडू मानला जातो. वयाच्या सातव्या वर्षी त्याने आठ वर्षांखालील गटाची जागतिक स्पर्धा जिंकली आणि फिडे मास्टर किताब पटकावला. हे विजेतेपद म्हणजे चमत्कार नव्हता हे सिद्ध करत त्याने दहा वर्षांखालील गटातही विश्वविजेतेपद मिळवलंय. आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळवणारा तो सगळ्यात लहान खेळाडू आहे. ग्रँड मास्टर हा किताब त्याने बाराव्या वर्षीच मिळवलाय.
वयाच्या चौदाव्या वर्षीच त्याने २६०० फिडे मानांकन गुणांचा टप्पा ओलांडला आहे. अठरा वर्षांखालील गटाचाही तो विश्वविजेता खेळाडू आहे. ‘डेन्मार्क कप खुली स्पर्धा’ आणि ‘पोल्गार कप स्पर्धां’मधे त्याने अजिंक्यपदावर नाव कोरलंय. नुकत्याच झालेल्या ‘टाटा मास्टर्स स्पर्धे’त त्याने मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदवला होता.
या सोळा वर्षांच्या खेळाडूने कारकिर्दीत आतापर्यंत वेस्ली सो, जॉन क्रिझ्टोफ ड्यूड, तैमूर रादजाबोव, कर्याकिन, योहान सेबास्टियन क्रिस्तियान्सन, नील्स ग्रँडेलिउस, आंद्रे एसिपेन्को, विदित सारख्या खेळाडूंवर खळबळजनक विजय नोंदवला आहे. अतिशय लहान खेळाडू असला तरी कसलंही मानसिक दडपण न घेता आत्मविश्वासाने तो खेळतो आणि बलाढ्य खेळाडूला शेवटपर्यंत झुंजवण्याबाबत तो ख्यातनाम खेळाडू मानला जातो.
आनंदप्रमाणेच जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक उंचावण्याचं ध्येय उराशी बाळगून अर्जुन एरीगेसी याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्वासक वाटचाल केलीय. अठरा वर्षाच्या या खेळाडूने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमधे पहिल्या तीन क्रमांकांमधे झेप घेतलीय.
त्यामधे त्याने आपल्यापेक्षा मानांकनांमधे वरचढ असलेल्या खेळाडूंना नमवलं आहे. एकाच वर्षी ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ आणि ‘ग्रँड मास्टर’ हे दोन्ही किताब मिळवणार्या या खेळाडूने २७०० फिडे मानांकनाच्या दिशेने मार्गक्रमण केलंय. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करून त्याप्रमाणे आपल्या रणनीतीत बदल करण्याबाबत तो चतुरस्र खेळाडू मानला जातो.
विदित, अर्जुन, प्रग्याननंदा यांच्यासह अनेक युवा खेळाडू जागतिक स्तरावर भारताची शान उंचावत आहेत. कोरोनाच्या महामारीतही ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण आणि सराव करण्याची संधी या खेळाडूंनी मिळवली. त्याचबरोबरीने ऑनलाईन स्पर्धांमधेही भाग घेत त्यात देदीप्यमान यश त्यांनी मिळवलंय. खर्या अर्थाने आजचे हे युवा खेळाडू आनंदचे वारसदार आहेत.
हेही वाचा:
अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता
मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)