शिवभक्त चोळांचा तमिळनाडू ‘आम्ही हिंदू नाही’ असं का म्हणतोय?

०८ ऑक्टोबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा एक ट्रेंडिंग हॅशटॅग होता. यातल्या बहुतांश ट्विटमधून थेट आरएसएसला आव्हान दिलं गेलं होतं. या ट्विटमधे आपल्यावर जबरदस्ती हिंदुत्व लादलं जात असल्याचा सूर असल्याचा दिसत होता. दुसरीकडे, हा ट्रेंड थांबवण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्वन’चे दाखले दिले जात होते.

उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत हा भारतातला बराच जुना सांस्कृतिक-राजकीय वाद आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भाषा, संस्कृती, लोकजीवन, राजकारण, कला, धर्म, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांमधे अनेक छोट्या-मोठ्या विषयांवरून या वादाची आग कायमच धुमसत राहिलीय. या वादात प्रामुख्याने तमिळनाडू आणि तमिळ जनता उत्तर भारतीयांविरोधात दंड ठोकताना दिसून येते.

नुकत्याच झालेल्या दसऱ्याला देशभर उत्सवाचं वातावरण असताना ट्विटरवर मात्र ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा हॅशटॅग वाऱ्याच्या वेगाने ट्रेंड होताना दिसला. या वादावर पडदा घालण्यासाठी हिंदुत्ववादी गटाकडून चोळ राजघराण्याच्या शिवभक्तीचे दाखले दिले जात होते. या वादाची ठिणगी पाडण्यासाठी केवळ एक सिनेमा कारणीभूत ठरलाय. तो म्हणजे - ‘पोन्नियीन सेल्वन’!

असा सुरु झाला वाद

निम्मित्त होतं ‘विडुतलै सिरूतैगल कच्छी’ या पक्षाचे प्रमुख आणि खासदार तोल. तिरुमावलवन यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या सोहळ्याचं. या सोहळ्याला ‘वडं चेन्नई’, ‘असुरन’सारख्या महत्त्वाच्या सिनेमांचा दिग्दर्शक वेट्रीमारनही उपस्थित होता. त्यावेळी भाषण करताना वेट्रीने तमिळ लोकांकडून त्यांची मूळ ओळख हिरावून घेतली जात असल्याचं सांगितलं.

या नव्या सांस्कृतिक दहशतवादाबद्दल बोलताना वेट्रीचा रोख थेट मणिरत्नमच्या ‘पोन्नियीन सेल्वन’कडे नसला, तरी त्याच्या भाषणाचा केंद्रबिंदू हा चोळ राजघराण्यावर आधारित होता. ‘पोन्नियीन सेल्वन’ ही मध्ययुगीन इतिहासात चोळ राजगादीसाठी झालेल्या सत्तासंघर्षाची गोष्ट आहे. कथेचा नायक पोन्नियीन सेल्वन म्हणजेच अरुलमोळी वर्मन हा पहिला राजराजा चोळ म्हणूनही ओळखला जातो.

वेट्रीने आपल्या भाषणात राजराजा चोळ याला हिंदू राजा म्हणून रंगवण्यात येत असल्याचा आरोप केलाय. मुळात चोळ राजघराणं हे शैव म्हणजेच शिवभक्तीला प्राधान्य देणारं होतं. महान तमिळ कवी आणि संत तिरूवल्लुवर यांना ऋषीमुनींसारख्या भगव्या वेषात गुंडाळून आपल्या इतिहासाचं भगवीकरण केलं जात असल्याचं वेट्रीने आपल्या भाषणात सांगितलं. वेट्रीच्या या विधानामुळे दक्षिणेतला सांस्कृतिक दहशतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

अभिनेता कमल हासन, पक्षप्रमुख तिरुमावलवनसह द्रविड चळवळीतल्या अनेक नेत्यांनीही वेट्रीच्या या विधानाला पाठिंबा दिलाय. तमिळ जनतेवर हिंदू ही ओळख लादली जात असल्याची चीड अनेकांनी व्यक्त केलीय. याचाच परिणाम म्हणून दसऱ्याच्या दिवशी ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला.

हेही वाचा: दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

वेट्रीच्या भाषणाचे पडसाद

वेट्रीच्या भाषणाची पाठराखण करताना कमल हासननेही चोळांवर लादण्यात येणाऱ्या हिंदुत्वाला धुडकावून लावलं. ‘पोन्नियीन सेल्वन’च्या पत्रकार परिषदेत बोलताना कमल हासन म्हणतो, ‘चोळ राजवटीच्या काळात हिंदू हा शब्दच अस्तित्वात नव्हता. तेव्हा फक्त शैव, वैष्णव आणि समनम म्हणजेच जैन पंथ होते. आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी हे पंथ एकत्र केले. ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी सर्वांना हिंदू घोषित केलं, हा इतिहास आहे.’

तमिळनाडूच्या माजी भाजप प्रदेशाध्यक्षा आणि तेलंगणाच्या राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनीही कोईंबतूरमधे पत्रकारांशी संवाद साधताना तमिळ जनतेची सांस्कृतिक ओळख दडपण्याचा प्रयत्न झाल्याचं मान्य करत त्याला होत असणारा विरोध योग्यच असल्याचं सांगितलं. शैव आणि वैष्णव ही तमिळ जनतेची सांस्कृतिक ओळख असून त्या लपवण्याचा प्रयत्न करणं अयोग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

अण्णा द्रमुकचे प्रवक्ते कोवई सत्यन यांनी टाइम्स नाऊशी बोलताना वेट्रीचं भाषण, कमल हासनचं विधान हा निव्वळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, हा हॅशटॅग अर्धवट ज्ञानामुळे वायरल होतोय. त्यावर नेटकऱ्यांनी ‘अण्णा द्रमुक’ला इतिहासाचे दाखले मान्य नाहीत का? असा प्रश्न विचारत पक्षाच्या भूमिकेवर बोट ठेवलंय.

दुसरीकडे, ‘विडुतलै सिरूतैगल कच्छी’चे पक्षप्रमुख आणि खासदार तिरुमावलवन यांनीही वेट्रीच्या म्हणण्याला दुजोरा दिलाय. चोळ कालखंडात घडलेल्या शैव-वैष्णव लढायांची आठवण करून देत, ‘तेव्हा हिंदू कुठं होते?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. फक्त बृहडेश्वराचं शिवमंदिर बांधलं म्हणून शैवपंथी असलेला राजराजा चोळ हिंदू आहे असं म्हणणं आणि इतिहासाची मोडतोड करणं योग्य नाही, असं त्यांचं मत आहे.

तमिल्स आर नॉट हिंदूज

वेट्रीच्या भाषणानंतर तीन दिवसांनी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तमिळी जनतेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि ब्राम्हणांवर सोशल मीडियावरून हल्लाबोल करायला सुरवात केली. अगदी थोड्याच वेळात ट्विटरवर ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा हॅशटॅग वायरल होताना दिसला. आपल्या ट्विटमधून तमिळ हिंदू नाहीत, तसंच आरएसएसचं हिंदुत्व हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं तमिळी जनता ठणकावून सांगताना दिसत होती.

‘आमची पूजा पद्धत, परंपरा आणि संस्कृती वेगळी आहे. तमिळ लोक पूर्वजांना पूजतात. तमिळ देवता या कुणी अचाट दैवी शक्ती नसून ते आमचे शूर आणि पराक्रमी पूर्वज आहेत.’ या आशयाचं ट्विट सर्वाधिक वायरल होताना दिसत होतं. त्याचबरोबर हिंदू आणि तमिळ यांच्यातला फरक दाखवण्यासाठी मनूने रचलेल्या, वर्णव्यवस्था, शोषणाचं प्रतिक असलेल्या मनुस्मृतीचे आणि तिरूवल्लुवरांनी रचलेल्या समताधिष्ठित, मुक्तिदायी तिरुक्कुरलचे दाखले दिले जात होते.

हिंदुत्व स्वीकारणे म्हणजेच संस्कृत आणि हिंदी भाषांचा वाढता प्रभाव, ब्राम्हणवाद, मनुस्मृती, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता स्वीकारणे अशी तमिळ जनतेची धारणा आहे. तमिळ संस्कृतीतला महान ग्रंथ मानला जाणारा कुरल म्हणजेच तिरुक्कुरल हा हिंदुत्वाच्या शोषक विचारधारांच्या विरुद्ध लढण्याचं बळ देतो, असं तमिळ जनता मानते. द्रविड सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारसरणीत तमिळ जनतेच्या विरोधाचं मूळ दडलंय.

हेही वाचा: डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!

पेरियार आणि दसरा

भारत सरकारने तमिळ जनतेवर हिंदी लादण्याचा केलेला प्रयत्न द्रविड चळवळीने मोडून काढला. या चळवळीला पेरियार यांनी वैचारिक पाठबळ दिलं. आर्य विरुद्ध द्रविड ही सांस्कृतिक चळवळ उभी करताना पेरियार यांनी आर्यांच्या शोषणकर्त्या भूमिकेवर कडाडून टीका केली. ‘सच्ची रामायण’हे त्यांनी लिहलेल्या पुस्तकांपैकी एक महत्त्वाचं पुस्तक आहे.

या पुस्तकात पेरियार यांनी उपलब्ध असलेल्या वाल्मिकी, कंब, बौद्ध, जैन रामायण तसंच ‘रामचरित मानस’सारख्या ग्रंथांचा संदर्भ देऊन नवी मांडणी केली. त्यांच्या मते, रामायण हा धार्मिक नाही तर राजकीय ग्रंथ होता, जो ब्राम्हणी दमनशाहीच्या समर्थनासाठी रचला गेला होता. उत्तर भारतीय, आर्य राजा राम याने दक्षिण भारतीय, द्रविड राजा रावणाची हत्या केली, अशी क्रांतिकारी मांडणी पेरियार यांनी केली.

पेरियार यांच्या या मांडणीने द्रविड सांस्कृतिक चळवळीचा पाया आणखीनच भक्कम झाला. दसऱ्याला होणाऱ्या रावणदहनाविरुद्ध निदर्शने होऊ लागली. १९७४मधे दिल्लीतल्या रावणदहनाला प्रत्युत्तर म्हणून मद्रासमधे राम, सीता आणि लक्ष्मणाच्या पुतळ्यांचं दहनही करण्यात आलं होतं. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा हॅशटॅग केवळ एक इंटरनेट ट्रेंड म्हणून मर्यादित न राहता, या सांस्कृतिक वादात अतिशय महत्त्वाचा दुवा ठरतो. 

हिंदुत्ववाद्यांचा तोकडा प्रतिवाद

पोन्नियीन सेल्वन म्हणजेच राजराजा चोळ हा ‘शिवपादशेखर’ अर्थात ‘शिवाचा पाय डोक्यावर मुकुट म्हणून ठेवणारा राजा’ म्हणूनही ओळखला जातो. मणिरत्नमच्या ‘पोन्नियीन सेल्वन’मधेही शैव-वैष्णव वादाचा संदर्भ आलेला आहे. या सिनेमात कार्तीने साकारलेला वानर कुळातला राजकुमार वल्लवरायन वंदीयदेवन हा एका वैष्णव गुप्तहेराकडून शैव पंथ महान असल्याचं वदवून घेताना दिसतो.

त्यामुळे या हॅशटॅगचा विरोध करताना हिंदुत्ववाद्यांनी ‘शिवपादशेखर’ राजराजा चोळने बांधलेल्या बृहडेश्वराच्या शिवमंदिराचा आसरा घेतलाय. सर्व चोळ राजे हे शंकराची उपासना करणारे, शैव परंपरा पाळणारे होते आणि सर्व शैवपंथी हे हिंदूधर्मीयच आहेत, अश्या आशयाचं ट्विट हिंदुत्ववादाच्या पाठीराख्यांकडून वायरल होताना दिसलं. अर्थात, त्यांचा हा युक्तिवाद किती तोकडा आहे, हे तमिळ जनतेने पुराव्यांसकट दाखवून दिलंच!

मुळात, ‘तमिल्स आर नॉट हिंदूज’ हा हॅशटॅग वायरल करणाऱ्या तमिळ नेटकऱ्यांमधे लिंगायत समाजाच्या तरुणाईचा मोठा वाटा होता. कट्टर शिवोपासक असलेला हा समाज गेली काही वर्षं लिंगायत या जातीला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. त्यामुळे चोळांच्या शिवभक्तीची ढाल करून तमिळ जनतेवर हिंदुत्व लादू पाहणाऱ्या नेटकऱ्यांचा या लिंगायत नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला.

शैव पंथ आणि हिंदू धर्माची घातलेली सांगड अपयशी ठरल्यावर हिंदुत्ववादी गट धर्मांतराचा मुद्दा बळकट करू लागला. त्यांच्या मते, दोन पोती तांदूळासाठी धर्मांतर केलेली ख्रिश्चन, मुसलमान आणि बौद्ध तमिळ जनता जाणीवपूर्वक हिंदू धर्मात तेढ पसरवतेय. त्यावर लगेच काही तमिळ नेटकऱ्यांनी हिंदू धर्मातली जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि भटभिक्षुकीचा मुद्दा उचलून धरत हिंदुत्ववाद्यांचा धर्मांतराचा मुद्दाही निकालात काढला.

हेही वाचा: 

आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?