एका शिक्षिकेचं विद्यार्थ्यांना प्रेमाची गोष्ट सांगणारं पत्र

१४ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


लवकर होणारी मुलामुलींची लग्न, अर्धवट राहिलेलं शिक्षण, प्रेमाच्या लेबलमागे वाहवत जाणारी तरूणाई आणि वयात येणाऱ्या मुलांमधले बदल असे बरेच प्रसंग शिक्षिकेसाठी अस्वस्थ करणारे असतात. याच जाणिवेतून वॅलेंटाईन दिवशी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ उलगडून सांगणारं शिक्षिका प्रज्वली नाईक यांचं हे पत्र.

प्रिय,
विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो,

तुम्ही म्हणता ना... मॅम एक मेसेज आलाय, फोन आलाय खूप अर्जंट आहे घेऊ का? तेव्हा माझं मन तुम्हाला ते करताना कधीच नकार देत नाही. कारण तुम्ही जगत असता आणि प्रेमाच्या प्रतिसादासाठी धडपडत असता. खरं आहे मुलांनो....पण ना अजूनही या आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाजाला प्रेम आणि सहजीवनातून फुललेलं लग्न रूजत नाही हे वास्तव नाकारता येत नाही.

समाजात प्रेम करणं म्हणजे पाप समजलं जातं. त्यामुळे कित्येक ठिकाणी दिवसाढवळ्या होतात हजारो हत्या, खून, हिंसाचार... समाजात प्रेमासारखी गोष्ट रूजवणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे असं म्हणता येईल.

पण अजूनही कित्येक तरूणाई वयात आल्यावर आकर्षणाला प्रेम हे लेबल लावतात आणि हे प्रेमच आहे असं ठाम मत तयार करतात. यात दोष तुमचा नाही या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी त्या-त्या वयात यातला फरक समजून सांगणं ही गरज आहे.... पण प्रेम ही संयमाने जगण्याची आणि सहजीवनातून फुलवण्याची प्रकिया आहे. प्रेमाला पर्याय नाही... प्रेम ही शाश्वत कल्पना आहे.

आपल्या स्वप्नातला राजकुमार, राजकुमारी भेटेल ही तर अपेक्षा तुमचीही नक्कीच असेल. पण तुम्हाला हेच काहीसं सांगण्यासाठी हे पत्र लिहित आहे. तुम्ही जोडीदाराचा शोध घेत असाल किंवा प्रेम समजून घेत असाल तर हे नक्कीच वाचा हा... अरे वाचताना असे लाजताय का? प्रत्येकाच्या आयुष्यात असे निर्णय घेण्याची वेळ येते. फक्त तुम्ही त्याच्याकडून आभाळा एवढ्या अपेक्षा ठेवू नका.

हेही वाचा: प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया

भौतिक गरजा पूर्ण करताना पुरुष असो स्त्री आपलं अस्तित्व विसरून जातोय. स्त्रीला समजून घेणं ही गरज आहे. तेवढंच पुरूषाला देखील समजून घेता आलं पाहिजे. एका विशिष्ट वयानंतर कळत-नकळत आपल्यावर बंधनं घातली जातात. वारंवार तू 'पुरूष' आहेस, तू 'स्त्री' आहेस असं सांगितलं जातं.

लग्नाचं वय झालं आहे. उरकून टाका... तुमच्या वयाच्या मुलांना पोरं झाली वगैरे डायलॉग सर्रासपणे ऐकले असतील‌ ना... यातही लग्नामधे मुली आणि मुलींच्या घरच्यांची हीच अपेक्षा असते की, मुलगा भरपूर पगारवाला आणि श्रीमंत हवा.

मुलगी घरातली स्वयंपाक पाणी व्यवस्थित करणारी असावी, कमी शिकलेली असली तरी घर सांभाळून राहणारी असावी. तुम्हालाही हीच स्वप्न पडत असतील ना. त्याने भरपूर कमवायला हवं. मला हवं तसं लगेच घेऊन द्यायला हवं. किंवा तिने आपली सेवा करावी, दमून भागून आल्यावरही घर सांभाळून राहावं. हल्ली समाज माध्यमांवर भिरभिरणारी मंडळी एक निराळं चित्र समोर ठेवतात.

पण आपण ही अपेक्षा करणारे कोण? इतक्या अपेक्षा का केल्या जातात? कधी मनाला विचारता का रे? कित्येकांना ताणतणाव नक्कीच येत असेल. कित्येकांची घुसमट होत असेल. कित्येकजण यात गुरफटून जात असतील. कित्येकजण मानसिक त्रास सहन करत असतील.

हेही वाचा: प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का

खरंतर माणसाला जन्माला आल्यापासून तू असं वागायचं तसं वागायचं... हे समाज आणि घरचे ही बंधनं लादत असतात. मर्द को भी दर्द होता है! आणि स्त्रियांनाही जाणीवा असतात ही भावना स्वीकारून माणूसपणाच्या वाटेनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालायला हवं.

बाईला तर तराजूमधे मोजमाप करताना समाजाची अर्धी मानसिकता पणाला लागत असते. जे चाकोरीबद्ध विचार सोडून समतेच्या वाटेने विचार करतात. स्त्रीमधे चांगला माणूस शोधतात. पुरूषाला एक समतेची वाट म्हणून न्याहाळतात तेव्हा प्रेमाची खरी सुरवात होत असते.‌

मुलांनो, तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून तुम्ही आधार मागा... पण कधीच हक्क लादू नका. जोडीदाराची निवड करताना विचारपूर्वक करा. आधी तुम्ही काय आयुष्यात मिळवलं आहात आणि काय मिळवणार आहात याची जाणीव ठेवा.

हेही वाचा: प्रेमातल्या समर्पणाची भावना नव्या पिढीनं जपायला हवी

त्याला किंवा तिला  समजून घेताना... तुम्ही मात्र कल्पनेच्या दुनियेत रेंगाळत राहू नका. वास्तविक जाणीव ठेवून समतेच्या आणि विवेकाच्या वाटेनं जोडीदाराची निवड करा. त्याला-तिला तुम्ही बोलू शकता सगळी स्वप्न आपण मिळून पूर्ण करू.‌.. आपलं आयुष्य अधिक सुंदर करू.‌ हे ऐकून किती बरं वाटेल... थोडं ओझं कमी होईल. माणूस म्हणून जगणार आहात याची जाणीव करून द्या.

स्वीकारणं म्हणजे दबावाखाली जगणं नाही हा. जोडीदाराचा, लग्नाचा विचार करत असताना नव्याने होणाऱ्या नात्यांचाही अभ्यास करणं, धर्म- जात, वर्ण या पलिकडे जाऊन आपुलकीने स्वीकार करणं आवश्यक आहे.

कमी वयात होणारं लग्न आणि न होणारं लग्न या विचारांमधे पडण्यापेक्षा तुम्हाला काय कसं मनापासून हवं आहे हा विचार रूजणं महत्त्वाचं आहे‌. कित्येकदा हीच नाती नवं जगणं शिकवतात. नवी स्वप्न पूर्ण करण्यासाठी वास्तव समोर उभं करतात. तुम्ही सारेजण ना समुद्रासारखे अथांग आणि प्रवाही भासता. कधी या नभासारखी हरवून जाता. पण  तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कळत-नकळत तुम्ही कोणाला ना कोणाला तरी घडवत असता हे विसरू नका. तुम्ही जपता आयुष्यभर फक्त स्त्रित्वाची गोष्ट... पुरूषत्वाचं जगणं... पण तुम्ही जपायला पाहिजेत माणूसपणाची सुंदर गोष्ट... या तुम्हाला प्रेमाच्या दिवसाच्या प्रेमळ सदिच्छा!

तुमची,
प्रज्वली

हेही वाचा: 

‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!

आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!