गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?

१३ मार्च २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


१९९५ मधे शिवसेना भाजपचं युती सरकार होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेने मंत्रालयात कुसुमाग्रजांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणीचे पोस्टर लावले होते. पण त्यानुसार कुणी वागताना दिसलं नाही. आता उद्धव ठाकरे त्याच्या दहा पावलं पुढं गेलेत. त्यांनी गाडगेबाबांची दशसुत्री मंत्रालयाच्या गेटवरच लावलीय. आता त्यानुसार वागण्याचं आव्हान त्यांच्या सरकारपुढे आहे. ते आव्हान सोपं नाही.

संत गाडगेबाबा यांच्या दशसुत्री शिकवणीनुसार महाविकास आघाडीचं सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनावरण केलं. मंत्रालयाच्या मेन गेटजवळ गुरुवारी १२ मार्च २०२० ला हा कार्यक्रम झाला.

आपलं सरकार संत गाडगेबाबा यांच्या दशसुत्रीनुसार काम करेल आणि या दशसुत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. त्यानुसार मार्बल शिळेत कोरलेल्या दशसुत्री फलकाचं अनावरण करण्यात आलं. एका अर्थानं मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणेची आणि त्या समाजोपयोगी धोरणांच्या अंमलबजावणीची ही सुरवात आहे याचं हे दिग्दर्शन करणारं सूचक चिन्ह आहे, असं आपल्याला म्हणता येईल.

हेही वाचाः बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

महापुरुषांचा वारसा पुढे नेला पाहिजे

सरकार कोणतंही असो त्याने महापुरुषांचा वारसा घेत पुढे गेलं पाहिजे. यापूर्वी मंत्रालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे तैलचित्र लावलं होतं. कुसुमाग्रज यांची स्वातंत्र्यदेवतेस विनवणी ही सरकारचा कारभार कसा असावा हे सांगणारी कविताही लावली होती. आज गाडगेबाबा यांची दशसुत्री लावून सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. गाडगेबाबांची दशसुत्री अमलात आणण्याची मनीषा असणं म्हणजे आपण लोकाभिमुख आहोत असंच सांगणं होय.

कुणी काहीही म्हणो उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी कर्जमाफीनं त्यांची संवेदनशीलता सिद्ध केलीय. शेतकरी कर्जमाफीच्यावेळी त्यांनी दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात या कर्जमाफीने शेतकऱ्यांचे आयुष्य बदलेल या भ्रमात शेतकरी नाहीच.

भटजीच्या ताब्यातला देव माणसात आणला!

संत गाडगेबाबा हे विदर्भाच्या मातीतले आधुनिक काळातले महान संत आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या माणसाने शाळेची पायरी न चढताही अत्यंत ताकदीने विज्ञानवाद समाजात पेरला. लोकांना मानसिक गुलामीतून बाहेर काढलं. भटकंतीच्या काळात त्यांनी समाजातलं दारिद्र्य जवळून अनुभवलं. इथला माणूस कायम शोषणाच्या साखळदंडाने जायबंदी झालाय, याचं त्यांनी सत्यशोधन केलं.

इथली धार्मिक यंत्रणा देव आणि धर्माच्या नावावर माणसाच्या आर्थिक आणि मानसिक शोषण कसं करते याचं त्यांनी चिरफाड केलं. पंढरपूर इथे अनेकदा जाऊनसुद्धा त्यांनी कधी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही. कमरेवर हात ठेवून बसलेल्या विठोबाला प्रश्न विचारत त्यांनी स्वतः हातात खराटा घेतला आणि चंद्रभागेचं वाळवंट झाडून काढलं. 

मंदिरात भटजीच्या ताब्यात असलेला देव त्यांनी माणसात आणण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून त्यांनी कीर्तनातून लोकांना ‘तिर्थी धोंडा पाणी! देव रोकडा सज्जनी!’ हा संदेश दिला. खरं तर गाडगेबाबांनी संत तुकाराम महाराज आणि संत कबीर यांचाच विचार कीर्तनातून पुढे नेला. म्हणून तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गाडगेबाबांना आधुनिक महाराष्ट्राचा तुकाराम असं संबोधलं होतं.

हेही वाचाः तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

दशसुत्रीचा म्हणजे आजोबांच्या लेखणीलाच सलाम

‘जत्रा मे फत्रा बिठाया। तीरथ बनाया पाणी।

दुनिया भई दिवाणी। सब पैसे की धूलदाणी। 

हा संत कबीर यांचा विचार गाडगेबाबा कीर्तनातून मांडत असत. यामागं त्यांची स्पष्ट भूमिका होती. ती म्हणजे, माणूस गुलाम होऊ नये. देव शोधायचा असेल तर तो रंजल्या गांजल्या लोकांच्या हृदयात शोधा हे त्यांनी अत्यंत कणवेनं सांगितलं. या कणवेतूनच दशसुत्रीचा जन्म झाला. या दशसुत्रीचं पालन करणं म्हणजेच खऱ्या देवाला फुलं वाहणं होय.

इतक्या सोप्या पद्धतीने गाडगेबाबांनी मंदिरात अडकवलेल्या देवाला माणसात आणलं. आता तेच काम सरकारला करावं लागेल. सर्वसामान्य माणसांची फायलीआडून होणारी नाडवणूक थांबवली पाहिजे. माणसातल्या फायली शोधल्या पाहिजेत. म्हणजेच माणसाला कामाला लावून राज्याच्या विकासाचं गाढं पुढे नेलं पाहिजे.

गाडगेबाबा यांच्या या खऱ्या लोकसेवा धर्माने अनेकांना वेड लावलं होतं. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी म्हणूनच संत गाडगेबाबा यांच्यावर पुस्तक लिहिलं. हे पुस्तक खऱ्या अर्थाने गाडगेबाबा यांच्या कार्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारा दस्तऐवज आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी एका विज्ञानवादी संताला खरी शब्दांजली वाहिलीय. आज मंत्रालयातील या फलकाच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजोबांच्या लेखणीलाच सलाम केलाय, असं आपल्याला म्हणता येतं.

गाडगेबाबांच्या दशसुत्रीत काय आहे?

१. भुकेलेल्यांना अन्न

२. तहानलेल्यांना पाणी

३. उघड्यानागड्यांना वस्त्र

४. गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत

५. बेघरांना निवारा, आश्रय 

६. अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार

७. बेकारांना रोजगार

८. पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय

९. गरीब तरुण तरुणींचं लग्न

१०. दुःखी, निराशांना हिम्मत

हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

योजना भुकेल्यांसाठी की ठेकेदारासाठी?

गाडगेबाबांनी ७०-८० वर्षांपूर्वी सांगितलेली दशसुत्री लागू करण्याची आज नितांत गरज आहे. त्यामुळे या दशसुत्रीला मुख्यमंत्री ठाकरेंना खूप गांभीर्याने घ्यावं लागणार आहे. भुकेल्या लोकांना अन्न द्या म्हणजे दहा रुपयात जेवण असा त्याचा अर्थ होत नाही. शिवभोजन योजना ही भुकेल्या लोकांसाठी आहे की ठेकेदार वर्गासाठी अशी लोकांच्या मनात शंका आहे.

सरकारी योजना या लोकांच्या करातून राबवल्या जातात. याचा वापर पारदर्शकपणे लोकांसाठीच व्हायला हवा. गाडगेबाबांनी लोकांच्या पैशात जे काम उभं केलं त्याचा अत्यंत पारदर्शकपणे त्यांनी वापर केला. आपल्या बायको आणि मुलीलासुद्धा त्यांनी कधी आश्रमात राहू दिलं नाही.

गाडगेबाबा हा सामाजिक कार्याचा निखारा आहे. तो तळहातावर पेलता आला पाहिजे. आज तहानलेल्या लोकांना पाणी मिळत नाही. मराठवाडा, विदर्भ कायम दुष्काळाच्या झळा सोसत असतो. या पाणीटंचाईमुळे मुक्या प्राण्यांना अभय देणं अशक्य होवून बसलंय.

बेरोजगारांना हिंमत द्या!

जलयुक्त शिवार ही जलमुक्त शिवार योजना म्हणून फेल गेली. ठाकरे सरकारला विदर्भ आणि मराठवाड्याची तहान भागवता आली तर आपोआप भुकेल्या लोकांना अन्न मिळेल आणि पैशाअभावी तरुण तरुणींचं लग्न अडणार नाही. शेती पिकली, पिकाला योग्य भाव मिळाला, शेतीला पाणी मिळालं तर ही दशसूत्र राबवल्याचं पुण्य सरकारच्या पदरात पडेल.

गेल्या पाच वर्षात राज्यात प्रचंड बेकारी वाढलीय. महापरीक्षा पोर्टलनं प्रचंड घोळ घातला. अनेक बेरोजगारांचं स्वप्न या ऑनलाईन पोर्टलनं ऑफलाईन केलं. परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले. मात्र वर्ष लोटूनही परीक्षा झाल्या नाहीत. निदान या सर्व परीक्षा लवकर घेवून उद्धव ठाकरे यांना बेरोजगारांना हिंमत देता येईल.

आज ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य यंत्रणा पार ढासळलीय. जिल्हा परिषदेच्या शाळांची काय अवस्था आहे हे न सांगितलेलं बरं. जेवणाचं ताट मोडा पण लेकराला शाळेत पाठवा असा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांना आपण अभिवादन करत असताना या शैक्षणिक दुरवस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

तर सामाजिक क्रांतीची पहाट होईल

फलकाचं अनावरण तर केलं. मात्र हा फलक उद्धव ठाकरे यांच्यावर एक प्रचंड सामाजिक दडपण आणणार आहे. गाडगेबाबांच्या दशसुत्रीचा एक सकारात्मक दबाव सरकारवर राहणार आहे. केवळ संदेश फलकाचं अनावरण करून हे काम थांबणार नाही. तर ज्या महापुरुषाने हा विचार दिला तो विचार पेलता आला पाहिजे.

उद्धव ठाकरे यांची संवेदनशीलता पाहता ते या दिशेने भक्कम पाऊल टाकू शकतात. हे राज्य या दशसुत्रीचं बोट धरून चाललं तर सामाजिक क्रांतीची पहाट होईल. गाडगेबाबांचा एक अनुयायी म्हणून, उद्धवजी आपण त्या पहाटेला जन्म द्या एवढीच माफक अपेक्षा.

हेही वाचाः 

प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग १)

वाचा गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग २)

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

आपण कोरोनापेक्षा भयंकर वायरसशी लढलोय, त्यामुळे कोरोना से डरोना!

(लेखक हे मुक्त पत्रकार असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.)