अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

१५ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


कसलीही अपेक्षा न करता काही क्रीडा संघटक खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी आयुष्य झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे आंतरराष्ट्रीय टेनिसपटू आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक अख्तर अली यांचं नाव पहिल्यांदा घ्यायला हवं. अली यांचं ७ फेब्रुवारीला निधन झालं. त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेनिसपटू, माजी राष्ट्रीय प्रशिक्षक, भारतीय डेविस संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अख्तर अली यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवण्याचं अविरत काम केलं. नुकतंच ७ फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं.

भारताच्या क्रीडा क्षेत्रात कोणत्याही पुरस्कारांची किंवा पदाची अपेक्षा न करता सतत खेळ आणि खेळाडूंचा विकास हेच तत्त्व डोळ्यासमोर ठेवत काही क्रीडा संघटक आपलं आयुष्य त्यासाठी झोकून देतात. अशा मुलखावेगळ्या क्रीडापटूंमधे अख्तर अली यांचं नाव घेतलं जातं.

भारताला दिले सर्वोत्तम खेळाडू

टेनिस हाच त्यांचा विश्वास होता. अखेरच्या श्वासापर्यंत सतत भारतीय टेनिसपटूंचा विकास कसा होईल, यादृष्टीनेच त्यांनी काम केलं. अली यांनी जवळजवळ चाळीस वर्ष तळागाळापासून टेनिसपटू घडवले.

टेनिसच्या सुरवातीच्या काळात त्यांना भारताच्या दिग्गज खेळाडूंबरोबर डेविस चषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत त्यांनी आपल्या सहकारी खेळाडूंकडून अनेक चांगले गुण आत्मसात केले. त्याचा उपयोग त्यांना प्रशिक्षक म्हणून काम करताना सर्वांगीण कौशल्यपूर्ण खेळाडू घडवताना झाला.

त्यामुळेच भारताला ग्रँडस्लॅम, डेविस चषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे अव्वल दर्जाचे यश मिळवणारे खेळाडू मिळाले.

हेही वाचा : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

पराभव स्वीकारलाच नाही

अली यांनी १९५५ मधे राष्ट्रीय कनिष्ठ गट टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. तिथूनच खर्‍या अर्थाने त्यांची कारकीर्द फुलली. त्याच वर्षी त्यांनी विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कनिष्ठ गटात उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. ही कामगिरी करताना त्यांनी अनेक मानांकित खेळाडूंवर सहज विजय मिळवला. या स्पर्धेबरोबरच त्यांनी अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधेही आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. त्यांची ही कामगिरी लक्षात घेऊनच त्यांना १९५८ मधे भारताच्या डेविस संघात स्थान देण्यात आलं.

प्रामुख्याने दुहेरीतले हुकमी खेळाडू म्हणून त्यांनी आपली छाप उमटवली. १९६४ पर्यंत त्यांनी डेविस चषक स्पर्धेच्या आठ सामन्यांमधे प्रतिनिधित्व केलं. या सामन्यांमधे त्यांना रामनाथन कृष्णन, नरेश कुमार, प्रेमजित लाल आणि जयदीप मुखर्जी यांच्यासोबत खेळण्याचे भाग्य लाभलं. या सामन्यांमधे त्यांनी कधी प्रेमजित, तर कधी जयदीप यांच्यासोबत दुहेरीत खेळताना कधीही पराभव स्वीकारला नाही.

जमिनीलगत परतीचे फटके, बॅकहँड आणि फोरहँड प्लेसिंग, खोलवर वॉलीज, ताकदवान सर्विस अशी विविधता अली यांच्या खेळात दिसून यायची. चतुरस्र खेळाडू म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला होता. अली यांना ऑस्ट्रेलियन डेविस चषक संघाचे प्रशिक्षक हॅरी हॉपमन यांच्याकडून टेनिससाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनही मिळालं. 

आक्रमकतेचा सल्ला

स्पर्धात्मक टेनिसमधून दूर झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाच्या भूमिकेलाच प्राधान्य दिलं. किंबहुना, आपला जन्म हा चांगल्या दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी झाला आहे, असं ते नेहमी म्हणत. त्याद़ृष्टीने त्यांनी राष्ट्रीय क्रीडा संस्थेचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. एवढंच नाही, तर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ आणि अमेरिकन व्यावसायिक टेनिस प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला.

आपण तांत्रिकद़ृष्ट्या परिपूर्ण असलो तरच आपल्याकडे येणार्‍या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊ शकू, असा त्यांना ठाम विश्वास होता. ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातल्या टेनिस नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकडेच त्यांचा जास्त कल होता.

खेळाडूंना प्रशिक्षण देताना ते आपल्याकडे असलेली ज्ञानाची शिदोरी भरभरून वाटत. आक्रमकता हाच खरा बचावात्मक पवित्रा असतो, असं ते मानत होते. आपल्या खेळाडूंनाही ते त्याच पद्धतीने खेळण्याचा सल्ला द्यायचे.

हेही वाचा : जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं

शिक्षकापेक्षा शिष्य तरबेज

भारताला डेविस चषक स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करून देणारे विजय आणि आनंद अमृतराज हे भाऊ, डेविस चषकाबरोबरच ग्रँडस्लॅम स्पर्धेमधे मानांकित खेळाडूंना पराभूत करणारे रमेश कृष्णन, एनरिको पिपेरनो, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून देणारा लिएंडर पेस अशा अनेक खेळाडूंना अली यांचं मार्गदर्शन लाभलं.

ग्रँडस्लॅम स्पर्धेमधे महिलांच्या दुहेरीत अनेक विजेतेपद मिळवणारी सानिया मिर्झा हिनेही अनेक वेळा अली यांच्याकडून मार्गदर्शनाचा लाभ घेतलाय. अली यांचे चिरंजीव झीशान यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा गाजवल्यात.

हुकमी प्रशिक्षक

भारताच्या राष्ट्रीय टीमचे प्रशिक्षक म्हणून अली यांनी १९६६ ते १९९३ या कालावधीत यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीमने १९६६ मधे डेविस चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवलं. पुन्हा १९७४ मधेही अली यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टीमने या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. 

डेविस चषक स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीसाठी खेळाडूंची योग्यरीतीने निवड करणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, एकमेकांमधे सुसंवाद ठेवणं, याबाबत अली हे अतिशय हुकमी प्रशिक्षक होते. प्रतिस्पर्धी टीममधले खेळाडू कितीही बलवान आणि मानांकित असले, तरी त्यांच्याविरुद्ध आपले खेळाडू कसे यशस्वी होतील, याचा सतत ते ध्यास घेत असत आणि त्याप्रमाणे आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घ्यायचे.

सतत हसतमुख आणि उत्साही प्रशिक्षक म्हणून अली यांनी नावलौकिक मिळवला होता. त्याचप्रमाणे आपल्या खेळाडूंना काही वैयक्तिक समस्या असतील, तर त्या दूर करण्याचाही अली प्रयत्न करत. खेळाडू मानसिकद़ृष्ट्या तंदुरुस्त असेल तरच तो मैदानावर सर्वोत्तम कौशल्य दाखवू शकतो, असं त्यांचं मत होतं.

हेही वाचा : ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

अली यांचा वारसा

खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीकडेही त्यांचं नेहमीच लक्ष असायचं. खेळाडूंचा सराव सुरू असताना त्यांना पोषक आहार, वैद्यकीय सुविधा याबरोबरच पुरेशी विश्रांती मिळते की नाही, याकडेही त्यांचं लक्ष असायचं. खेळाडूंना विश्रांती मिळाली नाही तर त्याचा अनिष्ट परिणाम मैदानावर खेळताना होऊ शकतो, हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच खेळाडूंचा सराव आणि सामने याचं नियोजन करताना विश्रांतीचा वेळही ते ठरवायचे.  

मनमिळाऊ पण शिस्तप्रिय प्रशिक्षक म्हणूनही त्यांची ओळख होती. अली हे आता आपल्यात नाहीत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिसपटू घडवण्याचा त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव झीशान सांभाळतायत. त्यांच्याकडूनही ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू घडेल, अशी आशा आहे.

हेही वाचा : 

लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'

हो, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे

नव्या पिढीचं प्रेम: स्माईलीच्या मागेही प्रेमाची भाषा

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतुन साभार)