आपल्या ठाण्याच्या खाडीला मिळालाय ‘रामसर साईट’चा बहुमान

१८ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


युनेस्कोने ठाणे खाडीसह भारतातल्या ११ ठिकाणांना रामसर साईट म्हणून मान्यता दिलीय. जल संसाधन, पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने, रामसर साईट महत्त्वाच्या मानल्या जातात. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर हा बहुमान मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी साईट ठरलीय.

युनेस्कोची रामसर परिषद ही जगभरातल्या पर्यावरणविषयक परिषदा आणि चर्चासत्रांमधली महत्त्वाची परिषद मानली जाते. या परिषदेत जगभरातल्या अतिमहत्त्वाच्या पाणथळ जागांबद्दल चर्चा होऊन त्यांना रामसर साईटचा दर्जा दिला जातो. यावर्षी भारतातल्या ११ पाणथळ जागांना हा दर्जा मिळाला असून, त्यात आपल्या ठाण्याच्या खाडीचा समावेश आहे.

काय आहे रामसर साईट

२ फेब्रुवारी १९७१ला युनेस्कोने इराणमधल्या एका शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या विषयावर परिषद भरवली. या परिषदेतला ठराव होता होता पाणथळ जागांचं संरक्षण आणि ते ऐतिहासिक शहर होतं रामसर. त्यामुळे या परिषदेला रामसर परिषद म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या ठरावानुसार मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाणथळ जागांना रामसर साईट म्हणून ओळखलं जातं.

१९७५मधे रामसर ठरावाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी झाली ती प्रथम सहभागी झालेल्या सात देशांच्या सहमतीने. यात ऑस्ट्रेलिया, फिनलँड, नॉर्वे, इराण, स्वीडन, ग्रीस आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. भारताने १९८२मधे रामसर परिषदेचा ठराव स्वीकारला. बर्डलाईफ इंटरनॅशनल, वेटलँड्स इंटरनॅशनल, इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर अशा महत्त्वाच्या पर्यावरणविषयक संस्था रामसर परिषदेशी संलग्न आहेत.

‘रामसर’च्या अधिकृत वेबसाईटनुसार, सध्या जगभरातल्या २४००हून अधिक पाणथळ जागांना रामसर साईट म्हणून मान्यता मिळाली आहे. रामसर ठराव स्वीकारलेल्या १७० देशांच्या यादीत सर्वाधिक रामसर साईट असण्याचा मान युनायटेड किंगडमला जातो. आशिया खंडाचा विचार करता भारत आणि चीनमधे सर्वाधिक म्हणजेच ६४ रामसर साईट आहेत. भारतात तमिळनाडूमधे सर्वाधिक म्हणजेच १४ रामसर साईट आहेत.

पाणथळ जागा का जपायच्या

पृथ्वीवरचा ६ टक्के भूभाग हा पाणथळ जागांनी व्यापलेला आहे. सध्या भारताचं ४.६ टक्के क्षेत्रफळ हे पाणथळ जागांनी व्यापलं असून, वर्षानुवर्षे त्यात घट होत असल्याचं दिसून येतं. १९८९मधे प्रकाशित झालेल्या ‘अ डिरेक्टरी ऑफ एशियन वेटलँड्स’नुसार हा आकडा तेव्हा १८.४ टक्के इतका होता. वर्षानुवर्षे वाढत चाललेलं हे घटीचं प्रमाण पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे.

पाणथळ जागा या वरवर इतर प्राणिमात्रांचा अधिवास म्हणून ओळखल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या मानवजातीसाठीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. किनारपट्टीवरच्या पाणथळ जागा चक्रीवादळ आणि त्सुनामीसारख्या विध्वंसक संकटांचा तडाखा सौम्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पाणी साठवण्याच्या अनोख्या क्षमतेमुळे या जागांच्या आसपासच्या क्षेत्रात पुराचा धोका तुलनेत कमी असतो.

पाणथळ जागांचा प्रभाव हा त्या त्या क्षेत्रातल्या विविध सामाजिक-आर्थिक घटकांवर पडत असतो. त्यात शेती, मासेमारी, पशुपालनसारखे परंपरागत व्यवसाय तर आहेतच, त्याचबरोबर पर्यटनासारखा व्यवसायही उत्तमपणे चालू शकतो, हे पश्चिम बंगालच्या सुंदरबन, केरळच्या वेंबनाड, ओडिशाच्या चिलिका, महाराष्ट्राच्या लोणार सरोवर प्रकल्पांनी सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळे त्यांचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे.

हेही वाचा: एका झाडाची किंमत शोधली कशी?

ठाण्याला मान कसा मिळाला

बहुतांश पाणथळ जागांना विशिष्ट प्राणिमात्रांच्या अधिवासासाठी अभयारण्य म्हणून घोषित केलं गेलं आहे. महाराष्ट्रातली पहिली रामसर साईट म्हणून गौरवलं गेलेलं नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हे याचंच एक उदाहरण. आता यात भर पडलीय ती ठाण्याच्या खाडीची. २०१५मधे या खाडीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. दरवर्षी ऑक्टोबर-नोवेंबरमधे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात स्थलांतरीत फ्लेमिंगो पक्ष्यांची जत्राच भरलेली दिसून येते.

तब्बल सोळा हजाराहून अधिक एकरभर पसरलेल्या ठाणे खाडीला रामसर साईट म्हणून मान्यता मिळावी असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून फेब्रुवारी २०२२मधे केंद्राकडे पाठवण्यात आला. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक जलचरांचा ठाणे खाडीत अधिवास आहे. रामसर साईट म्हणून दर्जा मिळवण्यासाठी जे नऊ निकष रामसर ठरावात आहेत, त्यातल्या सात निकषांची पूर्तता केल्यामुळे युनेस्कोने ठाणे खाडीला रामसर साईटचा दर्जा दिला आहेय.

नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य आणि लोणार सरोवरानंतर रामसर साईटचा दर्जा मिळवणारी ठाणे खाडी ही महाराष्ट्रातली तिसरी आणि सर्वात मोठी साईट ठरलीय. त्याचबरोबर असा जागतिक दर्जा मिळवणारी एखाद्या शहरी महानगरातली ही पहिलीच पाणथळ जागा असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे या दर्जाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

दर्जा मिळाला, फायदा काय

अभयारण्याचा दर्जा मिळाल्यामुळे गेली सात वर्षं ठाणे खाडीतल्या जैवविविधतेला संरक्षण लाभलेलं होतंच. पण आता रामसर साईटच्या दर्जामुळे खाडीला जागतिक महत्त्व आलंय. इथं संवर्धनाच्या हेतूने राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक धोरणाचा तपशीलवार अहवाल भारत सरकारला जागतिक समितीपुढे मांडावा लागणार आहे. शहराच्या मधोमध वसलेल्या या खाडीचं संवर्धन करण्याची जबाबदारी आता स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशासनावर असणार आहे. 

बेकायदेशीर वाळू उपसा, शहर आणि उपनगरांतल्या वाढत्या लोकसंख्येमुळे भासू लागलेला जमिनीचा तुटवडा, वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकरण तसंच अनिर्बंध मासेमारीसारखे बरेच धोके ठाणे खाडी आणि इतर पाणथळ जागांसमोर यक्षप्रश्न बनून उभे आहेत. रामसर साईटचा दर्जा मिळाल्याने आता जागतिक आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे या सर्व प्रश्नांवर उपाय शोधणं आणखी सोपं जाणार आहे.

हेही वाचा: 

पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलुया

पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!