ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

२२ जून २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोना वायरसनंतर जग बदलणार असं म्हटलं जातंय. त्याची सुरवात सिनेमापासून झालेली दिसते. थेटरमधे सिनेमा रिलिज करण्याची प्रथा टाळून अनेक निर्माते आता अमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेत. आपला धंदा बुडेल या भीतीनं थेटरवाले या निर्मात्यांकडे आपला विरोध व्यक्त करतायत. तेव्हा आता ओटीटी विरूद्ध थेटर या वादात कोण कोणाचा बाप ठरेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है’

अमिताभ बच्चन यांच्या शहनशाह या सिनेमातला हा गाजलेला डायलॉग. अमिताभ बच्चन यांचा सिनेमा थेटरात पाहण्यासाठी त्याकाळी थेटराबाहेर झुंबड उडायची. ब्लॅकने तिकीटंही विकली जायची.  पण आता अमिताभचा सिनेमा रिलिज झाला तरी थेटरबाहेर मोठीच्या मोठी रांग लागणार नाही की शो हाऊसफुल होणार नाही. कारण, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है हा डायलॉग घुमणाऱ्या थेटरांनाच आता आपलं बापपण धोक्यात आल्याची चिंता सतावू लागलीय. अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा गुलाबो सिताबो हा नवाकोरा सिनेमा थेटर सोडून थेट अमेझॉन प्राईमवर रिलिज झालाय.

ओटीटीवर रिलिज झालेला पहिला सिनेमा

मिर्झा या भूमिकेत असणारे बिग बी बच्चन एका आलिशान पण जीर्ण झालेल्या हवेलीचे मालक. बंकी म्हणजेच आयुषमान हा त्यांचा भाडेकरू. मिर्झा यांचं हवेलीबद्दलचं प्रेम आणि बंकीसोबत चाललेली त्यांची धुसफूस या सगळ्याचं चित्रण गुलाबो सिताबो सिनेमात दाखवलंय. गेल्या एक वर्षापासून या सिनेमाची आतुरता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. १७ एप्रिल २०२० ला सिनेमा थिएटरमधे रिलिज होणार होता.

पण मार्चपासून देशात लॉकडाऊन झाला. त्याआधीच सरकारनं देशातले सगळे थेटर बंद करायला लावले होते. साहजिकच, दर शुक्रवारी नवा सिनेमा थेटरमधे रिलिज व्हायची आपली परंपरा थांबली. अनलॉक ०.१ चालू झाल्यापासून दुकानं, मॉल हळूहळू सुरू होऊ लागलेत. पण थेटर जुलैपर्यंत उघडता येणार नाहीत. जुलैमधेही थेटर्स उघडता येतील की नाही याबाबत पक्कं कुणालाच सांगता येणार नाहीय.

अशा अस्थिर परिस्थितीत वाट बघत बसण्यापेक्षा दिग्दर्शक शुजित सरकार यांनी आपला गुलाबो सिताबो हा सिनेमा १२ जूनला अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज केला. गुलाबो सिताबो आधी ‘अंग्रेजी मिडीयम’ हा इरफान खानचा सिनेमाही हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झाला होता. त्याआधी आठवडाभर तो थेटरमधेही चालू होता. पण शुजित सरकारचा हा सिनेमा थेटरमधे न येता थेट अमेझॉन प्राईमवर उपलब्ध झालाय. त्यामुळेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणारा गुलाबो सिताबो हा बॉलिवुडचा पहिला सिनेमा ठरलाय.

हेही वाचा : सारं काही चांगलं असूनही डिप्रेशन येतंय ना, मग दीपिकाची ही गोष्ट वाचा

ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे काय?

आपण थेटरात जाऊन तिकीट काढतो आणि सिनेमा पाहतो. हा सिनेमा थेटरात दाखवणाऱ्यांना एक्झिबीटर किंवा प्रदर्शक असं म्हटलं जातं. या प्रदर्शकांकडे हा सिनेमा पोचवण्याचं काम डिस्ट्रीब्युटर म्हणजेच वितरक करत असतात. तर सिनेमा बनवुन या वितारकांकडे पोचवण्याचं काम निर्माते म्हणजेच प्रोड्यूसर करतात. निर्माता - वितरक – प्रदर्शक - प्रेक्षक अशी ही साखळी असते. तिकीट विक्रीतून जमलेल्या पैशातून वितरक आणि प्रदर्शक आपल्या कमिशनचा भाग काढून घेतात.

आता ही मधली वितरक आणि प्रदर्शकाची साखळी टाळून निर्मात्याने तयार केलेला सिनेमा थेट आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम ओटीटी प्लॅटफॉर्म करतात. ओटीटी याचा पूर्ण अर्थ होतो ओवर द टॉप. ओटीटीमुळे ऑडिओ विज्युअल म्हणजे दृकश्राव्य स्वरूपातला, आवाज आणि पडद्यावर चित्रं असणारा वीडियो कंटेण्ट इंटरनेटद्वारे लोकांपर्यंत पोचतो. अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, मॅक्स प्लेअर, हॉटस्टार हे भारतातले लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जातात.

साधंसोप्पं सांगायचं तर आपल्याला सिनेमे, नाटकं, टीवी सिरिअल दाखवणारे हे मोबाईल अॅप्स आहेत. इथं आपल्याला जुनेनवे सिनेमे, शॉर्ट फिल्म, वेबसिरिज, डॉक्युमेंटरी, स्पोर्ट, टीवी मालिका असं बरंच काही पाहता येतं. घर, ऑफीस, बस, ट्रेन अशा कुठल्याही ठिकाणी आपण आपल्या मनाजोगता सिनेमा, सिरिअल बघू शकतो. अट फक्त आहे, ती म्हणजे तुम्ही संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशीप हवी आणि मोबाईलला इंटरनेट कनेक्ट असलं पाहिजे. अनेक ऍपमधे तर इंटरनेट असताना सिनेमा किंवा वीडियो डाऊनलोड करून ठेवायचीही सोय असते. मग आपण ऑफलाईनमधेही डाऊनलोड केलेला कंटेट बघू शकतो.

काही ओटीटी प्लॅटफॉर्म अगदी मोफत वापरता येतात. पण त्यात टीवीवाले करतात तसा आपल्यावर जाहिरातीचा मारा होतो. तर काही ऍपकडून महिन्याला किंवा वर्षाला ठराविक वर्गणी घेतली जाते आणि कोणत्याही जाहिरातींशिवाय ऍपवर उपलब्ध असणारं हवं ते, हवं तितका वेळ आपण पाहू शकतो.

सिनेमाप्रमाणे गाजली वेबसिरिज

२००८ मधे रिलायन्सने बिगफ्लिक्स हा पहिला ओटीटी फ्लॅटफॉर्म भारतात आणला होता. २०१० मधे नेक्स झी टीवी नावाचं ओटीटी प्लॅटफॉर्मचं पहिलं ऍप भारतात आलं. या नेक्सझीटीवी अॅपवर लाइव टीवीही पाहता यायचा आणि सोबत आपल्याला हवे तसे वीडियोही पाहता यायचे. या नेक्सझीटीवीनं २०१३ मधे भारतात पहिल्यांदा आयपीएलचे लाईव सामनेही दाखवले. त्यानंतर झी कंपनीचं डिट्टो टीवी आणि सोनी लाइव हे दोन ओटीटी प्लॅटफॉर्म आले. टीवीवर चालणाऱ्या मालिकांचे सगळे एपिसोड या अॅपवर दिसत. या दोन प्लॅटफॉर्मनंतर भारतात ओटीटीची गांभीर्यानं चर्चा सुरू झाली. २०१६ मधे नेटफ्लिक्स भारतात आल्यावर तर ओटीटीनं भलताच जोर धरला.

सध्या भारतात अमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी फाइव, इरोज नाऊ, सोनी लिव, आल्ट बालाजी, वूट असे ३० ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. २०१९ च्या आकडेवारीनुसार त्यातलं हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम हे भारतात सर्वाधिक पाहिले जाणारे ओटीटी आहेत.

तरूणांना ओटीटीकडे खेचण्यात वेबसीरिजनं मुख्य भुमिका बजावलीय. टीवीवरच्या कंटाळवाण्या, प्रौढांसाठीच्या मालिकांना कंटाळलेली तरूणाई आपल्या पिढीचं दर्शन घडवणाऱ्या परमनंट रूममेट सारख्या वेबसीरिजकडे वळली. सुरवातीला बहुतांश वेबसीरिज या इंग्लिशमधल्या असायच्या. पण आता हिंदी वेबसीरिजचं पिकही चांगलं फुलून आलंय. २०१८ मधे आलेली सेक्रेड गेम्स ही नेटफ्लिक्सवरची वेबसीरिज तर एखाद्या सिनेमाएवढी गाजली.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

तमिळ इंडस्ट्रीही ओटीटीवर भाळली

वेबसीरिजप्रमाणेच जुने नवे सिनेमेही ओटीटीवर आले. आर्ट फिल्म किंवा पॅरेलल फिल्मसारखे अनेक सिनेमे पूर्वी एखाद्या फिल्म फेस्टिवलमधे रिलिज होत असत. पण अलिकडे हे सिनेमे ओटीटीवर रिलिज करणं चालू झालंय. कर्मशिअल फिल्म म्हणजेच बॉलिवुडमधला एखादा सिनेमा रिलिज झाल्यानंतर जवळपास ८ आठवडे थेटरमधे दाखवला जातो. त्यानंतर लगचेच हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध करून द्यायचा असाही ट्रेन्ड सुरू झाला होता. पण लॉकडाऊनमुळे हा ट्रेन्ड पूर्णपणे बदलला. आता तर आर्ट फिल्मप्रमाणेच हिंदी सिनेमेही थेटरआधी ओटीटीवर रिलिज करणं चालू होईल.

गुलाबो सिताबो नंतर आता ओटीटीवर बॉलिवुडचे कोणते सिनेमे रिलिज होणार याची भलीमोठी यादी तयार झालीय. विद्या बालनचा शकुंतलादेवी हा सिनेमा अमेझॉनवर रिलिज होणार आहे. तर अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, नवाझुद्दीन सिद्दीकीचा घुमकेतू अशा प्रसिद्ध सिनेमांबरोबरच साऊथकडचेही अनेक निर्माते ओटीटीवर सिनेमा रिलिज करायच्या तयारीला लागलेत.

थेटरवाल्यांना होतोय ओटीटी वरचढ

ओटीटीवर सिनेमे रिलिज करण्याचा ट्रेन्ड हॉलिवुडमधे खूप जुना आहे. हॉलिवूडमधल्या रोमा या नेटफ्लिक्सवर रिलिज झालेल्या सिनेमाने ब्रिटिश अॅकेडमी फॉर अवॉर्ड म्हणजेच बाफ्ताचे चार पुरस्कार जिंकले होते. त्यामुळे मोठा वादंगही झाला. हा सिनेमा थेटरमधे रिलिज झाला नसतानाही त्याला पुरस्कार दिल्याबद्दल अमेरिकेतल्या वितारकांनी बाफ्तावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती.

भारतीय सिनेमात मात्र असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय असं अनेकांचं म्हणणं आहे. पण खरंतर, असा प्रकार याआधीही झाल्याचं जागतिक सिनेमाचे अभ्यासक आणि पत्रकार नरेंद्र बंडबे यांनी 'कोलाज'शी बोलताना सांगितलं, ‘वितरक आणि प्रदर्शक निर्मात्याची खूप अडवणूक करत असतात. त्यामुळे हे टाळून टाटा स्कायच्या माध्यमातून आपला सिनेमा रिलिज करता येईल का याचा विचार कमल हसन यांच्या दशावतार या सिनेमासाठी केला गेला होता. पण असं केलं तर आम्ही कमल हसन यांच्यावर बहिष्कार टाकू असा इशारा या वितारकांना दिला. त्यामुळे हा निर्णय बारगळला.’

आताही ओटीटीवर सिनेमा रिलिज केला तर त्यानंतर पुन्हा तो थेटरमधे लावायला नकार दिला जाईल, असा पावित्रा थेटरवाल्यांनी घेतलाय. कारण, ओटीटी हा आपला खरा बाप आता आपल्या डोईजड होत असल्याचं त्यांच्या लक्षात येतंय. हे थांबलं नाही तर काही दिवसांत थेटर ओस पडू लागतील आणि आपला धंडा बुडेल अशी भीती त्यांना वाटत असणार. ओटीटी की थेटर या वादात खरोखर ओटीटी वरचढ ठरतेय.

थेटरमधे जेवढा पैसा कमावता येईल साधारण तितकाच पैसा ओटीटीला प्रदर्शनाचे हक्क विकल्यावर मिळतोय. गुलाबो सिताबो या सिनेमाने थेटरमधे ६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली नसती, असं सिनेमातज्ञ सांगतायत. तर बिझनेस इन्सायडर या वेबसाईटवरच्या एका बातमीत, सिनेमाच्या प्रदर्शनाचे हक्क अमेझॉनने ६५ कोटी रूपयांना विकत घेतले असल्याचं सांगितलंय. गुलाबो सिताबोच्या निर्मितीसाठी ३० कोटी रूपये खर्च आला होता. म्हणजेच, निर्मात्याला साधारण ३५ कोटींचा फायदा झालाय.

हेही वाचा : हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

ओटीटीवरच्या सिनेमावर सेन्सॉर नाही

शिवाय, सिनेमाच्या प्रदर्शनाची पारंपरिक पद्धत टाळल्यामुळे ओटीटीवर रिलिज केल्या जाणाऱ्या कोणत्याही वेबसीरिज किंवा वीडियोवर कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशीप लागत नाही, ही निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही मोजक्या नियमांचं पालन करून सिनेमे, वेबसिरिज त्यातल्या शीव्या, बोल्ड किंवा हिंसक सीन यांच्यासकट ओटीटीवर रिलिज केले जाऊ शकतात. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्माते येत्या काळात ओटीटीलाच प्राधान्य देतील, असं दिसतंय.

प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाला तर ओटीटीमुळे वीडियो ऑन डिमांड म्हणजे पाहिजे त्यावेळी, पाहिजे तो वीडियो किंवा सिनेमा त्यांना पाहता येईल. प्रेक्षकांना मूडनुसार विनोदी सिनेमा बघायचा की हॉरर हे ठरवता येतं. कंटाळवाणा वाटणारा प्रवास या ओटीटीवरच्या सिनेमांमुळे सुखकारक होईल.

थेटरचं एका माणसाचं तिकीट असतं साधारण २०० रूपये. त्यात थेटरपर्यंत जाण्याचा खर्च, तिथल्या पॉपकॉर्नचा, खाण्यापिण्याचा खर्च धरला तर एका सिनेमासाठी लागणाऱ्या खर्चात एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं वर्षाचं सबस्क्रिपशन येतं. त्यात घरातले सगळे सदस्य ओटीटीवरचा सिनेमा घरबसल्या पाहू शकतील. त्यामुळेच ओटीटी प्रेक्षकांच्या खिशाला परवडणारा आहे.

ओटीटीवर फक्त गोष्ट लक्षात राहील

सध्या भारतात अमेझॉन प्राईमचे १७ लाख सबस्क्रायबर आहेत. गुलाबो सिताबो आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलाय. २०० देशांत आणि १५ भाषांमधे हा सिनेमा पाहता येतो. असं असलं तरी, भारतातला ओटीटीचा प्रेक्षक वर्ग अत्यंत मर्यादीत आहे. शहरी, त्यातही सुशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय घरातली विशेषतः तरूण मंडळी ओटीटीचा जास्त वापर करतात, असं सध्याचं चित्र आहे. इंटरनेटची पुरेशी सुविधा नसणाऱ्या गावात सध्या थेटरमधले सिनेमेच चालतात. बॉलिवुडचे सगळेच सिनेमे ओटीटीवर रिलिज होऊ लागले तर या लोकांना निदान काही काळ सिनेमांना मुकावं लागेल.

नरेंद्र बंडबे म्हणतात, ‘सिनेमा पाहणाऱ्यासाठी एकप्रकारचं वातावरण निर्माण होण्याची गरज असते. ते ओटीटीवर होत नाही. ओटीटीवर सिनेमा पाहताना आपल्याला फक्त सिनेमाची पटकथा लक्षात येईल. पण त्याचं दिग्दर्शन, कॅमेऱ्याचा अँगल, आवाजातले बारकावे अशा गोष्टींचा आनंद घेण्यासाठी थेटरमधेच जावं लागेल. सिनेमा ही थेटरमधेच बघायची गोष्ट आहे.’

खरंतर, या सगळ्या गोष्टीचा आनंद ओटीटीवरही घेता येऊ शकतो. पण त्यासाठी चांगले, दर्जेदार हेडफोन्स, होम थेटर, चांगला मोबाईल, स्मार्ट टीवी वगैरे गोष्टी लागतात. असा खर्चिक सोहळा सगळ्याच वर्गातल्या लोकांना परवडण्यासारखा नाही. शिवाय, ‘थेटरमधे जाऊन सिनेमा पाहणं हा कौटुंबिक कार्यक्रम असतो. एकानं तिकीटं काढून आणणं, सगळ्यांनी नटूनथटून जाणं, तिथे जाऊन बसणं या सगळ्या गोष्टी सिनेमाइतक्याच महत्त्वाच्या असतात,’ असं बंडबे म्हणतात.

ओटीटीवर सरसकट सिनेमा पाहता येत नाही. मधे फोन येतो, घरी कोणीतरी येतं, काही कामासाठी उठावं लागतं अशा अनेक गोष्टी घडतात. त्यातून तुकड्या तुकड्यातून सिनेमा पाहीला जातो. पण खरंतर सिनेमा ही सरसकट बघण्याची गोष्ट आहे, असं बंडबे यांचं म्हणणं आहे. ‘आपल्याकडे सिनेमाच्या मधे इंटरवल होतो. परदेशातल्या अनेक थेटरमधे इंटरवल नावाचा प्रकारच नसतो. सिनेमा हॉलमधे आपण प्रवेश करायचा, त्यात आपलं सगळं मन गुंतवायचं आणि दोन एक तासांनी त्यातून बाहेर यायचं. थेटरमधे सिनेमा पाहताना एका अंधाऱ्या खोलीत आपण असतो आणि समोर फक्त सिनेमाचा प्रकाश येतो. या सगळ्या वातावरणाचा वेगळा परिणाम आपल्या मनावर होत असतात,’ असं ते म्हणतात.

हेही वाचा : #बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?

लॉकडाऊननंतर थेटर चालू राहणार?

‘मुळातच ओटीटी हा प्रकार सेकंड स्क्रिन म्हणून ओळखला जातो. फर्स्ट स्क्रिन म्हणजे थेटर सारखा मोठा पडदा. सिनेमाचं चित्रीकरण करणारे कॅमेरे या मोठ्या पडद्याचा विचार करून बनवलेले असतात. सिनेमाचं दिग्दर्शनही तसंच होत असतं. छोट्या स्क्रिनचा विचार नंतर केला जातो. ओटीटीवर सिनेमा रिलिज केल्याने हा सगळा सिनेमा बघायचा आनंद निघून जाणार आहे.’

ते काहीही असलं तरी आता अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना अशा दोन पिढ्यांच्या सुपरस्टार्सचा एक सिनेमा आपल्या मनोरंजन विश्वात नवा बदल आणू पाहतोय. लॉकडाऊन संपेपर्यंत, परिस्थिती पुन्हा आधीसारखी होत नाही तोपर्यंत तरी सिनेमा निर्माते ओटीटी हा पर्याय निवडतील. पण नंतर थेटरकडे वळू असा निर्मात्यांचा प्लॅन दिसतोय, असं बंडबे सांगतात. इतकंच नाही, तर लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेले प्रेक्षक सिनेमालाच प्राधान्य देतील आणि आधीपेक्षा जास्त संख्येने थेटरमधे हजेरी लावतील, असं बंडबे यांचं म्हणणं आहे. शिवाय थेटर आणि वितरणाच्या प्रक्रियेत गुंतलेल्या साधारणपणे २ लाख लोकांच्या रोजगाराचाही हा सवाल आहे.

त्यामुळे थेटरकडे थेट पाठ न फिरवता ओटीटी आणि थेटर दोन्ही माध्यमं एकत्र चालू राहतील. सिनेमातून आपण काय शिकतो, गाणी किती छान असतात यापेक्षा जास्त सिनेमातून होणारं मनोरंजन, सिनेमा बघण्याच्या प्रक्रियेमधून मिळणारा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचाय. त्यामुळेच लॉकडाऊननंतरही थेटर पुन्हा चालू होतील, असा विश्वास गुलाबो सिताबोचे दिग्दर्शक शुजित सरकार यांनाही वाटतो. ओटीटी आणि थेटर हातात हात घालून एकाच मनोरंजन विश्वास गुण्यागोविंदाने नांदतील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.

हेही वाचा : 

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे?

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव