चॅटिंग, डेटिंग ही आधुनिक काळातली प्रेमाची गंमत!

१४ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


या नव्या, डिजिटल युगातल्या तरुणाईच्या प्रेमाची व्याख्या बदलतेय. आणखी विस्तारतेय. कुठं हे प्रेम परंपरावादी, कर्मठ समाजाला वणवा लावतंय तर कुठं ते आकर्षण आणि प्रेमाचा सुवर्णमध्य साधू पाहतंय. बागेत, समुद्रतीरावर फुलणारं प्रेम आता मोबाईलवरही बहरतंय. नवं प्रेम काय, जुनं प्रेम काय; प्रेम तुमचं नि आमचं सेमच असतं!

‘वॅलेंटाईन’! सध्या प्रचलित असलेला, आणि तरुणच काय, तर आबालवृद्धांनाही सुपरिचित असणारा शब्द! एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेम साजरं करण्याचा हा दिवस! फेब्रुवारी महिना मुळातच प्रेमफुलांचा बहर घेऊन येतो. आणि अशातच उधाण येतं ते आपल्या आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणींना!

लहानपणीचं ‘समथिंग समथिंग’

परीकथेतला सफेद घोड्याचा देखणा, रुबाबदार राजकुमार आणि घार्‍या डोळ्यांची, गुलाबी गालांची सुंदर राजकुमारी यांच्या कल्पनाविलासात रमता रमता बालपणीच आपल्या सगळ्यांच्या मनात प्रेमभावनेचा अंकुर फुटतो. मग या पात्रांना वास्तवात शोधताना आपल्या शाळेतल्या किंवा आपल्या घराजवळच्या मुलीसोबत किंवा मुलासोबत नजरानजर होते आणि मनात वाजायला लागतं,

‘हृदयात वाजे समथिंग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी आता ड्रीमिंग’

त्या शाळकरी वयात आपल्या आवडत्या व्यक्तीवर अर्थातच प्रपोज ‘मारला जातो’. आपलं आवडतं माणूस आपल्या समोर आल्यावर पोटात भिरभिरणार्‍या फुलपाखरांची बात तर काही औरच!

हेही वाचा: आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

समाजाला वणवा लावणारं प्रेम

पौगंडावस्थेतल्या या प्रेमाच्या पायर्‍या वाढत्या वयात वेगळ्या होत जातात हेही तितकंच खरं! समुद्राकाठी निवांत दोघांनी बसून राहणं. मावळत्या सूर्याने उधळलेले रंग एकत्र पाहणं. वाफाळत्या चहाचा एकाच कपातून घोट घेणं. त्याने तिच्यासाठी चाफा, मोगरा, जाई जुई आणि हो गुलाबही आणणं. एकमेकांना लिहिलेली पत्रं सांभाळून ठेवणं. ती अधूनमधून वाचणं नि खुदकन गालात हसणं!

हे इतकं सरळ, साधं, मऊ आणि सोप्पं असतं प्रेम! तरीही कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं’. अशावेळी आठवतात ती एकमेकांसाठी जगाविरुद्ध उभी राहणारी प्रेमीयुगुलं.

आपल्या माणसासाठी सर्वस्व अर्पण करणारी दोन पेटून उठलेली मनं! कारण प्रेम करणारी मनं एकमेकांत जगाला विसरुन गुंतलेली असतात. पावसात ओलीचिंब होऊन न्हाऊन निघतात. हे भिजणं प्रत्येकवेळी समाज मान्य करेलच असं मात्र नाही. प्रेमीयुगुलांवर निर्बंध लादणार्‍या या समाजाला वणवा लावतं ते प्रेम!

सेटिंग, डेटिंग आणि चॅटिंग!

आताच्या काळात प्रेमाचे हेच आयाम बदलताना मात्र दिसतायत. आवडत्या व्यक्तीसोबत संभाषणाची सुरुवात जर करायची असेल तर ‘जेवलीस का?’ या प्रश्नाशिवाय आमच्या प्रियकरांची गाडी काही पुढे सरकतच नाही. व्हाॅटसऍप स्टेटस, इन्स्टा स्टोरीला गुलजारांच्या शायर्‍या लावून आपल्या क्रशने त्या पाहाव्यात नि निदान त्याला आपल्या मनाची घालमेल कळावी यासाठीचा आटापिटा अगदी वाखाणण्याजोगा असतो.

चॅटिंग, डेटिंग ही आधुनिक काळातली प्रेमाची गंमत आहे! रोज न चुकता हाय, हॅलो, गुडमाॅर्निंग, गुडनाईटच्या नोटिफिकेशनने मोबाईल खणखणतो. आपल्या क्रशने केलेलं साधं स्टोरी मेन्शनही पराकोटीचं आनंद देऊन जातं’ त्याला पाठवलेल्या रीलवर त्याचं रिऍक्ट होणं हेही त्याचं आपल्यावर असणार्‍या प्रेमाचं मोजमाप बनून गेलंय!

बरं प्रेमाच्या जंजाळात अडकलेल्यांसाठी 'सेटिंग लावणं' ही संकल्पनाही काही नवी नाही. आपल्या मित्रमैत्रिणींकरवी आपल्या क्रशला सेटिंग लावून गळ घातली जाते. आधीसारखं पत्र किंवा भेटकार्ड जरी आता पाठवण्याचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी आपलेच जुने चॅटस् पुन्हा पुन्हा चोरुन वाचणं हेही भारी फिलिंग आहे! मेसेज सीन करुन सोडून दिला म्हणून लुटूपुटीची भांडणंही नात्यात होतातच की.

हेही वाचा: प्रेमासाठी खावाच लागतो एखादा धक्का

प्रेमालाही मिळतोय ऑप्शन!

हे सगळं सुरु असतानाच आजूबाजूला पाहिलं तर जाणवतं की प्रेमाला ऑप्शन्सही भरपूर मिळू लागलेयत. झटपट गोष्टी मिळणार्‍या या जगात आपले जोडीदारही पटपट बदलू लागलेयत. शरीरसंबंधांकडे गरज म्हणून तर लग्नाकडे एक तडजोड म्हणून पाहिलं जातंय.

शारीरिक भूक भागवणं, आपल्या जोडीदाराने आपलंच ऐकावं हा आग्रह धरणं, आपल्या अपेक्षांचं ओझं त्यावर लादणं नि यातलं काहीच मिळत नसेल तर 'ब्रेकअप' बोलून असलेले संबंध तोडून टाकणं. हे खरं प्रेम आहे का? हीच एक शंका निर्माण होते.

दुसरं म्हणजे आपल्याला आवडणारी व्यक्ती जर आपल्याला होकार देत नसेल तर स्वत:चं किंवा त्या क्रशचं जीवन संपवण्याची शपथ घेणारे एकतर्फी महाभागही हल्ली वाढलेत. मीरेचा कृष्ण, जनीचा विठोबा याबाबतीत मात्र अगदी भाग्यवान! मीरेने, जनीने केलेली एकतर्फी प्रीती भक्तीरसात परावर्तित झाली.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं!

याच तरुणाईच्या प्रेमाची दुसरी बाजू म्हणजे, एकत्र मोठं होणं, आपल्या जोडीदाराच्या यशात आपणही सहभागी होणं, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं. अशीही जोडपी आजूबाजूला दिसतात बरं! प्रेम, प्रेम म्हणता म्हणता आपल्यासमोर येणारं केवळ ‘स्त्री-पुरुष नातं’ हे चित्रही कुठेतरी बदलताना दिसतंय.

ते स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष असं दिसलं तर त्यात काही वावगं नाही ही धारणा समाजात मूळ धरु पाहतेय. याचा स्वीकार समाजमनात होणं गरजेचं आहे. प्रेमाचे नानाविध रंग, ते साजरं करण्याच्या असंख्य पद्धती, त्याला दिलेल्या अनंत उपमा आणि त्याच्यावर लिहिलं गेलेलं प्रचंड विविधांगी साहित्य हे सर्व जरी अमर्याद असलं तरी पाडगावकर म्हणतात तसं, 

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं!
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!

हेही वाचा: 

प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया

समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव

खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?