अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे.
यंदा मान्सून पूर्व काळात ‘तोक्ते’ आणि ‘यास’ ही दोन चक्रीवादळं अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झाली. गेल्यावर्षी अॅम्फन, निसर्ग तर मान्सुनोत्तर काळात ‘गती’, ‘निवर’ आणि ‘बुरेवी’ अशा एकंदर पाच चक्रीवादळांचा अनुभव आपण घेतलाय.
चक्रीवादळांचा मान्सूनवर प्रभाव पडतो; पण मान्सून काळात चक्रीवादळं निर्माण होत नाहीत हे महत्त्वाचं आहे. ‘मान्सून’ हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौसिम या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ ‘ऋतू’ किंवा ‘हंगाम’ असा होतो. नैऋत्य मोसमी वार्यांना आणि त्यासोबत बरसणार्या पावसाला ‘मान्सून’ हे नाव ब्रिटिश आल्यानंतर मिळालं.
समुद्रावरून येताना हे वारे मोठ्या प्रमाणात बाष्प आणतात. अनुकूल स्थितीत या बाष्पाचं रूपांतर ढगांमधे होतं. या ढगांना योग्य तो थंडावा मिळाला की ते जलधारा बनून पडतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो आणि हाच तो ‘मान्सूनचा पाऊस’ होय.
पाऊस वातावरणामधली एक प्रक्रिया आहे. जून-जुलैमधे मान्सून हिमालयापर्यंत धडकतो. आपल्या कृषिप्रधान देशाचा जुलै ते ऑक्टोबर असा खरीप हंगाम यावर अवलंबून असतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. यावेळी प्रामुख्याने बंगालच्या उपसागरातल्या बाष्पामुळे आणि ‘ईशान्य मोसमी’ वार्याने परतीचा मान्सून पाऊस येतो. या पावसावर ऑक्टोबर ते मार्च असा रब्बी हंगाम पिकतो.
अनेकदा शेतकरी मान्सूनपूर्व पावसाला मान्सून समजून नियोजन आणि पेरणी करून मोकळा होतो आणि दुबार पेरणीचं संकट ओढावून घेतो. वादळाच्या प्रभावामुळे मान्सून लवकर येत असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. अशा ‘आभासी मान्सून’पासून सावध रहावं. गेल्या वीस वर्षांत वेगाने बदललेल्या मान्सून आणि वादळांच्या पॅटर्नमुळे मान्सून निकष पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे.
हेही वाचा : पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनचा पाऊस आणि मान्सुनोत्तर पाऊस अशी तीन टप्प्यांत पावसाची वर्गवारी करता येऊ शकते. याशिवाय अचानक येणारा अवकाळी पाऊस काय? हे शेतकर्यांनी समजून घेतलं पाहिजे
मान्सूनपूर्व पाऊस :
यालाच प्री मान्सून रेन म्हणजेच वळवाचा पाऊस असंही म्हणतात. ढोबळ मानाने मार्च ते मे आणि मान्सून पॅटर्न बदलल्याने सध्या जूनमधे ही होणारा पाऊस हा मान्सून पूर्व किंवा वळवाचा पाऊस होय. वातावरणातलं तापमान, हवेचा दाब, आर्द्रता यांच्यातल्या बदलामुळे अस्थिरता वाढल्याने हा पाऊस होतो. अजस्र क्युमुलोनिंबस प्रकारच्या ढगांमुळे हा पाऊस होतो.
वातावरणातल्या अस्थिरतेमुळे वादळी वारे, गडगडाट आणि कडकडाट असे विजांचे तांडव, गारा किंवा गारपीट, आकाशात ढगांचे पुंजके वेगवेगळ्या रंगछटा आणि शेडमधे दिसणं ही पाऊस ओळखण्याची साधी लक्षणं किंवा खूण आहे. हा पाऊस दोन प्रकारे कोसळतो.
अ) दिवसभर उष्णता वाढल्यामुळे दुपारी १२ वाजल्यावर आणि जास्त करून २ नंतर हवा तापल्याने ऊर्ध्व झोत निर्माण होत खालून वरच्या दिशेने हवेचा प्रवास होऊन अस्थिरतेमुळे दिवसा पडतो.
ब) संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हवा थंड होऊन वरून खालच्या दिशेने येऊ लागल्याने ढगात घुसळण होत अस्थिरतेने रात्री ते पहाटे सूर्य नसताना पाऊस पडतो.
मान्सूनचा पाऊस :
ढगांचे पुंजके यात दिसत नाहीत तर आकाश समान एका रंगांच्या शेडमधे काळपट दिसतं. पाऊस रिपरिप पडत राहतो. मान्सूनपूर्व पावसातली कुठलीच लक्षणं दिसत नाहीत, कारण वातावरण स्थिर झालेलं असतं.
मान्सुनोत्तर पाऊस :
हाच पाऊस मान्सून पश्चात किंवा पोस्ट मान्सून म्हणून ओळखला जातो. यात मान्सूनपूर्व पावसाप्रमाणेच सर्व लक्षणे वातावरणात असतात. ढोबळमानाने याचा कालावधी ऑक्टोबर व नोव्हेंबर असा असून याची तीव्रता कमी असते.
अवकाळी पाऊस :
डिसेंबर ते फेब्रुवारीत होणार्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात. हिवाळी पाऊस असंही याला कधी कधी म्हणतात.
हेही वाचा : फ्लॅश दुष्काळ म्हणजे हवामान बदलाचं नवं अपत्यच!
हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळमधल्या आठ केंद्रांवर अडीच मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन होतं. दरवर्षी १० मे नंतर मिनिकॉय, अमिनी, तिरुवनंतपूरम, पुनालीर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्ट्यम, कोची, त्रिसूर, कोझीकोडे, थालासेरी, कन्नूर, कुडुलू आणि मंगलोर या वेधशाळांच्या क्षेत्रांपैकी किमान आठ ठिकाणी सलग दोन दिवस अडीच मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडला तर केरळमधे मान्सूनचं आगमन झालं असं जाहीर केलं जातं.
मान्सून भाकितासाठी घटक
१) डिसेंबर-जानेवारीतल्या उत्तर अटलांटिक आणि उत्तर प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरच्या तापमानातला फरक.
२) फेब्रुवारी-मार्चमधल्या विषुववृत्तीय दक्षिण हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान
३) फेब्रुवारी-मार्चमधल्या पूर्व आशियातल्या समुद्रसपाटीवरचा दाब.
४) जानेवारीचं वायव्य युरोपच्या जमिनी जवळचं तापमान.
५) फेब्रुवारी-मार्चमधल्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरातल्या ऊबदार पाण्याचं तापमान.
हे पाच घटक आणि इतर माहितीचा वापर करत आतापर्यंत मान्सून अंदाज दिला गेलाय. सांख्यिकीय आणि गणितीय मॉडेलने आकडेमोड करत मान्सूनचे अधिकृत अंदाज दिले जातात. मान्सून अंदाज वर्तवताना, काश्मीर ते कन्याकुमारीचं हवामान संबंधित घटक सोडून युरोपच्या जमिनी जवळच्या तापमानाचाच भारताच्या मान्सूनशी संबंध कसा आणि किती आहे? तसंच हिमालय आणि सह्याद्री पर्वतरांगांमधलं तापमान, वारे, दाब असे भारतीय स्थानिक घटक मान्सून मॉडेलमधे का आवश्यक वाटत नाहीत?
विजांचं तांडव, हिंद महासागरातल्या चक्रीवादळांची निर्मिती असे जवळचे आणि भारतातले घटक का मॉडेलमधे नाही? या प्रश्नाची समाधानकारक उत्तरं हवामान खात्याकडून अद्याप मिळालेली नाहीत. पण या सर्व घटकांचा वापर केला तर आपण अधिकाधिक अचूक हवामान माहिती शेतकरी आणि सामान्य जनतेला देऊ शकू.
हवामान खात्याच्या ५५६ स्टेशन्सचा प्रत्यक्ष जमिनीलगतचा डाटा, भारतातल्या जवळपास २७ रडार्सचा डाटा, उपग्रहांना डाटा यांचं सुपर कॉम्प्युटर्सवर रियल टाईम अॅनालिसीस किंवा विश्लेषण करता येणं शक्य आहे.
मान्सून पॅटर्न बदलामुळे लांबलेल्या पावसाने ९२ लाख हेक्टर पेक्षाही जास्त शेती २०१९ ला महाराष्ट्रात उद्ध्वस्त झाली. त्यामुळे देशभरात कांद्याचे भाव २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले होते. १ जून ते १५ नोव्हेंबर या दरम्यान होणारा पाऊस म्हणजे मान्सून!’ अशी नवी व्याख्या हवामान खात्याने आता अनधिकृतपणे स्वीकारायला हवी, अशी मागणी केली होती.
चुकीच्या हवामान माहितीसाठी कारणीभूत ठरणारी आणि आज वापरली जाणारी आयएमडीची १९७१ ची फोरकास्टिंग मॅन्युयल आता कालबाह्य झाली आहे. त्यातही मूलभूत बदल होणं अत्यंत गरजेचं आहे.
अनेकदा मान्सूनचं भाकीत वर्तवताना ठिकाणी स्टॅटिस्टिकल मॉडेलची मदत अजूनही घेतली जाते. यातही बदल होणं आवश्यक आहे.
हेही वाचा : या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय
३० सप्टेंबर २०१९ ला भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजे आयएमडीने १४५ वर्ष पूर्ण केलेत. आयएमडीचा कारभार पृथ्वी विज्ञान खात्यांतर्गत चालतो. यावेळीच्या कार्यक्रमात पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडली होती. १९४१ ला १ जूनला सुरू होऊन मान्सून परतण्याची तारीख ३० सप्टेंबर अशी ठरवली गेली होती. पण आता ३० सप्टेंबरनंतर मान्सून परतताना दहा ते पंधरा दिवस उशीर होणार आहे, असं स्पष्ट सांगितलं होतं.
केरळपासून १ जूनलाच मान्सून आपला प्रवास सुरू करणार आहे. लोकांना माहिती देण्यासाठी आम्ही १९४० चं हवामानशास्त्र वापरू शकत नाही, हे थोडंसं विचित्र आहे अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली होती. २०२० चा मान्सून आणि पावसाळा दहा दिवस उशिरा येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. हवामान खात्यातल्या या सकारात्मक बदलाचं खरोखरच स्वागत करायला हवं.
मान्सून आणि चक्रीवादळाचा पॅटर्न बदलला आहे. ढोबळमानाने मान्सून पॅटर्न आणि चक्रीवादळाच्या पॅटर्न बदलाचे चार भागात वर्गीकरण करता येईल.
अ) १९५१ ते १९७१ पर्यंत मान्सूनचा एक ठराविक पॅटर्न होता.
ब) १९७१ ते २००० पर्यंत वेगळा मान्सूनचा पॅटर्न होता.
क) २००१ ते २०१५ पर्यंत मान्सूनचा परत वेगळा पॅटर्न बघायला मिळतो जो अतिशय वेगाने बदलल्याचं दिसतं. पण मान्सूनसोबत चक्रीवादळाचाही पॅटर्न बदलला आहे.
ड) २०१६ ते २०२० मधे मान्सून आणि चक्रीवादळात खूप फरक पडल्याचं दिसून येतं.
मराठवाडा या दुष्काळी भागात ढगफुटीची संख्या वाढलीय. तसंच कोकणचा पाऊस तुलनेने कमी होत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातल्या उत्तरेकडे पावसाचं प्रमाण वाढलंय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी गारपिटीचं प्रमाण वाढले आहे. या बदलांमुळे वर्षभर पाऊस दिसतो आहे.
२०१९ ला मान्सून १५ जुलैला आला होता आणि १५ नोव्हेंबरला तो परतला होता. २०२० मधे मान्सून १५ ऑगस्ट ते १५ डिसेंबरपर्यंत होता. २०२१ ला मान्सून कसा असेल, याबद्दल अभ्यास सुरू असून ढोबळमानाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे.
हेही वाचा :
जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?
१७२ वर्षांपूर्वी आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं
लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!
अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली
(लेखक भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञ आहेत)