भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

१० सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतातले अव्वल दर्जाचे क्युरेटर दलजित सिंग गेल्या आठवड्यात आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. वयाच्या ऐंशीत त्यांनी निवृत्तीचा हा निर्णय जाहीर केला. पण त्याआधी त्यांनी प्रोफेशन म्हणून खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंय. त्यातली शेवटची २२ वर्ष ते पिच क्युरेटर होते. पण त्यांच्या कामाची उपेक्षाच झाली.

प्रत्येक टेस्ट मॅचवेळी सर्वांना उत्सुकता असते ती खेळपट्टीबद्दल. ती पाच दिवसांत कुठले रंग दाखवेल याचे अंदाज बांधले जातात. दोन्ही टीमचे कॅप्टन या अंदाजावर आपापले निर्णय घेतात. खेळपट्टी तयार करणारा म्हणून पट्टीचा लागतो. त्याला क्युरेटर असा इंग्रजीत छान शब्द आहे. काल परवाच भारतातला सर्वोत्तम असा क्युरेटर दलजित सिंग या जबाबदारीतून मुक्त झाला.

फर्स्ट क्लासमधेच मिळाली संधी

१ सप्टेंबरला त्याने निवृत्ती जाहीर केली. गेली एक, दोन नव्हे तर तब्बल २२ वर्ष तो भारतीय क्रिकेट बोर्डाच्या खेळपट्टी आणि मैदान समितीसाठी काम करत होता. मोहालीची खेळपट्टी ही दलजित सिंगची भारतीय क्रिकेटला देणगी आहे. त्याचं वय आहे ७९. हे सांगून खोटं वाटेल. इतका तो अद्याप उत्साही आणि क्रियाशील आहे.

दलजित हा बराच काळ फर्स्ट क्लासमधे क्रिकेट खेळला. १९६१ ते १९७२ अशी अकरा वर्ष तो उत्तम विकेटकीपर होता आणि चांगला बॅट्समनही होता. पण याच काळात इंजिनियर, कुंदन असे खंदे विकेटकीपर असल्याने दलजितला टीम इंडियाकडून खेळायची संधी मिळाली नाही. सय्यद किरमाणीने त्याच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले. पुढे जीजीभॉय कृष्णमूर्ती यांना टीम इंडियात स्थान मिळालं. ते पाहता दलजितलाही संधी मिळायला हरकत नव्हती.

दलजितने मात्र रणजी करंडक स्पर्धेत इमानेइतबारे खेळून आपली खेळायची हौस भागवली. तो फर्स्ट क्लासमधे एकूण ८७ मॅच खेळला. जवळपास ४००० रन आणि स्टम्पमागे सव्वादोनशे विकेटही घेतले. तो सेनादल पंजाब, दिल्ली, बिहार यांच्याकडून खेळला. टूलिप स्पर्धेत उत्तर विभाग आणि पूर्व विभागकडूनही मैदानावर उतरला. १९७५-७६ च्या मोसमात बिहारचं नेतृत्व करताना त्याने टीमला रणजी स्पर्धेच्या फायनलपर्यंत नेलं होतं.

हेही वाचाः कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

घडवलेले विद्यार्थी

दलजितचं आयुष्य अनेक वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेलंय. तो आधी भारतीय नौदलात होता. नंतर त्याने टाटा स्टीलमधे नोकरी पत्करली. जमशेदपूरला तो रहायचा. त्याला आणखी एक वेगळी ऑफर मिळाली होती. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या १० जनपथ इथल्या निवासस्थानी क्रिकेटची खेळपट्टी तयार करायची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.

शास्त्रींची मुले क्रिकेटवेडी होती. वर्षभर त्याचा इथे वावर होता. २२ वर्ष टाटा स्टीलकडे काढल्यावर तो बंगलोरला एका सेवाभावी संस्थेचं काम करायला आला. इथेही तो स्वस्थ बसला नाही. त्याने क्रिकेट प्रशिक्षण सुरु केलं. आणि त्याने घडवलेले ‘विद्यार्थी’ तरी कोण होते? राहुल द्रविड, जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे. मग तो पंजाबचा कोच झाला आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या बिंद्रा यांनी त्याच्याकडे मोहालीचें स्टेडियम उभारलं जात असताना खेळपट्टी तयार करायची जबाबदारी दिली.

पुढे दलजितने हेच कार्य अंगिकारलं. १९९७ मधे जगमोहन दालमिया यांनी भारतातली मैदानं आणि खेळपट्ट्या सुधारायचं मनावर घेतलं. क्रिकेट मंडळाने यासाठी खास समिती स्थापन केली. त्यात दलजित होता. कपिलदेवचं खास मार्गदर्शन होतं. मन लावून काम करणाऱ्या दलजितने मग देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन बहुतेक स्टेडियमना भेटी देऊन तिथले मैदान आणि खेळपट्टी सुधारण्याचं काम केलं.

विराट कोहली वाकून नमस्कार करतो

आज तो अभिमानाने सांगतो, ‘पूर्वी माळी मैदान आणि खेळपट्टी बघायचे. आता मात्र यासाठी निष्णात तज्ञ नेमले जाताहेत. आज भारतातली बहुतेक मैदानं सुरक्षित झालीत. पूर्वी कुणी मैदानावर झेपावायला कचरायचा. आता तशी स्थिती नाही आणि आता बरेच चांगले क्युरेटर्स उपलब्ध आहेत.’

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली दलजितला खूप मानतो. कुठेही भेटला की त्याला वाकून नमस्कार करतो. विराटला लहान असल्यापासून दलजितने पाहिलंय. चारेक वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने भारताचा मोठा पराभव केला. त्यानंतर कोच रवी शास्त्रीने क्युरेटरवर खरमरीत टीका केली होती. मग मोहालीला शास्त्री, कोहली गेले. आणि विराटने दलजितच्या पाया पडत त्याला खेळपट्टी कशी हवी ते समजावले. त्याने तशीच खेळपट्टी तयार करून दिली हे वेगळं सांगायला नको.

हेही वाचाः गणपती बाप्पांच्या या पाच गोष्टी आपल्याला माहीत आहेत?

किंमतही मोजली

दलजित बऱ्याचदा आपल्या मनाचा राजा असल्यागत काम करायचा. याचा अनेकांना राग होता. पण तो कुणी चांगला सल्ला दिला तर जरूर ऐकायचा. अनिल कुंबळेने कोच असताना सांगितलं की भारतीय बॅट्समन सुमार फिरकीपुढेही अपयशी ठरतात तेव्हा त्याने तशा खेळपट्ट्याही तयार केल्या. हेच बॅट्समन भारताबाहेर वेगवान माऱ्यापुढे ढेपाळतात तेव्हा ‘खिलाडू’ ठरेल अशा खेळपट्ट्या त्याने तयार केल्या.

पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांसाठी आणि नंतर हळूहळू फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या या ‘खिलाडू’ म्हटल्या जातात. पण जेव्हा दोन्हींकडून वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले येतात तेव्हा म्हणजे मंडळ एक सांगते, कॅप्टन दुसरे, तेव्हा त्याने समतोल राखण्याचं काम केलं. टीम इंडिया विजयी ठरेल अशा फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार करणं त्याला मनावर घ्यावं लागलं. याची किंमतही त्याने मोजली.

खेळपट्टीवर गवत कधी ठेवायचं, त्या टणक कधी ठेवायच्या, यामुळे जेव्हा नागपूर, अहमदाबाद इथल्या काही टेस्ट मॅच तीन दिवसांत संपल्या तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने याची दखल घेऊन खेळपट्ट्या दर्जाहीन असल्याचा शेरा मारला. दलजितवर मग कारवाईही झाली. सर्वात खराब प्रकार २००९ मधे दिल्लीला वनडेच्या वेळी झाला. 

कुणी वंदा, कुणी निंदा

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधे २३ ओवर टाकली गेली आणि अम्पायर, मॅच रेफ्री यांनी खेळपट्टी खेळायला धोकादायक ठरवून मॅच थांबवली. या नामुष्कीचं खापर दलजितवर फुटलं. त्याची गच्छन्ती केली गेली. पण त्याचं म्हणणं असं की २३ ओवर तरी खेळ का झाला? त्याने अवकाळी आलेला पाऊस आणि या खेळपट्टीवर बोर्डाने आधी प्रॅक्टिस मॅच ठेवला नाही. या सबबी पुढे केल्या. पण त्याच्या म्हणण्याकडे कुणी लक्ष दिलं नाही.

मात्र काहीच दिवसांत दलजित परत त्याच्या जागी आला. कुणी सूचना दिली भारताचे तळाचे बॅट्समन २०, ३० रनही जमवत नाहीत. त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढेल असेही खेळपट्टीत बदल करून दाखवले. आज भारताकडे अतिशय दर्जेदार असा वेगवान मारा आहे. या बॉलर्सना तयार करण्यात, त्यांना प्रोत्साहन देण्यात खेळपट्ट्यांचं योगदान मोठं आहे. आणि याचं श्रेय दलजितला जातंच. कुणी वंदा कुणी निंदा खेळपट्टी तयार करणं हाच आपला खरा धंदा असं त्याचं तत्व राहिलं.

क्रिकेटमधे खेळाडूंना मानसन्मान, पैसा मिळतो. बाकीचे दुय्यम ठरतात. क्युरेटर, माळी हे उपेक्षितच राहतात. पण क्रिकेटवर भारी प्रेम करणाऱ्या दलजितने आधी खेळाडू म्हणून आणि नंतर कोच, क्युरेटर म्हणून क्रिकेटची सेवा करण्यातच धन्यता मानली. त्याच्या त्या झोकून देण्याच्या वृत्तीला सलाम!

हेही वाचाः 

मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्तावही नाकारला

मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?

क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण

स्वर्गातल्या वडलांना येस पप्पा म्हणणाऱ्या जॉनी बिअरस्टोची गोष्ट

(लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)