कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

२२ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आमच्या धर्माच्या चालीरीती अवलंबून आपण कोरोनाचा नायनाट करू शकतो, अशा पोस्ट लिहिणाऱ्यांचा धंदा सध्या जोरात सुरू आहे. दुसरीकडे विरोधात लिहिणारे लोक, आता तुमचा देव मदतीला का येत नाही, असा सवाल करताहेत. पण दोघांच्याही दाव्यात काहीच तथ्य नाही. कारण धर्माचा आणि कोरोनाचा काहीएक संबंध नाही, असं सांगताहेत आघाडीचे तरुण कीर्तनकार हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर.

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातलंय. आपल्या भारतातही कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढू लागलीय. अशातच सोशल मीडियावर कोरोनाविषयी खऱ्यापेक्षा आपापली दुकानं चालवणारी खोटी माहितीच जास्त पसरवली जातेय. आता अनेकजण कारण नसताना धर्माला मधे आणतायत. कोरोनाच्या खबरदारीचे उपाय आमच्या धर्माने आधीच सांगितलेत, असा अनेकजण दावा करू लागलेत.

हिंदू धर्मात हस्तांदोलन नाही तर नमस्काराची पद्धत आहे आणि आता कोरोनाच्या काळातही हेच करावं लागतंय. त्यामुळे आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, अशा वावड्या उडवल्या जातायत. वास्तविक पाहता हिंदू धर्मात आलिंगन देण्याची तसंच पाया पडण्याचीही म्हणजेच चरणस्पर्शाचीही पद्धत आहे. ती कोरोनासाठी हानिकारकच आहे. आपल्या धर्माच्या गौरवासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेणं हा खरंतर धर्माचाच अवमान म्हणावा लागेल.

हेही वाचा : कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

धर्माच्या खतपाण्यानं अफवांचं पीक

कोरोनाचं भाकीत ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे वर्षापूर्वी करून ठेवलं होतं, असं काहीजण रेटून खोटं सांगतायत. कोरोनाचं भाकीत म्हणून सांगितलेल्या त्या ओव्यांच्या भाषाशैलीवरूनच त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नाहीत, हे स्पष्ट होतं. काहीजण त्या ओव्या रामदासस्वामींच्या नावे फिरवतायत.

मुख्य म्हणजे, त्या ओव्यांमधे कुठेही विषाणूच्या प्रसाराने आजार फैलावेल असं म्हटलेलं नाही. युद्धांमुळे विषवायू पसरेल असं त्या ओव्यांमधे म्हटलंय. विषवायू आणि विषाणू यात खूप मोठा फरक आहे. विषाणू हा सजीवसदृश मायक्रोऑरगॅनिझम आहे. शिवाय हा विषाणू वायूमार्फत पसरत नसून तो कडक पृष्ठभागावर स्थिरावतो, असे महाराष्ट्र राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे सांगतात.

त्या ओव्यांचा कसाही अर्थ काढला तरी त्यातून कोरोनाचं भाकीत स्पष्ट होत नाही. बाळूमामांनी कोरोनाचं भाकित केलं होतं अशा आशयाचा एक टिकटॉकवरचा वीडियोही प्रचंड वायरल होतोय. अनेकजण यात गाईलाही ओढतायत. त्यांनी कोरोनावर गोमुत्राचा हास्यास्पद उपाय सुचवलाय. त्याद्वारे धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. धर्मश्रद्धेचे खतपाणी मिळाल्यानं अफवांच्या पिकांनी मात्र जोम धरलाय!

वारकरी रोगनिवारणाचा दावा करत नाही

एकाबाजूला हे असले लोक कोरोनाचा संबंध धर्माशी जोडत धार्मिक अहंकारावर फुंकर घालतायत तर दुसरीकडे काहीजण धर्माची आणि मंदिराची गरज संपलीय, असे मेसेज पाठवतायत. धर्म आणि मंदिरं कोरोनाला संपवू शकत नाहीत. म्हणून हॉस्पिटल आणि डॉक्टरांची गरज आहे. मंदिरांची नाही, असा अनेकांचा दावा आहे. वास्तविक पाहता धर्माचा आणि रोगाचा काहीही संबंध आजच्या विज्ञानयुगात उरलेला नाही.

शरीराच्या रोगनिवारणासाठी धर्माचा आधार घेणं ही सकाम भक्ती आहे. रोगनिवारणासाठीची अशी सकाम भक्ती किमान वारकरी परंपरेला तरी मंजूर नाही. वारकरी परंपरेतले थोर संत सावता महाराज तापाने गेले. तर तुकाराम महाराजांच्या पत्नी रखुमाई दम्याच्या आजाराने गेल्या. त्याबरोबरच स्वतः तुकोबारायांना ताप आल्यावर ते वारीला गेले नाहीत. तेव्हा त्यांनी पांडुरंगाला निरोप दिल्याचे अभंग आजही उपलब्ध आहेत.

रोगनिवारणाचा दावा वारकरी संतांनी तरी केला नाही. शिवाय, आजाराच्या काळात वारी चुकली तर ते पाप मानलं जात नाही. धर्म आणि मंदिरं रोगनिवारण करू शकत नाहीत म्हणून त्यांची गरज संपली असं म्हणणंही रास्त होणार नाही. कारण धर्माचं काम मनातल्या कामक्रोधादी विकारांवर उपचार करणं आहे. त्यासाठी धर्माची आणि प्रार्थनास्थळांची गरज आपल्याला भासणारच आहे.

हेही वाचा : कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

मंदिरं संतविचारांकडे फिरवायला हवीत

शरीराच्या रोगनिवारणासाठी दवाखान्यांची गरज असते तशी मनातल्या काम, क्रोध, अहंकारादी वासनाविकारांवर मात करण्यासाठी मंदिर, विहार, मशीद अथवा चर्च यांसारख्या प्रार्थनास्थळांची गरज आहे. रामेश्वर भटजींच्या अंगाचा वर्णाभिमानाचा दाह तुकोबारायांच्या अभंगानी शांत झाला होता. तसं आताही खोट्या जातिधर्माच्या अभिमानाचा दाह शांत करण्यासाठी संतवचनांची गरज आहे. धर्म आणि वैद्यकशास्त्र ही दोन वेगळी क्षेत्रं असून दोघांचीही समाजाच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी गरज आहे.

मंदिरात काही चुकीच्या गोष्टी घडतात. पण त्यामुळे मंदिराकडे पाठ फिरवणं योग्य नाही. उलट नामदेवरायांप्रमाणे मंदिरंच आपल्या बाजूने उलटी फिरवायला हवीत. पुरोहितशाहीची मक्तेदारी आणि जातीवर्चस्ववादाच्या कचाट्यातून मंदिरं संतविचारांकडे फिरवली तर ती नैतिकतेचा उपदेश करणारी केंद्रं बनतील.

मंदिरात अलीकडे काही चुकीच्या गोष्टी घडतात हे खरंय. पण त्या हॉस्पीटलमधेही घडू शकतात. हे ही सत्य आहे. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या अनैतिक गोष्टी करणारे डॉक्टर आणि विवेकशून्य बुवाबाबा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. त्यांना जाब विचारायलाच हवा पण या दोघांचीही समाजाला गरज आहे, हे ही समजून घ्यायला हवं. डॉक्टर, हॉस्पीटल शारिरीक रोगांवर तर धार्मिक सत्पुरूष-प्रार्थनास्थळे वासना विकारांवर उपचार करण्यासाठी हवेत.

विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही हवं

कोरोनाचा आणि धर्माचा संबंध म्हणूनच जोडता येत नाही. कोरोना रोखण्याची उत्तरं धर्मात शोधणं आजच्या विज्ञानयुगात मूर्खपणाचं ठरेल. त्याचप्रमाणे कोरोना रोखण्याची हिंमत धर्मात नाही म्हणून धर्म सोडण्याचा अथवा मंदिर नाकारण्याचं आवाहन करणंही चुकीचेच मानावं लागेल. कारण धर्माचं काम वासना विकारांवर उपचार करण्याचं आहे.

समाज दोन्ही बाजूंनी निरोगी राखायचा असेल तर अध्यात्म आणि विज्ञान दोघांचा आधार घ्यावा लागेल. अध्यात्माला नितीशी आणि भक्तीला कष्टाशी जोडण्यासाठी संतपरंपरा मदतकारक ठरेल, यात संशय नाही. तर कोरोनासारख्या रोगांचा सामना आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने करता येईल.

हेही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

(लेखक हे तरुण वारकरी कीर्तनकार आहेत.)