कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात

०४ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही! अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय.

कोणत्याही लसीचं संशोधन करायला आणि पुढे लोकांवर त्याची चाचणी करून ती बाजारात आणायला खरंतर अनेक वर्षांचा काळ जातो. पण साथरोगाचा वाढता प्रसार पाहता लस लवकरात लवकर बाजारात यावी यासाठी वैज्ञानिक जीव तोडून प्रयत्न करतायत. जगभरातल्या अनेक नामवंत संस्थांमधे या कोरोना वायरस विरोधी लसीचं संशोधन सुरूय. अनेक संस्थांनी तर लस शोधली असल्याचा आणि लवकरच बाजारात आणणार असल्याचाही दावा केलाय.

भारतही यात मागे नाही. भारतात एकूण सात संस्थांमधे कोरोनाच्या लसीचं संशोधन चालू होतं. त्यापैकी तीन संस्थांमधल्या संशोधनाकडे सगळ्या देशाचं आणि जगाचंही लक्ष वेधलंय. शनिवार २८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनही संस्थांना भेट दिली. अहमदाबादमधली झायडस कॅडिला हेल्थकेअर, हैदराबादमधली भारत बायोटेक पार्क आणि आपल्या पुण्यातली सिरम इंस्टिट्यूट या तीनही संस्थांमधे मोदी एकाच दिवसात जाऊन आले.

चौथ्या नंबरची झायडस कॅडिला

खरंतर, पहिल्यांदा नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता पुण्यातल्या सिरम इंस्टिट्यूटमधे जाणार असल्याचं ठरलं होतं. पण आपल्या प्लॅनमधे बदल करत पहिल्यांदा झायडस कॅडिला हेल्थकेअरकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. मोदींच्याच गुजरातमधल्या अहमदाबाद जवळच्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रात झायडस कॅडिला म्हणजेच कॅडिला हेल्थकेअर ही कंपनी वसलीय. झायकोव-डी या कोरोनाच्या लसीचं संशोधन आणि उत्पादन इथं करण्यात येणार आहे.

या फार्मासुटीकल कंपनीची स्थापना रमनभाई पटेल आणि इंद्रवदन मोदी या दोन बिझनेस पार्टनरनी १९५२ मधे केली. नंतर दोघांत वाद झाला. १९९५ मधे मोदी यांनी कॅडिला फार्मासुटीकल प्रायवेट लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी काढली. तर झायडस ग्रुपच्या अंतर्गतच पटेल यांची कंपनी कॅडिला हेल्थकेअर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांचा मुलगा पंकज पटेल आता ही कंपनी सांभाळतात. फोर्ब्स मासिकाच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचं नाव झळकलंय.

१९९५ मधे कंपनीचा टर्नओवर २५० कोटींचा होता. आता २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओवर १४,२५३ कोटींचा आहे. भारतातली चौथ्या क्रमांकावरची फार्मासुटीकल कंपनी आहे. २०१५ पासून कंपनीने दरवर्षी वेगवेगळ्या औषधांचे पेटंट आपल्या नावे करून घेतलीयत. नुकतंच, त्यांनी अमेरिकेच्या सरकारकडून कॅन्सरवरच्या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मिळवलीय.

हेही वाचा : आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

जगभर पोचवतात औषधं

कंपनीचं हेडक्वार्टर अहमदाबादमधे असलं तरीही गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश या पाच राज्यात आणि अमेरिका आणि ब्राझीलमधेही कंपनीचे प्लांट आहेत.  या प्लांटमधून फक्त आशियाबरोबरच नाही तर युरोप, आफ्रिका या खंडामधेही ते औषधं पोचवतात.

अहमदाबाद प्लांटमधून कोरोना लसीच्या दोन टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या. इथे सुरू असलेलं संशोधन हे कोरोना वायरसच्या डिएनएवर आधारित आहे. मार्च २०२१ पर्यंत हे संशोधन पूर्ण होईल आणि कोरोना लसीचे १० कोटी डोस इथं तयार केले जातील असं आश्वासन पंकज पटेल यांनी मोदींना दिलं. मोदींनीही या सगळ्या टीमचं ट्वीटवरून कौतूक केलं होतं.

झायडस कॅडिलामधे साधारण एक तासापेक्षा थोडा जास्त वेळ मोदींनी घालवला. त्यानंतर पुन्हा अहमदाबाद विमानतळावर जाऊन त्यांनी हैदराबादकडे झेप घेतली.

स्वस्त दरात दर्जेदार लस

मोदी साधारण १ वाजता हैदराबादजवळच्या हाकिमपेट एअर फोर्स स्टेशनवर उतरले. हैदराबादमधल्या जिनोम वॅलीमधे भारत बायोटेक पार्क ही कंपनी आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार या कंपनीत जवळपास ७०० कर्मचारी काम करतात. जगभरात या कंपनीचे प्लांट आणि शाखा आहेत. कंपनीचा टर्नओवर ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. 

कंपनीचे संस्थापक आहेत डॉक्टर कृष्णा ईला आणि सुचित्रा ईला. डॉ. कृष्णा ईला हे तमिळनाडूमधल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मले. शेतीवर अपार प्रेम असणारा हा माणूस शिष्यवृत्तीवर अमेरिकेत गेला. तिथं पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. अमेरिकेत उत्तम करिअर असतानाही आईच्या विनंतीखातर ते मायदेशी परतले. जगाला स्वस्तात दर्जेदार लसी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी भारत बायोटेक या कंपनीची स्थापना केली.

हेही वाचा : कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?

भारत बायोटेककडे १६० पेटंट

झायडस कॅडिला हेल्थकेअरची स्थापना १९५२ ला झाली. तर सिरम इंस्टिट्यूटची १९६६ ला. या दोन्ही कंपन्या प्रस्थापित असताना डॉ. ईला यांनी १९९६ ला भारत बायोटेकची स्थापना केली. पण फार कमी वेळात कंपनीने यशाची अनेक शिखरं सहज सर केली.

भारत बायोटेकने रोटावॅक ही रोटा वायरसविरोधातली पहिली लस शोधून काढलीय. त्यासाठी त्यांना बील आणि मिलेंडा गेट्स फाऊंडेशनकडून ग्रँट मिळाली होती. या लसीचं काम पूर्ण झाल्यावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स या कंपनीला भेटही देऊन गेले होते.

याशिवाय चिकनगुनिया, टायफॉईड, झिका आणि स्वाईन फ्लू वायरसच्या स्वस्तातल्या लसी कंपनीनं जगाला उपलब्ध करून दिल्यात. लवकरच रेबिज या रोगाविरोधातल्या लसीचं उत्पादन करणारी जगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून भारत बायोटेकला मान्यता मिळेल. जॅपनिज इन्सेफॅलिटिझ या आजारावरच्या लसीचं उत्पादनही भारत बायोटेकमधे केलं जातं. अशा एकूण १६० पेटंटची नोंद कंपनीच्या नावावर आहे.

नाकातून घ्यायचे दोन डोस

कोरोनाची लस काढण्यासाठी भारत बायोटेक कंपनीने अमेरिकेतल्या फ्लूजेन आणि युनिवर्सिटी ऑफ विस्कोन्सिन-मॅडिसोनशी करार केलाय. कृष्णा ईला यांचं शिक्षणही याच युनिवर्सिटीतून झालं होतं. कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असेल. जुलैमधेच कंपनीनं लसीची पहिल्या दोन्ही फेजमधली मानवी चाचणी पूर्ण केलीय. तर सप्टेंबरमधे वॉशिंग्टन युनिवर्सिटीतल्या स्कूल ऑफ मेडिसीनकडून शोधलेल्या नाकातून घ्यायच्या लसीचं उत्पादन भारत बायोटेककडून होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.

कोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातली मधली मानवी चाचणी सध्या सुरूय. या सगळ्या मानवी चाचण्यांसाठी जवळपास २६ हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतल्याचं डॉ. ईला यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. देशभरात २५ ठिकाणी या चाचण्या चालू आहेत. मोदींच्या भेटीमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली असल्याचंही ते म्हणाले. चालू असलेल्या संशोधनासाठी त्यांचं अभिनंदन करून मोदी लगेचच पुढच्या भेटीला म्हणजे पुण्यातल्या सिरम इंस्टिट्यूटकडे निघाले.

हेही वाचा : खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का?

पुनावाला म्हणजे घोड्यांचे व्यापारी

संध्याकाळी साधारण सव्वा चारला मोदी पुणे विमानतळावर पोचले. तिथून हडपसरमधल्या मांजरी गावातल्या सिरम इंस्टिट्यूटमधे गेले. सकाळपासून ही मंडळी मोदींची वाट पाहत थांबली होती. सिरम ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत कोविशिल्ड ही कोरोनाची लस बनवतंय. याशिवाय, नोवावॅक्स आणि कोडाजेनिक्स या दोन कंपन्यांच्या लसीच्या संशोधनातही सिरमचा सहभाग आहे.

वॅक्सिन किंग ऑफ इंडिया अशी ओळख असणाऱ्या सायरस पुनावाला यांनी १९६६ मधे या कंपनीची स्थापना केली. ते भारतातले चौथ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पुण्यातल्याच बिशप्स स्कूल आणि बीएमसीसी कॉलेजमधून शिक्षण घेतलेले पुनावाला खरंतर घोड्यांचा व्यापार करत होते.

घोड्यांपासून लसीपर्यंत

पुनावाला हे पारशी कुटुंब. शर्यतीसाठी लागणारे घोडे पाळण्याचा त्यांचा व्यवसाय होता. हडपसरमधे त्यांचं अजूनही एक स्टड फार्म आहे. स्टड फार्म म्हणजे म्हणजे घोडे पाळण्यासाठी, त्यांचं प्रजनन करण्यासाठीचा आलिशान तबेलाच. १९६० मधे फार्ममधले थकलेले घोडे सरकारच्या हाफकिन इंस्टिट्यूटला दान केले जात होते. मुंबईतल्या या संस्थेकडून घोड्यांच्या रक्तापासून सिरम बनवलं जायचं.

घोड्याचं सिरम हे अत्यंत पोषक द्रव्य असतं. या सिरममुळे आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात आणि धनुर्वातासारख्या रोगांपासून लढण्याची ताकद मिळते. याविषयी एका प्राण्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करताना हे असं सिरम आपण आपल्याच स्टड फार्ममधे मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो हे पुनावाला यांच्या लक्षात आलं. त्यातूनच १९६६ मधे सिरम इंस्टिट्यूटचा जन्म झाला.

८० कोटींची गुंतवणूक

आज सिरम इंस्टिट्यूट ही लसीचं उत्पादन करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी साधारण वेगवेगळ्या लसीचे १५० कोटी डोस बनवले जातात. यात पोलिओ, धनुर्वात, देवी, रुबेला, गोवर, बीसीजी अशा अनेक लसींचा समावेश होतो. जगातल्या ६५ टक्के मुलांना निदान एकदा तरी सिरमने बनवलेली लस टोचली जाते असं एका संशोधनातून समोर आलंय.

कोरोना वायरसविरोधातली लस शोधण्यासाठी कंपनीने मोठी आर्थिक जोखीम उचललीय. लसीच्या संशोधन आणि उत्पादनासाठी सिरम ८० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याआधी त्यांनी ३० कोटी डॉलरचा खर्च केलाय. कोविशिल्डचे १० कोटी डोस तयार करण्याचं वचन सिरम इंस्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिलंय. फक्त भारतच नाही तर इतर अविकसित आणि विकसनशील देशांनाही ही लस पुरवली जाईल. १० कोटींमधले निम्मे डोस भारतासाठी राखीव असणार आहेत. तर उरलेले इतर देशांना पुरवले जातील. एक डोस साधारण २२५ रूपयांना असेल. पण कोरोनापासून पूर्ण संरक्षण पाहिजे असेल तर या लसीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.

त्यामुळे आता कोरोना लसीच्या स्पर्धेत या तीनपैकी कोणती कंपनी पुढे जाते हे बघायचंय. कोणत्याही कंपनीची लस बाजारात आली तरी पहिल्यांदा ती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली जाणार असल्याचं सरकारनं आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे लस मिळण्यासाठी आपल्याला आणखी काही महिने थांबावं लागणार आहे.

हेही वाचा : 

थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

आरसेप व्यापारी कराराला विरोध करणं भारतासाठी धोक्याचं ठरेल? 

हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं