थुई थुई आभाळ: गावातल्या मुलांचं जग उलगडणारा कवितासंग्रह

२९ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


गोविंद पाटील या एका कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाने ‘थुई थुई आभाळ’ हा आपला पहिलाच बालकवितासंग्रह नुकताच प्रकाशित केलाय. पाटील यांचे याआधीही ‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘थुई थुई आभाळ’ या नव्या बालकवितासंग्रहातून पाटील यांनी गावातल्या मुलांचं भावविश्व उलगडून दाखवलंय. त्याची ओळख करून देणारा डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांचा हा लेख.

लहान मुलांचं भावविश्व हे अद्भुतरम्यतेनं भरलेलं असतं. एका अनोख्या कल्पनेच्या विश्वात ते वावरतात. आपल्या सभोवताली दिसणाऱ्या अनेक गोष्टींमधली विसंगती त्यांना जाणवते आणि ते निखळ हसत राहतात. त्यांच्या मनोभूमीत निर्माण होणाऱ्या कल्पना इतक्या विलक्षण वेगळ्या असतात की त्या ऐकून आपणही थक्क होतो. त्यांचं कार्टून प्रेम हा त्याचा पुरावा आहे. बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखक-कवींना याचं नेमकं भान असावं लागतं.

हेही वाचा: कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

‘थुई थुई आभाळ’

कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या कवी गोविंद पाटील यांना हे बालमानस अचूक सापडलंय. गेली अनेक वर्षे उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी या परिसरात अनेक कार्यक्रम राबवलेत. रमिजा जमादारसारख्या अनेक बाल साहित्यिकांना घडवलंय.

‘गावकीर्तन’, ‘उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता’ आणि ‘धूळधाण’ हे त्यांचे काव्यसंग्रह अगोदरच प्रकाशित आहेत. अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. ‘थुई थुई आभाळ’ हा गोविंद पाटील यांचा पहिलाच बालकवितासंग्रह. सांगलीच्या सृजन प्रकाशनाने तो प्रकाशित केलाय. हा संग्रह जितका गोविंद पाटील यांचा आहे, तितकाच चित्रकार पुंडलिक वझे यांचाही आहे. कारण प्रत्येक कवितेला अत्यंत आकर्षक चित्रांची साथ सोबत मिळालीय.

त्यामुळे ही कविता मुलांकडून वाचली जाईल. त्याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून अनुभवली जाईल. या संग्रहात एकूण ५६ कविता आहेत. बोबडे बोल बोलणाऱ्या बालकांपासून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्व वयाच्या मुलांचं भावविश्व या कवितेत आलंय. विशेषतः ग्रामीण बालमानस या कवितेत अचूकपणे पकडलंय, हे या कवितेचं वेगळेपण आहे.

बोबड्या बोलांचं शब्दरूप

बालक्या सोनूची
दंमत मोटी...
चित्लं काढतान्
फोल्ली पाटी…

अशा बोबड्या बोलांनी ही कविता सुरू होते. बाळाला घास भरवताना आई नवी बोलगाणी म्हणते. खेळता खेळता मुलं चांदोमामाशी संवाद साधतात किंवा कधी एकमेकांशी भांडतात. त्यालाही इथं शब्दरूप मिळालेलं दिसतं.

हेही वाचा: दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

टोलापूरचे अजब प्राणी

मुंग्यांनी मेलेलं झुरळ उचलून नेणं, या छोट्या घटनेचीही कविता होते. या सगळ्या संग्रहात टोलापूर हे काल्पनिक गाव येतं. या गावातलं बदक चिखलात पाय फसू नयेत म्हणून बाटा चप्पल विकत घेतं. आजूबाजूच्या परिसरातलं दृश्य टिपणं हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे.

खेकड्याच्या बिळात शेपटी घालून खेकडा बाहेर काढणारा कोल्हा आपल्या मुलांना त्याचं ट्रेनिंग देतो. असा हा कोल्होबा गुरुजी टोलापूरच्या शाळेत शिक्षक होतो. तर दुसऱ्या बाजूला टोलापूरच्या चौकात बगळा पोलीस झालेला दिसतो. या कवितेच्या माध्यमातून कवीने,

अंगणात लावा चेरीबर्ड
पक्षी येथील हजार भर

असा संदेश दिलेला दिसतो. या चेरीच्या झाडावर चिऊ, काऊ, कोकीळ, राखी धनेश असे पक्षी आलेले दिसतात. 

नारळीच्या झाडावर
खारू करते खालीवर...
हळूच मग डल्ला मारते
पिकलेल्या पपईवर...

अशा पद्धतीने खारुताईचं नेमकं वर्णन आलेलं आढळतं.

कल्पना आणि अतिशयोक्तीचा मिलाफ

अतिशयोक्तीचं एक अत्यंत सुंदर उदाहरण ‘चमत्कार’ या कवितेत आलंय.

एक सरडा दूध घेऊन
टोलापूरला आला
टँकरला धडकला
नि टँकर उलटा झाला

असा भला मोठा टँकर उलटवणारा हा सरडा सांडलेल्या दुधाची वाटही अडवितो आणि तिकडून मुंगूस येताच अख्खा टँकर पिऊन टाकतो. अशी ही कल्पनारम्यता आहे. यातल्या लहान मुलाला, ‘सदानकदा पाण्यात राहणाऱ्या मासोळीला सर्दी कशी होत नाही?’ असा प्रश्न पडतो. तसंच ‘मित्र माझे’ कवितेत मोर मोबाईलवर बोलत बसलेला दिसतो.

ढगांचे विविध आकार हेही बालमनाला आनंद देतात. कधी त्यामधे मोर दिसतो. कधी साप दिसतो. कधी हत्ती, घोडा, भारताचा नकाशा असे सगळे आकार आकाशात दिसू लागतात. ‘कल्पनेच्या दुनियेत’ या कवितेत मुलांना गंमतशीर वाटणाऱ्या अभिनव कल्पना आल्या आहेत.

वांग्याच्या झाडाला
लागली ढब्बू मिरची
चहा पिताना सकाळी
कपात पडली खुर्ची

अशी ही कविता आहे. 

हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

लहान मुलांचं निरीक्षण

देश असतो सर्वांसाठी
सुखाने राहण्याची सुरक्षित जागा

असा संदेशही ही कविता देते. 'जीऊ आजोबा' कवितेत आजी-आजोबा शेतात विविध भाज्या पिकवतात आणि नातू त्यांना मदत करतो. श्रेयस या छोट्या मुलाला आई नाही, हे कळाल्यावर शाळेतल्या बाईच आई होतात. घरात दादा, ताई, बाबा, आई काय काय करतात याचे निरीक्षण ‘असं कसं’ या कवितेत आलंय.

आईच्या कामाला सुट्टी कधीच नाही
स्वयंपाक घर सांभाळणं सोपी गोष्ट नाही

असं हे लहानग्या मुलाचं निरीक्षण आहे. ‘बाप लेक’ कवितेत शेतीच्या कामाला हातभार लावणारा लहान बाळ येतो. ‘कॅप्टन लिओ आजोबा’ हे तर एक कथाकाव्यच आहे. संकट काळात प्रवाशांना वाचवणारा लिओ स्वतः मात्र जहाज सोडत नाही, याचं प्रभावी चित्र या कवितेत आलंय.

गावाकडच्या गोष्टी

शहरी मुलांना माहीत नसलेला वासराचा जन्म ‘नवीन वासरू’ या कवितेत आलाय. गोठ्यातल्या गाईला कळा सुरू होणं, तिची उठबस आणि वासरू जन्मणं या सगळ्याचं अचूक वर्णन आलंय. ‘आमच्या शेतात’ या कवितेत शेतकरी अनेक पिकं घेतो. पण पाखरं त्यावर डल्ला मारतात. तरीही शेतकरी पिकवणं सोडत नाही.

तरी बी बाबा पिकवत जाई
बाजारात कोणी विचारत नाही

हे दैन्य बालकवितेत येणं हे महत्त्वपूर्ण मानले पाहिजे. एकंदर, ही बालकविता ग्रामीण भागातलं बालमानस चित्रित करते. बदलत्या काळाशी स्वतःला जोडून घेते. बदलत्या काळानुसार खेडोपाडी आधुनिक साधने, इंग्रजी शब्द पोचलेत. त्यांचाही वापर कवितेत होतो. त्यासोबतच अस्सल कृषिसंस्कृतीतले शब्द, शेतकरी कुटुंबाचं जगणं-वागणं या कवितेत आलेलं दिसतं. म्हणून या कवितेचं स्वागत केलं पाहिजे.

हेही वाचा: 

तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध

‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

भ्रष्टाचारी माणूस चांगलं साहित्य लिहू शकत नाही : राजन गवस

(डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांच्या ब्लॉगवरून साभार)