थायरॉइडविषयी हे समजून घ्यायला हवंच

१९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न.

थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न.

थायरॉइड हा आजार आता भारतात नवीन उरलेला नाही. तो फक्त श्रीमंतांनाच असतो, असंही नाही. एका अंदाजानुसार, देशातील ३० टक्के लोक थायरॉइडने ग्रस्त आहेत. हा बदलत्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आलेला आजार आहे. थायरॉइडच्या समस्येचा सर्वाधिक त्रास होतो तो स्त्रियांना. अनेकींचं वजन जास्त वाढते आणि संप्रेरकांमध्ये बदल होतो. 

थायरॉइड हा सायलेंट किलर म्हणूनही ओळखला जातो. थायरॉइडच्या रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. दिनचर्येत बदल, व्यायाम आणि पौष्टिक आहार याच्या मदतीने  थायरॉइडच्या समस्येतून बाहेर पडता येतं.

थायरॉइड कसा त्रास देतो?

थायरॉइड ही एक इंडोक्राइन ग्रंथी आहे. ती गळ्याच्या खालच्या बाजूला असते. विशेषतः चयापचय क्रियेसाठी ती अत्यंत आवश्यक आहे. तिच्यामुळे काही हार्मोनल स्राव शरीरात पाझरतात. या  ग्रंथीने आपलं काम करणं बंद केल्यास शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तसंच थायरॉइड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त संप्रेरकं तयार करतात, तेव्हा थायरॉइड वाढले, असे आपण म्हणतो. या सायलंट किलरची लक्षणं एकत्र दिसून येत नाहीत. वेळीच त्यावर इलाज न केल्यास रुग्णाच्या आरोग्याला धोका पोचू शकतो. थायरॉइड ही ग्रंथी अत्यंत लहान असते. मात्र तिच्यातील बिघाडाचे आरोग्यावर मोठे परिणाम होताना दिसतात.

शरीरात थायरॉइडचे दोन प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. त्या दोन्हींची लक्षणं आणि त्यामुळे होणार्‍या समस्याही वेगवेगळ्या आहेत.

हेही वाचाः बोरिवलीच्या आजीबाईच्या बटव्यात दडलंय काय?

हायपो थायरॉइडिझम

यामध्ये थायरॉइड ग्रंथी हार्मोन्सच्या पातळीत घट करते. त्यामुळे व्यक्‍तीला कोणताही आजार नसला, तरीही पचनाचा वेग कमी होतो. त्यावर उपचार करण्यासाठी रुग्णाला थायरॉइड हार्मोन्स दिले जाते. एखाद्या व्यक्‍तीला हायपो थायरॉइडिझम आहे किंवा नाही हे माहीत करून घेण्यासाठी टी थ्री आणि टी फोर यांची कमतरता आहे का किंवा टीएसएचमध्ये वाढ झाली आहे काय, याची तपासणी करून घ्यावी लागते.

बद्धकोष्ठता, चेहर्‍यावर सूज, चेहरा कोमेजणं, नैराश्य आणि चीडचीड होणं. शरीर थंड होणं, ही या प्रकाराची लक्षणं आहेत. तसंच यामुळे महिलांमधे मासिक पाळीचं चक्रही अनियमित होतं. चयापचयाचा वेग सरासरीपेक्षा खूप कमी होतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्‍त चरबीचे रूपांतर होणं थांबतं आणि वजन वाढतं. हायपो थायरॉइडिझममधे थायरॉक्साईनचे प्रमाण सामान्य प्रमाणापेक्षा कमी असतं. यामुळे अप्रत्यक्षपणे थकवा, अशक्‍तपणा जाणवतं.

हायपर थायरॉइडिझम

यामध्ये थायरॉइड ग्रंथी हार्मोन्सच्या पातळीत वाढ करतात. त्यामुळे चयापचयाचा वेगही वाढतो. हायपर थायरॉइडिझममध्ये व्यक्‍तीच्या शरीरातील टी थ्री आणि टी फोर मध्ये वाढ होते, तर टीएसएचचं प्रमाण कमी होतं.

यामधे विशेष कोणतंच लक्षण दिसून येत नाही किंवा अनेक लक्षणं एकाचवेळी दिसून येतात. जसं अशक्‍तपणा, घाम येणं, केस गळणं, शरीराची थरथर, वजन कमी होणं, हृदयाची गती वाढणं, त्वचेला खाज येणं.

हेही वाचाः स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

थायरॉइड फ्रेंडली आहार

थायरॉइडच्या आजाराने ग्रस्त असाल, तर अतिरिक्‍त वजन कमी करावं लागतं आणि तीच गोष्ट खूप अवघड असते. पण वजन कमी करण्यासाठी थायरॉइड फ्रेंडली आहार घेऊ शकता.

सकाळी: सकाळी लवकर उठून पाण्याबरोबर थायरॉइडसाठीची गोळी घ्यावी. सकाळी ७-८ दरम्यान लिंबू पाणी आणि मध घ्यावं. आठ ते नऊदरम्यान केळी आणि डाळिंबाचे दाणे एकत्र करून खावेत. मोड आलेली धान्यं किंवा सफरचंद, केळी एकत्र मिक्सरमधे वाटून शेक बनवून खावं. साडेदहाच्या सुमारास अर्धी वाटी साय काढलेले लो फॅट दही, त्याच्याबरोबर डाळिंब किंवा एक चमचा भाजलेली अळशी  खा.

दुपारचं जेवण: एक बाऊल ओटस् किंवा दोन मल्टिग्रेन पोळ्यांरोबर एक वाटी डाळ किंवा दही-भात किंवा सूप किंवा उकडलेल्या भाज्या खाव्यात. जेवणानंतर एक ग्लास ताक किंवा ग्रीन टी. दुपारी ४ वाजता सुकामेवा किंवा मोड आलेली कडधान्यं खावीत.

रात्रीचं जेवण: संध्याकाळी एक प्लेट सलाड खा. साधारणत: ७-८ वाजता दलिया किंवा एक वाटी पनीर किंवा एक पोळी किंवा एक वाटी ब्राऊन राईस. झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी एक कप गरम लिंबू पाणी प्यावं.

वजन कमी करण्यासाठी

आहाराव्यतिरिक्‍त वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करावे लागतात. सर्वात  आधी डॉक्टरांशी बोलून दैनंदिन दिनचर्येत आवश्यक बदल करा. दिवसभरात कमीत कमी १०-१२ ग्लास पाणी प्या. किमान ४५ मिनिटं व्यायाम करा. थायरॉइडची औषधं सकाळी अनशापोटी घेण्यास विसरू नका. कमीत कमी 15 मिनिटं चाला. सावकाश जेवा आणि प्रत्येक घास चावून खावा. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहाते. कार्बोनेटेड ड्रिंक्स, गोड पदार्थ, रिफाईंड तेल आणि अतिग्लुटेनचे सेवन करण्यापासून बचाव करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ७-८ तास शांत झोप घ्या.

हे आवर्जून खा

हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्यं, ब्राऊन ब्रेड, ऑलिव्ह ऑइल, लिंबू, हर्बल आणि ग्रीन टी, अक्रोड, जांभूळ, स्ट्रॉबेरी, गाजर, हिरवी मिरची, मध

हेही वाचाः आवाज कुणाचा?... टेक्नॉलॉजीचा

हे खाणं टाळाच

मैद्यापासून बनवलेले पदार्थ, पास्ता, मॅगी, व्हाईट ब्रेड, सॉफ्ट ड्रिंक, जास्त गोड पदार्थ यांच्याबरोबर पुढील गोष्टी टाळायला हव्यात

कॉफी: कॉफीतल्या कॅफिनमुळे थेट थायरॉइडवर परिणाम होत नाही. पण थायरॉइडमुळे वाढलेल्या समस्यांमध्ये वाढ होते. त्यामुळे बेचैनी आणि अनिद्रा हे त्रास खूपच वाढतात.

अतिआयोडिनयुक्‍त आहार: थायरॉइड ग्रंथी शरीरातून आयोडिन घेऊनच थायरॉइड हार्मोन्स तयार करते. त्यामुळे थायरॉइडचे प्रमाण वाढल्याने ज्यांना त्रास होतो, त्यांनी आयोडिनचे अधिक प्रमाण असणारा आहार वर्ज्य करावा. मासे आणि आयोडिन मीठ वापरू नका.

अल्कोहोल: दारू, बीअर इत्यादींमुळे शरीराची ऊर्जा पातळी प्रभावित होते. त्यामुळे थायरॉइडने ग्रस्त लोकांच्या झोपेत अडथळा येण्याची तक्रार वाढते. त्याशिवाय त्यामुळे स्थूलताही वाढते.

वनस्पती तूप: भारतात वनस्पती तूप हे डालडा या ब्रँडच्या नावानेच ओळखलं जातं. वनस्पती तेल हायड्रोजनचा वापर करून तुपामध्ये रूपांतरित केले जाते. याच्यामुळे चांगले कोलेस्टेरॉल कमी होतात आणि वाईट कोलेस्टेरॉल वाढतात. त्यातून थायरॉइडचा त्रास वाढतो. 

लाल मांस: प्राण्यांच्या मटणात म्हणजे लाल मांसात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल असतं. त्यामुळे वजन खूप वेगाने वाढतं. थायरॉइडने ग्रस्त व्यक्‍तीचे वजन तसेही वाढतंच. लाल मांस खाल्ल्याने ते अधिक वाढतं. त्याशिवाय लाल मांस खाल्ल्याने थायरॉइडच्या रुग्णांच्या अंगाची जळजळ होत असल्याची तक्रारही ते करतात. त्याऐवजी काही प्रमाणात चिकन खाल्लेले चालू शकतं. चिकनमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असतं. तसेच त्याने वजन वाढण्याची शक्यता नसते.

हेही वाचाः 

द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्सः स्वप्नांमधून जगण्याचा अर्थ लावायला शिकवणारं पुस्तक

अशोक चव्हाणांच्या जागी कोण होऊ शकतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?

तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ