WHOनं सांगितलेल्या खाण्यापिण्याबद्दलच्या पाच टिप्स भिंतीवर चिकटवा

११ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कमजोर प्रतिकारशक्ती असलेले लोक हे कोरोना वायरसचं सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यामुळे कोरोना काळात आपलं खाणंपिणं अगदी व्यवस्थितच असायला हवं. आपण काय खातो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ होत असते. स्वच्छ जागेत, नीट शिजवलेलं अन्न खाणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं पुढाकार घेऊन खाण्यापिण्याबद्दल पाच साध्यासोप्या टिप्स दिल्यात.

कुठल्याही आजाराशी दोन हात करायचे तर त्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असायला हवी आणि आपण काय खातो, काय पितो त्यावर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची वाढ टिकून असते. पण आपण खात असलेलं अन्न सुरक्षित नसेल तर पुन्हा त्या अन्नामुळेही आपण आजारी पडू शकतो. सध्याच्या कोरोना वायरसच्या काळात तर अन्नपदार्थांबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

आता ही काळजी कशी घ्यायची, काय करायचं याबद्दल नेमकं आपल्याला माहीत नसतं. युट्यूब किंवा वॉट्सअप युनिवर्सिटीवर हजार टिप्स फिरत असतात. पण त्यातल्या सगळ्याच उपयोगी असतात, असं नाही. आणि उपयोगी काय हेही आपण सहज ठरवू शकत नाही. म्हणूनच अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तज्ञांनी सांगितलेल्या आणि मान्यता प्राप्त संस्थांनी जाहीर केलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवायला हवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही यापैकी एक महत्त्वाची संस्था.

कोरोना बाबतीतल्या मोठमोठ्या संशोधनांपासून ते अगदी रोजच्या जीवनात काय काळजी घ्यायची याचबद्दलही सगळ्या गोष्टी डब्ल्यूएचओच्या साईटवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. रोजच्या खाण्यापिण्याबद्दलच्याही काही टिप्स डब्ल्यूएचओनं सांगितल्यात. खरंतर, या पाच टिप्स आपण घरात भिंतीवरच चिकटवून ठेवायला हव्यात.

हेही वाचा : डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

१) नेहमी स्वच्छ रहा

- जेवण बनण्याआधी आणि जेवण बनवतेवेळी हात आवर्जून धुवत रहा.

- टॉयलेटमधे जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुवा.

- जेवण बनवण्याची जागा, म्हणजे किचन, चूल आणि भांडी चांगली धुवून घ्या. ते सॅनिटाइज करा.

- स्वयंपाक खोलीमधे कीडेमकोडे किंवा दुसरे कुठले कीटक येणार नाहीत याची काळजी घ्या.

हे का करावं?

ढोबळमानानं बघितलं तर सुक्ष्मजीव कोणताही आजार पसरवत नाही. पण या सुक्ष्मजीवांमधे असे काही खतरनाक जीवही असू शकतात जे माती, पाणी, जनावरं आणि माणसांमधे मोठ्या प्रमाणात आढळतात.

या सुक्ष्मजीवांचा आपले हात, साफसफाईसाठीची कापडं, भांडी, भाजीपाला कापण्यासाठीची फळी म्हणजेच कटिंग बोर्ड यासारख्या ठिकाणी वावर असतो.
हे सुक्ष्मजीव खानपानाच्या वस्तुंच्या थोड्याफारही संपर्कात आले तर खानपानाशी संबंधित आजारांचा धोका उद्भवू शकतो.

२) कच्च्या अन्नापासून शिजलेलं अन्न दूर ठेवा

- कोंबडी, कच्च मांस आणि सीफूड म्हणजे समुद्रात आढळणारे मासे, झिंगे यासारख्या गोष्टी खाण्याच्या दुसऱ्या गोष्टींपासून दूर ठेवा.

- कच्चं अन्न हाताळताना नेहमीच वेगळा चाकू, कटिंग बोर्ड यांचा वापर करा.

- तयार अन्न आणि कच्चं अन्न हे एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू कंटेनरमधे ठेवा.

हे का करावं?

कच्चं अन्न विशेषतः मांस, चिकन आणि सीफूड यामधे खतरनाक सुक्ष्मजीव असण्याचा धोका असतो. त्यामुळे अन्न शिजवताना खाण्यापिण्याच्या दुसऱ्या गोष्टींमधेही ते संक्रमित होऊ शकतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

३) अन्न नीट शिजवा

- विशेषतः मांस, चिकन, अंडे आणि सीफूड चांगल्या तऱ्हेनं शिजवलं पाहिजे.

- सूप सारख्या गोष्टी उकळताना तापमान ७० डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल याची काळजी घ्या. मटन आणि चिकन तयार करताना रस्सा गुलाबी होणार नाही हे नीट ध्यानात ठेवा. तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरणं कधीही चांगलं.

- शिजलेलं अन्न पुन्हा एकदा चांगल्या तऱ्हेनं गरम करा.

हे का करावं?

जेवण नीटपणे शिजवलं तर असले नसलेले सारे सुक्ष्मजीव मरून जातील.

जेवण ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजल्यास ते खाण्यालायक आहे, हे ठरवण्यास आपल्याला मदतच होते, असं संशोधनातून सिद्ध झालंय.
मटन, खीमा किंवा चिकन शिजवताना तर आपण ही गोष्ट नीट ध्यानात ठेवली पाहिजे.

४) योग्य तापमानावर जेवण सुरक्षित ठेवा

- तयार अन्न घरात नॉर्मल वातावरणात दोन तासांहून अधिक वेळासाठी ठेऊ नका.

- तयार अन्न आणि विशेषतः लवकर खराब होणारं अन्न पाच डिग्री सेल्सिअसहून कमी तापमानावर फ्रीजमधे ठेवा.

- जेवण वाढण्याआधी ते ६० डिग्री सेल्सिअसहून जास्त तापमानावर गरम करा.

- फ्रीजमधेही जेवण जास्त काळ ठेऊ नका.

- फ्रोजन फूड घरातल्या सामान्य तापमानात वितळायला ठेऊ नका.

हे का करावं?

शिजलेलं अन्न सामान्य तापमानात ठेवल्यानंतर तिथं सुक्ष्मजीव वेगानं विकसित होऊ शकतात.

पाच डिग्रीहून कमी आणि ६० डिग्रीहून जास्त तापमानावर सुक्ष्मजीवांचा विकास एकतर थांबतो किंवा मंदावतो.

तरीही काही सुक्ष्मजीव पाच डिग्रीहून कमी तापमानावरही तयार होत असल्याचं दिसलंय.

हेही वाचा : कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

५) स्वच्छ पाणी आणि कच्चं अन्न

- स्वच्छ पाणी वापरा आणि उपलब्ध नसेल तर जे कुठलं पाणी असेल ते वापरण्यालायक स्वच्छ करून घ्या.

- जेवण तयार करण्यासाठी ताजी आणि पौष्टिक सामुग्री वापरा.

- फळं आणि भाजीपाला धुवूनच वापरा. आणि कच्चं खात असाल तेव्हा तर ही गोष्ट नक्की करा.

- खाण्यापिण्याच्या मुदत संपलेल्या म्हणजेच एक्सपायरी डेट संपलेल्या वस्तू कधीच वापरू नका.

हे का करावं?

पाणी आणि बर्फ यासारख्या गोष्टींमधे सुक्ष्मजीव किंवा काही हानीकारक घटक असू शकतात. खराब आणि शिळ्या अन्नामधे विषारी रसायनं तयार होण्याचा धोका असतो.

भाजीपाला वगैरे निवडताना ते नीट धुवून, गरज असेल तर छिलून घ्या. असं करून आपण धोक्याचं प्रमाण कमी करू शकतो.

हेही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

लॉकडाऊन संपल्यावर खासगी वाहनं कायमची ‘लॉकडाऊन’ करा!

कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

कोरोनावरचा उपाय म्हणून वायरल होणाऱ्या ५ गोष्टींमागचं अर्धसत्य

भाव नसल्याने दूध सांडणारे शेतकरी लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत?

सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?