वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

०९ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


जात आणि धर्माच्या मुद्द्यांवरुन वाढत असलेल्या कट्टरतेमुळे लोकांमधला दुरावा वाढतोय. यावरच गडहिंग्लज इथे झालेल्या सलोखा परिषद झाली. त्याचा रिपोर्ट कोलाजमधे आला. त्यातल्या तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर यांची मांडणी चर्चेचा विषय बनली. सोशल मीडियातून कोलाजच्या वाचकांनी ती मांडणी सविस्तर देण्याची मागणी केली. त्यानुसार हा लेख.

वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचं योगदान दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीची पार्श्वभूमी संतांनी केलेल्या लोकजागृतीमुळे तयार झाली होती. याबरोबर संतांनी सामाजिक समानतेचाही आग्रह धरला. त्यांनी कर्मठतेचं बंड मोडीत काढलं. वाढती असहिष्णुता रोखली. वारकरी संतांच्या सहिष्णुतेची भूमिका आजच्या धार्मिक उन्मादावरचं जणू गुणकारी औषधच. यासाठी वारकरी संतांची धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधातील भूमिका आपण समजून घेऊया. 

हेही वाचा: माणुसकीचे धागे मजबूत करणारी गडहिंग्लजची सलोखा परिषद

मांसाहार केल्यानं कोणी परकं होत नाही

सगुण निर्गुण, आस्तिक नास्तिक, शाकाहार मांसाहार या आधारानं धार्मिक ध्रुवीकरण होतं, हे आपल्याला माहीत आहेच. मात्र हे सगळे धर्माचे दुय्यम भाग आहेत. खरं तर प्रत्येक धर्माचं ‘मानवता’ हेच मुख्य तत्त्व असतं. धार्मिक मूलतत्त्ववादी धर्मासाठी फार महत्त्वाच्या नसलेल्या दुय्यम भागांना मुख्य मानून धार्मिक उन्माद पोसतात. वारकरी संतांनी आपल्या आचार, विचार आणि उद्गारातून या प्रवृत्तींचा धिक्कार केलाय.

वारकरी संत स्वत: पांडुरंगाची सगुण रूपात उपासना करायचे. पण ते कबीर, रोहिदास. दादू दयाळ या निर्गुणोपासक उत्तर भारतीय संतपरंपरेविषयी आदर बाळगतात. इतकंच नाही तर आपल्या अभंगात त्यांचा आदराने उल्लेख करतात. सर्व संत शाकाहारी असूनही त्यांचा पांडुरंग मात्र सजन कसायाला मांस विकायला मदत करतो. संत तुकोबाराय म्हणतात, ‘सजन कसाया विकू लागे मांस | माळ्या सावत्यास खुरपू लागे ||’ ही वारकरी संतांची सहिष्णुता.

हेही वाचा: गांधीजींना तुकोबा भेटले होते

नास्तिकसुद्धा मानवतेचं तत्त्वज्ञान सांगू शकतात

विठ्ठलाची उपासना करणाऱ्या संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाईंनी नास्तिक असणाऱ्या बौद्ध तत्त्ववेत्ता अश्वघोषाच्या वज्रसूचीचा अभंगानुवाद केलाय. आपण स्वत: आस्तिक असलो तरी एखाद्या नास्तिकानं मांडलेलं मानवतेचं तत्त्वज्ञान आपण स्वीकारुन त्याचा प्रसार केला पाहिजे, ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे.

आस्तिक आणि नास्तिकतेपेक्षा मानवता महत्त्वाची. म्हणूनच आजचा काळात एखादा नास्तिक आंबेडकरवादी किंवा कम्युनिस्ट मानवतेचं तत्त्वज्ञान मांडत असेल. तर आजच्या वारकरी संप्रदायिकांनी त्याला विरोध करण्याचं कारण नाही. उलट त्यांनी संत बहिणाबाईंप्रमाणे त्यातली मानवता पाहून त्याचा प्रचार केला पाहिजे. 

भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते

प्रत्येक धर्मातील मूलतत्त्ववाद्यांना स्वत:च्या धर्मग्रंथातली भाषा हीच देवभाषा वाटते. संत एकनाथ महाराज अशा भाषिक कट्टरतावाद्यांना विचारतात, ‘संस्कृत भाषा देवे केली | मग पाकृत काय चोरापासून झाली||’ 

हेही वाचा: मामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर

हा संत एकनाथांचा प्रश्न सर्वच भाषिक कट्टरतावाद्यांना आहे. कोणत्याच धर्मग्रंथातली भाषा किंवा लोकभाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही असा नाथांचा अभिप्राय.

वारकरी संप्रदाय फक्त हिंदूंचा नाही

वारकरी संप्रदाय हा केवळ हिंदूंपुरता मर्यादित नाही. लतिफासारखा मुस्लिम वारकरी त्यांच्या अभंगात संत नामदेवांचा उल्लेख करतो. संत लतिफ हे तुकोबांच्या वंदनाचा विषय आहेत. तुकोबा म्हणतात, ‘कबीर मोमीन लतिफ मुसलमान | सेना न्हावी जाण विष्णुदास ||‘ वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ संत ज्ञानदेव हे आद्य बौद्ध सिद्ध सरहापाच्या परंपरेत येतात, असे राहुल संस्कृत्यायन यांनी म्हटलंय. 

ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या गुरुपरंपरेतील मच्छिंद्रनाथ हे कौल वा शाक्त सिद्ध होते. ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, `चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा | हा सुख सोहळा स्वर्गी नाही ||` हे सर्व ८४ सिद्ध जैन आणि बौद्ध या विविध धर्मातले आणि कापालिक, पाशुपत यांसारख्या अवैदिक समतावादी शैव पंथातले होते. 

हेही वाचा: आज देहूत संत तुकारामांचा तारखेनुसार जन्मोत्सव

वारकरी परंपरेत तुकोबांचे विद्यावंशज मानण्यात आलेले मल्लाप्पा वासकर हे लिंगायत होते. तुकोबाभक्त रेव्हरंड टिळक  ख्रिश्चन होते ते म्हणतात, `तुकानिर्मित सेतूवरुनी | मी ही आलो ख्रिस्तचरणी||` तुकोबांचे विचार त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन गेले. हिंदू धर्मपीठाने पाण्यात बुडवायला लावलेली गाथा प्रथमच छापणारे ग्रँट अलेक्झांडर ख्रिश्चन होते. सर्वच वारकरी संत जन्मजात धर्मकोषाच्या पलिकडे गेले होते. त्यांनी स्वधर्मातल्या धर्मग्रंथांची, धर्म प्रमुखांची, अनिष्ट परंपरांची समीक्षा केलीय. 

वारकरी संतांची सहिष्णुतेची भावना आज जपण्याची सर्वाधिक गरज आहे. त्याचबरोबर ज्ञानोबा तुकोबांचा वारसा सांगणाऱ्या वारकरी संप्रदायिकांनी जपावी, एवढीच पांडुरंगचरणी प्रार्थना! 

हेही वाचा: 

वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू

(लेखक सोलापूर येथील तरुण कीर्तनकार आहेत.)