तृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज?

१९ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ...

First Published : 6 September 2018

या रविवारी म्हणजे २ सप्टेंबरला नांदेड जिलह्यातल्या  किनवटमधे एक आक्रित घडलं. हसीना शेख उर्फ आशा या तृतीयपंथी मुलीनं राजू हनवते या तरुणाशी लग्न केलं. हसीना ट्रेनमध्ये मंगती करते आणि घराघरांमधे बधाई द्यायला जाते. त्यावर तिचा उदरनिर्वाह चालतो. आता लग्नानंतर तिला स्वत:चं ब्युटीपार्लर उघडायचंय. शिवणकाम करायचंय. तिचा नवरा राजू साधा मजूर आहे. त्याला हसीना ट्रेनमधे भेटली आणि तो तिच्या प्रेमातच पडला. राजूच्या पहिल्या बायकोचा मृत्यू झालाय. त्याला दोन मुली आहेत. विशेष म्हणजे राजूच्या घरच्यांचाही या लग्नाला आक्षेप नाही. गावातल्या लोकांनीही त्याला पाठिंबा दिलाय. हसीनाने सुखी संसाराचं स्वप्न रंगवलंय. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलत असल्याचं हे एक उदाहरण मानायला हवं. 

दोन वर्षांपूर्वी असंच एक लग्न मुंबईत झालं होतं. माधुरी सरोदे आणि जय यांचं अगदी विधीवत लग्न झालं. जयच्या कुटूंबीयांचीही त्याला संमती होती. माधुरी साड्या आणि इमिटेशन ज्वेलरी विकण्याचा बिझनेस करते. अर्थात जयच्या सोबतीने. पण दोन वर्षांनंतरही त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. त्यांच्या लग्नाची नोंद झालेली नाही. आजही माधुरी त्यासाठी प्रयत्न करतेय.

माधुरी एक सुंदर नृत्यांगना आहे. नृत्य शिक्षिका म्हणून क्लास चालवायची. त्यानंतर एके ठिकाणी तिने नोकरी करण्याचाही प्रयत्न केला. माधुरीचा आवाज, शरिरयष्टी स्त्रीसारखी आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिला स्त्री म्हणून स्वीकारलं होतं. पण ज्या दिवशी त्यांना कळलं की माधुरी तृतीयपंथी  आहे. त्यांनी तिला वाळीत टाकलं. डबा खातानाही तिच्याबरोबर कोणी बसायला तयार नव्हतं. माधुरीनं नोकरी सोडली. रिस्पेक्ट नाही म्हणून तिने डान्स सोडला. मोजक्याच ठिकाणी ती आता आवडीनं डान्स करते. नवऱ्याबरोबरचा तिचा व्यवसाय नीट सुरू आहे. 

ललिता साळवेच्या लिंगबदलाची चर्चा झाल्यानंतर अशी ऑपरेशन सातत्याने होत गेली. त्याच्या बातम्या झाल्या. पण माधुरी आणि जयच्या लग्नानंतर हसीना आणि राजूच्या लग्नाची बातमी यायला दोन वर्षं लागली. याचं कारण काय? या नात्यांना कायदेशीर बनवणारी नंबरी कलमं आपल्या देशात नाहीत. तसंच तृतीयपंथीयांसह एकंदर समाजाची यासाठी तयारी नाही. हेच यामागचं सत्य आहे. 

आपल्याला माहीत नाही. पण मग अशी लग्न झाली असतीलही. घरच्यांची संमती आणि मीडियातल्या प्रसिद्धीमुळे तृतीयपंथी  आणि पुरुष यांच्यातल्या विवाहाची ही दोन उदाहरणं महाराष्ट्रभर पोचली. मात्र अशी अनेक नाती जन्माला आली असतीलच. शपथा आणि वचनांच्या पलीकडे जाऊन मंगळसुत्रात गुंतली असतीलच. पण समाजासमोर आली नसतील. येऊ शकतही नाहीत. कारण समाज अशा नात्यांना उभं राहू देत नाही. आपल्याकडे लग्नासाठी स्त्री आणि पुरुष अशीच जोडी लागते. पुरुष-पुरुष आणि स्त्री-स्त्री यांनी लग्न करणं हे समाज नियमां विरोधी आहे, अशी आवई उठते. म्हणे समाजाचा तथाकथित 'तोल' बिघडतो. या अशा कारणांनी ही नाती लग्नापर्यंत पोचली नसतील. मंगळसूत्र आणि शरीरसुखात रमली आणि संपली असतील. संपवली असतील. 

लग्न म्हणजे काय? एकमेकांची सोबत, समाजमान्य नातं, वगैरे. एकदम सगळं गोडगोड. पण त्यात एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पी.के. सिनेमातला अमीर खान विचारतो, `बॅण्ड बजाके लोगो को क्यों बताया जाता हैं, की आज आय अॅम हॅविंग सेक्स?'. आपण म्हणूयात लग्नानंतर समाज येतो. एकमेकांबरोबर झोपायला समाजाची परवानगी देणारी लग्नाची ही प्रथा फक्त स्त्री -पुरुषांसाठी का? हा प्रश्न आपणही विचारला पाहिजे. नाही तर आज हसीनाच्या लग्नाने हा प्रश्नच आपल्याला विचारलाय. 

हो आणि मुलांना जन्म द्यायलाही परवानगी मिळते या प्रथेने. लग्न सोबतीने राहायला परवानगी देणारी विधी आहे, तशी सेक्सलाही परवानगी देणारी विधी आहे असं मानूयात. मग तृतीयपंथी -पुरुष विवाहात यापेक्षा वेगळी अपेक्षा नसते. सोबतीबरोबर सेक्स हाही उद्देश असतो. अजून तरी अशा नात्यातून मुल जन्माला नाही आलंय. तरीही समाज, समुदाय आणि कायदा या लग्नांना मान्यता द्यायला काय हरकत आहे.

अर्थात हल्ली स्त्री-पुरुष यांनाही सेक्ससाठी लग्नाची गरज नाही. निरोधसारखे गर्भप्रतिबंधक उपाय सहज उपलब्ध झाल्यानंतर तर सगळ्याच गोष्टी बदलल्यात. चुपके चुपके सेक्स कुठेही करता येतो. लोक करतातही. आणि पकडे गये तो लोकांच्या बॅक ऑफ द माईंड शरीराची भूक वगैरे मान्यताप्राप्त कल्पना असतात. या पकडापकडीनंतर लोकांनी तांडव केलं, तरी ही समजेश वृत्ती पॉइण्ट एक टक्का असतेच. पण तृतीयपंथी आणि पुरुष एकत्र सापडले, तर मात्र चोप ठरलेला. मरेस्तोवर मार. नाहीतर खून. तृतीयपंथी समुदायातील काहींचे असे खूनही झालेत. अगदी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अशा युगलांना मरेस्तोवर मार खावा लागला आहेच. त्यातही नादाला लावतो म्हणून तृतीयपंथी ला दोन हात जास्तच. कधीतरी मुडदा पाडूनच जमाव शांत होतो.

मला आठवतंय, माझ्या एका तृतीयपंथी मैत्रिणीशी बोलत होते. तिला मी विचारलं सेक्स चेंज का? तिने मोकळं आणि प्रामाणिक उत्तर दिलं. `मला भावना आहे. शरीराची भूक आहे. बाई म्हणून मी जास्त एन्जॉय करते. शेवटी मला पण गरज लागतेच ना.`

हे सांगायचा मुद्दा म्हणजे तृतीयपंथींबरोबर कसा सेक्स होत असेल हे पॉर्न साईटवर शोधणारे, बेधडक या क्युरिऑसिटीला भिडत तृतीयपंथीयाबरोबर सेक्स करण्याची फॅण्टसी पूर्ण करणारे आणि हा प्रश्न डोक्यात घेऊन झुरणारे असे अनेक जण आहेत. पण त्यांच्या या भूकेमागची कारणं शोधणारे मोजकेच असतील. कुत्रा, मांजर आणि झुरळांच्या सेक्सची गरज  मान्य करणारे आपण आपल्यासारखी माणसं असणाऱ्या तृतीयपंथीयाची सेक्सची गरज मान्य करत नाही. विसरून गेलोय, त्यांचं शरीरही आपल्यासारखंच आहे. हार्मोन्सचा लोच्या किंवा लिंगाच्या लांबी, रुंदीत कमतरता. एवढाच फरक.

मग ती भूक भागवण्यासाठी त्यांनी त्यांच्या वाटा निवडल्या. काही आपण आपल्या सोयीसाठी त्यांच्यावर लादल्या. भीक आणि बधाईचे ऑप्शन नेहमीच चालणारे किंवा सहज अवेलेबल असणारे असतीलच असं नाही. त्याऊपर शरीराच्या भावना आहेत. तशाच समाजाच्या वाईट नजरा आणि हौशी शौक आहेतच. त्यात त्यांना अनैतिक संबंधांना बळी पडावं लागलं. जिथे संबंध, नातं नाही, तिथे काही दमड्या मिळवून देणारा शरीराचा बाजार कामी येतो. सेक्स चेंज करत बाई झालेल्या ट्रान्सजेंडरसाठी देखील लग्न हे दिवास्वप्नच आहे. तथाकथित सेक्सच्या कल्पनेशी चिकटलेल्या गरजा भागवणाऱ्या योनीचं अस्तित्व त्यांच्याकडे ऑपरेशनमुले आलं असलं तरीही हे सुख त्यांच्यासाठी नाही. 

समाजाने त्यांना नाकारल्याने नोकरी, व्यवसायाचे पर्याय तसे फार नाहीत. मग त्यांना उदरनिर्वाहासाठी भीक मागण्याचाच पर्याय उरतो. बधाई देणं हे आणखी एक उत्पन्नाचं साधन. समाजाने दिलेलं हे गोंडस नाव. तो त्यांचा अधिकार असल्याचं आपण मानतो आपण. घासाघीस करुन किंवा मूहमांगी रक्कम त्यांच्या हातात नाहीतर ब्लाऊजमध्ये कोंबून त्यांची हकालपट्टी करतो. त्यांना पंगतीत बसवून जेवण देत नाही. मग त्यांच्याशी त्यांचं मन समजू घेऊन लग्न करण्याची हिंमत, ही तर दूरचीच गोष्ट. 

तो आणि ती पेक्षा वेगळ्या असलेल्या 'ते' साठी समाजाने जशी झापडबंद मानसिकता ठेवलीय. तशीच कायद्यानेही त्यांच्यासाठी समानता नाकरलीय. माधूरी सरोदे आणि जय यांचं लग्न फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला पहिला तृतीयपंथी - पुरुष यांच्यामधला घोषित विवाह मानला जातो. तो झाला २८ डिसेंबर २०१६ला. अजून त्यांच्या लग्नाला कायदेशीर संमती मिळालेली नाही. म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट नाही. त्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी हालचाल होताना दिसत नाही. कारण तृतीयपंथीयांनाच या बदलांमध्ये फारसा रस नाही. त्यांना असली लग्नं समुदायाच्या विरोधातील वाटतात. अर्थात त्यामागची त्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

तृतीयपंथी लोक फसवतात, लुटतात, रस्त्यावर आणतात. ते लग्न करून राहूच शकत नाहीत अशा समजूती या तृतीयपंथी आणि पुरुष यांच्यामधील नात्याला विरोध करण्यामागे असतात. पण या सगळ्या शक्यता तर स्त्री-पुरुष नात्यातही असतातच.  

सोबत, एकत्र राहण्यासाठी आणि सेक्स करण्यासाठी लग्न विधी असेल. माणसांसाठी तो गरजेचा असेल. तर माणूस असलेल्या तृतीयपंथीयांसाठी तो विधी नसणं किंवा त्याला मान्यता नसणं हा समाजाचा दुटप्पीपणा आहे. कायद्यात त्यासाठी तरतूद न करणं हा कायदा आणि यंत्रणेचा कमजोरपणा आहे. हसीना आणि राजूच्या लग्नाने त्याला आव्हान दिलंय. म्हणून ते महत्त्वाचं आहे.

(writer)