मिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल

११ मार्च २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.

कोलकात्यात पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, आम्हाला सर्वांचं भलं हवं आहे, एखाद्याला इजा व्हावी असं आम्हाला वाटत नाही. पण नंदीग्राममधे स्कुटी पडणं निश्चित आहे, त्याला आम्ही काय करणार?

पंतप्रधानाच्या भाषेचा अभ्यास केला जाईल तेव्हा लोकांना दिसेल की, त्यांनी ज्या भाषेमुळे आणि भाषणामुळे जे पद मिळवलं आहे त्या पदाची प्रतिष्ठा त्यांनी आपल्या भाषणात आणि भाषेमुळे किती खाली आणली आहे. तेलाच्या किमती कमी झाल्यावर स्वतःला नशीबवान म्हणवणार्‍या पंतप्रधानांच्या भाषणातला हा भाग विचित्र आहे. ते स्कुटी पडण्याचं रूपक निवडतात. एखाद्या दिवशी असंही म्हणतील की, तुमची कार उलटेल, विमान कोसळेल. त्यांनी बिहारमधे एके काळी डीएनएचा विषय काढला होता.

संदर्भ असा की, ममता बॅनर्जी यांनी स्कुटी चालवून तेलाच्या किमतींना विरोध केला होता. त्यांना गाडी नीट चालवता येत नसल्यानं सुरक्षारक्षक मदत करत होते.

हेही वाचा : चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

पंतप्रधानांच्या उथळ गोष्टी

आता ही घटना पंतप्रधान त्यांच्या भाषणात कशी आणतात ते तुम्ही पाहिलं पाहिजे. ते तेलाच्या किमतींना विरोधाची गोष्ट टाळतात, पण त्या वाढत्या किमतींना केलेल्या विरोधाच्या पद्धतीची खिल्ली उडवायला मात्र विसरत नाहीत. वर असंही म्हणतात की, स्कुटी पडली असती तर ती स्कुटी जिथं बनली आहे त्या राज्याला दिदींनी दोष दिला असता.

पंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. कधी ऐतिहासिक संदर्भांबाबत सरळसरळ खोटं बोलणं, कधी डीएनएचा विषय काढणं तर कधी गुजरात दंगलीच्या संदर्भात ‘एखादं कुत्र्याचं पिल्लू कारखाली आलं तरी मला वाईट वाटतं’ असं म्हणणं.

मिथुन कोब्रा कधी झाले?

त्यांच्या भाषणांतले राजनैतिक मर्यादा खाली आणणारे अनेक प्रसंग विसरले गेले असतील, परंतु जेव्हा अभ्यास होईल तेव्हा लोकांना कळेल की आपण लोकप्रियतेच्या नावाखाली कितीतरी गोष्टींकडे काणाडोळा केला आहे.

पंतप्रधान ज्या मंचावर ममता बॅनर्जींची स्कुटी पडण्याचं रूपक निवडतात त्याच मंचावर मिथुन चक्रवर्ती म्हणतात की, आपण कोब्रा आहोत. चावताच माणसाचं रूपांतर फोटोत होतं.

डायलॉग भले फिल्मी असेल, त्याला संदर्भ मात्र ममतांचा होता. अशा फालतू डायलॉगमधून ते ममता बॅनर्जींना टार्गेट करतात आणि म्हणतात की, मी ज्याला मारतो त्याचं प्रेत स्मशानात सापडतं. 

मिथुन कोब्रा होऊन बीजेपीत गेलेत की बीजेपीत गेल्यानंतर कोब्रा झालेत? ते बीजेपीत गेले नसते तर ईडी आणि आयकर विभागाच्या भीतीनं, भेदरलेल्या सशासारखे फिरत राहिले असते कदाचित.

चतुराई म्हणजेच सत्य?

पंतप्रधानांच्या भाषेच्या राजनैतिक पतनाचे परिणाम इतर नेत्यांवरही झालेले दिसतात. त्यांच्या समर्थकांच्या भाषेतही ते दिसून येतात. माझ्याच लेखांवरची एखादी कमेंट तुम्ही पाहिलीत तर तुम्हाला त्यांच्या समर्थकांची भाषा दिसेल. खालपासून वरपर्यंत लोकशाहीला साजेशी भाषा चिरडण्याचं त्यांनी नेतृत्व केलं आहे. 

मोदी हे बहुधा सर्वात खराब भाषण करणार्‍या नेत्यांपैकी एक असावेत. त्यांच्या भाषणात टाळ्या वाजवून घेण्याची आणि ललकार्‍या देण्याची क्षमता आहे, पण आपल्या भाषेद्वारे ते लोकशाही मानणार्‍या कोणत्याही समाजासाठी आवश्यक असलेल्या राजनीतीच्या प्रत्येक मर्यादेला ध्वस्त करतात. कधी लाल किल्ल्यावरून खोटं ठोकून देतात तर कधी संसदेत गोष्टी अशा गोलगोल फिरवून सांगतात, जणू चतुराई म्हणजेच सत्य.

हेही वाचा : सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

रोजगारावर लढतायत निवडणूक

पंतप्रधानांनी स्वतः कधी बेरोजगारीची आकडेवारी दिली नाही. जी आकडेवारी उपलब्ध व्हायची ती बंद केली. आपल्या सरकारमधल्या नोकर्‍यांचा हिशेब दिला नाही. दर दिवशी ट्विटरवर रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमीशन ट्रेंड होत असतं, त्यावर पंतप्रधानांनी कोणतंही विधान केलं नाही किंवा त्याबाबतीत पुढाकार घेतला नाही. मात्र, बंगालमधे जाऊन ते रोजगाराचा मुद्दा मांडताहेत. 

विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत बीजेपी रोजगार हा मुद्दा बनवत आहे. पण बिहार, मध्यप्रदेशासह स्वतःची सत्ता असलेल्या राज्यांत रोजगाराचा विषयदेखील काढत नाही. मोदीजींची भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. ज्या चतुराईची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे.

शेतकर्‍यांना दहशतवादी म्हणू नका, असं पंतप्रधानांनी एकदाही म्हटलेलं नाही.

हेही वाचा : 

मोदीप्रेमाचा ताप आता ओसरू का लागलाय?

स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र

सरकारी पदांवरच्या लॅटरल एण्ट्रीमुळे आरक्षणाची मूळ संकल्पना धोक्यात?