झाडावर चढणाऱ्या जुगाडू स्कूटरची गोष्ट

२६ मार्च २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


कर्नाटकातल्या एका शेतकऱ्याने आपल्या नव्या जुगाडाने सगळ्यांनाच चकित केलंय. आपलं काम सोपं व्हावं यासाठी त्याने ‘ट्री स्कूटर’ म्हणजेच चक्क झाडावर चढणारी स्कूटर बनवलीय. अवघ्या पाच सेकंदात ६५ फुटांची उंची गाठणारी ही स्कूटर सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनलीय.

संकट आस्मानी असो वा सुलतानी, बळीराजा कायमच खंबीरपणे उभा असतो. उन्हातान्हात घाम गाळून मेहनत करताना तर तो नेहमीच दिसतो. पण कधीकधी उगाच शक्ती आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा तो युक्तीचा वापर करतो आणि वेगवेगळे जुगाड बनवतो. कर्नाटकातली झाडावर चढणारी स्कूटर हा असाच एक आगळावेगळा जुगाड आहे.

सुपारी उत्पादकाची ‘आयडियाची कल्पना’

भारत हा सुपारी उत्पादक देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीचे आकडे पाहता, तब्बल १२ लाख टनांचं सुपारी उत्पादन नोंदवलं गेलं होतं. कर्नाटक आणि केरळच्या किनारी प्रदेशात घेतल्या जाणाऱ्या सुपारी उत्पादनाचा यात मोठा वाटा आहे.

कर्नाटकच्या मंगळूरमधे किनारपट्टीवर असलेल्या एका गावात गणपती भट राहतात. त्यांची १८ एकरची सुपारीची शेती म्हणजेच बनं आहेत. वयाची पन्नाशी गाठलेल्या गणपती यांना आधीसारखं पटापट झाडावर चढणं जमत नाही. ते राहत असलेल्या भागात मजूर सहजासहजी मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांची अव्वाच्या सव्वा मजुरी इथल्या शेतकऱ्यांना परवडत नाही.

पावसाळ्यात सुपारी तोडण्याचं काम अतिशय जिकिरीचं असतं. त्यात वेळेवर सुपारी तोडली गेली नाही तर तिचा दर्जा घसरतो. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. याच सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी गणपती यांनी झाडावर चढणारी स्कूटर बनवायचं ठरवलं.

हेही वाचा: जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट

अशी बनली ‘ट्री स्कूटर’

२०१४मधे गणपती यांनी सुपारी तोडण्याचं काम सोपं, लवकर आणि कमी खर्चात व्हावं यासाठी एक यंत्र बनवायचं ठरवलं. बऱ्याच विचाराअंती, त्यांच्या डोक्यात झाडावर चढू शकणाऱ्या स्कूटरची आयडिया आली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या एक इंजिनीयर सहकाऱ्याची मदत घेतली. या दोघांनी मिळून २०१८च्या आसपास या स्कूटरचं पहिलं मॉडेल बनवलं.

झाडावर चढण्याआधी गणपती एक जॅकेट घालतात, ज्याचे पट्टे स्कूटरच्या हँडलला जोडता येतात. हे जॅकेट सीटबेल्टसारखं काम करतं. या स्कूटरला जाड रबरी टायर बसवलेली दोन मोठी आणि एक छोटं चाक आहे, ज्यांच्या मदतीने ही स्कूटर झाडाच्या खोडाला पुरेपूर जखडून ठेवत वेगाने वर जाते. एक माणूस सहज उचलून नेऊ शकेल, इतकी हलकी ही स्कूटर आहे.

या स्कूटरला एक तात्पुरत्या स्वरूपाचं पण पुरेसं आरामदायक सीटही बसवलं गेलंय. ही स्कूटर चालवण्यासाठी एक मोटर बसवली गेलीय, जी स्कूटरच्या वेगावर नियंत्रण ठेवते. ही मोटर करवती बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्टील’ या जर्मन कंपनीने बनवलीय. यात हँडलच्या बाजूला विळा ठेवण्यासाठीही जागा आहे. पहिली स्कूटर बनवण्यासाठी संशोधन आणि इतर साधनसामग्री मिळवेपर्यंत गणपती यांनी तब्बल चाळीस लाख रुपये खर्च केलेत.

स्कूटरचा फायदा काय

आपली कमाई स्कूटरच्या वेड्या ध्यासापायी उधळून टाकणाऱ्या गणपती यांना गावानेच काय, त्यांच्या घरातल्यांनीही आधी विरोधच केला होता. स्कूटर बनेल का? ती चालेल का? तिच्या देखभालीचा खर्च झेपेल का? अशा अनेक प्रश्नांचा मारा त्यांनी गणपती यांच्यावर केला होता. एकदा टेस्टिंग करताना ते पडलेही होते, त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षिततेविषयी लोकांच्या मनात संशय निर्माण झाला होता.

पण गणपती आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी वेगवान, टिकाऊ आणि सुरक्षित स्कूटर बनवून दाखवली. सुपारी काढण्याच्या पारंपारिक पद्धतीनुसार, झाडावर चढणाऱ्याला आपले तळवे दोरखंडाने बांधून वर चढावं लागतं. यात शारीरिक क्षमतेचा कस आणि वेळ तर जास्त लागतोच, त्याचबरोबर जोखीमही जास्त असते. याउलट गणपती यांची ‘ट्री स्कूटर’ कमी वेळेत आणि सुरक्षितपणे काम करते.

पारंपारिक पद्धतीनुसार, आधी एका दिवसात जेमतेम शंभर झाडांच्या सुपाऱ्या काढणं शक्य होतं. ‘ट्री स्कूटर’च्या मदतीने एका दिवसात सुमारे तीनशे झाडांच्या सुपाऱ्या सहज काढता येतात. पावसाळ्यात सुपारीची झाडं निसरडी बनतात. त्यामुळे अपघाताचा धोका जास्त असतो आणि कामाचा वेगही मंदावतो. ‘ट्री स्कूटर’च्या रबरी टायरमुळे अपघाताचा धोका बराच कमी झालाय आणि काम लवकर होत असल्याने पूर्वी होणारं नुकसानही कमी झालंय.

गणपती यांनी आजवर जवळपास तीनशे ‘ट्री स्कूटर’ची विक्री केलीय आणि दर हंगामात ही मागणी वाढतच चाललीय. ६२ हजारांमधे येणाऱ्या या स्कूटरमुळे सुपारी काढणाऱ्या मजुरांच्या मनमानी कारभाराला चांगलाच चाप बसलाय. या ‘ट्री स्कूटर’पासून प्रेरणा घेऊन गणपती लवकरच नारळाच्या झाडावर चढणाऱ्या स्कूटरवर काम सुरु करणार आहेत.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

श्यामकांत मोरे: कम्युनिटी किचनच्या जनकाची जन्मशताब्दी

नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!