कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी २०२२ हे वर्ष बरंचसं समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणाऱ्या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे दीड वर्षाहून अधिक काळ भारतीय सिनेजगतात उदास वातावरण होतं. त्यामानाने २०२२ हे वर्ष उभारी घेऊ पाहणाऱ्या सिनेजगतासाठी आशादायक चित्र निर्माण करून गेलं. प्रादेशिक सिनेमांचं बॉक्स ऑफिसवरचं वर्चस्व, राजकीय हस्तक्षेपामुळे बळावलेली बॉयकॉट मोहीम, ओटीटी आणि थियेटरमधला चुरशीचा सामना, अशा एक ना अनेक गोष्टींमुळे २०२२ सिनेरसिकांच्या आठवणीत राहील.
२०२२मधे आलेल्या काही बहुप्रतिक्षित सिनेमांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली तर काही सिनेमांनी अनपेक्षितपणे कानामागून येऊन तिखट होण्याचा मानही मिळवला. काहींनी वातावरण चांगलंच तापवलं, तर काही सिनेमे येऊन गेल्याचंही जाणवलं नाही. सिनेसृष्टीतल्या बऱ्याचशा दिग्गजांना अपयशाला सामोरं जावं लागलं. तर काही जणांनी अनपेक्षितपणे उत्तम कामगिरी करत या वर्षावर आपली वेगळी मोहोर उमटवली.
गेल्या वर्षभरात आलेल्या बहुचर्चित सिनेमांच्या किंवा वेबसिरीजच्या यादीवर नजर टाकल्यास वेगवेगळ्या बायोपिक आणि इतिहासपटांचंही त्यात नाव दिसतं. पण सत्य इतिहास आहे तसा मांडण्याऐवजी या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा कल वास्तव घडामोडींना सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली अतिरंजित कल्पकतेने मांडण्याकडे दिसून आला. त्यातून बरीचशी राजकीय, सामाजिक आणि पर्यायाने आर्थिक गणितंही साधली गेली.
रामायण, महाभारतासारखी पौराणिक महाकाव्ये असोत, उत्तम साहित्यिक मूल्य असलेली व्यक्तीचरित्रे असोत, समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा बजावणाऱ्या ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक घटना असोत किंवा अगदी देशभरात गाजलेलं एखादं हत्याकांड असो, हे सगळं चंदेरी पडद्यावर अनुभवणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि प्रत्येक सिनेरसिकाला तो हवाहवासाच असतो.
सिनेनिर्माते आणि दिग्दर्शकांसाठीही असे सिनेमे म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच असते. प्रेक्षकांच्या धार्मिक, जातीय, प्रादेशिक अशा विविधरंगी अस्मितांना हात घालून असे विषय मांडणं बॉक्स ऑफिस कमाईच्या दृष्टीने सोयीस्कर ठरतं. मग या विषयांच्या भव्यदिव्य सादरीकरणाच्या आडून खरा इतिहास लपवत सोयीस्कर गोष्टी मांडल्या जातात. या कल्पक आणि अतिरंजित सादरीकरणाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक फायदेही असतातच.
हेही वाचा: आकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच
गेल्या वर्षी अशा धाटणीचे बरेच सिनेमे, वेबसिरीज आल्या आहेत. त्यातल्या काहींना चांगलं यश मिळालं, तर काही दणकून आपटले. त्यातल्या फ्लॉप सिनेमांची यादी करायची झाली तर यशराज फिल्म्सच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चं नाव आधी घ्यावं लागेल. अक्षय कुमारने यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती. आशुतोष राणा, संजय दत्त, साक्षी तन्वर, सोनू सूद अशी तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा चालला नाही.
त्यानंतर ब्रिटीश सत्तेच्या कालखंडातली गोष्ट घेऊन आलेल्या ‘शमशेरा’लाही अपयशाचं तोंड पाहावं लागलं. २०१५ला घडलेल्या दोहा-कोची विमान दुर्घटनेवर आधारित ‘रनवे ३४’ हा सिनेमाही फारसा चाललाच नाही. ‘झुंड’ हा सिनेमा नागपूरच्या विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांवर आधारित होता. पण दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता अमिताभ बच्चन या जोडगोळीची जादू ‘झुंड’ला बॉक्स ऑफिसवर टिकवण्यात अपयशी ठरली.
‘कौन प्रवीण तांबे’, ‘शाबाश मिथू’ या सिनेमांनाही क्रिकेटधर्मीय भारतात चांगला प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या गंगूबाई काठीयावाडी यांच्या जीवनावर आधारित ‘गंगूबाई काठीयावाडी’ हा आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा सुपरहिट ठरला. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कहाणी सांगणारा ‘द काश्मीर फाईल्स’ही राजकीय वरदहस्ताच्या जोरावर तिकीटबारीवर बराच काळ टिकून राहिला.
सत्य घटनांच्या अशा नाट्यमय सिनेरुपांतरांवर भारतीयांनी दाखवलेलं प्रेम ओळखून नेटफ्लिक्सने ‘द इंडियन प्रिडेटर’ या नावाने डॉक्युसिरीजची एक वेगळी मालिकाच सुरु केली. या मालिकेत नेटफ्लिक्सने भारतात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांना डॉक्युमेंटरी आणि वेबसिरीज अशा स्वरुपात सादर केलंय. या मालिकेतल्या काही प्रसंगांमुळे नेटफ्लिक्स वादाच्या भोवऱ्यातही सापडलं होतं.
एकीकडे बॉलीवूड यशापयशाच्या गर्तेत गटांगळ्या खात असताना, प्रादेशिक सिनेमांनी मात्र वेगवेगळ्या इतिहासपटांच्या आणि बायोपिकच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखण्यात यश मिळवलं. यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे १००० कोटींहून अधिक कमाई करणारा ‘आरआरआर’ हा तेलुगू सिनेमा. या सिनेमात अल्लुरी सीताराम राजू आणि कुमारम भीम या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या जीवनातल्या एका कालखंडाचं कल्पकतेने सादरीकरण केलं गेलं होतं.
दिग्दर्शक मणिरत्नमचा बहुप्रतिक्षित तमिळ सिनेमा ‘पोन्नियीन सेल्वनप १’ही याच वर्षी रिलीज झाला. चोळ राजवटीवर आधारित असलेल्या या सिनेमाने ५०० कोटींहून अधिक कमाई करत तिकीटबारीवर आपलं वर्चस्व राखलं. एप्रिल २०२३मधे या सिनेमाचा दुसरा भागही येतोय. अवकाश संशोधक नंबी नारायण यांच्यावर आधारित ‘रॉकेट्री’ हा तमिळ सिनेमा आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित ‘मेजर’ या तेलुगू सिनेमानेही बॉक्सऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली.
मराठी सिनेमानेही एकामागोमाग एक अशी शिवकालीन इतिहासपटांची रांगच लावली. त्यामुळे त्यातले काही चांगले चालले तर काहींना संमिश्र प्रतिसाद मिळाला. पावनखिंडीतल्या गाजलेल्या लढाईवर ‘पावनखिंड’ आणि ‘हर हर महादेव’ असे दोन सिनेमे यावर्षी येऊन गेले. ‘शेर शिवराज है’ या सिनेमात अफजलखानाच्या वधाची कहाणी सांगितली होती. यासोबतच शिवरायांच्या आग्रा भेटीवर आधारित ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा सिनेमाही येऊन गेला.
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्यावर आधारित ‘हंबीरराव’ या सिनेमानेही चांगली कमाई केली. शिवसेनेचे ठाण्यातले प्रमुख नेते आनंद दिघे यांच्यावर बनवला गेलेला ‘धर्मवीर’ हा बायोपिक वेगवेगळ्या कारणांनी गाजला. ‘मी वसंतराव’ या बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेल्या सिनेमातून शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेण्यात आला होता.
हेही वाचा: इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?
यातले बरेचसे सिनेमे वेगवेगळ्या भारतीय भाषांमधे डब करून देशभर प्रदर्शित केले गेले. त्यातल्या काहींच्या वाट्याला तिकीटबारीवर अपयश आलं तर काही सिनेमे अपेक्षेपेक्षाही जास्त काळ तिकीटबारीवर ठाण मांडून बसल्याचं चित्रही या वर्षी ठळकपणे समोर आलं. प्रेक्षकांच्या अस्मितेला हात घालून त्यांचा खिसा सहज रिकामा होऊ शकतो, हे त्रिकालाबाधित सत्य या सिनेमांच्या कमाईमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
येणाऱ्या वर्षातल्या सिनेमांकडे बारकाईने पाहिलं तर २०२२चाच कित्ता पुन्हा एकदा गिरवण्याचा ध्यास भारतीय सिनेजगताने घेतलाय असं दिसतं. राजकारण, क्रीडा, समाज, इतिहास अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण व्यक्तींचा आणि घडामोडींचा आढावा २०२३मधे घेतला जाणार आहे. २०२३मधल्या इतिहासपटांच्या आणि बायोपिकच्या गर्दीचा विचार करता, साधारणतः महिन्याला अशा धाटणीचे दोन ते तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
भारताचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित ‘मैं अटल हूँ’ हा हिंदी बायोपिक मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित करतोय. या बायोपिकमधे अभिनेता पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वादळी कारकिर्दीवर आधारित ‘इमर्जन्सी’ या सिनेमात अभिनेत्री कंगना राणावत प्रमुख भूमिका साकारणार आहे.
२०२२च्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या राजकीय पटावर झालेल्या उलथापालथीत ‘धर्मवीर’ या सिनेमाने महत्त्वाची भूमिका बजावली. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येतोय. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक धक्कादायक खाचखळगे आणि त्यांच्यामागचं गुपित उलगडणार असल्याचा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. या चरित्रपटांच्या निमित्ताने, पडद्याआडचं राजकारण रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.
हेही वाचा: द फॅमिली मॅनः गुप्तचर यंत्रणेची आतली गोष्ट सांगणारी वेब सिरीज
२०२१मधे आलेला ‘शेरशाह’ हा सिनेमा कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा यांच्यावर आधारित होता. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे युद्धपटांमधून राष्ट्रभक्तीचा डंका वाजवण्याची जुनीच रीत अजूनही प्रभावी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. याच धर्तीवर यावर्षी आणखी काही बायोपिक येणार आहेत.
अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘सॅम बहादूर’ हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित असलेला सिनेमा मेघना गुलजार दिग्दर्शित करणार आहेत. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी परमवीर चक्र मिळवणाऱ्या लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित ‘इक्कीस’मधे अगस्त्य नंदा हा महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
१९७१ला झालेल्या बांगलादेश मुक्तीसंग्राम लढ्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्यावर आधारित ‘पिप्पा’ हा सिनेमाही लवकरच येतोय. या लढ्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या रशियन रणगाड्याला भारतीय सैनिकांनी ‘पिप्पा’ असं नाव दिलं होतं. या सिनेमात अभिनेता ईशान खट्टर मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.
भारतीय क्रिकेटपटूंमधे किलर इन्स्टिंक्ट जागवण्याचं श्रेय माजी कर्णधार सौरव गांगुलीला जातं. याच ‘दादा’ खेळाडूचा बायोपिकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या दिग्दर्शकासोबतच गांगुलीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव अजूनही गुलदस्त्यातच आहे. ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजन या सिनेमाची निर्मिती करतोय.
भारतीय महिला क्रिकेट टीमची आघाडीची पेस बॉलर झुलन गोस्वामी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेती झाली. पुरुषांचा खेळ म्हणून गौरवल्या गेलेल्या क्रिकेटमधे भारतीय महिलांचा टक्का वाढवण्यात झुलनने माजी कर्णधार मिताली राजसोबत प्रेरणादायी भूमिका बजावलीय. तिच्या कारकिर्दीवर आधारित ‘चकदाहा एक्स्प्रेस’मधे अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
आधुनिक भारतीय फुटबॉलचे जनक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित ‘मैदान’ हा बायोपिक लवकरच प्रदर्शित होतोय. ‘रहीम साब’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फुटबॉल प्रशिक्षकाची आणि भारतीय फुटबॉल टीमच्या माजी व्यवस्थापकाची कारकीर्द ही भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ म्हणून ओळखली जाते. रहीम साब यांच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता अजय देवगन झळकणार आहे.
हेही वाचा: शॉशांक रिडीम्पशन: कारागृहातल्या घुसमटीचं अस्वस्थ करणारं चित्रण
येणाऱ्या वर्षात ऐतिहासिक सिनेमांचीही मोठी लाट उसळणार आहे. यात तानाजी मालुसरेंवर आधारित ‘सुभेदार’, सरसेनापती प्रतापराव गुजरांवर आधारित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, पानिपतच्या पराभवानंतर बलोचीस्तानमधल्या मराठ्यांच्या गुलामगिरीवर आधारित ‘बलोच’, सरसेनापती हंबीरराव मोहितेंवर आधारित ‘रावरंभा’, छत्रपती ताराराणींवर आधारित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ तसेच नागराज मंजुळे-रितेश देशमुख प्रस्तुत शिवत्रयीमधला पहिला भाग ‘शिवाजी’ असे अनेक मराठी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने दिल्लीतल्या मुघल राजवटीवर आधारित ‘तख्त’ या सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओलही यावर्षी ‘हरी हरा वीरा मल्लू’ या तेलुगू सिनेमात औरंगजेबाचं पात्र रंगवताना दिसणार आहे. कुतुबशाहीतल्या एका अनाम वीराची शौर्यगाथा सांगणाऱ्या या सिनेमात ‘पॉवर स्टार’ पवन कल्याण प्रमुख भूमिका साकारणार आहे.
१८१८मधे लढली गेलेली भीमा कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई मानली जाते. या लढाईत महार योद्ध्यांच्या मदतीने इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. पेशवाईत अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीचं लढवैय्या स्वरूप या लढाईमुळे समोर आलं. यावर आधारित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या ऐतिहासिक लढाईच्या नायकाची म्हणजेच सिदनाक इनामदाराची भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल साकारतोय.
गेल्या काही वर्षांत देशाच्या वैचारिक वर्तुळात गांधी विरुद्ध गोडसे आणि गांधी विरुद्ध सावरकर या राजकीय वादांनी थैमान घातलंय. त्याचे पडसाद वेळोवेळी साहित्यातून, नाटकांमधून उमटलेत. आता पुन्हा मोठ्या पडद्यावरही हा वाद नव्याने जिवंत केला जाणार असून, त्यांच्या निर्मिती आणि तिकीटबारीवरच्या व्यवसायात होणारा राजकीय हस्तक्षेप हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधे अभिनेता रणदीप हुडा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. सप्टेंबर २०२२मधे रणदीपने मांजरेकरांच्या ऐवजी आपण हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचं जाहीर केलंय. ‘गांधी गोडसे - एक युद्ध’ हा राजकुमार संतोषी दिग्दर्शित सिनेमा या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होतोय. अभिनेता चिन्मय मांडलेकर या सिनेमात गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे.
राजर्षी शाहू महाराज. साने गुरुजी. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारी ही दोन नावं. या दोघांनीही महाराष्ट्राचं समाजमन घडवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. ‘शाहू छत्रपती’ या आगामी बायोपिकमधून राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास चंदेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या साने गुरुजींच्या बायोपिकमधे अभिनेता ओम भूतकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
हेही वाचा: ‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी
असंख्य हालअपेष्टा सहन करून मुंबईची श्रीगौरी सावंत आज ताठ मानेनं समाजात मिरवतेय. तृतीयपंथीयांच्या सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी व्यवस्थेला भिडतेय. तृतीयपंथी बनण्याचा तिचा आजवरचा अतिशय खडतर प्रवास ‘ताली’ या बायोपिकमधून जगासमोर लवकरच येतोय. या सिनेमात गौरीची भूमिका दिग्गज अभिनेत्री सुश्मिता सेन साकारणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे त्याचे आजोबा पद्मश्री ‘महाराष्ट्र शाहीर’ कृष्णराव साबळे यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. आपल्या खणखणीत आवाजाने साबळे यांनी महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राची लोकपरंपरा सातासमुद्रापार नेली. या सिनेमातल्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी रंग भरणार आहे.
२०२२ संपता संपता कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढत असल्याचं धूसर चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ पाहतंय. दीड वर्षात झालेल्या आर्थिक नुकसानीच्या जोरदार तडाख्यानंतर आता कुठे भारतीय सिनेजगत सावरू लागलंय. अशात पुन्हा एकदा कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर आल्याने आव्हानांचा भला मोठा डोंगर भारतीय सिनेजगतापुढे आ वासून उभा राहिलाय.
अस्मितेच्या नावाखाली प्रेक्षकांचे खिसे हलके करण्यासाठी घातलेला हा महागड्या बायोपिक आणि इतिहासपटांचा घाट सिनेव्यावसायिकांसाठी प्रचंड आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून ही सोन्याची कोंबडी ओटीटीच्या खुराड्यात कोंडायची की तिला थियेटरमधे मुक्त बागडू द्यायचं, या प्रश्नाचं उत्तर शोधताना या सिनेव्यावसायिकांची मात्र पुरती दमछाक होणार आहे, हे नक्की!
हेही वाचा:
पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?
बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?