जगप्रसिद्ध चिनी भारतीय शास्त्रीय नृत्यांगना झांग जून यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीजिंगमधे नुकत्याच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. झांग जून यांनी भारतातली कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्यशैली चीनमधे पोचवली. त्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यातून चीन आणि भारत यांच्यात एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला.
पूर्व लडाखमधे भारत-चीन दरम्यान तणाव असताना २४ जूनला बीजिंगमधे एक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्या दिवशी बीजिंगच्या आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या सभागृहात चाहत्यांची रीघ लागली होती. इथं आयोजित करण्यात आलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमानं दोन्ही देशांमधल्या संघर्षाचं सौहार्दामधे रूपांतर केलं होतं. त्याला कारण ठरल्या जगप्रसिद्ध चिनी भारतीय शास्त्रीय नृत्यांगना झांग जून.
झांग जून यांनी भारतीय नृत्य प्रकारांना चीनमधे एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यामुळेच त्यांच्या शिष्य आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना जिन शान शान यांनी गुरुची आठवण म्हणून एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. झांग जून यांच्या चाहत्यांसोबतच चीनमधले भारताचे राजदूत प्रदीप कुमार रावत आणि चीनचे माजी अर्थमंत्री जिन लिकून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
हेही वाचा: पुरूषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट
भारतीय शास्त्रीय नृत्याच्या पुरस्कर्त्या असलेल्या झांग जून यांचा जन्म १९३३ला चीनच्या हुबेई भागातल्या किचुआन इथं झाला. त्यांच्या आईवडलांना चीनच्या बुद्धिवादी वर्तुळात मोठा मान होता. चीनमधल्याच एका ऑर्केस्ट्राचं संचालन करणाऱ्या वेई जून यांच्याशी झांग जून यांचं लग्न झालं होतं.
झांग जून १९५४ला एका सांस्कृतिक शिष्टमंडळासोबत भारतात आल्या होत्या. त्यावेळी भारत-चीन यांच्यातलं सौहार्द वाढावं म्हणून चीनचे तत्कालीन पंतप्रधान झू इनलाई प्रयत्नशील होते. त्यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली. भारताची सभ्यता आणि संस्कृतीविषयी इनलाई यांना विशेष ममत्व होतं. त्यावेळी भारतात आलेल्या झांग जूनना इथल्या भारतीय नृत्यकलेनं प्रेमात पाडलं.
१९५७ला प्रसिद्ध भारतीय नर्तक पंडित उदय शंकर यांनी सांस्कृतिक देवाणघेवाणीचा एक भाग म्हणून चीनला भेट दिली होती. तोपर्यंत भारतातल्या अनेक कलाकारांशी झांग जून यांची ओळख झाली होती. अशातच पंडित बिरजू महाराज यांच्याशीही त्यांची गट्टी जमली. बिरजू महाराजांनी झांग जून यांचं शानु असं नामकरण करून टाकलं होतं.
पंडित उदय शंकर चीनमधे गेले तेव्हा झांग जून यांचा त्यांच्याशी संपर्क आला. बीजिंगमधे त्यांनी झांग यांना काहीकाळ नृत्याचे धडे दिले. पुढच्या प्रशिक्षणासाठी त्यांना भारतात यायचं होतं. १९८०मधे तत्कालीन भारत सरकारनं देऊ केलेल्या स्कॉलरशिपमुळे त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. चीनच्या लिऊ युलन या नृत्यांगनेसोबत झांग जून भारतात आल्या.
दिल्ली आणि हैदराबादमधे शास्त्रीय नृत्याची प्रॅक्टिस सुरू झाली. दिल्लीत बिरजू महाराजांकडून कथ्थकचे तर अहमदाबादमधे प्रसिद्ध भारतीय नर्तकी मृणालिनी साराभाई यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे घेतले. जे शिकायला विद्यार्थ्यांना पाच ते सहा वर्ष लागतात ते झांग जून अवघ्या वर्षभरात शिकल्याचं बिरजू महाराजांनी त्या गेल्यानंतरच्या एका इंटरव्यूमधे म्हटलं होतं.
मृणालिनी साराभाई आणि बिरजू महाराजांशी त्यांचं खूप घट्ट नातं तयार झालं होतं. अतिशय प्रेमभावनेनं या दोघांशीही झांग जून जोडल्या गेल्या. भारतातला आपला सगळा वेळ त्यांनी या शास्त्रीय नृत्यशैलीसाठी दिला. त्यातल्या खाणाखुणा समजून घेतल्या. याच नृत्यशैलीची ओळख त्यांनी चिनी कलाकारांना करून दिली.
हेही वाचा: पन्नाशीतला आराधना आज आठवण्याचं कारण काय?
१९५०चं दशकात चीनमधे भारतातल्या नृत्यशैली क्रेज होती. ते पोचवणारा झांग जून यांच्यातल्या सहजभावही त्यामागे होता. पुढे चीन-भारत यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यात कटुता आली. पण तो सहजभाव झांग जून यांनी सोडला नाही. त्या कायमच भारतीय शास्त्रीय नृत्याच्या पुरस्कर्त्या राहिल्या.
झांग जून यांनी शेकडो चिनी कलाकारांना भारतीय शास्त्रीय नृत्याचे धडे दिले. त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं. कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी नृत्यशैलीची ओळख त्यांनी या कलाकारांना करून दिली. चीनमधे 'ओरियंटल डान्स अँड म्युझिक अकॅडमी' आणि 'बीजिंग डान्स अकॅडमी'च्या माध्यमातून त्यांनी आपल्या शिकवणी सुरूच ठेवल्या. त्यामुळे भारतीय नृत्यकला चीनमधे पोचवण्याचं श्रेय झांग जून यांनाच जातं.
पण या नृत्य कलेतली आक्रमणं त्यांना अस्वस्थ करायची. विशेषतः भारतातल्या बॉलिवूडमधल्या नृत्याच्या दर्जावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. या खालावलेल्या दर्जामुळेच आपल्याला आधुनिक भारतीय चित्रपट आवडत नसल्याचं २००९ला त्यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या इंटरव्यूमधे म्हटल्याची नोंद बीजिंग फॉरेन स्टडीज युनिवर्सिटीच्या विनोद सिंग यांनी आपल्या एका लेखात केलीय.
कधीकाळी तिथं माओच्या विध्वंसक सांस्कृतिक क्रांतीनं विचारवंतांचा छळ केला. तिथंच एका नव्या सांस्कृतिक देवाणघेवाणीनं दोन देशांमधे एक सांस्कृतिक अवकाश निर्माण झाला. योग तर कधी नृत्य, संगीत यामुळे तो अधिक व्यापलाय. संघर्षाच्या भूमिकांवेळी हा अवकाशच आपल्यातलं परस्पर सौहार्द टिकवून ठेवू शकतो. झांग जून या त्यातलाच एक महत्वाचा दुवा ठरल्या होत्या.
भारत आणि चीन यांच्यातल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत झांग जून यांचा वाटा मोठा होता. भारत-चीन संबंधांच्या ५०व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका सांस्कृतिक परिषदेलाही त्या आवर्जून हजर राहिल्या होत्या. १९९६मधे त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. चारवेळा शस्त्रक्रिया करावी लागली. अखेर ४ जानेवारी २०१२ला बीजिंगमधे त्यांचा मृत्यू झाला.
झांग जून यांच्या शिष्य आणि प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना जिन शान शान त्यांचा सांस्कृतिक वारसा पुढं नेतायत. आपल्या गुरुची आठवण म्हणून त्यांनी २००५ला बीजिंगमधे 'संगीतम् इंडियन आर्ट' नावाची संस्था स्थापन केली. त्यातून चीनमधल्या भारतीय दूतावासासोबत एकत्र येत वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी केली. भरतनाट्यमचा क्लास उघडला. १०० हुन अधिक डान्सरना प्रशिक्षण दिलं. आपल्या गुरूचा वारसा त्या पुढं नेतायंत.
हेही वाचा:
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?