हैदर अली आणि टिपू सुलतान यांना न्याय देणारा इतिहास

०८ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


महापुरुषांच्या कर्तृत्वाची माहिती ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळते त्यात बऱ्याचदा चुकीचे संदर्भ दिल्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरतात. आतापर्यंत अशीच चुकीची माहिती म्हैसूरचे दोन शासक हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्याबद्दल पसरवली गेलीय. याबद्दल तटस्थ आणि संशोधनपूर्ण माहिती सरफराज अहमद लिखित हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद या पुस्तकात आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय.

हैदरअली आणि टिपू सुलतान यांचा इतिहास बऱ्याच अंशी पूर्वग्रहदुषित दृष्टिकोनातून लिहिला गेलाय. त्यांच्या कार्याला धार्मिकतेचं वलय दिलं गेलं. पण त्यांचं सामाजिक, प्रशासकीय कार्य मात्र फारसं समोर आलं नाही. 'हैदर अली, टिपू सुलतानः सल्तनत-ए-खुदादाद' या पुस्तकाचे लेखक सरफराज यांनी युद्धाच्या आणि धर्माच्या पलिकडं जाऊन हैदरअली आणि टिपू सुलतान या दोन महापुरूषांबद्दल संशोधनपर लेखन केलं. ज्यातून हैदरअली आणि टिपू सुलतान यांच्या इतिहासाकडं संकुचित धार्मिक दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही हे दाखवून दिलंय.

ब्रिटिशांनी इतिहास फोडा आणि राज्य करा या दृष्टिकोनातून लिहिलेला. इतिहासाची हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड, ब्रिटिश कालखंड अशी चुकीची विभागणी केली गेलीय. शिवाय काही धर्मवादी मंडळींनी लिहिलेला इतिहास आणि काही टोकाची भूमिका घेणाऱ्या धार्मिक संघटना या सगळ्या गोष्टी सामाजिक विकासाला घातक आहेत.

काय आहे पुस्तकात?

पुस्तकाच्या सुरवातीच्या काही प्रकरणांत म्हैसूरच्या इतिहासाचा मागोवा घेण्यात आलाय. म्हैसूरचे राजे कृष्णराज वडियार यांच्या कालखंडाबद्दल लिहिलंय. त्यावेळी राज्यव्यवस्थेची विस्कटलेली घडी, हैदरअलींची भूमिका, देशातल्या तत्कालीन परिस्थितीची मांडणी केलीय. १७६१ च्या काळात हैदरअली म्हैसूरचे सर्वाधिकारी बनले. पण त्यांनी राजदरबारातल्या प्रथा न बदलता त्यांचं कसं काटेकोर पालन केलं, याची संदर्भाच्या आधारे मांडणी केलीय.

हेही वाचाः विकीमातेने जन्म दिलेले अवकाळी विचारवंत जग बिघडवत आहेत

त्या काळात भारतावर वसाहतवादाचं प्राबल्य वाढलं. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, त्यांच्यातली युद्धं, शिवाय वसाहतवाद्यांचा इथल्या राज्यकर्त्यांशी झालेला संघर्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला हैदरअली आणि टिपू यांचा इतिहास समजून घ्यावा लागतो.

या दोघा राजांचं मूळ घराणं भारतातले की परकीय, याबद्दल इतिहासकारांमधे वेगवेगळी मतं आहेत. लेखक मात्र हैदर आणि टिपू यांचं घराणं मूळचं पंजाबचं आणि नंतर स्थलांतर होऊन दक्षिणेत आल्याचं मानतात. हाच मुद्दा पकडून त्यांनी अशी मांडणी केलीय की, म्हैसुूरचे हे शासक ऐत्तदेशीय आहेत.

टिपू सुलतानचा जाहीरनामा

टिपू सुलतान यांनी देशावर गुलामगिरी लादत असणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात लढा दिला. या दोघांनीही आपल्या मातृभूमीचं गुलामगिरी लादणाऱ्यांपासून रक्षण केलं. पुस्तकातून त्यांच्या युद्धनिपुणतेला, शौर्याला तर दाद दिलीच, पण मुख्य भर त्यांच्या राज्यकारभारावर, सहिष्णू दृष्टिकोनावर दिलायं. राज्याविषयी कोणती कर्तव्यं पार पाडू, राज्य चालवण्याची धोरणं  याविषयी टिपूंनी आपली भूमिका जाहिरनाम्याद्वारे मांडली.

हेही वाचाः थोरांचे अज्ञात पैलूः आधुनिक महाराष्ट्रेतिहासाचा नवा अन्वयार्थ

प्रजेत धार्मिक आणि वंशीय भेद केला जाणार नाही. प्रजेच्या सुखासाठी प्रगतीसाठी प्रयत्न करीन. शेवटच्या श्वासापर्यंत भूमीच्या रक्षणासाठी लढेन. इंग्रजांना देशाबाहेर घालवण्यासाठी या देशातल्या लोकांना एकत्र आणेण. निष्पाप रयतेला जमीनदारांच्या आणि जहागीरदारांच्या जाचातून मुक्त करीन. वेळ पडली तर देशाच्या संरक्षणासाठी परकीय मदत घेईन. चुकीच्या धार्मिक चालिरिती संपविण्याचा प्रयत्न करणार आणि व्यापारांच्या वृद्धिसाठी प्रयत्न करणार, असे मुद्दे जाहिरनाम्यात मांडलेत. या सर्व मुद्यांचं आणि केलेल्या कार्याचं मूल्यमापनही या पुस्तकातून लेखकानं केलंय. 

सर्वधर्म समभाव वृत्ती

टिपूंनी आपल्या राज्यातल्या अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्या. शृंगेरीच्या शंकराचार्यांचा आदर केला. त्यांच्याशी पत्रसंवाद केला. त्यांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मातले लोक सैनिक म्हणून काम करत होते, याचे संदर्भ आपणास पुस्तकातून वाचायला मिळतात.

हेही वाचाः दारिद्र्याची शोधयात्राः आपल्या अवतीभवतीच्या छळछावण्यांचं कथन

राज्याची राजभाषा फारसी असली, तरी त्यांनी लोकभाषाही वापरात आणल्या. स्थानिक प्रशासनात कानडी, तमिळ या भाषांचा वापर होत होता. कल्याणी नदीजवळ मेलुकोट इथं असणाऱ्या मंदिरातला हुकुमनामा याची साक्ष देतो.

सर्वसामान्यांचा राजा

व्यापार, उद्योग, बांधकाम, साहित्य, सिंचन, शेती, वृत्तपत्र, व्याजरहित बॅंकिंग, जहाज, सुसज्ज ग्रंथालय अशा कितीतरी गोष्टी टिपू यांनी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या. त्यावेळीसुद्धा त्यांच्या राज्याला स्वतंत्र परराष्ट्र धोरण होतं. तसंच त्यांनी आपले प्रतिनिधी देशविदेशात पाठवले.

इतिहास अभ्यासक असलेल्या या पुस्तकाच्या लेखकानं या सगळ्यांचा धांडोळा घेत राष्ट्रीय एकात्मता सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं लेखन वाचनीय आणि मौलिक आहे.

हेही वाचाः मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

---

पुस्तकाचं नाव: हैदरअली, टिपू सुलतान सल्तनत-ए-खुदादाद -राज्य, प्रशासन, आधुनिकीकरण आणि धर्म

लेखक: सरफराज अहमद

पानांची संख्या: २१०

किंमत: ३०० रुपये

प्रकाशक: डायमंड प्रकाशन

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत)