रिहाना ही आंतरराष्ट्रीय गायिका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आपण का बोलत नाही असा प्रश्न विचारून तिनं सगळ्या देशाला बोलायला लावलं. तेव्हापासून रिहाना मुस्लिम आहे का असा प्रश्न गुगलवर वारंवार सर्च होतोय. इतकंच काय, तर रिहाना ही पाकिस्तानमधून गाण्यात करिअर करण्यासाठी अमेरिकेला गेली असेही मेसेज फिरतायत. या वायरल मेसेज मागचं खरं असत्य आपल्याला माहीत असायला हवं.
गेल्या काही दिवसात आपल्या लाडक्या सेलिब्रिटी, सिनेमातले हिरो हिरोईन, क्रिकेटर, गायक गायिका यांचे ट्वीट आपण पाहिले असतील. त्यातले काही जण ‘इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा’ म्हणत आपली एकता टिकवून ठेवण्याचं आवाहन करतायत. तर काही जण आय स्टॅण्ड विथ फार्मर्स म्हणत प्रोपोगंडाच्या विरोधातल्या प्रोपोगंडाला विरोध करतायत. गेल्या काही वर्षात सरकारच्या काही कायद्यांमुळे, योजनांमुळे आपल्या सेलिब्रेटींच्या वैचारिक भूमिकेत अशी फूट पडलेली आपण अनेकदा पाहिलंय.
पण यावेळी ही फूट पडलीय ती आंतरराष्ट्रीय किर्तीच्या एका गायिकेमुळे. रिहाना हे तिचं नाव. २ फेब्रुवारीला सीएनएन या न्यूज संस्थेकडून शेअर करण्यात आलेली शेतकरी आंदोलनाचं वीज पाणी बंद केल्याची बातमी रिहानानं आपल्या ट्वीटरवर शेअर केली. त्यासोबत तिनं असाही प्रश्न विचारलाय की, ‘आपण या विषयावर का बोलत नाही?’
जगाभरातले कोट्यवधी लोक रिहानाचे फॉलोवर्स आहेत. त्या सगळ्यांपर्यंत तिचं हे ट्वीट पोचलं आणि भारताची राजधानी दिल्लीच्या सीमेवर चाललेलं शेतकरी आंदोलन हा आंतरराष्ट्रीय विषय झाला.
रिहाना ही जगभर गाजणारी गायिका आहे. तिचे स्वतःचे फॅशन आणि मेकअप ब्रँड आहेत. पण तिचं सोशल मीडिया फक्त या झगमगाटानं बरबटलेलं नाही. फॅशनच्या पोस्टसोबतच रिहानाने शेतकरी आंदोलनासारख्या आणखीही अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
२०१९ मधे अमेरिकेच्या टेक्सास शहरात झालेल्या गोळीबाराला दहशतवादी हल्ला म्हणत तिनं तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातही आवाज उठवला होता. एलजीबीटीक्यू व्यक्तीकडे माझ्या ब्रँडची जहिरात करायचं साधन म्हणून मी कधीही पाहणार नाही, या तिच्या ट्वीटचंही जगभर कौतुक झालं होतं. अलिकडेच म्यानमारमधे चालू असलेल्या हुकूमशाही विरोधातही ती बोलली होती.
आता शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात बोलायला लागल्यापासून रिहानाविषयी भारतातले लोक बरीच माहिती गोळा करतायत. इंटरनेटवर तिची बरीचशी माहिती अगदी सहज मिळू शकतेही. पण त्या महासागरात रिहाना नावाचं जहाज वेगळं का ठरतं हे समजून घेण्यासाठी पुढचे ५ मुद्दे फार महत्त्वाचे आहेत.
हेही वाचा : तुम्ही मोबाईल चार्जरशिवाय विकत घेणार का?
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
शेतकरी आंदोलनाचं ट्वीट केल्यापासून रिहाना मुस्लिम आहे का हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च होतोय. अनेकांनी तर ती पाकिस्तानची असल्याचं आणि गाण्यात करिअर करण्यासाठी अमेरिकेत गेल्याचं पसरवणं चालू केलंय. पण खरंतर रिहाना ही पाकिस्तानीही नाही आणि मुस्लिमही नाही.
रिहाना ही बार्बाडोस या ब्राझीलच्या उत्तरेला असणाऱ्या छोट्याशा कॅरीबियन बेटावर जन्माला आली. कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन वंशाची ही मुलगी धर्माने ख्रिश्चन आहे. रिहाना बरीच धार्मिक आहे. चर्चला तर ती जातेच. पण भूताप्रेतांवरही तिचा विश्वास आहे.
लहानपणी वडलांसोबत एका छोट्याशा टपरीवजा दुकानात ती कपडे विकत असे. तेव्हापासूनच फॅशन आणि कपड्यांचं तिला वेड होतं. आपल्याला न्यूयॉर्कला जायला मिळावं अशी तिची इच्छा होती. त्यासाठी ती उपासतापासही करत होती. आपण काहीतरी त्याग केल्यावरच आपल्याला हवी ती गोष्ट देव देतो यावर तिचा विश्वास आहे.
२००३ ला रिहानाच्या करिअरची सुरवात झाली आणि पुढच्या दोन तीन वर्षातच तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली. लगेचच २००६ ला तिनं ‘बिलिव फाऊंडेशन’ नावाने आजारी मुलांसाठी एक संस्था काढली. एचआयवी असणाऱ्या मुलांसाठी पैसा उभा करण्यासाठी फॅशन ब्रँड काढणं, कुठल्यातरी संस्थेला पैसे मिळवून देणाऱ्यासाठी एखादा गाण्याचा शो करणं अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर ती करत होतीच.
शेवटी, २०१२ ला तिच्या आजीआजोबांच्या नावाने क्लारा लिओनेल फाऊंडेशन सुरू केलं. सध्या आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रात या फाऊंडेशनचं काम चालतं. तिच्या छोट्याशा बेटावरमधे या फाऊंडेशनने हॉस्पिटल उभं केलंय. शिवाय, कॅरेबियन बेटावरच्या मुलांना अमेरिकेत येऊन शिकायला मिळावं यासाठी या फाऊंडेशनमधून स्कॉलरशिपही मिळत असते.
कोविड १९ रिलिफ फंडमधेही तिनं ५० लाख डॉलरचं योगदान दिलं. यासोबतच बार्बाडोसमधे वेंटिलेटरची देणगी दिली. तर लॉकडाऊनमधे कौटुंबिक हिंसाचार सोसाव्या लागणाऱ्या मुलं आणि महिलांसाठीही तिनं पैसे दान केले.
हेही वाचा : केरळमधल्या जेंडर पार्कमधे फुलतायत स्त्री पुरूष समानतेची फुलं
२००९ मधे रिहानाला आपला एक मोठा शो रद्द करावा लागला होता. कारण होतं, तिचा तेव्हाचा बॉयफ्रेंड ख्रिस ब्राऊन यानं तिला गंभीर मारहाण केली होती. ख्रिस ब्राऊन हाही गायकच. २००७ पासून तो आणि रिहाना नात्यात होते. २००९ ला ख्रिसला अटक करण्यात आली आणि त्यांचं नातं तुटलं.
पण जानेवारी २०१३ ला ते दोघे पुन्हा नात्यात आले. आता हे वेगळंय, आमचं नातं आम्ही सुधरवलंय हे जगाला ओरडून सांगितलं. पण लगेचच मे महिन्यात ते पुन्हा वेगळे झाले.
शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं म्हणून कालपासून ट्वीटवर अनेक फेक अकाऊंटवरून या ख्रिस ब्राऊनला टॅग केलं जातंय. ‘तू हिला का मारलंस ते आज कळालं. हिनेच काहीतरी चूक केली असेल. तू मारलंस ते बरोबर केलंस,’ अशी या फेक अकाऊंट्सची भाषा आहे. तिने शेतकरी आंदोलनाला दिलेलं समर्थन हे कुणाच्या सांगण्यावरून दिलंय की नाही हा फारच वेगळा मुद्दा. पण अशाप्रकारे तिच्यावर झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराचं समर्थन करणं चुकीचंच म्हणायला हवं.
रिहानाचं पूर्ण नाव आहे रोबिन रिहाना फेंटी. आपल्या आडनावावरून २०१७ ला तिनं फेन्टी ब्युटी हा मेकअपचं सामान विकणारा ब्रँड काढला. असा एकमेव ब्रँड जगात आहे. कारण, सौंदर्य आणि मेकअपच्या तथाकथित संकल्पना मोडण्याचं काम या ब्रँडनं केलंय. गोऱ्या रंगाचं वेड न दाखवता जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या रंगाला सूट होतील अशी मेकअप प्रॉडक्ट या ब्रँडमधे काढलेत.
२०१८ ला सॅवेज फँटी या नावाने लिंगरी म्हणजे स्त्रियांच्या अंतवर्त्रांचा ब्रँड लॉन्च केला. त्यांनंतर २०१९ ला तिनं फेंटी हा कपड्यांचा ब्रँड काढला. कपडे आणि सनग्लासेस आणि चपलांसारख्या गोष्टी या ब्रँडमधे आहेत.
हेही वाचा : निवडणुका हरलेले राकेश टिकैत शेतकरी आंदोलनाचा चेहरा कसा बनले?
सॅवेज फँटी या ब्रँडच्या जहिराती नेहमीच वेगळ्या असतात. अशाच एका जहिरातीसाठी रिहानाने कुकू क्लोई या फ्रेंच गायिकेकडून एक गाणं गाऊन घेतलं. या गाण्यात मुस्लिम धर्मातल्या हिदास या ओळींचा वापर करण्यात आला होता. हिदास या प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलेल्या ओळी आहेत, असं मानलं जातं. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तिला जाहीर माफी मागावी लागली.
त्याआधीही २०१३ ला आबुधाबी मधल्या एका मशीदीत विचित्र फोटो काढल्याबद्दल रिहानाला मशीदीतून बाहेर हाकलून देण्यात आलं होतं.
अशी ही रिहाना. लवकरच जुलै २०२१ ला तिच्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्मही प्रदर्शित होणारे. पीट बर्ग या दिग्दर्शकाच्या या फिल्मचं नाव असेल ‘द पास्ट फोन इअर्स ऑफ रिहानास लाईफ’ ऍमेझॉन प्राईम वीडियोवर ही फिल्म दाखवली जाईल. रिहानाने केलेली स्वतःच्या ब्रँडची उभारणी आणि तिच्या नवव्या स्टुडिओ अल्बमच्या शूटमधल्या काही गोष्टी या फिल्ममधे दाखवल्या जातील.
हेही वाचा :
'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना!
समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!
दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा
एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट