दोन लग्नांची ‘पहिली’ गोष्ट

११ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


दोन जुळ्या बहिणींनी एका तरुणाशी लग्न केलं. कायद्याला बुचकळ्यात टाकणारं हे प्रकरण सोलापूर जिल्ह्यात घडल्यामुळे महाराष्ट्रभर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली. खरंतर लग्नासाठी वयोमर्यादेचं बंधन आहे तसंच आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी हा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या एका लग्नाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. यामधे आयटी इंजिनिअर असणार्‍या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाबरोबर लग्न केलं. ही घटना तशी दुर्मिळ स्वरुपाचीच म्हणावी लागेल. कारण कायद्याला बगल देऊन दोन लग्न करणारी उदाहरणं समाजात अनेक दिसून येतात.

विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं आपल्याकडे नवी नाहीत. कालोघात लिव इन रिलेशनशिपसारखा प्रकारही आता रुजू लागलाय. पण एकाच वेळी एकाच कुटुंबातल्या सख्ख्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न करण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. या दोन तरुणींनी असा निर्णय का घेतला, त्यामागचा हेतू काय आहे हे अनाकलनीय आहे.

खरंतर जुळ्या भावंडांचं, बहिणींचं स्वतंत्र लग्न होत नाहीत असं नाही. शेकडो-हजारोंच्या संख्येने जुळ्या मुलामुलींचं स्वतंत्र लग्न झालेलं आहेत आणि ते आपलं वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यामुळं नेमक्या कोणत्या भूमिकेतून या जुळ्या बहिणींनी असा निर्णय घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.

तिघांचीही लग्नाला संमती

हेतू काहीही असला तरी मुस्लिम वैयक्तिक कायदे वगळता सर्वच लग्न कायद्यांनुसार एका व्यक्तीला एका वेळी एकच विवाह करण्याची परवानगी आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा म्हणजे बॉम्बे प्रिवेन्शन ऑफ हिंदू बायगेमस अ‍ॅक्ट १९४६ या कायद्याअंतर्गत हिंदू विवाहित स्री किंवा पुरुष पहिल्या पती किंवा पत्नीपासून विभक्त न होता दुसरं लग्न करू शकत नाही. तसं केलं तर या दुसर्‍या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळत नाही. उलट यासाठी सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ नुसार हा जामीनपात्र, अदखलपात्र गुन्हा आहे. आताच्या प्रकरणामधे नवरा आणि दोन्ही जुळ्या मुली या तिघांपैकी एकाने या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे. पण या तिघांचीही या लग्नाला संमती असल्यामुळे कोणीही यासंदर्भात गुन्हा दाखल करणार नाही. आत्ता जी कारवाई होते आहे ती त्रयस्थ व्यक्तीने तक्रार दाखल केल्यामुळे किंवा महिला आयोगाने त्यावर आक्षेप घेतल्यामुळे होत आहे. अशी केस न्यायालयामधे टिकून राहू शकत नाही. कारण या तिघांनाही या विवाहाबद्दल काहीही आक्षेप नाहीये.

हेही वाचाः नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही, कारण

जोडीदार कोण हा वादाचा मुद्दा

या पार्श्वभूमीवर विवाहसंस्थेचा विचार करताना एक लग्न कायदेशीर मानलं जात असलं आणि दुसरं लग्न बेकायदेशीर मानलं जात असलं तरी जर कोणी स्री-पुरुष लग्नानंतरही नवरा-बायकोसारखे एकत्र राहात असतील तर ते लिव इन रिलेशनशिप मानलं जातं. त्यामधे कौटुंबिक नातं असलं तरी लग्न म्हणून त्याला कायदेशीर अधिमान्यता नाहीये. त्यामुळे  जोपर्यंत या तिघांमधले नातेसंबंध सामंजस्याच्या, सहमतीच्या पायावर जोपर्यंत सुरळितपणाने सुरू राहतील तोपर्यंत कसलाच प्रश्न उद्भवणार नाही.

पण जेव्हा कायदेशीर पत्नी म्हणून ओळख प्रस्थापित करण्याचा मुद्दा येईल तेव्हा वादविवाद उद्भवू शकतात. पुढे जाऊन त्यांना अपत्य झाली तर मुलांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने एका जुन्या निर्णयानुसार मुलं बेकायदेशीर किंवा अनौरस नसतात. त्यामुळे मुलांना वारस म्हणून समान हक्क मिळतील. प्रश्न हा असेल की कोणत्या मुलीबरोबरचं लग्न हे कायदेशीर आहे.

या प्रकरणातली आणखी एक गुंतागुंत म्हणजे लग्न एकाच दिवशी, एकाच मंडपात, एकाच वेळी पार पडलंय. त्यामुळे त्यातलं कोणतं लग्न कायदेशीर आहे, हे ठरवणं अवघड आहे. सामान्यतः दुसर्‍या लग्नाची प्रकरणं घडतात तेव्हा ती वेगवेगळ्या वेळी घडलेली असतात. साहजिकच त्यावेळी पहिलं लग्न कुणाशी झालंय, हे स्पष्ट असतं.

द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची प्रक्रियाही सहजपणाने पार पाडता येते. या प्रकरणात तशीही स्थिती नाहीये. त्यामुळे इथं हा कायदा कसा लागू होणार याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. असं असलं तरी कालोघात कायदेशीर पत्नी ठरवताना कायदेशीर जोडीदार कोण, हा मुद्दा वादाचा ठरेल यात शंका नाही.

दोघींबरोबरचं नातं कसं खुलणार?

दुसरी गोष्ट म्हणजे, लग्न म्हणजे केवळ एक दिमाखदार सोहळ्यापुरतं मर्यादित नाहीये. लग्नानंतर जोडीदाराबरोबर हळूहळू प्रेमाचं नातं खुलत जातं. त्यातून परस्परांमधे सामंजस्य वाढत जाऊन, भावनिक बंध निर्माण होऊन सहजीवन आकाराला येतं. रुसवेफुगवे, वादविवाद, भांडण, तडजोडी यातून ते नातं विकसित होत जात असतं. हे लक्षात घेता एकाच वेळी दोघींबरोबर हे नातं कसं खुलत जाणार? दोघींबरोबर समसामायिक भावबंध कसे जोडले जाणार? पुढे जाऊन अनुरुपतेचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात का?

या दोघी जुळ्या बहिणी असल्या तरी त्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व, स्वभाव, विचार, वर्तणूक, मानसिकता, आकलनक्षमता अशा अनेक बाबतीत भिन्नता असणं स्वाभाविक आहे. अशा वेळी त्यांच्यात तुलना केली जाऊ शकते का? त्यातून काही वाद उद्भवू शकतात का? थोडक्यात, लग्न सोहळा पार पडला असला तरी पुढच्या काळात कौटुंबिक, वैवाहिक नातेसंबंध कसे राहतात यावर या नात्याचं, लग्नाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

हेही वाचाः नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

विवाह नोंदणीचा मुद्दा

दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याची नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक आहे. पण रजिस्ट्रेशन केलं नाही तरी लग्न सोहळा पार पडलेला असल्यामुळे त्यांचं लग्नच झालं नाही असं कोणी म्हणत नाही. न्यायालयातही ते लग्न स्वीकारलं जातं; पण या प्रकरणामधे कोणतं लग्न रजिस्टर करणार हाही प्रश्नच आहे.

एका वेळी दोन लग्न रजिस्टर करता येत नसल्यामुळे या तिघांना एकाही लग्नाची नोंदणी करता येणार नाहीये. आज समाजात किती तरी लग्न नोंदणीविना झालेली आहेत आणि होतही आहेत. पण एखादी समस्या निर्माण झाली आणि त्यावेळी कदाचित लग्न नोंदणीचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. अशी वेळ आल्यास हे तिघे काय करणार?

तर नात्याचा कस लागेल

नव्याचे नऊ दिवस या आपल्याकडच्या प्रचचिल उक्तीनुसार सुरवातीला जोपर्यंत सारं काही आलबेल आहे, सुखनैव सुरू आहे तोपर्यंत या तिघांनाही यामधे काहीच गैर वाटणार नाही. उलट आम्ही तिघेही कसे आनंदाने राहात आहोत किंवा राहू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण पुढे जाऊन जेव्हा या नात्याचा कस लागणारे प्रसंग येतील किंवा कसोटीचे क्षण येतील तेव्हा त्यातून काही वाद उद्भवले तर मात्र त्यावेळची गुंतागुंत ही अधिक क्लिष्ट असेल.

आज समाजात विवाहबाह्य संबंध अनेक ठिकाणी दिसतात. ते चूक की बरोबर हे ठरवण्याचा हक्क समाजाला नाही. कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण या प्रकरणामधे दोन लग्न झालेले आहेत आणि ते कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. त्यामुळे पुढे जाऊन दोन्ही बहिणींपैकी कुणा एकीचे हक्क डावलले जाणार आहेत, हे निश्चित आहे.   सुशिक्षित असणार्‍या या जुळ्या बहिणींनी याची पूर्ण कल्पना असणार आहे. तरीही त्यांनी असा निर्णय कसा घेतला, हे आश्चर्यकारक आहे.

महिला आयोगाच्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या चौकशीतून या तरुणाचं यापूर्वी एका मुलीशी लग्न झाल्याचं समोर आलंय, अशी बातमी मीडियातून आलीय. त्यामधे तथ्य असेल तर मात्र कायदेशीर गुंतागुंतीचा प्रश्न उरणार नाही. या तरुणीने तक्रार दाखल केली तर द्विभार्या प्रतिबंधक कायद्यान्वये या तरुणाने जुळ्या बहिणींशी केलेलं लग्न बेकायदेशीर ठरणार आहे. तसंच त्या तरुणीची फसवणूक केल्याचा गुन्हाही या तरुणावर दाखल होऊ शकतो.

हेही वाचा: 

देशद्रोहाचा खटला दाखल करणारं टूलकिट प्रकरण आहे काय?

लोकांना एकत्र येण्यापासून रोखणारं कलम १४४ नेमकं आहे तरी काय?

संसद मोठी की संविधान या लढाईत पालखीवाला कुणाच्या बाजूने असते?

संविधान निर्मात्यांना माहीत होतं, देशात विध्वंस करू पाहणारी शक्तीही आहे!