ना बाळासाहेब ना प्रबोधनकार, त्यांनी दाखवून दिला स्वत:चाच चमत्कार!

२७ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वाद उध्दव ठाकरेंनी निकालात काढला. बाळासाहेबांचा वारसा बळकट केला. त्यासोबत त्यांनी हातात सोपवलेली सेनाही वाढवली, टिकवली. हे सगळं करताना त्यांनी बाळासाहेबांची किंवा इतर कुणाची आक्रमक शैली स्वीकारली नाही. तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

खरेतर आज राज्य अतिशय बिकट परस्थितीत अडकले आहे. कधी नव्हे इतके मोठे संकट राज्यावर आले आहे. या पुर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा, शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकर नाईक, ए. आर. अतूले, विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, मनोहर जोशी, नारायण राणे अशा मुख्यमंत्र्यांनी सत्ता गाजवली पण या कुणाच्याच कार्यकाळात इतके मोठे संकट राज्यावर आले नव्हते. ही माणसं राजकारणात मुरलेली होती. प्रशासनाचा त्यांना चांगला अनुभव होता. हातात चांगले बहूमत होते. पण याच्या उलट स्थिती सध्याची आहे.

कोरोनाचे मोठे संकट राज्यावर आले आहे. अशा स्थितीत प्रशासनाचा फारसा अनुभव नसणारे उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर समोर अँलन डोनाल्ड सारखा जलदगती गोलंदाज आहे. फलंदाजीची वेळ ज्याच्यावर आली आहे तो मात्र नवखा फलंदाज आहे. बर तो आक्रमक नाही. फटके मारण्यात पटाईत नाही. पण त्यानेच जोराचे चौके-छक्के मारावेत आणि विजय खेचून आणावा अशी स्थिती आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

ठाकरे बंधूचा वाद कोर्टात

आज महाराष्ट्र राज्याची सत्ता उध्दव ठाकरेंच्या हातात आहे. त्यांच्या नेतृत्वाच्या कसोटीचा हा काळ आहे. अवघं जग कोरोनापुढे हतबल झाले आहे. अशा काळात अतिशय धिरोदत्तपणे, संयमीतपणे आपलं काम करणारे उध्दव ठाकरे लोकांना भावले आहेत. कुठेच गाजावाजा नाही, विनाकारणचे आकांडतांडव नाही, आरडा-ओरडा नाही, प्रसिध्दीचा स्टंट नाही की अनावश्यक टिका-टिप्पणी नाही. अतिशय संयमीतपणे ते काम करत आहेत. संकटाला सामोरे जात आहेत. स्वत:ची बायपास झालेली असताना ते या कोरोनाच्या काळात राज्याचा गाडा व्यवस्थित हाकलत आहेत.

समोरून एकेकाळचे सहकारी असलेले विरोधक त्यांच्यावर तुटून पडत आहेत. संकट आहे म्हणून सहानूभुती बिलकुल नाही. पक्के राजकारण करत राजकारण्यासारखे वागत आहेत. पण जराही विचलीत न  होता उध्दव ठाकरेंचे काम चालू आहे. ते महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देत आहेत, धीर देत आहेत. त्यांचे नेतृत्व, त्यांच्यातील नम्रता, संयम आणि साधेपणा लोकांना अपिल होतोय.

 २०१४ ला ठाकरे बंधूंच्यातला संपत्तीचा वाद कोर्टात पोचला होता. त्या वादाची माध्यमात जोरदार चर्चा सुरू होती. त्याचवेळी चित्रलेखा या महाराष्ट्रातील नामांकित आणि सुप्रसिध्द साप्ताहिकात एक व्यंगचित्र प्रसिध्द झाले होते. त्या व्यंगचित्रातला आशय असा होता की उध्दव ठाकरे आणि इतर बंधू बाळासाहेबांच्या संपत्तीसाठी भांडत बसले आहेत आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रतिक झालेला वाघ काकोटीला मारला आहे आणि घेऊन निघाले आहेत.

बाळासाहेबांचा वारस कोण?

भौतिक संपत्तीपेक्षा बाळासाहेबांची जी खरी संपत्ती आहे तो सेनेचा वाघ राज ठाकरे घेऊन निघाले आहेत. बाळासाहेबांची खरी संपत्ती आणि वारसा त्यांच्याकडे आहे असाच त्या व्यंगचित्राचा अर्थ होता. बाळासाहेबांचा खरा वारस कोण? यावर माध्यमांच्यात अनेकवेळा चर्चा झाली. या विषयावर विपुल लेखन झाले. कॉलम, रकाने दुथडी भरून वाहिले. टिवीवर बेंबीच्या देठाला ताण पडेल इतकी चर्चा झाली. बहूतेकांनी बाळासाहेबांचा वारस व्हायची क्षमता राज ठाकरेंच्याकडे असल्याचे नमूद केले. 

राज ठाकरे हूबेहूब बाळासाहेबांसारखे बोलतात, नकला करतात, भाषणातही तशीच घणाघाती टिका करतात, तशीच व्यंगचित्रेही काढतात. त्यांची एकूणच शैली बाळासाहेबांसारखीच आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा वारस कोण? हा प्रश्न आला की लोकांना पटकन आठवायचे ते राज ठाकरे. राज ठाकरे बाळासाहेबांची सावलीच होते, त्यांच्याच सावलीत ते वाढले. पण उध्दव ठाकरे पहिल्यापासून फोटोग्राफीच्या प्रेमात पडलेले. या राजकीय धकाधकीपासून बऱ्यापैकी अलिप्त असलेले. राजकारणात फारसे सक्रीय नव्हते. 

ते राजकारणात आले आणि सेनेला हादरे बसायला सुरूवात झाली. २००४ ला त्यांची शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखपदी निवड झाली आणि त्यांच्या नेतृत्वाविरूध्द सेनेत बंडाळी माजायला सुरूवात झाली. २००५साली नारायण राणेंनी पहिले बंड केले. उध्दव ठाकरेंच्यावर कडाडून हल्ला चढवत शिवसेना सोडली. लागोपाठ २००६ला राज ठाकरेंनी बंड केले. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढत मनसेची स्थापना केली. त्या काळात राज ठाकरे यशाच्या सर्वोच्च स्थानी होते.

पुढे २००९ ला त्यांनी विधानसभेच्या निवडणूका लढवत १३ आमदार निवडूण आणले. इकडे १४ ला सेनेचे अवघे ४४ आमदार निवडून आले होते. त्यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्राचे राजकीय क्षितीज व्यापले होते. जिकडे तिकडे त्यांचीच चर्चा सुरू होती. या सगळ्या वातावरणात उध्दव ठाकरे हरवल्यासारखे वाटत होते. लोकांना राज ठाकरेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचा करिष्मा दिसत होता. त्यात २०१२ साली बाळासाहेबांचा मृत्यू झाला.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

शिवसेनेची वेगळी चुल

आता शिवसेनेचं कसं? शिवसेना संपणार का? असाच प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण उध्दव ठाकरेंनी शिवसेनेवरील आपली कमांड पक्की केली. पक्षातील बंडाळी मोडून काढली. वळवळ करणारांची वळवळ थंड केली. पक्षात नवचैतन्य आणले. सेना भक्कम करत लढवत ठेवली. शिवसैनिकांना खंबीरपणे आधार दिला. महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेना घट्ट केली. 

२०१४च्या निवडणूकीत भाजपाने दगाफटका केला म्हणून शिवसेनेने वेगळी चुल मांडली. स्वतंत्रपणे निवडणूका लढवत उध्दव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले. २००९ला शिवसेनेचे ४४ आमदार होते. उध्दव ठाकरेंनी मोदी लाटेच्या विरूध्द लढत स्वत:चे आणि शिवसेनेचे अस्तित्व भक्कम केले. २००९च्या तुलनेत तब्बल १९ आमदार जास्त निवडून आणले. शिवसेनेला आणि उध्दव ठाकरेंना डिवचणाऱ्या भाजपाला युती करण्यास भाग पाडले.

पाच वर्षे सत्तेत राहून सतत उध्दव ठाकरे भाजपाचे तोंड फोडत राहिले. बाळासाहेब नसताना त्यांनी मोदी-शहा या मात्तबर जोडीला शिंगावर घेतले. कधी आव्हान दिले, कधी बेदखल केले. या सगळ्यात त्यांनी स्वत:चे राजकीय कसब दाखवून दिले. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

हिंदूत्वाचा आवाज बुलंद

एका बाजूने प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या भल्या मोठ्या माणसाचा आणि बाळासाहेबांसारख्या प्रचंड आक्रमक नेतृत्वाचा मराठी जन-माणसावर पगडा होता. अशा काऴात या दोघांच्या प्रभावात न जाता, त्यांची उगीच नक्कल न करता उध्दव ठाकरेंनी स्वत:चीच वेगळी ओळख निर्माण केली. स्वत:चा चमत्कार दाखवून दिला आहे. त्यांनी लवकर राजकारण आत्मसात केले, ते कसे असते हे अनुभवले आणि तेवढेच लिलया केले सुध्दा.

भल्या-भल्या राजकीय समिक्षकांचे, अभ्यासकांचे अंदाज मोतीमोल करत, त्यांची भाकीतं खोटी ठरवत हा माणूस प्रत्येक विरोधकाला पुरून उरला. सगळ्यांचे अंदाज चुकवत उध्दव ठाकरे आज लंबी रेस का घोडा ठरले आहेत. नितिश कुमार यांच्यासारखे कसलेले आणि  मुरलेले मात्तबर राजकारणी मोदी-शहा जोडगोळीपुढे गुडघ्यावर येवून शरण गेलेले या देशाने पाहिले आहे. पण या हिम्मतबहाद्दरांने त्यांना कोलून चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करत मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली आहे.

मोदी-शहांचा राजकीय धंटींगपणा, झुंडशाही मोडीत काढत वैचारिक विरोधाभास असणारी युती केली आहे. ही युती शिवसैनिकांच्या गळी उतरवलीच पण तमाम मराठी माणसाच्याही गळी उतरवत त्यांच्या मनात त्यांनी आपुलकीची जागा निर्माण केली आहे. हे सगळं करताना हिंदूत्वाचा आवाज बुलंद ठेवला आहे. तसेच प्रबोधनकारांच्या आत्म्याला आनंद होईल अशा भूमिका घेत त्यांचे काम सुरू आहे. ते बदलले नाहीत त्यांनी शिवसेनचे रूपडे बदलले आहे. त्यांनी शिवसेनेचा साचा बदलला आहे. त्यांनी त्यांच्यासारखेच पण आक्रमकता शाबूत ठेवत शिवसेनेचे नवे मॉडेल विकसीत केले आणि यशस्वीही करून दाखवले आहे

हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

छप्पन इंच छातीवाले झाले फेल

खरेतर बाळासाहेबांचा खरा वारस कोण? हा वादच उध्दव ठाकरेंनी निकालात काढला आहे. वारसा बळकट केलाच पण बाळासाहेबांनी हातात सोपवलेली सेना वाढवली आणि टिकवलीही. हे करताना ते ना बाळासाहेबांच्या प्रभावात गेले, ना प्रबोधनकारांच्या प्रभावात गेले. त्यांनी स्वत:चीच वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठाकरे घराण्यातला ही नवी ओळख आणि नवे अस्तित्व असलेला चेहरा म्हणून इथून पुढे महाराष्ट्र त्यांना नक्कीच ओळखेल. थोरा-मोठ्यांच्या प्रभावातून वर उठणे भल्या-भल्यांना शक्य होत नाही. त्यातल्या त्यात ते थोर लोक घरातले असतील तर अजिबात नाही. त्या ओझ्यानेच लोक कोलमडून पडतात पण उध्दव ठाकरे याला अपवाद ठरले आहेत.

सध्याचा काळ आणीबाणीचा आहे. राज्यावरचे संकट खूप मोठे आहे. छप्पन इंच छातीवाले सपशेल फेल ठरले आहेत. अशा स्थितीत तीन पक्षाचे सरकार चालवत, सर्वांना सांभाळून घेत, सर्वांचे राग-लोभ कुरवाळत त्यांनी राज्याचा गाडा चांगला चालवला आहे. उध्दव ठाकरे  एक चांगला मुख्यमंत्री म्हणून नक्कीच काम करतील. स्वत:च्या कर्तबगारीची ओळख महाराष्ट्राला करून देतील. त्यांनी अडचणीच्या काळात शिवसेना जोपासली आणि वाढवली. 

त्याचप्रमाणे ते अडचणीच्या काळात या महाराष्ट्रालाही जोपासतील, चांगले सांभाळतील आणि प्रगतीपथावर नेतील असा विश्वास वाटतो. त्यांचा आज साठावा वाढदिवस. त्यांच्या हातून खूप मोठे काम घडावे. महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीता यावी अशी कामगिरी त्यांच्या हातून घडावी याच त्यांना वाढदिवसाच्या वज्रधारी शुभेच्छा!

हेही वाचा : 

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही