अथर्व अंकोलेकरः शेवटच्या ओवरमधेही विकेट काढणारा जिद्दी बॉलर

२१ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज शनिवार, २१ सप्टेंबर. १९ वर्षांखालच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा हिरो अर्थाल अथर्व अंकोलेकर याचा आज बड्डे. त्याने केलेल्या कामिरीमुळे सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली. आणि विशेष म्हणजे अथर्वने आपल्या वडलांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे येत्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठीसुद्धा अथर्व खेळेल असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय.

काही दिवसांपूर्वी आशिया कप क्रिकेट स्पर्धेत १९ वर्षांखालच्या टीमची फायनल मॅच झाली. ही मॅच कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगली. आणि ती मॅच मुंबईकर अथर्व अंकोलेकरने एकहाती भारताच्या बाजूने फिरवली. डावखुरा फिरकीपटू अथर्वने या स्पर्धेत भन्नाट कामगिरी केली. मॅच सुरू असताना त्याची आई बेस्ट बसच्या ३३४ रूटच्या बसमधे होती. ती आपली कंडक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत होती. पण तिचं सगळं लक्ष आपल्या मुलाच्या खेळाकडे होतं.

फायनल मॅचमधे भारताने फक्त १०६ रन केले. आणि विजयासाठी बांगलादेशपुढे नाममात्र लक्ष्य ठेवलं. ही बातमी ऐकल्यावर अथर्वची आई नर्वस झाली. शेवटी त्यांनी मरोळ डेपोतल्या अधिकाऱ्याकडून लवकर घरी जाण्याची परवानगी मिळवली. आणि त्यांना आपल्या अथर्वचा पराक्रम बघायला मिळाला. अवघ्या २८ रनमधे ५ गडी गारद केले. आणि त्याने बांगलादेशला १०१ रन्सवरच रोखलं. भारताला एक थरारक विजय मिळवून दिला. आणि त्यानंतर अथर्व आपल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला.

अथर्वने वडलांचं स्वप्न पूर्ण केलं

दोन दिवसांपूर्वी अथर्व अंधेरीच्या गोविंद नगरमधे परतला. त्यावेळी विमानतळापासून त्याच्या दोस्त मंडळींनी मिरवणूक काढली. वाजतगाजत खांद्यावर मिरवत त्यांनी त्याला घरी आणलं. त्याची आई वैदेही अंकोलेकर यांना आनंद गगनात मावेनासा झाला. वडलांचं स्वप्न अथर्वने जवळपास पूर्ण केलं. आणि त्याचंच समाधान आईच्या चेहऱ्यावर होतं.

अथर्वचे वडील विनोद हे चांगलं क्रिकेट खेळायचे. मात्र ते बेस्टकडून खेळायचे. ते नेहमीच अथर्व आणि त्याचा धाकटा भाऊ पार्थ यांना क्रिकेटच्याच गोष्टी सांगायचे. क्रिकेटमधल्या हिरोंच्या पराक्रमाचं वर्णन करायचे. यामुळे दोन्ही मुलं क्रिकेटकडे वळली नसती तरच नवल. आपल्या किरकोळ पगारातही त्यांनी अथर्वला चांगलं क्रिकेटचं प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न चालवले. त्याने भारताकडून खेळावं हे स्वप्न ते बघत होते. आता अथर्वने भारताच्या ज्युनिअर संघात स्थान मिळवलंय.

हेही वाचा: अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

अथर्वच्या प्रशिक्षकांचे आभार

अथर्वला जर्सी मिळाली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याला आपल्या वडलांची तीव्र आठवण आली. तो नऊ वर्षांचा असताना त्याचे वडील गेले. म्हणून अथर्व आपल्या आईला खूप मानतो. तिने खंबीरपणे अख्ख्या संसाराची जबाबदारी पेलली. आधी त्या शिकवण्या घ्यायच्या. नंतर बेस्टने अनुकंपा धर्तीवर त्यांना नोकरी दिली. आणि त्यांनीही ती स्वीकारली.

कंडक्टर म्हणून ही नोकरी सांभाळताना मात्र त्यांची खूप दमछाक होतेय. म्हणूनच आता अथर्व आपल्या आईला नोकरी सोडायला सांगू लागलाय. मात्र वैदेहींना दोन्ही मुलं आणखी खूप मोठी झालेली बघायचीयत. वैदेही अथर्वच्या क्रिकेट प्रशिक्षकांचे विशेष आभार मानतात. आधी पार्ले टिळक विद्यालयात अथर्व होता.

तिथे त्याला सुरेन आयरे, दिवाकर शेट्टी, निलेश पटवर्धन आणि एमआयजी क्लबचे प्रशांत प्रशांत शेट्टी इत्यादी. यांनी त्याला पोटच्या पोरासारखी माया लावली आणि दिवाळीला फटाके, फराळ, भेटवस्तू देण्यापासून अर्थात क्रिकेटमधल्या सगळ्या खाचाखोचा शिकवण्यापर्यंत त्यांनी सारं काही अथर्वला दिलंय.

हेही वाचा: भारताला मोहालीच्या खेळपट्टीची देणगी देणारे दलजित सिंग

अथर्वने नेमकं काय केलं?

अथर्वचे वडील मुद्दाम रात्रपाळी घ्यायचे आणि दिवसभर अथर्वला क्रिकेटचे धडे द्यायचे. ती मेहनत आणि भल्या गुरूंची शिकवण यामुळेच आज अथर्वने प्रगती केलीय, असं अथर्वच्या आईंना प्रामाणिकपणे वाटतं. शिवाय प्रत्यक्ष या आशिया स्पर्धेदरम्यान टीमचे कोच पारस म्हांबरे यांनी अथर्वला मोलाचं मार्गदर्शन केलं. तेही खेळताना त्याला महत्वाचं ठरलं.

भारताचा डाव १०६ धावांत आटोपला. त्यावेळी म्हांबरेंनीच सगळ्या खेळाडूंना खंबीर राहा. आणि आधी दोन तीन विकेट्स लवकर काढायचा प्रयत्न करा असा सल्ला दिला. मग बाजी पलटवता येईल असंही प्रोत्साहन दिलं. अथर्वने नेमकं तेच केलं.

हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

म्हांबरेंना अथर्वचं कौतुक का वाटतं?

म्हांबरेंना अथर्वचं खूप कौतुक. कारण त्याने शेवटचे ओवर टाकतानासुद्धा विकेट काढण्यासाठीची जिद्द राखली. अवघ्या पाच धावा पाठीशी असूनही तो डगमगला नाही. आणि त्याने शेवटचे दोन बळी त्या ओवरमधे काढले. आणि आठवणीत राहील असा विजय मिळवून दिला. आता म्हांबरे जानेवारीत होणाऱ्या १९ वर्षाखाली विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने आखणी करताहेत. दक्षिण आफिकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड अद्याप व्हायचीय. पण त्यात अथर्व असेल अशी त्यांच्यासह अनेकांना खात्री वाटतेय.

अथर्व हा १३, १५, १७, १९ वर्षांखाली मुंबईच्या टीमकडून खेळलाय. तो खरंतर ऑलराऊंडर आहे. तो बॅटिंगही सुरेख करतो. त्याची सुरवात तर झक्कास झालीय. आता मुंबईच्या संघातही निवड झालीय. त्याची पुढील वाटचाल बघायला क्रिकेट रसिकांना आनंदच होणार आहे.

हेही वाचा: 

संत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती

जंगलातून मेट्रो धावताना जंगल उरेलच कसं?

ई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे?

जगात पर्यावरण आणीबाणी घोषित करा सांगणाऱ्या ग्रेटा ताईची गोष्ट