हॉलीवूड आणि बॉलीवूडसोबतच आता मराठी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमाची मेजवानी यावर्षी प्रेक्षकांच्या दिमतीला हजर असणार आहे. थिएटरवर लावल्या जाणाऱ्या सततच्या लहरी निर्बंधांमुळे बऱ्याच सिनेमांना रिलीजचा मुहूर्तच सापडला नव्हता. पण आता येत्या चार महिन्यात तमाम थिएटर ‘हाऊसफुल’ होण्याची दाट शक्यता आहे.
कोरोना देशातून हद्दपार झालेला नसला तरी लसीकरणाच्या ढालीपुढं त्याचा जोर आता हळूहळू कमी पडत चाललाय. अर्धवट प्रेक्षकक्षमतेच्या जाचक बंधनातून थिएटर आता मुक्त होऊ पाहतायत. गेल्या दोन वर्षांत झालेलं नुकसान भरून काढायला थिएटरमालक आता सरसावलेत. याचं एकमेव कारण म्हणजे, या वर्षी रिलीज होणाऱ्या सिनेमांची गर्दी!
मराठी सिनेसृष्टीने जानेवारीत ‘झोंबिवली’ रिलीज करून या वर्षाची दणक्यात सुरवात केलीय. ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’नेही चांगली कमाई केल्याने तमाम मराठी प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. चरित्रपट, इतिहासपट किंवा ‘पिरीयड ड्रामा’ जॉनरवर तर मराठी सिनेसृष्टीचं भरभरून प्रेम आहे. याच प्रेमाचा अनोखा अंदाज येत्या ४ फेब्रुवारीला महेश मांजरेकरांच्या ‘पांघरूण’मधून पाहायला मिळणार आहे.
‘मी वसंतराव’ हा शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांचा चरित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. ‘एक नंबर’ हा मराठी अडल्ट कॉमेडी सिनेमा ११ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ‘इफ्फी’मधे कौतुकाची थाप मिळवणाऱ्या ‘गोदावरी’सोबतच ‘दे धक्का २’, ‘अनन्या’, ‘विडीओ पार्लर’, ‘चंद्रमुखी’ हे मराठी सिनेमेही यंदा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
दुसरीकडे, मराठ्यांच्या पराक्रमाचे पोवाडेही यावर्षी थिएटरमधे दुमदुमणार आहेत. १८ फेब्रुवारीला रिलीज होणारा बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलसेनेची शौर्यगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या छत्रपती युनिवर्समधला तिसरा तर अफजलखानवधावर आधारित २९ एप्रिलला रिलीज होणारा ‘शेर शिवराज है’ हा चौथा सिनेमा ठरणार आहे. स्वराज्यनिर्मितीच्या दोन पिढ्यांची सैनिकी कमान सांभाळणाऱ्या हंबीरराव मोहितेंचा गौरव प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’मधून मांडला जाणार आहे.
स्वराज्य गिळायला दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबाच्या तोंडचा घास पळवणाऱ्या भद्रकाली ताराबाई महाराणी ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’मधून या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. राहुल जाधव दिग्दर्शित या सिनेमात ‘हिरकणी’फेम सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांच्या बहुप्रतीक्षित ‘शिवत्रयी’मधला ‘शिवाजी’ हा पहिला सिनेमाही याच वर्षी रिलीज होणार असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?
तिकीटबारीवर गाजणारी बॉलीवूडची ‘भाई’गिरी प्रेक्षकांना नवीन नाही. कोरोनामुळे बऱ्याच मोठ्या कलाकारांनी आपले सिनेमे थेटरमधे रिलीज करायला नकार दिला होता पण आता ते सगळेच प्रचंड उतावीळ झालेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची भूमिका असलेला ‘बधाई दो’ ११ फेब्रुवारीला रिलीज होतोय. गे आणि लेस्बियनची लगीनघाई यात पाहायला मिळणार आहे. ‘८३’च्या यशानंतर रणबीर सिंग २५ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या ‘जयेशभाई जोरदार’मधे दिसणार आहे.
आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ही याचं दिवशी रिलीज होतोय. संजय भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा कामाठीपुराच्या गंगूबाई कोठेवालीच्या जीवनावर आधारित आहे. १८ मार्चला रिलीज होणाऱ्या ‘बच्चन पांडे’ या तमिळ ‘जिगरथंडा’च्या रिमेकमधे अक्षय कुमार क्रिती सेननसोबत झळकणार आहे. त्याच दिवशी रणबीर कपूर आणि संजय दत्त यांचा ‘शमशेरा’ही रिलीज होतोय. रणबीर कपूर ९ सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या ‘ब्रम्हास्त्र’मधेही झळकणार आहे.
यात त्याच्यासोबत महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असणार आहेत. अमिताभ बच्चन, बोमन इराणी, यूट्युबर कॅरीमिनाटी, आणि अजय देवगण यांची भूमिका असलेला ‘रनवे ३४’ २९ एप्रिलला रिलीज होतोय. अजय देवगण ३ जूनला रिलीज होणाऱ्या ‘मैदान’मधेही मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती २’ २९ एप्रिल आणि ‘गणपत’ २३ डिसेंबरला रिलीज होतोय. मे महिन्यात आयुष्मान खुरानाचा ‘अनेक’ तर नोव्हेंबर महिन्यात कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ आणि वरुण धवनचा ‘भेडिया’ रिलीज होणार आहे.
चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या मि. परफेक्शनिस्ट आमीर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ १४ एप्रिलला रिलीज होतोय. बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानचा ‘पठाण’ सध्या पुढे ढकलला असला तरी दिवाळीच्या आसपास तो रिलीज करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नॅचरल स्टार नानीच्या ‘जर्सी’चा रिमेक याच वर्षी रिलीज होणार असून, यात शाहीद कपूर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
खरं तर, दक्षिण भारतीय सिनेसृष्टीच्या नावाखाली तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या सिनेमांचं अयोग्य सरसकटीकरण केलं जातं. गेल्या काही वर्षांत स्वतःची वेगळी ओळख राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारे हे सिनेमे याहीवर्षी आपला जलवा दाखवणार आहेत. गेल्या डिसेंबरमधे आलेल्या तेलुगू ‘पुष्पा’ने एकदम ‘फाय्यर’ कामगिरी करत यावर्षी प्रेक्षकांच्या ताटात दक्षिणेकडून कोणते पदार्थ वाढले जाणार याची एक झलक आधीच दाखवलीय.
‘बाहुबली’मधून तेलुगू सिनेमाची किर्ती जगभरात पोचवणारा दिग्दर्शक राजामौली २५ मार्चला ‘रौद्रम् रणम् रुधिरम्’ म्हणजेच ‘आरआरआर’मधून स्वातंत्र्यसंग्रामाचा काळ पडद्यावर घेऊन येतोय. या सिनेमात ज्युनियर एन. टी. आर. आणि राम चरण तेजा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. दस्तुरखुद्द ‘बाहुबली’ म्हणजेच प्रभास ११मार्चला रिलीज होणाऱ्या ‘राधेश्याम’मधे पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणारा आहे.
तमिळ सिनेजगताबद्दल बोलायचं झालं तर, नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित दलपती विजयचा ‘बीस्ट’ १४ एप्रिलला रिलीज होणार आहे. भारतीय नटसम्राटांच्या पंगतीत मानाचं पान मिळवलेले कमल हसन, विजय सेतुपती आणि फहाद फासील हे तीन अभिनेते लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’मधून ३१ मार्चला रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. चियान विक्रमची प्रमुख भूमिका असलेला ‘कोब्रा’ही याच वर्षी रिलीज होतोय.
कन्नड सिनेसृष्टीसाठी वरदान ठरलेल्या ‘केजीएफ’चा गेली तीन वर्षं प्रेक्षकांना ताटकळत ठेवणारा दुसरा भाग १४ एप्रिलला येतोय. किच्चा सुदीप स्टारर ‘विक्रांत रोना’ २४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. गेल्यावर्षी कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारने या जगाचा निरोप घेतला. त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘गंदद गुडी’ हा माहितीपटही याचवर्षी रिलीज होतोय. हे सगळे सिनेमे इतर भाषांमधेही डब होणार असल्याने थिएटरमधे स्क्रीन मिळवण्यासाठीची लढत चुरशीची ठरणार आहे.
हेही वाचा : हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका
ओटीटीमुळे वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे प्रेक्षकांना बघता आले. प्रेक्षकांची हीच नस पकडून इतर भाषिक सिनेमांमधे काम करण्याचा निर्णय अनेक कलाकारांनी घेतला आहे. २४ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या ‘वलिमाई’मधे अभिनेत्री हुमा कुरेशी तमिळ सुपरस्टार अजितसोबत दिसणार आहे. ४ मार्चला रिलीज होणाऱ्या मराठमोळ्या नागराज मंजुळेच्या ‘झुंड’मधे महानायक अमिताभ बच्चन मध्यवर्ती पात्र साकारत आहेत.
तेलुगू अभिनेता प्रभास १४ एप्रिलला रिलीज होणाऱ्या ‘सालार’मधून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्याचबरोबर प्रभास ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मधेही दिसणार आहे. किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोना’मधे जॅकलीन फर्नांडीस पाहुणी कलाकार म्हणून झळकतेय. मकरंद देशपांडे, अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा २५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या ‘लायगर’मधे झळकणार आहेत. अनन्याचा हा पहिला तेलुगू आणि विजयचा हा पहिला हिंदी सिनेमा ठरणार आहे.
अभिनेता अजय देवगण, आलिया भट हे राजामौलीच्या ‘आरआरआर’मधे मध्यवर्ती पात्र साकारत आहेत. मल्याळम अभिनेत्री निमिषा साजयन ‘बटरफ्लाय’च्या निमित्ताने यावर्षी मराठीत पदार्पण करतेय. ‘केजीएफ २’मधे अभिनेत्री रवीना टंडन पंतप्रधानांच्या तर अभिनेता संजय दत्त खलनायक अधिराच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ब्रम्हास्त्र’च्या निमित्ताने नागार्जुन अक्कीनेनी बऱ्याच वर्षांनंतर हिंदी सिनेमात झळकतोय.
भाषा आणि प्रांताची बंधनं तोडायच्या या खेळात सहभागी व्हायचा मोह खऱ्याखुऱ्या खेळाडूंनाही आवरलेला नाही. क्रीडाप्रेमींच्या मनात स्थान मिळवल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सिनेप्रेमींकडे वळवलाय. माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाण ‘कोब्रा’ या तमिळ सिनेमात चियान विक्रमचा प्रतिस्पर्धी म्हणून झळकणार आहे. लोकप्रिय अमेरिकन बॉक्सर माईक टायसन विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’मधे बॉक्सिंग रिंग गाजवताना दिसणार आहे.
इतके सगळे सिनेमे येणार ही वरवर कोरोनामुळे नुकसानीचा फटका बसलेल्या सिनेसृष्टीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पण या नाण्याची दुसरी बाजू मात्र वेगवेगळ्या प्रश्नांनी झाकून गेलेली आहे. एकाच तारखेला अनेक सिनेमे रिलीज होत असल्याने बॉक्स ऑफिसच्या गणितांचा मेळ बसवणं अवघड जाणार आहे. या खेळात बॉलीवूडचं पारडं इतर भाषिक सिनेमांच्या तुलनेत जरा हलकंच ठरतंय.
‘केजीएफ २’ आणि ‘आरआरआर’ हे यावर्षीचे दोन हुकमी एक्के ठरणार आहेत. प्रशांत नील हा दिग्दर्शक त्याचा ‘सालार’ आणि ‘केजीएफ २’ एकाच दिवशी रिलीज करतोय. त्याचदिवशी विजयचा ‘बीस्ट’ आणि आमीरचा ‘लाल सिंग चढ्ढा’ही रिलीज होतोय. ‘केजीएफ’ आणि ‘आरआरआर’ची वाढती क्रेझ पाहता अनेक सिनेमे पुढे ढकलले गेलेत, ज्यात कार्तिक आर्यनचा ‘भुलभुलैय्या २’देखील आहे.
बॉलीवूडला फक्त बाहेरच्याच नव्हे तर घरच्याही सिनेमांना तोंड द्यावं लागणार आहे. ‘बच्चन पांडे’ की ‘शमशेरा’, ‘रनवे ३४’ की ‘हिरोपंती २’, ‘जयेशभाई’ की ‘गंगूबाई’ अश्या वादांना तोंड देता देता बॉलीवूडला पळता भुई थोडी होणार आहे. कुठल्या सिनेमाला जायचं आणि कुठल्या नाही, हा प्रेक्षकांसमोर एक यक्षप्रश्न असला तरी त्याचं उत्तर म्हणून शेवटी त्यांच्या पदरी निखळ मनोरंजनच पडणार आहे. एकंदरीत, मनोरंजनाचा खजिना मुबलक आहे पण तो लुटण्यासाठी संघर्ष अटळ आहे!
हेही वाचा :
इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप
सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?
बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?
जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा