इतिहासाचा योग्य वापर आणि गैरवापर कसा केला जातो?

२६ मार्च २०२२

वाचन वेळ : ९ मिनिटं


श्रमिक प्रतिष्ठानने २०१८मधे कोल्हापुरात कॉ. अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानामाला आयोजित केली होती. या व्याख्यानमालेत ‘इतिहासाचा वापर आणि गैरवापर’ या विषयावर इतिहासाच्या अभ्यासक प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी भाष्य केलं होतं. त्या व्याख्यानाचा एक अंश इथं देत आहोत.

आज मी सोबत मार्क फेरो या लेखकाचं ‘इतिहासाचा वापर आणि गैरवापर’ हे पुस्तक घेऊन आलेय. ते १९८१मधे पहिल्यांदा प्रकाशित झालं. या पुस्तकात भारताच्या संदर्भात एक छोटंसं प्रकरण आहे. आपण श्रमिक प्रतिष्ठानचे लोक श्रम करून इथं उदरनिर्वाह करतो. जगभरातल्या श्रमिकांशी आपलं नातं जोडतो. तसं भारतात इतिहासाचा गैरवापर केला जातोय, असं एका छोट्या प्रकरणात जरी लिहिलेलं असलं, तरी या पुस्तकातली इतर चौदा प्रकरणं वाचून आपल्याला कदाचित थोडासा दिलासा मिळू शकतो. 

जगाच्या पाठीवर कित्येक देश असे आहेत, जिथं इतिहासाचा गैरवापर केलेला आपल्याला दिसतो. मग इतिहासाचा गैरवापर होणार हे ठरलेलंच आहे का? जगभरात अनेक ठिकाणी, अनेक असे शोषित-वंचित समाज आहेत, ज्यांचा इतिहास पुसून टाकण्याची किंवा ज्यांच्या इतिहासाची मोडतोड करण्याची प्रथा त्या त्या देशांमधे रुजलीय. याचा अर्थ आपण या लढाईत एकटेच नाहीय.

या दृष्टीने मी दोन उदाहरणांचा अभ्यास केला होता. दोन वर्षांपूर्वी ‘इतिहासाचा वापर आणि गैरवापर’ हा एका परिषदेचा विषय होता. तिथंही हंगेरी, पोलंड, स्वित्झर्लंड, नेदरलँड अशा वेगवेगळ्या देशांमधून आलेले अभ्यासक त्यांच्या देशांमधे इतिहासाचा कसा गैरवापर केला गेला, अस्तित्त्वात असलेल्या शोषणव्यवस्था आणखीन खोलवर रुजवण्यासाठी इतिहास कसा सांगितला गेला, अशी उदाहरणे घेऊन आले होते. 

माझ्या शोध निबंधामधे मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेची दोन उदाहरणे उपस्थित लोकांसमोर मांडली. आपल्या इतिहासविषयक कथनाला वैधता प्राप्त करण्याचं साधन म्हणून इतिहासाचा वापर कसा होतो आणि त्यातून सामाजिक उतरंडीतल्या संबंधिताचं स्थान कसं प्रस्थापित होतं, हे पहिल्या उदाहरणातून दिसून येईल, असं वाटतं. 

'आम्ही चित्पावन'मधला इतिहास

अभ्यासकांसाठी ‘संदर्भ-पुस्तक’ असल्याचा आभास निर्माण करणारं ‘आम्ही चित्पावन’ हे पुस्तक २००३मधे प्रकाशित झालं. चित्पावन जातीच्या विविध लेखकांचे ३० लहान लेख यात आहेत. यातला सगळ्यात जुना लेख १९१३ आणि सगळ्यात अलीकडचा लेख २००३मधे लिहिला गेलाय. काही अस्पष्ट संस्कृत स्त्रोतांमधून वंशावळीचा दावा या पुस्तकात केलाय. 

ब्रिटिश वसाहतीतल्या प्रशासकांनी चित्पावनांच्या विविध गुणांची दखल घेतल्याची उत्साही जाहिरातही या पुस्तकात आहे. भारतीय समाजरचनेत सर्वोत्तम स्थान चित्पावनांसाठी राखून ठेवत जातिआधारीत दडपशाहीच्या अपराधभावापासून त्यांना मुक्त करणारी अनिर्बंध उदार वृत्ती या पुस्तकात दाखवण्यात आलीय. ‘चित्पावन हे निःसंशयपणे भारतातल्या अतिशय सक्षम वर्गांमधील एक आहेत,’ अशी प्रशस्ती १८८५च्या मुंबई प्रांताच्या दर्शनिकेत देण्यात आली हेही त्यात हर्षभराने नोंदवलंय. 

पण मी जेव्हा ‘कोण? कधी? काय? कुठे? का?’ अशा प्रश्नांना जागून दर्शनिकेची प्रत वाचली, तेव्हा हे स्पष्ट झालं की तो भागही मुळात नरसो रामचंद्र गोडबोले या चित्पावन हस्तकाने लिहिला होता, अशी नोंद दर्शनिकेच्या ऋणनिर्देशातच केलीय! इतिहासाच्या वापर आणि गैरवापराचा ‘नमुना’ म्हणून याच पुस्तकाचा विचार का करायचा? म्हणजे बाजारात इतर असंख्य पुस्तकं उपलब्ध असताना याचाच अभ्यास कशासाठी?

तर इब्न खाल्दून या इतिहासाच्या तत्त्वचिंतकानं चौदाव्या शतकात दिलेला इशारा इथं नोंदवावासा वाटतो.

‘जर एखाद्या विशिष्ट पंथ किंवा विचाराच्या प्रेमापोटी मन कलुषित झालं असेल, तर ते सोयिस्कर तेवढ्या विचारांना चटकन मान्यता देतं. या पूर्वग्रहांमुळे आणि पक्षपातामुळे चिकित्सक बुद्धी आणि विवेकीपणावर सावट येतं. परिणामी खोटेनाटे दावेच खरे मानून त्यांचा प्रसार केला जातो.’

हेही वाचा: महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

जातीय भेदभावाचं समर्थन

इतिहासाच्या गैरवापराचा ‘नमुना’ म्हणून ‘आम्ही चित्पावन’ या पुस्तकाचा विचार करण्याचं पहिलं कारण म्हणजे हे पुस्तक ‘संदर्भा’साठी असल्याचा दावा केला गेलाय. विसाव्या शतकातल्या बरीच जनमान्यता लाभलेल्या इतिहासकारांचे, बुद्धीजीवींचे आणि राजकीय नेत्यांचे लेख या पुस्तकात आहेत. वि. का. राजवाडे, चिं. वि. वैद्य आणि लोकमान्य टिळक यांसारख्या मंडळींचा यात समावेश आहे. दुसरं कारण म्हणजे हे पुस्तक ‘ट्रोजन हॉर्स’ मोहिमेसारखं किंवा मेंढ्यांची कातडी पांघरून त्यांच्या कळपात शिरलेल्या लांडग्यासारखं आहे. 

अगदी प्रमाण मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात उच्चजातीयांशी पारंपरिकरीत्या जोडली गेलेली जातीय आक्रमकता आढळत नाही. त्यामुळे एका समुदायासंबंधीच्या कथनांचं हे निरुपद्रवी संकलन आहे, अशी समजूत होण्याची शक्यता आहे. पण ती गैरसमजूत म्हणावी लागेल. अनिर्बंध उदारमतवादी विचारसरणीप्रमाणे या पुस्तकातही असा दावा केलाय की, चित्पावनांनी त्यांचं स्थान हक्कानं कमावलंय. 

मुळात इतर जातींना कनिष्ठ लेखूनच चित्पावनांना विशेषाधिकार प्राप्त झाले, याविषयी एक शब्दही या पुस्तकात नाही. हे पुस्तक जातीय भेदभावाचं समर्थन करणारं ठरतं, कारण विशेषाधिकारी वागणूक मिळण्यास चित्पावन ‘निसर्गतः’ पात्र आहेत अशा स्वरूपाची मांडणी त्यात आहे. खरं तर, लढाऊ वंशाचा सिद्धान्त आणि आर्य आक्रमणाचा सिद्धान्त ही मांडणी पूर्णतः निरर्थक असल्याचं पूर्वीच सिद्ध झालंय आणि तरीही जातींना त्यांच्या कथित स्वभावधर्मानुसार जोडण्यात आलेल्या मिथ्या-वैज्ञानिक वैशिष्ट्यांचं समर्थनही या पुस्तकात केलं गेलंय. 

आम्हीही इतिहास घडवला

प्रस्तुत नमुना-अभ्यासासाठी निवडलेलं दुसरं पुस्तक इतिहासाचं नाही आणि त्यामधे तसा काही दावाही केलेला नाही. पण त्यात आपली बाजू ठासून मांडण्यासाठी केलेला इतिहासाचा वापर लक्षवेधक आहे. ‘आम्हीही इतिहास घडवला’ असं या पुस्तकाचं नाव आहे. सामाजिक मुक्तीसाठी डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीत सहभागी झालेल्या दलित स्त्रियांच्या मुलाखतींचं संकलन यात केलं गेलंय. 

इतिहासलेखनाच्या सबाल्टर्न प्रवाहाचे उद्गाते रणजित गुहा म्हणतात,

‘भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासलेखनावर अभिजनवादाचं वर्चस्व राहिलंय- वासाहतिक अभिजनवाद आणि बूर्झ्वा-राष्ट्रवादी अभिजनवाद असे दोन्ही प्रकार त्यात आहेत. भारतीय राष्ट्राची निर्मिती आणि या प्रक्रियेला आधारभूत ठरलेल्या राष्ट्रवादी जाणीवेचा विकास केवळ किंवा मुख्यत्वे अभिजनांमुळे झालाय, असा पूर्वग्रह या दोन्ही प्रकारच्या अभिजनवादांमधे आढळतो.’

मी अभ्यासलेलं हे दुसरं पुस्तक या प्रवाहाविरुद्ध जात अभिजन नसलेल्या लोकांना कर्तेपण आणि आवाज देण्याचा प्रयत्न करतं. वासाहतिक काळापासून वसाहतोत्तर काळापर्यंत भारताच्या स्थित्यंतरात खरे प्रयत्न गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी केले, असं गृहीतक मध्यवर्ती ठेवून आधुनिक भारताचा इतिहास बहुतांशाने लिहिला गेलेला दिसतो. पण दलितांचा या स्थित्यंतराबद्दलचा दृष्टिकोन अतिशय वेगळाय. 

राजकीय सत्ताबदलापेक्षा स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने दिलेले मानवाधिकार आणि स्वातंत्र्य दलितांना अधिक मौल्यवान वाटतं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अस्पृश्यतेच्या मानहानीकारक अस्तित्वाला या घटनात्मक अधिकारांनी छेद दिला. या पुस्तकासाठी मुलाखती घेण्यात आलेल्या सगळ्या स्त्रिया दलित जातींमधल्या आहेत. डॉ. आंबेडकरांनी लढण्याची प्रेरणा देईपर्यंत या स्त्रिया गरीबीचं आणि मानहानीचं जीवन जगत होत्या. 

हेही वाचा: शिवरायांचं प्रतीक ही वारसदारांनी गमावलेली संधी

अस्पृश्यांवर अविश्वास

जातीय भेदभाव ही केवळ सामाजिक समस्या नाही, त्याचे वास्तव जीवनात आर्थिक परिणामही होत असतात. या पुस्तकातली मुक्ता सर्वगौड यांची मुलाखत या संदर्भात महत्त्वाची आहे. द्रोण तयार करण्याचं प्रशिक्षण दलित स्त्रियांना देण्यासाठी त्यांनी शेकडो रुपये गुंतवले होते. पण दलित स्त्रियांचा स्पर्श झालेले हे द्रोण कुणीही विकत न घेतल्यामुळे शेवटी हजारो द्रोण फेकून द्यावे लागले. 

त्या एकदा गांधींना जाऊन भेटल्या होत्या. त्यांनी धिटाईनं गांधीजींना प्रश्न विचारला, 'हरिजन सेवक संघाचा फंड हरिजनांच्या ताब्यात का देत नाही?' गांधीजींनी उत्तर दिलं, 'हरिजनांना अस्पृश्य म्हणून दूर ठेवण्याचं पाप आम्ही सवर्ण हिंदूंनी केलंय. म्हणून ते त्यांच्याच हातानं धुण्याचा प्रयत्न चालूय.’ आर्थिक संधी नाकारण्यामागे जातीय विषमताही कारणीभूत असते आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीतले आदर्श नेते अस्पृश्यांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते, ही वस्तुस्थिती भारताचा राष्ट्रीय इतिहास सांगणाऱ्या प्रमाणित पुस्तकांमधे कधीही अधोरेखित केली जात नाही. 

इतिहासाविषयी निराळं परिप्रेक्ष्य मांडण्यासाठी ‘आम्हीही इतिहास घडवला’सारख्या पुस्तकाने ऐतिहासिक कथनांचा आणि दाव्यांचा वापर केला, तर त्याला इतिहासाचा वापर म्हणायचं की गैरवापर म्हणायचं? ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचं तत्त्व विचारात घेता, वाचकांसाठी जितकी जास्त ऐतिहासिक कथनं उपलब्ध होतील तितकं भूतकाळाचं आकलन करून घ्यायला श्रेयस्करच ठरेल. 

पुस्तकाच्या प्रस्तावनेचा वाद

ही कहाणी इथंच संपत नाही. या पुस्तकाचं लेखन आणि संपादनही दोन दलित स्त्रियांनी केलंय. आपल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती त्यांनी मराठीतले आघाडीचे इतिहासकार य. दि. फडके यांना केली होती. ‘लेखिकाद्वयानं फार कमी महिलांच्या मुलाखती नमुन्यादाखल घेतलेल्या आहेत, त्यामुळे या पुस्तकाची व्याप्ती अतिशय मर्यादित होते’, असं मत फडक्यांनी प्रस्तावनेत व्यक्त केलं. 

‘आंबेडकरांच्या चळवळीत सहभागी झालेल्या उच्चजातीय महिलांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत, आणि दलितांच्या पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांमधे महिलांचं प्रतिनिधित्व अत्यल्प आहे, त्यामुळे अर्थातच या पुस्तकातून आलेली माहिती ही पुरेशी वास्तवदर्शी नाही.’ अशी टिप्पणीही त्यांनी केलीय. या प्रस्तावनेवर दलित वर्तुळांमधून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाली. 

प्रस्तावनेचे लेखक जन्मानं चित्पावन ब्राह्मण होते, ही जखमेवर मीठ चोळणारी बाब ठरली. दलित महिलांच्या लिखाणाला एका उच्चजातीय पुरुषाने ज्ञानाचा दर्जा देणं नाकारल्यामुळे निर्माण झालेला वाद १९९०च्या दशकात मराठी विचारविश्वात संतप्त चर्चांचा विषय ठरला होता. फडक्यांच्या आक्षेपांचा प्रतिवाद पुढच्या आवृत्तीमधे समाविष्ट केला गेला. 

हेही वाचा: शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

पर्यायी इतिहासाची निर्मिती

इथं इतिहासाच्या वापराचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. ‘आम्ही चित्पावन’मधे इतिहासलेखनाच्या व्यावसायिक नियमांचं पालन झालेलं नाही हे उघड आहे. तरीही तो अस्मितानिर्मितीचा प्रयत्न आहे, आणि उच्च वंशावळीवर दावा सांगण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न झालाय, असं म्हणता येईल. 

‘आम्हीही इतिहास घडवला’ हे पुस्तक डॉ. आंबेडकरांच्या चळवळीतल्या दलित महिलांच्या सहभागाविषयी आहे. हे पुस्तकही व्यावसायिक इतिहासकारांनी लिहिलेलं नाही. ऐतिहासिक माहितीची नोंद करून पर्यायी इतिहास सादर करण्याचा प्रयत्न म्हणून त्याकडे पाहता येईल. 

यातून आपण पर्यायी इतिहासाच्या मुद्द्यावर येऊन ठेपतो. आपापल्या स्थानाविषयी वादग्रस्त दावे करणाऱ्या भिन्न सामाजिक स्तरांतल्या लोकांमधल्या संघर्षामुळे पर्यायी इतिहासाची निर्मिती अपरिहार्य ठरते. पर्यायी इतिहास म्हणजे गतकाळाचं एक कथन आणि अर्थनिर्णयन असतं. त्यातली तथ्यं आणि घटनांची मांडणी मुख्यप्रवाही इतिहासाला समांतर तरी असते किंवा त्याच्या पूर्णतः विरोधी तरी असते. 

पर्यायी इतिहासाची गरज

भारतातला अस्पृश्यतेचा प्रश्न आणि जातीय अस्मितांचा अभ्यास करताना पर्यायी इतिहासाच्या निर्मितीची आणि ग्रहणाची असंख्य उदाहरणं समोर येतात. अनेक अभ्यासकांच्या मते, एकोणिसाव्या शतकापासून विविध ब्राह्मणेतर जातींमधून पर्यायी संस्कृती उदयाला येऊ लागल्या. त्याचाच परिपाक म्हणून १९५६ला डॉ. आंबेडकरांनी आपल्या अगणित अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. 

हिंदू धर्मातल्या जातीय उतरंडीपासून दूर जाण्यासाठी आणि दूर गेलेल्यांच्या आजच्या अस्मितांमागच्या रचित परंपरांना पावित्र्य देण्यासाठीही पर्यायी इतिहासाचा वापर झालाय. पर्यायी संस्कृतीच्या निर्मितीसाठी उपयुक्त स्मरणोत्सव आणि घटनांचं आणि स्थळांचं इतिहासलेखन आजच्या भारतात अतिशय स्पष्टपणे दिसतं. याचं एक उदाहरण म्हणजे मराठी भाषक हिंदू एकमेकांचं स्वागत करताना ‘राम राम’ म्हणत असत. डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी ‘जय भीम’ असा पर्यायी शब्दप्रयोग चलनात आणला. 

राम या हिंदू देवाशी जवळीक ठेवण्याऐवजी त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या नावाशी जोडून घेतलं. आजही आंबेडकरी विचारांच्या अनुयायांमधे ‘जय भीम’ हे स्वागतपर संबोधन लोकप्रिय आहे. अस्पृश्यतेची ओळख पुसून टाकण्यासाठी दलितांनी पारंपरिक पेहराव, अन्न, पेशा आणि अगदी गावातली घरंही सोडून दिली आणि नवीन पर्याय स्वीकारले. या दुरावलेपणाच्या प्रक्रियेचा तर्कसुसंगत परिणाम म्हणून मुख्य प्रवाहातला इतिहास नाकारुन पर्यायी इतिहासाची निर्मिती झाली. 

हेही वाचा: राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

इतिहासाचा धोकादायक वापर

पर्यायी इतिहासासाठी इतिहासाची निर्मिती, वितरण आणि ग्रहण करणाऱ्या पर्यायी पद्धतीही गरजेच्या ठरतात. भारतीय समाजात डीजिटल माध्यमांची पोच लक्षणीय वाढली असल्यामुळे इतिहासनिर्मिती आणि प्रसारासाठी सोशल मीडियाचा वापर होतोय. फोटो, सिनेमे, रेडियो, सोशल मीडिया, ब्लॉग, एसएमएस, मीम आणि सार्वजनिक फलकांचा वापर इतिहासनिर्मिती आणि वितरणासाठी होतोय. 

एखाद्या ऐतिहासिक घटनेविषयीचं कोणाचं तरी भाषण स्मार्टफोनवर पाहत-ऐकत बसलेले विद्यार्थ्यांचे गट विद्यापीठांच्या आवारात सर्रास दिसतात. इतिहासातल्या कोणत्या ना कोणत्या घटनेविषयी सायबरविश्वात अस्मितेच्या लढाया खेळल्या जातायत. 

पुण्यात २०१४मधे दिवसाढवळ्या एका मुस्लीम तरुणाचा खून झाल्याचा दु:खद उल्लेख ह्यूमन राइट्स वॉचच्या अहवालातही व्यक्त केला गेलाय. हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनीयर होता आणि एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अपमानकारक मीम त्याने सोशल मीडियावर टाकल्याच्या संशयावरून जमावाने त्याची हत्या केली. ‘आपल्या’पैकी कोण आहे आणि ‘परका’ कोण आहे, हे सिद्ध करण्यासाठी इतिहासाचा वापर धोकादायक ठरू शकतो. 

दोन्ही पुस्तकांचं महत्त्व काय? 

आपण जर फक्त आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक वाचत राहिलो असतो तर ‘हा जो हरिजनांसाठीचा निधी होता, त्याच्या तिजोरीच्या किल्ल्या कोणाच्या कमरेला होत्या?’ हा प्रश्न अनुत्तरित राहिला असता. असा प्रश्न आपण विचारूच नये, अशाच पद्धतीने पुस्तकं लिहिली गेली असती. तर हे एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांची दुसरी बाजू दाखविणारी अनेक कथनं आपल्याला ‘आम्हीही इतिहास घडवला’मधून वाचायला मिळतात. 

‘इतिहासाचा वापर आणि गैरवापर’ या दृष्टीने जेव्हा मी या दोन पुस्तकांचा विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोघाही लेखकांचं उद्दिष्ट तर सारखंच आहे. आमच्या जातीतल्या, पंथातल्या, चळवळीतल्या किंवा आमच्या समविचारी लोकांनी भूतकाळात काय चांगलं केलंय? त्यांनी इतिहासात कसं महत्त्वपूर्ण योगदान दिलंय, हे दोन्ही पुस्तके सांगतायत. 

मला हे मनातून माहितीय की, ‘आम्ही चित्पावन’ हा इतिहासाचा गैरवापर आहे आणि ऊर्मिला पवारांचं ‘आम्हीही इतिहास घडवला’ हा इतिहासाचा गैरवापर नाहीय. इथं इतिहासाला उपचार पद्धती म्हणून वापरलंय. आम्ही काम केलंय, इतिहास घडवलाय, पण कोणी तो नोंदवला नाही. म्हणून तो नोंदवण्याची संधी आम्हाला मिळालीय, तिचा आम्ही वापर करून घेतोय. पण हे माझ्या मनाने नुसतं सांगून उपयोग नाही.

हेही वाचा: तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

दोन्ही पुस्तकांची चिकित्सा

इतिहासाची अभ्यासक म्हणून मला दोन्ही पुस्तकं एकच तर काम करत नाही ना या दृष्टीकोनातून दोन्हींची तुलना करायला हवी. मग मी पुन्हा ‘कोण? कधी? काय? कुठे? का?’ हे प्रश्न विचारले आणि पिअरे नोराचं फ्रेमवर्क वापरून घडलेल्या गोष्टींच्या स्मृती आपण कशा जतन करतोय, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. 

मला असं जाणवलं की, ‘आम्ही चित्पावन’सारखं पुस्तक स्वतःच्या जातीचं श्रेष्ठत्व ठसविण्यासाठी लिहिलं गेलेलं कथन आहे. दोन्ही कथनंच आहेत. पण या कथनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर मघाशी प्रस्तावनेतलं जे वाक्य आपण बघितलं, त्याच्याशी ते संबंधित आहे. आमची चित्पावन जात कशी श्रेष्ठ आहे आणि त्या जातीने अशा श्रेष्ठत्वाच्या आकांक्षा बाळगल्या तर त्यात गैर काही नाही, असं विधान त्या पुस्तकात दीक्षितांनी केलंय. 

ऊर्मिला पवारांच्या पुस्तकाचा उद्देश पुस्तकाच्या नावामधेच सहज समजून येतो. आम्ही इतिहास घडवण्यात काहीएक योगदान दिलंय आणि ते नोंदवतोय. मग जेव्हा आपण हा इतिहासाचा वापर आहे की गैरवापर आहे, अशा दृष्टीने बघतो, तेव्हा अंतिम उद्दिष्ट म्हणजेच शोषणमुक्त समाजरचनेसाठी याचा काही उपयोग होतोय की नाही असा विचार करावा लागतो. ‘आम्ही इतिहास घडवला’ हे त्या कसोटीवर खरं ठरतं हे स्पष्ट होतं आणि मग सगळ्या गोष्टी लख्ख होतात.

चिकित्सा करण्याचं भान हवं

त्यामुळे इतिहासाचा वाचक, अभ्यासक आणि आताच्या भाषेत बोलायचं झालं तर एक विचारी समाजाचा घटक म्हणून जर आपलं तारतम्य जागृत ठेवलं तर सांगणारी व्यक्ती किंवा आपल्याला आलेला वॉट्सअॅप मेसेज, सीरियल, सिनेमा, पुस्तक इतिहासाचा वापर करतेय की गैरवापर करतेय, हे आपल्याला अगदी सहजपणे समजणं शक्य आहे. 

शोषणमुक्त समाजरचनेसाठी त्या कथनाचा उपयोग होतोय की या उद्देशाला अपाय होईल असं कथन आपल्यासमोर मांडलं जातंय याचं मूल्यभान ठेवलं तर इतिहासातून निव्वळ सत्यापेक्षा अधिक महत्त्वाची अशी समाजधारणेसाठी आवश्यक सामग्री हाती लागू शकते.

हेही वाचा:

पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?