भारतातल्या अस्पृश्यांच्या पहिल्या मंदिर प्रवेशाची शंभरी

२८ मार्च २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


केरळच्या वायकोम गावात ३० मार्च १९२४ला मंदिर प्रवेश करून अस्पृश्यांनी मोठं बंड केलं. महात्मा गांधी, पेरियार, नारायण गुरू यांच्या प्रयत्नातून हा मंदिर प्रवेशाचा लढा उभा राहिला होता. वायकोम सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिर प्रवेशानं सामाजिक विषमतेच्या बेड्या एकाएकी गळून पडणाऱ्या नव्हत्या. पण अस्पृश्य म्हणून नरकयातना भोगणाऱ्या समाजाच्या आत्मसन्मानाला या आंदोलनानं बळ दिलं.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला भारत दोन पातळ्यांवर लढत होता. एकीकडे ब्रिटिश सत्ता तर दुसरीकडे समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरा. भारतातल्या जातव्यवस्थेनं याकाळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना मुख्य प्रवाहापासून दूर लोटलेलं होतं. शूद्र ठरवलेल्या गेलेल्या या जातींना मंदिरं, धर्मस्थळांमधे प्रवेश नाकारला गेला.

त्रावणकोर हे त्याकाळी ब्रिटिशांचं एक संस्थान होतं. आलुमुटील गोविंदन चन्नर नावाचे गृहस्थ त्याकाळी त्रावणकोर संस्थानला सर्वाधिक टॅक्स द्यायचे इतकी श्रीमंती त्यांच्याकडे होती. पण तथाकथित शूद्र जातीत जन्मल्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी होती. त्यांची सावलीही विटाळ मानली जायची. असा तो सगळा भीषण काळ होता.

अस्पृश्यांना देऊळ आणि रस्ता बंदीही

केरळमधून देशाभिमानी नावाचं एक मल्याळम वृत्तपत्र निघायचं. समाजसुधारक असलेले टी. के. माधवन या वृत्तपत्राचे संपादक होते. सगळ्यांनाच कोणत्याही भेदभावाशिवाय मंदिर प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आवाज उठवलेला होता. त्यासाठी १९२१ला महात्मा गांधींची भेट घेतली. तोपर्यंत चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह अशी आंदोलन देशभर पोचलेली होती. असहकार, अहिंसक मार्गानं आंदोलन करण्यावर गांधीजी ठाम होते. माधवन यांनाही त्यांनी याच मार्गानं मंदिर सत्याग्रहासाठी पाठिंबा दिला.

१९२३ला अखिल भारतीय काँग्रेसचं बंगालच्या काकीनाडा इथं अधिवेशन झालं. यात अस्पृश्यतेचा मुद्दा पहिल्यांचा चर्चेत आला. त्याला एक राष्ट्रीय स्वरूप मिळालं. माधवन यांच्यासोबत केरळ काँग्रेसचे नेते के. केल्लपन यांनीही यात पुढाकार घेतलेला होता. पुढे माधवन यांनी काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं. माधवन आणि केल्लपन दोन्हीही नेते अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या इरावा जातीतून येत होते.

केरळ काँग्रेसनं २९ फेब्रुवारी १९२४ला 'अस्पृश्यता निर्मूलन परिषदे'ची स्थापन केली. त्याचं नेतृत्व केल्लपन यांच्याकडे देण्यात आलं. यात माधवन, टी आर कृष्णास्वामी, के निलाकांतन नाम्बुर्थी, वेलायुधा मेनन अशी त्याकाळची केरळमधली समाजसुधारणेतली मोठी नावं होती. ज्या रस्त्यांवर अस्पृश्यांना फिरायची बंदी होती तिथूनच मिरवणूक काढायचा धाडसी निर्णय या परिषदेत घेण्यात आला. पण स्थानिक प्रशासनानं त्याला परवानगी दिली नाही.

हेही वाचा: नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

लढा अस्पृश्यांच्या पहिल्या मंदिर प्रवेशाचा

मग सत्याग्रहींनी थेट मंदिरात प्रवेश करायचं ठरवलं. त्यासाठी कोची शहरापासून ३५ किलोमीटवर असलेल्या वायकोम गावातलं महादेवाचं मंदिर निवडलं गेलं. कारण या मंदिरातच नाही तर मंदिराकडे येणाऱ्या चार रस्त्यांवरही अस्पृश्यांना प्रवेश बंदी होती.  'इरावा आणि इतर कनिष्ठ जातींना प्रवेश निषिद्ध' अशी पाटी या मंदिरावर लावलेली असायची. त्यामुळे याच मंदिरात प्रवेश करण्यावर सत्याग्रही ठाम होते.

३० मार्च १९२४चा दिवस उजाडला. सत्याग्रही नेत्यांसोबत मोठ्या संख्येनं लोक मंदिरापाशी जमू लागले. हळूहळू या सगळ्यांनी मंदिराला गराडा घालायला सुरवात केली. पण दुसरीकडे त्रावणकोर सरकारनं लोकांना पांगवण्यासाठी बॅरीकेड्स आणि पोलिसांची फौज उभी केली. अशातच मंदिराचे पुजारी आणि त्रावनकोर सरकारचा आदेश धुडकावून लावत सत्याग्रहींनी मंदिरात प्रवेश करायचा प्रयत्न केला. पण दुसरीकडून सत्याग्रहींवर जोरदार लाठीचार्ज झाला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

बघता बघता सत्याग्रहींना अटक झाली. पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी जामीन नाकारत तुरुंगातच आपला सत्याग्रह कायम ठेवला. हे बंड उच्चवर्णीयांच्या चांगलंच जिव्हारी लागलेलं होतं. त्याचवेळी सत्याग्रहाला देशभरातून पाठिंबा वाढत होता. देशभरातले काँग्रेसचे आणि इतरही नेते वायकोमच्या दिशेनं येत होते. त्याचवेळी केरळला पूर आलेला होता. गांधीजींनी सत्याग्रहींना उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण त्यांनी स्पष्ट नकार दिला.

वायकोम सत्याग्रहाचा नायक 

माधवन, केल्लपन अशा आंदोलनातल्या बड्या नेत्यांना तुरूंगात टाकलं जात होतं. त्यातच द्रविडी चळवळीचे जनक ई. वी. रामास्वामी उर्फ पेरियार यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. १३ मार्च १९२३ला ते स्वत: वायकोममधे दाखल झाले. त्यावेळी पेरियार मद्रास काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. सत्याग्रहींनी त्यांना आंदोलनाचं नेतृत्व करण्याची विनंती केली. गांधीजींना हे मान्य नव्हतं. त्यामुळे पेरियारनी मद्रास काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं.

पेरियार यांची अस्पृश्यतेविरोधातली जोरदार मांडणी आणि आक्रमक भाषणांमुळे त्रावणकोर सरकारला धडकी भरलेली होती. कारण ही भाषणं सत्याग्रहींना अधिकच स्फूर्ती द्यायची. शिवाय मित्र असूनही त्रावणकोरच्या राजाला पेरियारनी चांगलाच घाम फोडलेला होता. पेरियार यांना दोनवेळा अटकही झाली होती. पण तेही मागे हटले नाहीत. त्यामुळेच सत्याग्रहींनी पेरियारना 'वायकोमचा नायक' ही पदवी बहाल केली.

पेरियार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी नागम्मई यासुद्धा या लढ्यात अधिक सक्रिय होत्या. त्यांच्यासोबत अनेक महिलाही यात सहभागी झाल्या. ज्या काळात महिलांना सर्वाधिक जाचक बंधनांचा सामना करावा लागत होता त्याकाळात महिलांनी रस्त्यावर उतरणं विशेष होतं. तर दक्षिण भारतातल्या समाजसुधारणेतलं मोठं नाव असलेल्या नारायण गुरू यांनीही मंदिर प्रवेशाला जाहीर पाठिंबा दिलेला होता. इतक्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी स्वत:चा आश्रमही सत्याग्रहींसाठी खुला केला.

हेही वाचा: बाबासाहेबांनी पहिला मोर्चा दलितांसाठी नाही तर शेतकर्‍यांसाठी काढला

गांधीजींनी मध्यस्थी केली पण...

आंदोलन पुढे जात होतंच. १ ऑक्टोबर १९२४ला हिंदू सवर्णांनी मंदिर प्रवेशाला पाठिंबा दिला. त्यासाठी वायकोम ते तिरुवनंतपुरमपर्यंत मोर्चाही काढला. सह्यांची मोहीम राबवली गेली. जो अधिकार हिंदू सवर्णांना तोच दलितांना ही मागणी त्यांनी लावून धरली. त्याचं नेतृत्व समाजसुधारक असलेल्या मन्‍नथू पद्मनाभन यांनी केलं होतं. केरळच्या गुरुवायूर मंदिरातही दलितांना प्रवेश मिळावा म्हणून पद्मनाभन यांनी आंदोलन केलेलं होतं.

२५ हजारपेक्षा अधिक हिंदू सवर्ण यात सहभागी झाल्यामुळे मंदिर प्रवेशाच्या मागणीला अधिकच बळ मिळालं. त्यातून महादेवाच्या मंदिराकडे जाणारे रस्ते खुले करायच्या मागणीनं जोर पकडला. या मागणीसाठी सवर्ण हिंदूनीही बहिष्काराचं अस्त्र हाती घेतलं. पण तरीही त्रावनकोर सरकार मानायला तयार नव्हतं. त्यांच्यावर सनातनींचा पगडा कायम होता. तो दिसतंही होता.

८ मार्च १९२५ला महात्मा गांधी केरळला आले. त्यांनी त्रावणकोरच्या महाराणीसोबतच सवर्ण हिंदू आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. त्यावेळी सरकारनं अस्पृश्यांसाठी बंद असलेले रस्ते खुले करण्याचा निर्णय घेतला खरा पण एक दरवाजा त्यातून वगळला गेला. आंदोलक पुन्हा आक्रमक झाले. लढा सुरू राहिला.

पुन्हा एकदा गांधींजींनी उच्चवर्णीय गटाशी चर्चा करायचा प्रयत्न केला. त्यांनी मंदिराचे मुख्य विश्वस्त इंदमथुरुथी नंबुथिरी यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. नंबुथिरी यांचं घर असलेल्या वायकोमधल्या 'इंदमथुरुथी माना' या ठिकाणाला प्राचीन इतिहास होता. इथं केवळ ब्राम्हणांना प्रवेश होता. गांधीजी ब्राह्मण नसल्यामुळे त्यांची व्हरांड्यात स्वतंत्रपणे बसण्याची व्यवस्था करण्यात आली. कारण त्यांच्यादृष्टीनं गांधीजी आणि त्यांचे अनुयायी अस्पृश्य होते. 

ऐतिहासिक नोंद ठरलेला सत्याग्रह

पुढे १९३६ला त्रावणकोर सरकारनं एक आदेश काढला. त्रावणकोर संस्थानातली सगळी मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली झाली. हिंदू मंदिरांमधे त्यांना पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला. आंदोलनाला मोठं यश मिळालं. कोणत्याही हिंसक आंदोलनाशिवाय सामाजिक लढा कसा यशस्वी करता येतो हे वायकोमच्या मंदिर प्रवेश आंदोलनानं दाखवून दिलं होतं. या आंदोलनाची केरळच्या आणि भारताच्या एकूण स्वातंत्र्यलढ्यामधे ऐतिहासिक नोंद झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३०मधे दलितांसाठी काळाराम मंदिर सत्याग्रह घडवून आणला. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रही असाच होता. वर्षानुवर्ष ज्या समूहाच्या वाट्याला सामाजिक विषमता आली त्याला अधिकारांची जाणीव करून देणं हाच या लढ्यांमागचा महत्वाचा उद्देश होता. त्याआधीचा १९२४चा हा लढा या पुढच्या लढ्यांना दिशा दाखवणारा होता.

हा पूर्ण लढा केवळ आणि केवळ अहिंसेच्या मार्गाने लढला गेला हे विशेष! ३० मार्चला या ऐतिहासिक मंदिर प्रवेशाच्या लढ्याचं शतकमहोत्सवी वर्ष सुरू होतंय. मानवी इतिहासाला कलाटणी देणाऱ्या या लढ्यानं सामाजिक विषमतेला मूठमाती देत आत्मसन्मानाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. त्यामुळेच मंदिर प्रवेशाचा हा लढा भारताच्या इतिहासातली एक महत्वाची नोंद आहे.

हेही वाचा: 

संविधान म्हणजे काय रे भाऊ!

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

सातवीच्या पुस्तकातलं संविधान वाचलंय?

संविधानासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त का ठरला?

सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही