वसंतराव नाईक हा राजकारणाच्या पलीकडे विचार करणारा माणूस होता. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना होती. कोणत्याच राजकीय पक्षाशी त्यांनी वैर ठेवलं नाही. प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक पटलावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.
जांबुवंतराव धोटे येरवड्याच्या जेलमधे बंद होते. जेलमधून त्यांना पॅरोलवर सुटी मिळाली. एका गाडीत त्यांना बसवण्यात आलं. त्यांची आई नागपूरला भरती असल्याचं सांगण्यात आलं. ती गाडी अत्यंत वेगानं मुंबई विमानतळावर पोचली. विमानानं ते लगेच नागपूरला पोचले. विमानतळावरून सज्ज असलेल्या गाडीनं थेट दवाखान्यात पोचले.
आईच्या शेजारी सेवासुश्रूषा करत असतानाच त्यांना दिसले कट्टर राजकीय वैरी वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांना जांबुवंतरावांच्या आईबद्दल कळलं. त्यांनीच व्यवस्था केली. राजकीय मतभेदांच्या पलीकडे असलेला माणुसकीचा जिवंत झरा जांबुवंतराव धोटे यांनी अनुभवला. वसंतराव नाईक यांनी अनेकांच्या मनाच्या उजाड वाळवंटात सकारात्मकतेचा ‘वसंत’ फुलवला. म्हणूनच ते सर्वांचे ‘नाईक’, म्हणजे नायक झाले.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यात बंजारा समाजातील चतुरसिंग राठोड यांनी गहुली हे गाव वसवलं. ते त्या तांड्याचे प्रमुख होते. नायक होते, म्हणून त्यांना ‘नाईक’ ही उपाधी मिळाली. त्यांना दोन मुलं होती. मोठा राजूसिंग आणि धाकटा हाजूसिंग. हाजूसिंग सर्वांचा लाडका. त्यांना छोटे बाबा म्हणत. हेच हाजूसिंग पुढे वसंतराव नाईक म्हणून नावारूपाला आले.
छोट्या हाजूसिंगला शिक्षणाची प्रचंड ओढ होती. अगदी प्राथमिक अवस्थेतदेखील त्यांनी तीन तीन किलोमीटर पायी प्रवास करून पोहरा, उमरी, बान्सी आणि भोजला प्राथमिक शिक्षण केलं. नागपूरला नील सिटी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. १९३७ ला बी.ए. आणि १९४० ला ‘लॉ’ केलं. नंतर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात १९४१ ला त्यांनी वकिली सुरू केली. गोरगरीब, अडल्यानडल्यांना त्यांच्या वकिलीतून ते मदतही करायचे.
हेही वाचा : गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?
वसंतराव नाईक यांच्यावर महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांची पावलं समाजकार्याकडे वळली. डॉ. पंजाबराव देशमुख यांचाही त्यांच्यावर बराच प्रत्यक्ष प्रभाव होता. याच दरम्यान १६ जुलै १९४१ ला त्यांचं वत्सला घाटे यांच्यासोबत आंतरजातीय लग्न झालं. त्यामुळे त्यांना बराच रोषदेखील पत्करावा लागला. त्यांना निरंजन आणि अविनाश ही मुलं झाली. १९४३ ला त्यांना पुसद कृषी मंडळाचा अध्यक्ष करण्यात आलं.
त्यांचा राजकीय प्रवास वाढत राहिला. १९६३ मधे मारोतराव कन्नमवार यांचं निधन झालं. त्यानंतर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १२ मार्च १९७७ ला वसंतराव वाशिम मतदारसंघातून खासदारही झाले.
१९६६ च्या दुष्काळात खचलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन वसंतरावांनी हिंमत दिली. देशावर अन्नसंकट आलं. अमेरिकेहून धान्य आयात करणं सुरू झालं. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. त्यावेळेस त्यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. ‘जर दोन वर्षांत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही, तर मला फाशी द्या’ त्यांनी अत्यंत ताकदीने आपला शब्द पूर्ण केला. महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढलं.
हायब्रिड बियाणं उपलब्ध करून दिलं. कापूस एकाधिकार योजना आणली. पशूपालन, कुक्कूटपालन या शेतीपूरक व्यवसायाला नवीन दिशा दिली. दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिलं. महाराष्ट्रातल्या धवलक्रांतीची सुरवात वसंतरावांनी केला. त्यांच्याच प्रयत्नांतून चार कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू झाली.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?
‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ ह्या महामंत्रावर त्यांनी नागरिकांचं लक्ष केंद्रित केलं. त्यांच्याच नियोजनातून उजनी, जायकवाडी, चासकमान, पेंच, अप्पर वर्धा, धोम ही धरणं बांधली गेली. पाझर तलाव, वसंत बंधारा ही वसंतरावांचीच देण आहे. महाराष्ट्राची विद्युतशक्तीही वाढली ती वसंतरावांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळेच. पारस, कोराडी, खापरखेडा, भुसावळचे औष्णिक विद्युत प्रकल्प त्यांनी सुरू केले. दुष्काळी भागांत नव्या विहिरींचं आणि तळ्यांचं खोदकाम त्यांनी सुरू केलं. अपूर्ण रस्ते पूर्ण करण्यावर भर दिला.
शेतमालासाठी गोदामं बांधली. सहकारी जिनिंग प्रेसिंग उद्योगाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या कार्याची एक प्रचंड मोठी यादी आहे. १९७२ च्या दुष्काळात त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. ही रोजगार हमी योजना पुढे महात्मा गांधी यांच्या नावाने मनरेगा ही योजना कार्यान्वित झाली. १९६७ सालच्या कोयना भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम वसंतरावांनी केलं.
महाराष्ट्रात पंचायत राज समितीचे वसंतराव अध्यक्ष होते. केवळ १६ महिन्यांत सखोल अभ्यास करून २९३ पानांचा ‘नाईक अहवाल’ त्यांनी सादर केला. त्यानुसारच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं कार्य सुरू आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कलेक्टर असावा अशी सूचना बलवंतराव मेहता समितीनं केली होती. मात्र वसंतरावांनी इथं लोकप्रतिनिधी असावा हा आग्रह ठेवला. ग्रामीण भागातून रोजगारासाठी खूप मोठा प्रवाह शहराकडे येतो. त्यांच्यासाठी त्यांनी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या.
१८ मार्च १९७० ला सिडकोची स्थापना झाली. सहकारी चळवळीला गती मिळाली. नवी मुंबई, नवं औरंगाबाद विकसित झालं. त्यांनी मराठी नाटकांना टॅक्स फ्री केलं. मराठी भाषेला १९६० मधे राजभाषेचा दर्जा मिळाला. झंझावातासारखं त्यांचं कार्य होतं. १९६५ च्या पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांनी राज्यभर स्फूर्तिदायक भाषणं केली.
हेही वाचा : संन्यास घ्यायला निघालेले विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक कसे झाले?
नानासाहेब गोरे त्यांच्या पश्चात पुसदला गेले होते. त्यांनी लगेच सुधाकरराव नाईक यांना गोरेंच्या व्यवस्थेची सूचना केली. त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासही सांगितलं. सूचनेप्रमाणे सर्वच झालं. मृणाल गोरे ह्या पुसदला जाऊन आल्याचं त्यांना नंतर कधीतरी कळलं. ‘ताई, तुम्ही तुमच्या भावाच्या घरी गेलात तरी या भावाला कळवलं नाही.’ असं म्हणून त्यांनी माणुसकी जिंकली. त्यांनी कुठल्याच क्षेत्रात किंवा कुणाशीच द्वेषबुद्धी ठेवली नाही.
त्यांच्या वागण्या-बोलण्यात, त्यांच्या राहणीमानातही एक वेगळा रुबाब होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा संप पुकारला होता. त्यांची वसंतरावांसोबत पहाटेपर्यंत बोलणी झाली. पत्रकारांनी विचारलं ‘काय झालं संपाच्या विषयाचं?’ जॉर्ज म्हणाले, ‘वसंतराव इतकावेळ मला शेती उत्पादन कसं वाढवता येईल या विषयाचं महत्त्व पटवून देत होते.’
मटका हा जुगाराच एक प्रकार. त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी पर्याय म्हणून १२ एप्रिल १९६९ रोजी वसंतरावांच्या कारकीर्दीत ‘महाराष्ट्र राज्य लॉटरी’ सुरू झाली. माध्यमांनी यावर कडाडून टीकाही केली. दारूबंदीसाठीदेखील त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. विनोबांच्या भूदान चळवळीतही त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी ‘जनता शिक्षण प्रसारक मंडळ’ स्थापन केलं.
१९५९ ला त्यांनी फुलसिंग नाईक महाविद्यालय सुरू केलं. तर १९ एप्रिल १९६९ ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयाची सुरवात केली. एवढंच नाही तर तुरुंगातील कैद्यांचाही त्यांनी विचार केला. पैठण इथं १० मे १९६८ रोजी त्यांनी खुलं कारागृह सुरू केलं.
वसंतरावांची जयंती ही ‘कृषिदिन’ म्हणून साजरी केली जाते. २०१५ मधे त्यांच्यावर ‘महानायक वसंत तू’ हा चित्रपटदेखील निघाला. वसंतरावांना कृषी विद्यापिठांचे जनक, विकासाचे महानायक, जलयुक्त शिवार योजनेचे प्रेरणास्थान, ग्रामसडक योजनेची स्फूर्ती अशा अनेक अंगांनी बघता येईल. त्यांचा संघर्ष, त्यांचं कार्य, त्यांची धडपड शेवटपर्यंत सुरूच होती. १८ ऑगस्ट १९७९ ला सिंगापूर इथं त्यांची प्राणज्योज मालावली.
हेही वाचा :
कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी
सुप्रिया सुळेः लढणाऱ्या लेकीची बुलंद कहाणी
अण्णा भाऊंच्या कथेबद्दल आचार्य अत्रे काय म्हणतात?
विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव
'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर
टीम इंडिया निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीमधे का खेळणार?
मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार