संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा

११ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


वि. भि. कोलते यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राला यवतमाळ संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मिळालीय. पण कथित दबावाला बळी पडून उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रणच आयोजकांनी रद्द केलंय. त्यामुळे वि. भि. कोलतेंचा वारसाचं धोक्यात आलाय. व्यवस्थाशरण न जाणाऱ्या कोलते यांच्या बंडखोर वारशावर टाकलेला हा प्रकाश.

यवतमाळला तब्बल ४२ वर्षांनी होत असलेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन नको त्या कारणांनी चर्चेत आहे. या सगळ्या चर्चेमुळे महानुभाव साहित्याचं तत्त्वज्ञान मांडणारे, संतसाहित्याचे अभ्यासक, मराठीचे संवर्धक वि. भि. कोलते यांचा वारसा दुर्लक्षित झालाय. डागाळला गेलाय. काही महिन्यांपूर्वी ललित नियतकालिकात कोलते यांचा वारसा सांगणारा लेख प्रसिद्ध झाला होता. समीक्षक रणधीर शिंदे यांचा त्या लेखाचा हा संपादित अंश.


मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात डॉ. वि. भि. कोलते यांचं खूप मोठं योगदान आहे. महानुभाव साहित्य अभ्यासविद्येला प्रतिष्ठा प्राप्‍त करून देण्यात त्यांचा असामान्य वाटा आहे. कोरीव लेख, संशोधन, पाठचिकित्सा, प्राचीन साहित्य संशोधन, स्वतंत्र साहित्यनिर्मिती आणि समीक्षा या अंगाने त्यांनी लेखन केलं. कोलते यांच्या जन्मशताब्दीला आता दहाएक वर्ष होऊन गेलीत.

कोलते यांच्या कामाची अफाट व्याप्‍ती लक्षात घेता केवळ अंशरूपाने त्यांच्या लेखन आणि जीवनकार्याकडे लक्ष वेधलं गेलंय. अशा प्रकारची कामं करणार्‍या व्यक्‍ती समाजजीवनात दुर्लभच होत. त्यांचा १९६३ मधे आलेला ‘लव्हाळी’ हा कवितासंग्रह आणि ‘सोडचिठ्ठी’ हे नाटक प्रसिद्ध आहे. १९९४ मधे आलेल्या ‘अजुनि चालतोचि वाट’ या त्यांच्या आत्मचरित्राला असाधारण असं महत्त्व आहे.

पंचवीस वर्षांपूर्वीचं सातशे पानी आत्मचरित्र

जवळपास ७०० पानांच्या या आत्मचरित्रात त्यांनी आपला जीवनप्रवास कथन केलाय. ब्रिटीश काळाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाखेरपर्यंतचं महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वाङ्मयीन वाटचालीचं चित्र या आत्मचरित्रात आहे. कोलते यांच्या या आत्मचरित्राची सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे त्यांची तीव्र स्वरूपाची स्मरणबुद्धी. या स्मरणबुद्धीचं आत्मचरित्रात पानोपानी प्रत्ययंतर आहे. स्मरणबांधणीचा एवढा पट मराठी आत्मचरित्रात क्‍वचितच पहायला मिळतो. काळाचा, समाजाचा आणि कोलते यांचा संवेदनस्वभाव फार बारकाव्याने साकारला आहे. जसा वृत्तांत घडला तसा कथन करण्याची कोलते यांची शैली अभिनव अशी आहे.

कोलते यांच्या बालपणापासून ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू ते निवृत्तीपर्यंतच्या कार्यकाळाचे चित्र या आत्मचरित्रात आहे. भवानी शंकर पंडितांचा त्यांनी ‘अभिन्‍नहृदयमित्र’ असा उल्लेख केलाय. या काळातील रोमहर्षक अशा राष्ट्रीय चळवळीचं चित्र आहे. सावरकर व्यक्‍तिमत्त्वाने प्रभावित झाल्याचं चित्र आहे.

अंगठी मोडून शिक्षकांनी कोलते यांचा परीक्षा फॉर्म भरल्याची कृतज्ञतापूर्वक नोंद आहे. भारतीय समाजाच्या जातिग्रस्त आणि अस्मितावादी हितसंबंधाचं चित्रही या आत्मचरित्रात आहे. शासकीय महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या राजकारणाचं चित्र आहे. 

बहुजन दृष्टिकोनाचा प्रभाव

समाजदर्शनाच्या लपलेल्या गोष्टीही उघड केल्या आहेत. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी त्यांचं फार कृतज्ञतादृष्टीचं चित्र आहे. तसंच कोलते यांच्या बहुजन दृष्टिकोनाचाही त्यावर प्रभाव आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, पंढरीनाथ पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारदृष्टीने कोलते प्रभावीत झाले होते.

कोलते यांना एम. ए. ला सुवर्णपदक मिळालं. प्राध्यापक निवडीत झालेलं राजकारण आणि पंजाबराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे कोलते अमरावतीच्या ‘किंग एडवर्ड कॉलेज’ सध्याचं शासकीय कॉलेज इथे मराठीचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. अमरावती, नागपूर कॉलेजमधे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून अनेक कल्पक उपक्रम राबवलं.

कोलते यांच्या महानुभावीय संशोधन कार्याचंही चित्र आहे. १९४४ मधे ‘लीळाचरित्रा’तील झाडीमंडळाचा शोध तसंच महानुभावीय स्थाने, चक्रधराचा वध हा निबंध, महानुभावीय संतांचं अवैदिकत्व, लोकधर्मीत्व कोलते यांनी मांडलं. त्यांच्या या अमूल्य कार्याचं कथन त्यांच्या या आत्मचरित्रात आहे. कोलते अनेक महानुभाव मठांत गेले. महंताना भेटले. पोथ्या, हस्तलिखितं मिळवली. पाठचिकित्सेचा आदर्श नमुना प्रस्थापित केला. सांकेतिक लिपींचं लिप्यंतर केलं.

या काळाचे वर्णन त्यांनी पुढीलप्रमाणे केलंय. ‘माझे घर तर काही वर्षे महानुभाव-मठ बनला होता.’ या महानुभाव अभ्यासाची ‘धून’ त्यांना संपन्न करत आल्याचा अनुभव त्यांनी कथन केलाय.

दुसऱ्या लग्नाची हकीकत

आत्मचरित्रात कोलते यांच्या दुसर्‍या लग्नाची हकीकत आहे. त्या काळातील मानसिक निराशेचं चित्र आहे. कोलते यांच्या दुसर्‍या लग्नाबद्दल प्रबोधनकार ठाकरे यांनी फार टीका केली होती. त्यांनी ‘प्रो. कोलते यांचा ‘स्वैर’विवाह’ नावाचा लेख लिहिला. हा लेख कोल्हापूरच्या ‘सत्यवादी’ नियतकालिकाने १९३६ मधे पुनर्प्रकाशित केला. हा विवाह त्याकाळच्या पुढारपण करणार्‍या लोकांना फारसा आवडलेला नव्हता. मात्र कोलते यांनी त्याबद्दल आणि पहिल्या पत्नीबद्दलही लिहिलं.

कोलते यांना लीळाचरित्रांच्या संपादनासाठी सांप्रदायिक मंडळीकडून त्रास झाला. त्याचीही नोंद या आत्मचरित्रात आहे. त्यामुळे कोलते यांचं आत्मचरित्र हे मराठीतलं एक संपन्‍न, समृद्ध जीवनानुभवाचा ठेवा असणारं आत्मचरित्र आहे.

महानुभाव तत्त्वज्ञानाची रूपरेषा

महानुभाव साहित्य, तत्त्वज्ञान, तसेच चक्रधरस्वामी, गोविंदप्रभू आणि भास्करभट्ट बोरीकर या विषयावर त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिले. १९४५ मधे कोलते यांनी ‘महानुभाव तत्त्वज्ञान’ हा विस्तृत ग्रंथ लिहिला. सांप्रदायिकांचा विश्वास संपादन करून हजारो पानं पालटून गुंतागुंतीच्या पोथ्यातून साधार महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा मांडली.

महानुभाव संप्रदाय साहित्याविषयी लोकांमधे गैरसमज मोठ्या प्रमाणात होते. ते निवळण्यास कोलते यांच्या लेखनाने मोठा हातभार लागला. तसंच ‘महानुभावांचा आचारधर्म’ या विषयावरही त्यांनी एक ग्रंथ लिहिला. चक्रधरांच्या जीवनकार्याचाही त्यांनी साक्षेपी असा वेध घेतला.

परंपरेची चाकोरी सोडून केलेल्या लिखाणाला प्रस्थापित माध्यमं फारसं महत्त्व देत नाहीत. त्यामुळेच की काय कोलते यांचे बरेचसे महानुभावीय ग्रंथ त्यांनी स्वतःच छापले. मलकापूरच्या अरुण प्रकाशनाच्यावतीने त्यांचे बरेचसे ग्रंथ प्रसिद्ध झाले.

चक्रधरकालीन महाराष्ट्राच्या भूगोलचं चित्रण

कोलते यांनी महानुभाव साहित्याची अत्यंत दुर्मिळ पोथ्या, हस्तलिखितं मिळवून साक्षेपी अशी संपादनं केली. यामधे ‘उद्धवगीता’, ‘रूक्मिणी स्वयंवर’, ‘स्थानपोथी’, ‘लीळाचरित्र’, ‘शिशुपालवाध’, ‘श्रीगोविंदप्रभूचरित्र’ आणि ‘वछाहरण’ या ग्रंथांचा समावेश आहे. ही हस्तलिखितं त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतच्या कानाकोपर्‍यातून मिळविली. कामावरची अढळ निष्ठा, संशोधनाबद्दलची खोलवरची आंतरिक इच्छा, वस्तुनिष्ठ दृष्टी, विचारविश्वाबद्दलचा आस्थाभाव यामुळे कोलते यांना अनेक पोथ्या मिळाल्या.

१९७८ मधे त्यांनी प्राचीन महानुभावीय ‘पंचोपाख्यान’ नावाचा ग्रंथ संपादित केला. पंचतंत्रच्या पार्श्वभूमीवर या गद्यलोककथांचे वैशिष्ट्यपूर्ण संपादन केलं. कोलते यांनी ७८ मधेच ‘लीळाचरित्रा’ची संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली. ‘लीळाचरित्रा’चं बहुपेडीत्व सांगून संपादनमागची भूमिका सांगत या ग्रंथाचा परिचय करून दिला. ‘लीळाचरित्रा’चा इतिहास, लेखनकाळ, पिढीपाठाचा नमुना, अनेक प्रती, लीळाचे संकलन व्यवस्थापन, पुनर्लेखन सांगून म्हाइंभट्टाचे चरित्र प्रास्ताविकात दिलं.

चक्रधरांचा भ्रमणकाळ सांगत असताना एका अर्थाने चक्रधरकालीन महाराष्ट्राचा भूगोलच त्यांनी सांगितला. हे सर्व सांगत असताना कोलते अंतरंगाने चक्रधरमय झाल्याचा प्रत्यय येतो. मराठीतल्या सर्वांगसुदर आद्यगद्य चरित्रग्रंथाची ऐतिहासिक थोरवी सांगण्याचं काम कोलते यांनी केलंय. अशा प्रकारे ९३६ पानांचा सज्जड ग्रंथ एकहाती संपादन करणं ही दुर्मिळ बाब आहे. महानुभाव साहित्यात येणार्‍या काही स्थळाची आणि शब्दरूपाची चिकित्साही त्यांनी केली. ‘महानुभाव संशोधन - खंड २’ या ग्रंथात ती समाविष्ट आहे. 

मराठी संतवाङ्मयाचा नवा अन्वयार्थ

कोलते यांची संतसाहित्य आणि आधुनिक साहित्याची समीक्षा नवी मर्मदृष्टी देणारी आहे. १९५१ मधे त्यांनी वाराणसी इथे मराठी संतांच्या सामाजिक दृष्टीबद्दल पाच व्याख्यानं दिली. १९५४ मधे ती हिंदीतून प्रसिद्ध झाली. या ग्रंथास हजारीप्रसाद द्विवेदी यांची प्रस्तावना आहे. या ग्रंथामुळे हेमाद्रीकडे बघण्याची दृष्टी बदलली, असं द्विवेदींनी म्हटलंय. ‘मराठी संतांचे सामाजिक कार्य’ या नावाने मराठीत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

‘मराठीच्या एका पुत्राची राष्ट्रभाषेला एक लहानशी भेट’ या कृतज्ञतेने कोलते यांनी ही भाषणं दिली. महात्मा चक्रधर, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदासांवरील ही व्याख्यानं आहेत. त्या काळात बहुतांशपणे प्राचीन वाङ्मयाकडे धर्म आणि भक्‍ती जाणिवेच्या दृष्टीने पाहिलं जात होतं. कोलते यांनी मात्र धर्म हा लोकजीवनाचा अभिन्‍न भाग मानून संतकवितेचं पुनर्वाचन केलं. संतांच्या जीवनकार्याचं ऐतिहासिक मूल्यमापन त्यामधे आहे.

मराठी समाजव्यवस्था, प्रभुत्व वर्गसंबंध आणि संतपरंपरा यासंबंधीचा नवा विचार मांडला. वैदिक अवैदिक, ब्राह्मणी अब्राह्मणी विचारांतला सुप्‍त संघर्षाचा विचार या विवेचनात केंद्रस्थानी आहे. संतांच्या विवेचनातली परंपरानिष्ठता, वर्णाभिमान, ब्राह्मणी परिप्रेक्ष्य यासंबंधीची स्पष्ट आणि परखड भूमिका आहे. हिंदूधर्मातर्गंत सामाजिक जीवनातील संघर्षभूमी हा या कालपटाचा दर्शनफलक आहे. त्याधारे त्यांनी संतवाङ्मयाचा परामर्श घेतला.

चक्रधर बहुजनांचे धार्मिक नेते

श्रीचक्रधर हे महाराष्ट्राचे आद्यसंत असून मराठी संस्कृती आणि साहित्याला विशिष्ठत्व देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. जीवाचे हृदयपरिवर्तन आणि बहुजनांचे धार्मिक नेते असं ते चक्रधरांचा उल्लेख करतात. वारकरी पंथाच्या प्रवर्तकत्वाचा मान ते नामदेवांना देतात. पुरोहितांची मध्यस्थी नाहीशी करण्यासाठी संतांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला असं त्यांना वाटतं.

कोलते यांच्या या दृष्टीवर ब्राह्मणेतर दृष्टीचा मोठा प्रभाव आहे. ‘केवळ जातिवर्चस्वाचे हे उदाहरण अठराव्या शतकाच्या अंतिम काळाची विशेषतः होती’ या रानडे प्रणित विचारपरंपरेचा धागा कोलते यांच्या विचारांना आहे. परंतु कोलते यांनी जो विचार मांडला त्या वाटेवरून मराठी संतकवितेचे वाचन या दृष्टीने अजूनही फारसं झालेलं नाही.

महात्मा रावण पुस्तिकेने खळबळ

वि. भि. कोलते यांनी १९४९ मधे ‘महात्मा रावण’ असा एक वेगळा लेख लिहिला. पुढे तो पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झाला. राम, सीता, रावण या पुराकथेचा आर्यअनार्य संघर्षभूमीत शोध घेतला. वाल्मिकीच्या रामायणावर संशय व्यक्‍त करून राज्यकर्तव्य आणि राज्यावरील आक्रमण प्रतिक्रियेतून रावण सीताहरणाकडे वळल्याचं सूचवलं. वाल्मिकीने जाणीवपूर्वक हा भाग टाळून रामाची ‘कीर्तिवान प्रतिमा’ रेखाटली गेलीय. वस्तुतः रावण हा स्त्रीवर्गाचा संरक्षक आणि आदर्श होता, अशी मांडणी कोलते यांनी केली.

जीवनवादी विचार आणि वाङ्मयीन कलात्मकतेचे समन्वय असणारी समीक्षा कोलते यांनी लिहिली. ही समीक्षा ‘साहित्यसंचार’ या संग्रहात आहे. १९३० ते ३७ या काळात हे लेख लिहिले. काव्य, कथात्मसाहित्य आणि नाट्य या प्रकारांवर त्यांची समीक्षा आहे. लेख वा परीक्षणं असं त्याचं स्वरूप आहे. विसाव्या शतकाच्या आरंभकाळातलं मराठी साहित्य आणि मराठी समाज वाङ्मयाभिरूचीच्या दृष्टीने या संग्रहातलं लेखन महत्त्वाचं आहे.

१९५४ मधे दिल्ली मराठी साहित्य संमेलनात त्यांनी वाचलेला अर्वाचीन कवितेवरचा लेख तितकाच महत्त्वाचा आहे. या लेखात त्यांनी रविकिरण मंडळानंतरच्या कवितेबद्दल एक निरीक्षण नोंदवलंय.

ते म्हणतात, ‘तांब्यांच्या पासून घेतलेले प्रणयाचे सूर कंटाळा येईपर्यंत हे कवी पुनःपुन्हा आळवीत राहिले. त्यात ते इतके बुडून गेले की ‘स्व’काळातील परिस्थितीचे त्यांना फारसे भान राहिलेले दिसत नाही.’ तसंच नाटक आणि मराठी अभिरूची निर्मिती बद्दल सांगताना त्यांनी म्हटलं, की, मराठी नाटकातील मध्यमवर्गीय चित्रणाऐवजी साधारण जनतेच्या दैनंदिन जीवनातील प्रसंग चित्रण करणारी नाटकं यावीत.

अनुनासिक उच्चार वगळण्यात महत्त्वाची भूमिका

मराठी भाषा हा कोलते यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. मराठीचं संरक्षण, संवर्धन आणि संगोपन म्हणून कोलते यांनी जाणीवपूर्वक व्यक्‍तिगत तसंच प्रशासक म्हणून धोरणात्मक स्वरूपाचे प्रयत्न केले. चक्रधरप्रणित ‘महाराष्ट्री असावे’ या ब्रीदाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्याप्रमाणे कुलगुरू म्हणून त्यांनी मराठी भाषाविकासाठी प्रयत्न केले. १९६८ चा नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ हा संपूर्णपणे मराठीत घेतला. ‘मराठीच्या अस्मितेचा शोध’ या ग्रंथात त्यांचे मराठी भाषाविषयक लेख समाविष्ट आहेत. राष्ट्रभाषेच्या आक्रमणाची सततची निरीक्षणे त्यांच्या लेखनात आहेत.

मराठीतले अनुनासिक उच्चार काढून टाकण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोलते यांनी १९५१ मधे ‘अनुच्यारित अनुस्वरांना अर्धचंद्र’ या विषयावर एका वर्षात चार लेख लिहिले. त्यांनी काही लेख इंग्रजीतही लिहिले. ताम्रपटाचं वाचन आणि शिलालेखाचंही वाचन केलं. ‘हेमाद्रीचा हृदयद्रावक खून’ या विषयावर लेख लिहिला. कोलते यांच्या अभ्यास केवळ वाङ्मयीन स्वरूपाचा नव्हता. त्याला धर्मेतिहास, समाजतिहास, मूर्तिशास्त्र आणि संस्कृतितेहासाची जोड आहे.

लीळाचरित्रावर बंदीने मनस्ताप

कोलते यांनी व्रतस्थपणे केलेल्या संशोधनासंदर्भात त्यांना त्रासही सहन करावा लागला. एका प्रक्षिप्‍त लीळेच्या समावेशामुळे सांप्रदायिक मंडळींनी न्यायालयात धाव घेतली. या सांस्कृतिक, धार्मिक राजकारणाला राज्यसंस्थाही शरण गेली. आयुष्यभर ज्या माणसाने निरलसपणे महानुभावीय संशोधनाचे काम केले, त्या कोलते यांच्या लीळाचरित्रावर बंदी आणली गेली. याचा त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला.

१९९० नंतरच्या दरम्यान ते सुरेश डोळके यांच्या महानुभाव साहित्यावरील ग्रंथप्रकाशनात कोलते यांनी जे भाषण केले त्यात त्यांनी चक्रधरांचा वध झाला असं साधार विधान केलं होते. त्यांचा वृत्तांत त्यावर्षी १३ ऑगस्टच्या ‘तरुण भारत’मधे छापून आला. त्यातून या वादाला सुरवात झाली. त्यांच्यावर खटले दाखल केले. निषेध सभा झाल्या.

भारतीय श्रद्धाविश्वाला बळी पडलेलं समाजमन आणि छुप्या व्यक्‍तिगत स्वार्थाचं दर्शन त्या घटनेत पहायला मिळतं. चक्रधरांच्या अवयवच्छेदाची लीळा सांप्रदायिकांना मान्य नव्हती. त्याबद्दल श्रीक्षेत्र जाळीचे इथे निषेधाची धर्मसभा घेतली गेली. श्रद्धावान भाविक दैवतपुरुषांना शेंदूर फासतात आणि त्यात काही विद्वानांची साथ लाभते. या घटनेसंबंधी मनोरंजक वृत्तांत १९९१ मधे धनंजय वर्मा संपादित ‘विचारमंथन’ या पुस्तिकेत पहायला मिळतो. तसंच यामागे लीळाचरित्रनिर्मिती आणि कोलते यांच्या मान्यतेचा छुपा आकसही होता.

आजच्या उथळपणात कोलतेंचं दिशादर्शन महत्त्वाचं

एकंदरित कोलते यांच्या कार्याला आणि संशोधनाला मराठी समाज आणि संस्कृतिइतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. एकतर अखंड आणि निरंतर स्वरूपाच्या ज्ञानलालसेचं रूप त्यांच्या कार्यात होतं. छाती दडपून जावा असा त्यांच्या कामाचा पसारा आहे. मराठीचे प्राध्यापक आणि कुलगुरू म्हणून भाषा संस्कृती आणि प्रशासक म्हणून वेगळा असा ठसा उमटवला. ज्ञानपरंपरेत अलीकडे बोकाळत असलेल्या आधारहीन अस्मितावादी उथळ लेखनाच्या पार्श्वभूमीवर कोलते यांनी आपल्या व्यासंगी शास्त्रीय दृष्टिकोणातून निश्‍चित विचारांचं सुस्पष्ट अशा दिशांचं अधोरेखन केलं.

प्राचीन साहित्य संशोधनाला नवी दिशा दिली. मराठीतली आद्य धर्मसुधारणावादी चळवळ, त्या पंथाचं कार्यस्वरूप, वाङ्मयनिश्‍चिती, तत्त्वज्ञान वाटचाल आणि वैशिष्ट्यपूर्णता याचा सर्वांगीण वेध घेतला. त्यात मराठी समाज, संस्कृतीचं भानही अनुस्यूत आहे. महानुभावीय साहित्य संशोधनाला नवे परिमाण दिले.

कोलते यांनी केलेल्या संकलन संपादनामुळे या महानुभाव संशोधनाच्या दिशा बदलल्या. या संशोधनास खास असा विचारदृष्टीचा संदर्भ दिला. आर्य अनार्य अभिजन विचारसंघर्षाची नवी भूमी प्राप्‍त करून दिली. त्यामुळे मराठी समाज संस्कृतीला कोलते यांचं योगदान हा या समाजविचारविश्वाचा महत्तम ठेवा आहे. कोलते यांनी पाठचिकित्सा, संपादन, साहित्यसमीक्षा, संशोधन आणि भाषा अशा अनेकविध स्तरावरून मराठीमधे मौलिक स्वरूपाची भर घातलीय. आंतरविद्याशाखीय अभ्यासाची जोड, भूमिसातत्याचे आणि ज्ञानविचारावरच्या अढळ निष्ठेचं उदाहरण कोलते यांच्या जीवनवृत्तांत आढळतं. 

एकदा डॉ. वि. भि. कोलते दिग्रस जवळच्या दुर्गम भागातल्या नदीकिनारी एका मठात विद्वान महानुभाव महंत श्री. भालापेकरांना भेटायला गेले. भालापेकरांना कोलते भेटायला आल्याचा अतीव आनंद झाला. कोलते यांना मिठी मारून ते म्हणाले, ‘भाऊसाहेब, किती सुंदर पुस्तके लिहिलीत आपण. आम्हा महानुभावांवर आपले फार उपकार आहेत. आपले महानुभाव तत्त्वज्ञान तर मी नित्यनेमाने वाचतो. झोपतानाही माझ्या उशाजवळ ठेवतो. एवढे ते मला प्रिय आहे.’ या उद‍्गारातील कोलते यांच्या विचारकार्याचं स्मरण नव्या पिढीने कृतज्ञतापूर्वक करायला हवं.

 

(लेखक हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)