चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

०७ मार्च २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधे विधानसभेच्या निवडणुका कोरोनाच्या दरम्यान होतायत. पुद्दूचेरी या केंद्रशासित प्रदेशातही निवडणुका आहेत. या राज्यांमधे भाजपचा विशेष प्रभाव नव्हता. पण आसाममधे भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून गेल्या निवडणुकीत पुढे आला होता. तामिळनाडूमधे जयललितांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा विचार सत्ताधारी झाला होता.

पश्चिम बंगालमधे भाजपला विस्तारण्याची संधी गेल्या निवडणुकीत मिळाली होती. एकमेव केरळ राज्यात भाजपला फार विस्तारण्याची संधी नव्हती. थोडक्यात, केरळ वगळता आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या तीनही राज्यांमधे भाजपने आघाडीचं राजकारण करून सत्ताधारी होण्यासाठी डावपेच आखलेत.

या तीनही राज्यांमधे भाजपच्या पुढे आघाडी हाच महत्त्वाचा प्रयोग दिसतोय. तर चारही राज्यांमधे त्या राज्यांचं म्हणून स्थानिक राजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच या चारही राज्यांमधे तिथला स्थानिक दृष्टिकोन राजकारणावर प्रचंड प्रभाव टाकतो.

सीएए एनआरसीला आदिवासींचा विरोध

आसाममधे आसामियत हा दृष्टिकोन प्रचंड प्रभावशाली आहे. पण गेल्या निवडणुकीपासून हा दृष्टिकोन दुबळा होत चाललेलाय. गेल्या निवडणुकीत आसाममधले प्रादेशिक पक्ष भाजपच्या बाजूने झुकलेले होते. आसाम गण परिषद, बोडोलॉड पीपल्स फ्रंट, रभा जातीय ऐक्य मंच, तिवा जातीय ऐक्य मंच यांचा समावेश आहे.

या निवडणुकीच्या तोंडावर मात्र एनआरसी आणि सीएए या दोन्ही कायद्यांना स्थानिक आदिवासींचा विरोध दिसतोय. स्थानिक आदिवासींमधे सगळ्यात मोठी लोकसंख्या बोडो आदिवासींची आहे. एकूण आदिवासी समाज १३ टक्के आहे. मुस्लिम समाज ३५ टक्क्यांच्या जवळपास आहे. ख्रिश्चन समाज ४ टक्क्यांच्या जवळपास आहे. हिंदू आयडेंटिटी व्यक्त करणारा समूह ६१ टक्क्यांच्या जवळपास आहे.

हेही वाचा : पुद्दूचेरी हा दक्षिण भारतातला काँग्रेसचा एकमेव गड कोसळला, त्याची कारणं

बेरजेचं राजकारण काँग्रेससाठी धोक्याचं

काँग्रेसच्या पुढे मुख्य दोन आव्हानं आहेत. एक आघाडीचं प्रारूप विकसित करण्याचं आणि दुसरं आव्हान हिंदू आणि हिंदुत्व या दोन ओळखीत अचूकपणे फरक करून हिंदू मतदारांना काँग्रेसकडे वळवणं. काँग्रेस पक्षाने ही दृष्टी फार विकसित केलेली नाही. काँग्रेस पक्ष फक्त बेरजेचं राजकारण करत गेला तर काँग्रेसला प्रचंड मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागेल.

आसामप्रमाणे पश्चिम बंगालमधे काँग्रेसच्या पुढे हिंदू आणि हिंदुत्व या दोन ओळखीत फरक करण्याचं मोठं आव्हान आहे. काँग्रेसने युती कोणाशी करावी हासुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस आजही ताकद बाळगून आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या सत्तेची स्पर्धा सरळ सरळ तृणमूल काँग्रेस विरोधी भाजप अशीच होणार आहे.

पश्चिम बंगालमधल्या सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेस आणि डावे पक्ष तिसर्‍या चौथ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच आक्रमकता - प्रदेशवाद आणि आक्रमकता - हिंदुत्व या चौकटीत मुख्य सत्ता स्पर्धा आहे. या दोन्ही चौकटींना बाजूला ठेवून तिसरी चौकट प्रत्यक्षात आणायची क्षमता मात्र पश्चिम बंगालमधल्या राजकारणात सध्या दिसत नाही.

तामिळनाडूत सत्तास्पर्धेच्या बाहेर काँग्रेस

तामिळनाडूचं राजकारण सातत्याने दोन गटांत विभागलेलं राहिलंय. त्या दोन्ही गटांचे मुख्य नेते आज काळाच्या पडद्याआड गेलेत. पण नवीन नेत्यांचा उदय झालेला आहे. एम स्टॅलिन यांचा द्रमुक आणि पलानीस्वामी यांचा अण्णाद्रमुक असे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत आहेत.

काँग्रेस पक्ष स्टॅलिन यांच्या द्रमुकबरोबर जुळवून घेतोय. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४१ जागा लढवून फक्त आठ जागा जिंकल्या होत्या. यामुळे सध्या जागावाटपात एम स्टॅलिन यांनी काँग्रेसला फक्त २४ जागा देण्याचा आग्रह धरलेला आहे. काँग्रेस पक्षाने  या राज्यात आपली कुवत घटवलेली दिसते. म्हणजेच काँग्रेस पक्ष या राज्यात सत्ता स्पर्धेच्या बाहेर आहे.

हेही वाचा : देशद्रोहाचा खटला दाखल करणारं टूलकिट प्रकरण आहे काय? 

जयललितांच्या हिंदुत्वाचा फायदा भाजपला?

तामिळनाडूमध्ये हिंदुत्वाची मुख्य ताकद अण्णा द्रमुक या पक्षात आहे. जयललितांच्या नंतर या पक्षात वेगवेगळे गट उदयाला आले. शशिकला यांनी अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम या पक्षाची स्थापना केली. तर अण्णाद्रमुकवर पालानीस्वामी आणि पन्नेरसेल्वम यांचा दावा आहे. जयललिता यांच्या हिंदुत्वातून काही ताकद मिळवण्याचा प्रयत्न भाजपने केलाय.

भाजपने जयललिता यांचं हिंदुत्व आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू केलेत. यामुळे त्यांचं हिंदुत्व या निवडणुकीत तीन गटांमधे विभागलंय. हिंदुत्वाचं तीन गटांमधे विभाजन करून मुख्य हिंदुत्वाचा दावा भाजपला करायचा आहे.

हिंदुत्व अधिक विकास या चौकटीत भाजप तामिळनाडूतली एक महत्त्वाची शक्ती होण्याचा प्रयत्न करतंय. पण यात सुरवातीचा टप्पा म्हणून एम स्टॅलिन आणि भाजपचे डावपेच यांच्यात खरी विधानसभा निवडणुकीची सत्तास्पर्धा आहे.

फक्त भाजपचं वर्चस्व नाही

केरळमधे मुख्य सत्तास्पर्धा डावे पक्ष विरोधी काँग्रेस अशी आहे. डावे पक्ष केरळच्या राजकारणात प्रभावी आहेत. काँग्रेस पक्षासाठी इथं आघाडी तयार करणं मोठं आव्हान आहे. आसामप्रमाणे केरळमधेही काँग्रेसच्या पुढे हिंदू आणि हिंदुत्व असा फरक करण्याचं आव्हान आहे. म्हणजेच थोडक्यात आसाम आणि केरळ या दोन राज्यांमधे काँग्रेस पक्षाला कामगिरी करायची संधी आहे.

आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या तीन राज्यात भाजपला प्रगती करायची संधी आहे. डाव्या पक्षांना फक्त केरळमधे पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. म्हणजे थोडक्यात एकूण राजकारणाचा पट ८२४ जागांसाठी एकसंध स्वरूपाचा नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं या चार राज्यातल्या निवडणुकांचं चित्र दिसत नाही.

भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे मुसंडी मारता येऊ शकते. पश्चिम बंगालमधे मात्र भाजपविरोधी तृणमूल काँग्रेस अशी सरळ सत्तास्पर्धा आहे.

हेही वाचा : 

पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?

मुंबईच्या वीज पुरवठ्या आड येतोय चीनचाच घोडा?

सैन्य मागे घेऊन भारत आणि चीनने काय कमावलं, काय गमावलं?

तयार होण्याआधीच का संपवण्यात येतेय पुतीन यांची गॅस पाईपलाईन?