विद्रोहातून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं

०५ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : १५ मिनिटं


वर्धा जिल्ह्यात १७ वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतंय. पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून विद्रोहीच्या मंचावरून रोखठोक भूमिका मांडलीय. संतांची विद्रोही परंपरा, सध्याचं संशय आणि भीतीचं वातावरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी परखड भाष्य केलंय, शिवाय आयोजकांनाही काही मोलाचे सल्ले दिलेत. त्यांच्या या भाषणाच संपादित अंश.

सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचं कारण नाही. घोषित नसली तरी अघोषित आणीबाणी तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनवलं जातंय. वातावरणात परस्पर अविश्वास आणि जाती-जातीत, धर्माधर्मात ‘भया’चं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी सरकारी पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात आहे, हा यातला सर्वात दुर्दैवी भाग आहे.

हेही वाचाः वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण

भ्रमित होण्याचा काळ

नुकताच घडून आलेला ऊर्फी जावेदच्या कपड्यावरूनचा वाद. आता ती केवळ ‘जावेद’ आहे म्हणूनच तो वाद उकरून काढला गेला की काय असंही वाटतं. कारण त्याच दरम्यान कंगना राणावत, अमृता फडणवीस यांच्या तोकड्या कपड्यांचं दर्शन सोशल मीडियानं घडवून आणलं. त्याआधी मिलिंद सोमण, मधू सप्रे यांच्या वस्त्रविहीन दर्शनाची आठवणही सोशल मीडियाने करून दिली. तात्पर्य एवढंच की, सप्रे-सोमण यांनी नंगाडपणा केला तरीही ‘हिंदू राष्ट्रात’ खपवून घेतला जाईल. पण ऊर्फी जावेदचा कदापि नाही, असा संदेश देण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे.

कधी कपडे, कधी टिकली, कधी ‘पठाण’ सिनेमातला ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या वेळी दीपिका पदुकोण या नटीने घातलेले कपडे यातही बहिष्कार दीपिका पदुकोणचा नाही तर शाहरुख खानचा. श्रद्धाचे तुकडे तुकडे करणारा मुस्लीम, मशिदीत शिवलिंग सापडल्याचे प्रकार, लव जिहाद, हिजाब, भोंगे, हनुमान चालिसा याला झणझणीत हिंदुत्वाची फोडणी आणि ‘हिंदू खतरे में है’च्या सातत्याने चोहोबाजूकडून उठवण्यात येणार्‍या आरोळ्या हिंदूंची घटती आणि मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा तर हिंदूंना प्रचंड भयभीत करून सोडणारा मुद्दा.

याच मुद्यावर संसाराशी आणि प्रजननाशी संबंध नसलेलं साधू-साध्वींचं हिंदू स्त्रियांना पोरांची पैदास वाढवण्याचं मार्गदर्शन म्हणजे एकूणच स्त्री म्हणजे पोरं पैदा करण्याची ‘मशीन’ आणि पुरुष म्हणजे त्या मशीनवर ‘काम’ करणारा कामगार. एकूणच ‘भ्रमित करावे सकळ जन’चा रेशीमबाग पुरस्कृत कार्यक्रम जोरात सुरू आहे.

धर्मांतरं का झालीत?

साडेआठशे वर्ष या देशावर मुस्लिमांनी राज्य केलं आणि नंतरची १५० वर्ष ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ख्रिश्र्चनांनी या देशावर राज्य करूनही या देशातला बहुसंख्य हिंदू हिंदूच राहिला. तो अल्पसंख्याक झाला नाही. या हजार वर्षांत या राजवटी निव्वळ गोट्या खेळत होत्या, म्हणून हिंदू बहुसंख्य राहिले? पण, आता ‘हिंदुत्ववाद्यां’च्या राज्यात मात्र हिंदू अल्पसंख्य होण्याची भीती? खरा इतिहास वेगळाच आहे. मुस्लिमांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून धर्मांतर कमी झालं. याउलट हिंदू धर्मातल्या वर्णवर्चस्ववादाला आणि अतिरेकी वर्णश्रेष्ठत्वाच्या जाचाला कंटाळून धर्मांतर जास्त झालं.

‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकात महात्मा जोतिबा फुले म्हणतात, पुढे काही काळाने जेव्हा जहाँमर्द मुस्लीम लोकांचे या देशात राज्य झाले तेव्हा अज्ञानी शूद्रादी अतिशूद्र पवित्र कुराणातील सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागलीत. ब्राह्मणी धर्माच्या जाचाला कंटाळलेल्या हीन, शूद्र जातीतील असंख्य लोकांनी इस्लाम धर्माचा अंगीकार केला होता. आर्य चाहता हॅवेल हिंदूंच्या या धर्मांतराबद्दल म्हणतो, खालच्या वर्गात धर्मांतर फारच लवकर होत असे. विशेषतः ब्राह्मणांचे स्पृशास्पृश्यतेचे नियम ज्यांना जाचक होते ते फारच जलद स्वधर्म सोडीत असत. धर्मांतराने शूद्र वर्गाच्या शृंखला तोडल्या जाऊन त्याला ब्राह्मणांच्या बरोबरीचे स्थान मिळण्याची संधी निर्माण करून दिली. ( महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य-लेखक- बा. रं. सुंठणकर. पान नं. ५२ चौथी आवृत्ती )

संशय आणि भीतीचं वातावरण

जीवसृष्टीचा पसारा प्रजनन, पोषण आणि संरक्षण या तीन मुख्य प्रेरणांभोवती फिरत असतो. आपली वंशवृद्धी व्हावी, तिचं पोषण व्हावं, संरक्षण व्हावं यातही पोषणाचा आणि संरक्षणाचा मुद्दा वर-खाली होत राहतो. सर्वसाधारण परिस्थिती असेल तर पोषणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. पण परिस्थिती सर्वसामान्य नसेल, वातावरण असुरक्षित असेल, भयग्रस्त असेल तर पोषणाचा मुद्दा गौण ठरून संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

उदा. मी तीन-चार दिवसांचा उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही. चौथ्या दिवशी माझ्यासमोर अन्नाचं ताट आहे आणि पोटात सडकून भूक आहे. मी ताटावर बसतो, तेवढ्यात शेजारी आग आग म्हणून गलका ऐकू येतो. मी भरल्या ताटावरून तहान-भूक विसरून उठतो. इथं पोषणापेक्षा, भयापोटी संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा बनतो. सध्या अशाच धोरणाचा अवलंब राष्ट्रीय स्तरावर ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणारं आणि मिरवणारं सरकार करताना दिसत आहे. ‘भीती मुसलमानांची बाळगा. त्यांच्या वतीने  केल्या जाणार्‍या लव जिहादची बाळगा. हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे त्याची बाळगा. शेजारच्या मुस्लीम राष्ट्राची भीती बाळगा.‘  घरात हे मुस्लीम घुसून आपल्या मुलीबाळींवर अत्याचार करतील, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी घरात कायम धारदार शस्त्र बाळगा, असा सल्ला तर विद्यमान भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर रोज देतात.

अशाप्रकारे संशयाचं आणि भयाचं वातावरण देशात तयार केलं की, लोक आपसूकच पोषणाचे मुद्दे विसरून जातात. मग बेरोजगारीचा प्रश्र राहात नाही. महागाई लोकांना छळत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भावांमधील वाढ लोकांना त्रास देत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची चर्चाही मग होत नाही. २०१६ मधे नॅशनल क्राइम ब्यूरोने शेतकर्‍यांच्या आत्महत्येची आकडेवारी देणं बंद केलं. म्हणजे आत्महत्या थांबवण्याचा इतका साधा सोपा-उपाय आधीच्याही राजवटीला सूचला नाही, असंच म्हणायचं ना? पूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली की, देशाची किंमत घसरायची. आता मात्र ती किंमत न घसरता जगभरात भारताची किंमत वाढत आहे. असा ‘प्रपोगंडा’ आपल्याला सहजपणे गंडवून जातो.

हेही वाचाः नयनतारा सहगलः फुले, आंबेडकरांच्या रांगड्या वारशाचा अपमान

गांधी-विनोबांची भूमीत सनातनी वरचढ

हे विद्रोही साहित्य संमेलन आहे. विद्रोही या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरुद्ध लढा’ उभारणारे असा आहे. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापणा केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं त्यावेळी सत्य त्याला आव्हान देतं. असत्य हे दमनासाठी वापरलं जाणारं विखारी साधन आहे. सत्यानं असत्याला ललकारण, आव्हान देणं म्हणजे विद्रोह.

साहित्यिकांकडून सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या विद्रोहाची समाजाला अपेक्षा असते. पण, दुर्दैवाने काही अपवाद वगळता साहित्यिकही सरकारच्या ताटाखालचं मांजर होत आहेत की काय, अशी शंका यायला लागते. यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आलं होतं. पण, त्यांच्या इ-मेलवर सरकारविरोधी भाषणामुळे सरकारने साहित्यिक संस्थांवर दबाव टाकून त्यांचं निमंत्रणच रद्द करवून टाकलं आणि आयोजक संस्थांनी सरकारी अनुदानानं ‘भारभूत’ होत हा अपमान ‘सन्मानाने’ गिळंकृत केला. साहित्य क्षेत्रातली ही अभूतपूर्व अशी घटना होती. आता अशा घटना अपवादात्मक राहिल्या नाहीत.

यासंदर्भात ताजी घटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे वर्धा इथं सुरू आहे त्याच्या अध्यक्षपदावरून झालेला गदारोळ. एखादा लेखक सावरकर आणि गांधी यांच्या विचारांची चिकित्सा करणारं एखादं विधान भाषणात उच्चारतो आणि केवळ त्यामुळे त्या साहित्यिकाचे नाव वर्धेच्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी घेऊ नका, असा आदेश मंत्रालयातून येतो, अशा वर्तमानपत्रात बातम्या येतात. यावरून आज या प्रस्थापित साहित्य संस्थाही कशा दहशतीच्या वातावरणात काम करत आहेत, हे लक्षात येतं. विशेष म्हणजे वर्धा ही गांधी-विनोबांची भूमी आणि तिथं गांधींच्या विचारांना सनातन्यांचा विरोध आजही होणं ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.

सरकारी अनुदानाच्या दबावाखाली साहित्यिक संस्था ‘लाचार’ झाल्या आहेत की काय, अशीही शंका यायला लागली आहे. स्वायत्त संस्थांमधला सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि या हस्तक्षेपाविरोधात आवाज न उठवता ‘शरणागती’ पत्करण्याची संख्याही सध्या वाढीला लागली आहे. हा लोकशाहीच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेचा विषय आहे.

संतांच्या विद्रोहाची दखल घ्यावीच लागेल

विद्रोहाचा भला मोठा आवाज झाला म्हणजेच ‘विद्रोह’ ही व्याख्या पुरेशी नाही. बर्‍याच वेळा विद्रोहाचं बियाणं जमिनीत पडतं. स्वतःचं टरफल विसर्जित करतं आणि शांतपणे जमिनीची छाती फाडून अंकुरतं. हाही विद्रोहच आहे, असं मी मानतो. बर्‍याच वेळा या शांतपणे झालेल्या विद्रोहाची ‘डाव्यां’नी विनाकारण  उपेक्षा केली आहे, असं मला वाटतं.

चार्वाक, बुद्ध, महावीर, चक्रधरस्वामी, बसवेश्वर ही विद्रोहाची परंपरा मानली तर या विद्रोही परंपरेत संतांच्या विद्रोही परंपरेचीही दखल आपल्याला घ्यावीच लागेल. भक्तिपंथापूर्वीच्या काळात महाराष्ट्रात अनेक समूह नांदत होते; पण समाज नव्हता. महात्मा फुले यांच्या भाषेत म्हणायचं झाल्यास, ‘एकमय लोक’ नव्हते. इथं वेगवेगळी दैवतं, वेगवेगळ्या उपासनापद्धती, वेगवेगळे खेळ आणि वेळ घालवण्याची साधनं होती. या भूभागावर राहणार्‍या सर्वांना एकत्र आणील, असं काही नव्हतं.

भक्तिसंप्रदायांनी या वेगवेगळ्या समूहांना एकत्र आणून एक समाज निर्माण करण्याचं कार्य केलं. भक्तिपंथाच्या संतांचं साहित्य हे आध्यात्मिक लोकशाहीचं साहित्य आहे. हे साहित्य म्हणजे समता, बंधुता आणि आध्यात्मिकता यांची ग्वाही देतं. या साहित्याने समाजाला मातृभाषेविषयी, मराठी भाषेविषयी अस्मिता दिली. संतांच्या या साहित्यामुळे साहित्य हे ब्राह्मण, शूद्र अशा कोणत्याही एका समूहाचं न राहता ते मराठी साहित्य झालं.

विद्रोह करणारे संत साहित्यिक

संत साहित्याने निर्माण केलेले आध्यात्मिक आदर्श आणि ध्येय यांच्या एकात्मतेचा परिणाम म्हणून समाजाचे भौतिक आदर्श ध्येय आणि भाषा यांचीही एकात्मता झाली. म्हणून भक्तिपंथांच्या संतांनी केवळ साहित्य निर्माण केलं असं नाही, तर महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी ‘राष्ट्र‘ बनवलं. महात्मा फुलेंच्या भाषेत ‘एकमय लोक’ बनवलं. भारतीय संस्कृत पंडितांनी आणि भट भिक्षुकांनी ज्ञान हे संस्कृत भाषेतूनच व्यक्त होऊ शकतं, अशा बथ्थड समजुतीला बळी पडून मराठी मायबोलीच्या असंख्य खेडुतांना अज्ञानात खितपत पडू दिलं होतं.

तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी संस्कृत पांडित्याच्या पुरातन आणि अतिप्रतिष्ठा पावलेल्या प्रथेविरुद्ध पहिलं प्रभावी बंड पुकारलं आणि सर्व संस्कृतातल्या कडी कुलुपात बंदिस्त ज्ञानभंडार मराठी भाषेत खुलं केलं. संस्कृत ऐवजी मराठीचा उपयोग हा काही संस्कृत भाषेविरुद्धचा ज्ञानेश्वरांचा पवित्रा नव्हता तर संस्कृतवर मालकी हक्क प्रस्थापित केलेल्या मूठभर पंडितांविरुद्धचा तो विद्रोह होता. त्याचा परिणाम तेराव्या शतकापासून तर सतराव्या शतकापर्यंत घडून आलेला दिसतो.

पहिल्यांदा इतिहासात वेगवेगळ्या जाती-जमातीचे संत लिहिते आणि बोलते झाले. नामदेव शिंपी असेल, चोखामेळा महार असेल, सावता माळी असेल, गोरोबा कुंभार असेल, नरहरी सोनार असेल, संत जनाबाई, एकनाथ महाराज असतील आणि शेवटी तुकाराम महाराज. ही वेगवेगळ्या जाती-जमातीतल्या संतांची मांदियाळी तयार होण्याचं कारण ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील ज्ञानभंडार मराठी भाषेत आणलं, याला आहे हे विसरता येणार नाही. दुर्दैवाचा भाग एवढाच की, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यांच्या हयातीतच आई-वडिलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारे ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर छळणारे ब्राह्मणेतर होते हेही तेवढंच दुःखद आहे.

हेही वाचाः लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

समाजवाद्यांचं असंही धोरण

संतांच्या भक्तीच्या मार्गातल्या समतेमुळे का होईना सनातन्यांना आवरक्ताची हगवण सुरू झाली हे समजण्यासारखं आहे. पण, समतावादी म्हणवणार्‍या समाजवाद्यांच्याही पोटात का दुखायला लागलं, हे समजायला मार्ग नाही. सनातन्यांनी संत चळवळीला लावलेली संताळे, टाळकुटे ही विशेषणं समाजवाद्यांनी जशीच्या तशी लावावी, याचं आश्चर्य वाटतं.

संत तुकारामांच्या बाबतीत एकच अभंग ‘ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ हा वारंवार सांगून दाहक आणि कृतिशील संत तुकारामाला अडगळीत पेटीत टाकताना मी प्रत्यक्षपणे थोर समाजवाद्यांना सामाजिक क्षेत्रात अनुभवलं.

परिवर्तनाचा पुरस्कार करणारे जर परंपरेच्या विरोधात राहिले तर पुष्कळदा त्याचा फायदा परंपरेमधल्या परिवर्तन विरोधकांना, विषमतावाद्यांना मिळतो. हे परिवर्तन विरोधक परंपरेवर कब्जा करतात आणि तिला परिवर्तनाच्या विरोधात राबवतात हे आपण आज प्रत्यक्ष अनुभवतो आहे.

संतांची समतेची दिशा

हेमाडपंत हा त्या काळातल्या ब्राह्मण्याचं प्रतीक. ३६५ दिवसांसाठी या पंडिताने दोन हजार आचारमार्ग दिले आहेत. हेमाडपंताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ ग्रंथाची ओळ न ओळ कर्मकांडांनी भरलेली. या पुरोहितवर्गाने सर्वसामान्य जनतेला पूर्णपणे विळख्यात घेतलेलं. चक्रधरस्वामी थोर क्रांतिदर्श संत. त्यांनी माणसामाणसात भेद उत्पन्न करणार्‍या सर्व प्रथांना विरोध केला. स्त्री-पुरुष आणि ब्राह्मण-चांडाळ सर्वांना समान वागणूक दिली. अशा थोर महान संतांची हत्या, हेमाद्रीसारख्या हिंदू धर्मशास्त्री आचार्याने करवली.

तेराव्या शतकातल्या सर्वात श्रेष्ठ मानल्या गेलेल्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथाच्या लेखकाने चक्रधरस्वामींचा महानुभाव पंथ आणि बसवेश्वराच्या लिंगायत पंथाने पुरोहितशाहीला केलेल्या प्रत्यक्ष विरोधामुळे या दोन्ही पंथांना प्रस्थापितांच्या कठोर विरोधाचा सामना करावा लागला. यातून बोध घेत वारकरी पंथाने आपल्या रणनीतीला ‘खुबसुरत’ मोड दिला. वेदांवर टीका नाही पण ‘नामवेद’ हाच श्रेष्ठ. मंत्रातंत्रावर, कर्मकांडावर टीका नाही पण ‘नाममंत्र’च महत्त्वाचा.

देव कर्मकांडाचा भुकेला नसून, तो केवळ भावाचा भुकेला आहे. तो केवळ नामस्मरणाने प्रसन्न होतो आणि नामस्मरणाला ना देवाची मूर्ती लागत आणि ना त्याची पूजा. तुम्ही दैनंदिन काम करतानाही देवाचं नाव घेऊ शकता. त्यास काहीही लागत नाही. देवही लागत नाही, पुजारीही नाही. आणि पुजारीच नाही म्हटल्यावर त्याची ‘दक्षिणा’ही नाही. त्यामुळे वारकरी पंथाने ‘ब्राह्मणशाही’च्या पाठीवर न मारता डायरेक्ट ‘पोटावर’च पाय दिला. म्हणून त्याची परिणामकारकता आणि दीर्घकालिनता जास्त राहिली. वेदांवर काही टीका न करता तुकाराम महाराज असं म्हणत असतील की, ‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा, येर्‍यांनी वाहावा भार माथा’ यातला ‘विद्रोह’ आवाज करत नसला तरी परिणाम मात्र मोठा साधतो.

चार वर्णांच्या निर्मितीची कथा मोठी रोचक आहे. ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि पायांमधून शूद्र. चार वर्णातली श्रेष्ठ-कनिष्ठता, असमानता दर्शवण्यासाठीच अशाप्रकारे ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या अवयवांना जन्मस्थळ म्हणून निवडलं गेलं. हे तर स्पष्ट आहे. पण, त्याकडे फारसं न बघता तुकाराम महाराज म्हणतात, अखेर सर्वांचा जन्मदाता एकच असेल तर माणसामाणसांमधे भेद कसा? वीण तर सर्वांची एकच ना? होय ती समतेची दिशा आहे.

हिंदुत्ववाद खरडला की, ब्राह्मणवाद दिसतो

समतेचा मुद्दा जेव्हा जेव्हा समोर येतो, तेव्हा तेव्हा हिंदू उच्चवर्णीयांना पोटदुखी सुरू होते. हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्याच हिंदू बांधवांवर हजारो वर्ष केलेल्या अन्याय-अत्याचारावर पडदा टाकण्यासाठी सातत्याने हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घातलं जातं. मी, माझी जात आणि माझं जन्मजात वर्णश्रेष्ठत्व म्हणजेच राष्ट्र असं मानणार्‍यांचा राष्ट्रवाद सध्या जोरात आणि जोमात आहे. हा राष्ट्रवाद थोडा खरडला तर त्याखाली हिंदुत्ववाद दिसतो आणि हा हिंदुत्ववाद थोडा खरडला की, त्याखाली ब्राह्मणवाद दिसायला लागतो.

सध्या या राष्ट्रवादाच्या विरोधात बोलणार्‍याला देशद्रोही ठरवलं जातं. खरंतर हिंदुत्ववादी हा हिंदूच असत नाही. गाय आणि गायीच्या अंगावरचं गोचीड. गोचिडाच्या अंगातही गायीचं रक्त आहे, म्हणून गोचीड जसा गाय होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांच्या अंगात हिंदूचं रक्त आहे म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही. दुर्दैवाने गोचिडाला मारण्यासाठी जी जी काठी उगारली गेली ती गायीच्या पाठीवर बसत गेली आणि आज परिणास्वरूपी गायच खाटिकधार्जिणी होऊन बसली.

औरंगजेब हिंदूद्वेष्टा कसा होता, हे ठसवण्यासाठी औरंगजेबाने हिंदूंवर ‘जिझिया’ कर कसा लावला होता हे उच्चरवाने सांगितलं जातं. पण, हा ‘जिझिया’ कर ब्राह्मणांवर नव्हता, ही गोष्ट लपवली जाते. औरंगजेब ब्राह्मणांना हिंदू समजत नव्हता की काय? हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाहीत, या विधानाला ‘जिझिया’ करातून ब्राह्मणांना वगळून औरंगजेब पुष्टीच तर देत नाही ना? औरंगजेबासाठी ब्रह्मवृंदांनी दुवा मागितल्याचे दाखले आहेत.

ब्राह्मणांनी आपल्या निष्ठा खाविंदचरणी अर्पण केल्या होत्या. औरंगजेबाच्या वतीने मिर्झा राजे शिवाजी महाराजांवर म्हणजेच स्वराज्यावर चाल करून जातो तेव्हा शिवाजी महाराजांविरुद्ध मिर्झा राजेंना जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी कोट चंडियज्ञ केला होता, हे तर सर्वविदित आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसुद्धा महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी नाकारला होता. हेही जगजाहीर आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन औरंगजेबाने ब्राह्मणांना ‘जिझिया’ करातून सवलत दिली असेल?

हेही वाचाः आपल्याला कोणता आणि कसा हिंदू धर्म हवाय?

फाळणीचे खरे नायक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ ला येवला इथं ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू सनातनी कर्मठ धर्ममार्तंडाच्या वागणुकीत काही बदल होतो का, म्हणून तब्बल २० वर्ष वाट पाहिली आणि १९५६ मधे हिंदू धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लाखोंच्या संख्येनं हिंदूंची संख्या कमी झाली ती मुसलमानांचा अन्याय, अत्याचारामुळे नाही तर हिंदुत्वाच्या जन्मजात वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनेने दलितांवर केलेल्या छळामुळे आणि खापर फोडतात मुस्लिमांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे म्हणून!

पाकिस्तान निर्मितीचे जनक मोहंमद अली जिना आहेत, असं म्हटलं जातं. गांधींनाही फाळणीसाठी जबाबदार धरण्याचा खटाटोप हिंदुत्ववाद्यांकडून वारंवार केला जातो. पण, प्रश्नाच्या मुळाशी गेलं तर आढळून येईल की, यासाठी जबाबदार खर्‍या अर्थाने सनातनी ‘हिंदुत्ववादी’च आहेत. जिना मूळचे हिंदू लोहाना समाजाचे. त्यांच्या वडलांचा मासेमारीचा व्यवसाय. लोहाना समाजात मासेमारीचा व्यवसाय निषिद्ध. म्हणून कर्मठ सनातनी हिंदुत्वाद्यांनी त्यांचा छळ केला. याच छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी धर्मांतर केलं. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला.

अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या निर्मितीच्या जनकाला जन्म दिला असेल तर आपल्याच हिंदू बांधवांना धर्माच्या नावाखाली छळणार्‍या कर्मठ सनातनी हिंदुत्ववाद्यांनी. पण हे आपलं पाप झाकण्यासाठी वारंवार मुस्लिमांचा आधार घेत असतात, हेही तेवढंच खरं. दुर्दैवाने खरा इतिहास लिहिल्या गेलाच नाही.

काश्मिरी पंडितांच्या स्थितीला जबाबदार कोण?

काश्मीर प्रश्न नेहरूंनी निर्माण केला, अशा खोट्यानाट्या पावत्या आजही नेहरूंच्या नावाने हिंदुत्ववादी फाडत असतात. काश्मिरी पंडितांवर मुस्लिमांनी केलेल्या भीषण अन्याय-अत्याचाराचं अतिरंजित चित्रण ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमात केलं आहे. मुस्लीम द्वेषावर आधारित या सिनेमाचं ‘प्रमोशन’ खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केलं. अशा प्रकारच्या सिनेमाचे प्रमोशन करण्याचा ‘पायंडा’ या देशात प्रधानमंत्र्यांनी पाडला.

सरसंघचालक मोहन भागवत मागे राहण्याची शक्यता कमीच होती. त्यांनीही या सिनेमाचं प्रमोशन केलं. प्रेक्षकांना हा सिनेमा फुकटात दाखवण्याची चढाओढ भाजपा कार्यकर्त्यांमधे सुरू होती. या सिनेमाने करोडोचा धंदा केला आणि मुस्लीम द्वेषाचं भरघोस पीक या माध्यमातून घेतलं गेलं. जे भाजपाला भविष्यात ‘राजकीय’ फायदा करून देईल. पण या विषयाची एक दुसरीही बाजू आहे.

हरिसिंग काश्मीरचे राजे होते तेव्हा मोठ्या संख्येनी हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेल्या मुस्लिमांनी त्यांना हिंदू धर्मात परत घेण्याची विनंती केली. हरिसिंगांनी त्यांना सांगितलं, ‘हा प्रश्न धर्मक्षेत्रातला असल्यामुळे यावर निर्णय काश्मीरी पंडित घेतील.’ निर्णयासाठी हा प्रश्न काश्मिरी पंडितांकडे सोपवण्यात आला. पण काश्मिरी पंडितांनी या प्रश्नापासून हात झटकत या प्रश्नावर केवळ काशीचे पंडितच निर्णय देऊ शकतात, असा निवाडा दिला. काशीच्या पंडितांनी त्या धर्मांतरित मुस्लिमांना हिंदू धर्मात घ्यायला नकार दिला. आता हिंदूंची लोकसंख्या कमी होण्याला जबाबदार कोण? हिंदू धर्माचे धर्ममार्तंड की मुस्लीम?

त्यांनी फेकावं, आम्ही झेलावं

इतिहास घडवण्याची ‘औकात’ हिंदुत्ववाद्यांमधे कधीच नव्हती; पण इतिहासाची मोडतोड करून जनतेसमोर सादर करण्याची क्षमता मात्र दांडगी होती आणि आजही आहे.आणि आज तर राज्यसत्ताही त्यांच्या ताब्यात आहे. इतिहासकार त्र्यं. शि. शेजवलकर हे तसे हिंदुत्ववादीच. पण त्यांच्या मते, 'संशोधक ब्राह्मण, इतिहास लेखक आणि विवेचक ब्राह्मण, संपादक ब्राह्मण, व्याख्याते ब्राह्मण, शिक्षक ब्राह्मण चळवळी त्यांनी काढल्या आणि या सर्वांचे श्रोते, वाचक आणि अनुयायी तेही ब्राह्मण!'

या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की, ब्राह्मणांची कर्तबगारी अगदी गागाभट्टांपासून तर गोळवलकरांपर्यंत अशाप्रकारे फुगवण्यात, सोज्वळ करण्यात, चुकीची आणि म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी जास्त कोशीश करण्यात आली. इतिहासकार शेजवलकरांच्या या मताच्या प्रकाशात मग इतिहास तपासायला गेलो तर अनेक गोष्टी स्पष्ट दिसायला लागतील. पण, पाहायला कोणाला वेळ आहे? त्यांनी फेकत जावं आणि आम्ही झेलतं जावं असचं प्रामुख्याने होत राहिलं आणि आता तर देशाच्या सर्वोच्चपदीच फेकू आहे आणि त्याच्या ‘फेकण्या’मागे राज्यसत्तेचं बळ. मग तर फेकण्याचा वेग बघायची सोय नाही.

हेही वाचाः दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारी संस्थाः धि गोवा हिंदू असोसिएशन

देशांतर्गत विभाजन सुरूय

मी आयुष्यभर काँग्रेसविरोधक राहिलो. काँग्रेस बहुतांश काळ प्रस्थापित सत्तेत होती. म्हणूनही कदाचित काँग्रेसच्या विरोधी राहिलो. सत्तेचा विरोध ही माझी स्वाभाविक प्रेरणाच होती की काय मला माहिती नाही. सत्तेचा विरोध, सत्तेविरुद्ध आंदोलन, त्यामुळे स्वाभाविकपणे तुरुंगवास, वेगवेगळ्या कारणांसाठी गुन्हे दाखल. त्यामुळे त्या कारणांसाठी कोर्टाचे नियमितपणे तारखेवर खेटे घेणं क्रमप्राप्त होतं.

आणीबाणीच्या विरोधात याच वर्धेच्या तुरुंगात वर्षाचा तुरुंगवास भोगला. एवढं सगळं होऊनही काँग्रेसच्या राजवटीत कोणी मला चुकूनही ‘देशद्रोही’ म्हटलं नाही. काँग्रेसच्या विरोधात का बोलता? का लिहिता म्हणून कोणी टोचलं नाही, टोकलं नाही. आता तर विद्यमान भाजप  सरकार विरोधात लिहितो, बोलतो तेव्हा मोठ्या प्रमाणात ‘ट्रोल’ केलं जातं. तेही फार सुसंस्कृत भाषेमधे. देशद्रोह्यांमध्ये तर माझी गणना होतेच. त्याचही आता फारसं अप्रूप वाटत नाही.

काँग्रेसच्या काळात काँग्रेसने स्वायत्त संस्था बर्‍यापैकी अबाधित ठेवल्या होत्या. या देशाच्या पंतप्रधानाविरोधात, इंदिरा गांधीविरोधात अलाहाबादच्या उच्च न्यायालयात निर्णय दिला जातो. हे केवळ काँग्रेसच्याच काळात घडू शकत होतं, हे आज जाणवतं. या विद्यमान पंतप्रधानाच्या विरोधात एखादं न्यायालय निर्णय देईल याची सुतराम शक्यता वाटत नाही. तसं जर काही होण्याची शक्यता निर्माण झाली तर त्याचा न्यायमूर्ती लोया कसा केला जातो, याचं पुराव्यासह वर्णन पत्रकार निरंजन टकले यांनी आपल्या ‘हू किल्ड लोया?’मध्ये केलं आहे. हा पत्रकारही किती काळ जिवंत राहू शकतो हेही आता शहंन’शहा’च्याच हातात अशी आजची अवस्था आहे.

काँग्रेसच्या काळात शेषनसारखा खमक्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होण्याची शक्यता होती. आता असा शेषन तयार होण्याआधीच कोणत्या का कारणाने होईना तुरुंगामधे जाईल आणि वर्ष दोन वर्ष त्याची जमानतही होणार नाही. विरोधकांच्या बाबतीत इतकं टोकाचं, सुडाचं राजकारण आधीच्या सत्तेने केलं नाही. सत्तेच्या माध्यमातून चालणारी न्यायदानाची प्रोसेस हीच आज पनिशमेंट म्हणून उघड्या नागड्या पद्धतीने काम करत आहे.

सत्ताधारी पक्ष आज एकप्रकारे वॉशिंग मशीनचं काम करत आहे. त्यांच्यासोबत असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ!  त्याच्याबाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि त्यांच्या विरोधात जालं तर ‘देशद्रोही’!  भाजपा म्हणजे ‘हिंदुस्थान’ आणि विरोधक म्हणजे डायरेक्ट ‘पाकिस्तान’. अशाप्रकारे बटबटीत पद्धतीने देशांतर्गत विभाजन सुरू आहे. काळ तर कठीण आहेच. आणि म्हणूनच ‘विद्रोही’ संमेलनासोबत राहून विद्रोहाचीही गरज आहे.

धननिर्माता निर्धन का?

कसाबला फाशी दिली गेली तेव्हा सार्‍या देशाने आनंद व्यक्त केला. पण, या देशातल्या सरकारच्या ‘कसाब’नीतीमुळे शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, याबाबत फारसं दुःख या देशातल्या जनतेला आहे असं वाटतं नाही. तसं तर या देशात सगळेच प्रश्न संपल्याचा आभास निर्माण केला जात आहे. प्रश्नांचे मढे झाकून ठेवून खुळखुळ्यांनी लक्ष वेधून घेतल्याने प्रश्न संपत नसतात. हे ‘अच्छे दिन’वाल्या सरकारला कोणी समजावून सांगावं?

२०१६ नंतर सरकारने ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’मार्फत देण्यात येणारी शेतकरी आत्महत्येची आकडेवारी देणं थांबवलं म्हणून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या, असंही होत नाही. फक्त त्या प्रश्नांची तीव्रता त्यामुळे जाणवत नाही एवढंच. डॉ. पंजाबराव देशमुख शेतकर्‍यांना ‘धननिर्माता’ म्हणायचं आणि सातत्याने प्रश्न विचारायचे, ‘धननिर्माता निर्धन का? आणि धननिर्माताच कर्जबाजारी का?’ आपण या प्रश्नाचे ना कधी मूळ समजावून घेतलं ना त्यातली मेख.

मोदी सरकारने कोरोनाचा कहर सुरू असताना शेतकरी ‘कल्याणा’साठी तीन अध्यादेश घाईगर्दीने काढले. या अध्यादेशातल्या करार शेतीचं समर्थन करताना सरकार म्हणालं होतं, ‘शेतकर्‍यांजवळ शेती आहे, पण भांडवल नाही आणि कंपन्यांकडे भांडवल आहे पण शेती नाही.’ या विधानानंतर परत प्रश्न पडतो; पण मुळात शेतकर्‍यांकडे भांडवलचं का नाही? हा प्रश्न आपल्याला पडतही नाही आणि पडूही दिल्या जात नाही. आणि समजा प्रश्न पडण्याची किंचितही शक्यता निर्माण होणार असेल तर तो प्रश्नच पाताळात गाडण्याची योग्य ती दक्षता घेतली जाते.

पुरातन काळात बळीराजाला पाताळात गाडण्याची कथा आहे. आधुनिक काळात बळीराजाऐवजी बळीराजाचे प्रश्नही पाताळात गाडल्या जाण्याची तजवीज केली जाते, एवढाच काय तो फरक. असाच पाताळात गाडल्या गेलेल्या प्रश्नांपैकी डॉ. भाऊसाहेबांनी विचारलेला प्रश्न आहे आणि तो म्हणजे, ‘धननिर्माता निर्धन का?’ किंवा ‘ज्या शेतीतच भांडवल तयार होतं तिथेचं भांडवलाचा अभाव का?’

शेतकरी ‘कल्याणा’ची केवळ भाषा

शेतीत गुणाकार होतो. एका दाण्याचे हजार दाणे, मूठभराचे मणभर किंवा मणभर दाण्याचे टनभर करण्याची क्षमता शेतीत आहे. त्यामुळे भांडवल तिथं असायला हवं होतं, दिसायला हवं होतं. पण, तिथं ते दिसत नाही आणि असतही नाही. असं का होतं? हा प्रश्न खरं तर पडायला हवा होता. पण हा प्रश्न पडतही नाही आणि पडूही दिल्या जात नाही आणि यदाकदाचित पडलाच तर त्याला उत्तर ठरलेले आहेत. शेतकरीे आळशी आहे, व्यसनी आहे, दारू पितो, अडाणी आहे इत्यादी इत्यादी, आता अशा शेतकर्‍यांकडे पैसा कसा राहणार?

धन निर्माण करणारा शेतकरी त्याचे धन दारूतच उडवीत असेल, त्याचा आळशीपणा आणि त्यातही त्याच्या अडाणी आणि मू्र्खपणामुळे त्याने तयार केलेलं धन त्याला राखता येत नसेल आणि तो निर्धन होत असेल तर आपण तरी काय करणार असा साळसूद पवित्रा घेऊन ‘धननिर्माता निर्धन का?’ या प्रश्नाची बोळवण या व्यवस्थेनं आतापर्यंत केली आहे. अजूनही करताहेत.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक शेतकरी ‘कल्याणा’चीच भाषा झाली. पण त्याचं कल्याण तर सोडाच, अकल्याणच जास्त झालं. शेतीत खरं तर पेरलं तेच उगवतं. टमाटे पेरले तर वांगं येत नाही. मोगर्‍याची कलम लावली तर त्याला धोतर्‍याची फुलं येत नाही. त्याच शेतीत पेरणी कल्याणाची होते आणि शेतकर्‍यांच्या अकल्याणाचेच पीक भरघोस येतं. पेरणी शेतकर्‍यांच्या ‘आबादी’ची आणि पीक शेतकर्‍यांच्या ‘बरबादी’चं.

शेतकरी ‘जगण्या’साठीची पेरणी आणि भरघोस पीक शेतकर्‍याच्या ‘मरण्या’चं. असं घडतं कसं? शेवटी एकूणच डॉ. पंजाबराव देशमुखांनी त्या काळात विचारलेला प्रश्न ‘धननिर्माता निर्धन का?’ हा प्रश्न आजही तेवढाच प्रस्तुत आहे. स्वातंत्र्यानंतर गोरगरिबांच्या कल्याणासाठी एवढा खटाटोप केल्याचं सांगितलं जातं, पण त्यांचं भलं न होता त्यांचं वाईटच होतं. आणि भलं मात्र काही मूठभर लोकांचंच होतं. त्यातही अदानी-अंबानीचेच कोट-कोट कल्याण होतं. हा काय चमत्कार आहे. कोण्या शायरच्या या ओळी आहेत माहिती नाही. तो विचारतो,

‘देखकर फसल अंधेरो की
आप हैरत में क्यू हो
तुमने अपने खेतो में
उजाले बोये ही कहाँ थे?

हेही वाचाः यवतमाळ साहित्य संमेलनः आता बहिष्काराचाही निषेध वायरल

विद्रोही संमेलनाची खरी  फलश्रुती

सध्याची लढाई अशा विचारधारेशी आणि अशा विचारधारेच्या संघटनेशी आहे की, ज्याचा स्वतःचा असा आखाड्यात उतरवण्यासाठी पैलवानच नाही. म्हणून ते आपल्याला आपल्यातच लढवतात. महात्मा गांधींविरुद्ध महात्मा फुले, गांधींविरुद्ध आंबेडकर, गांधींविरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधींविरुद्ध भगतसिंग, नेहरूंविरुद्ध पटेल अशा लढाया त्यांनी लावल्या आहेत. आपणही त्यांच्या या कुटील डावाला बळी पडून टाळ्याही पिटल्या आहेत.

या विषमतावाद्यांचा कोणताही नेता त्यांच्या संघटनेशिवाय जनमाणसांमधे मोठा होऊ शकत नाही. स्वतःची जात आणि त्या जातीचे हितसंबंध, त्या जातीचं जन्मजात वर्णश्रेष्ठत्व यापलीकडे ज्यांची ‘करुणा’च पोचत नाही, ते काय खाक मोठे होणार? त्यांना असंघटनेच्या अंतर्गत कितीही प. पू. म्हटलं तरीही. म्हणून मग ते आपल्याच लोकशाहीवादी, समतावादी नेत्यांचं अपहरण करतात.

स्वामी विवेकानंदांचं असचं अपहरण केलं. त्यांनी भगवे कपडे परिधान केले असल्यामुळे त्यांनाही ते सोपं गेलं आणि आम्ही त्या अपहरणाला हातभार लावला. पण, आता दत्तप्रसाद दाभोळकरांनी खरा विवेकानंद समजावून सांगितला तेव्हा तो त्यांचा नाहीच हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. आज दत्तप्रसाद दाभोळकरांना त्यांनी विवेकानंदांच्या बाबतीत सत्यकथन केलं म्हणून  पोलिस संरक्षणात जगावं लागतं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनाही याच मंडळींनी ‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ म्हणून ‘हिंदुत्वाच्या’ तुरुंगात डांबून ठेवलं होतं. मुस्लिमांच्या विरोधात त्यांचा यथेच्छ वापर करून घेतला. त्यांची ‘हिंदुत्वा’च्या तुरुंगातून गोविंद पानसरेंनी सुटका केली. या पापाची शिक्षा म्हणून पानसरेंची हत्या झाली. आता राहता राहिले सावरकर. पण, त्यांनी सावरकरांच्या कितीही महिमा गायल्या तरीही त्यांच्याबाबत उपलब्ध असलेले पुरावे त्यांचा हा खोटा महिमा काळवंडून टाकणारच आहे. त्या भरोशावर त्यांची उतमाज सुरू आहे. सर्व स्वायत्त संस्था, प्रसारमाध्यमं त्यांनी वेठीस धरली आहेत. अशा वेळेसच खर्‍या अर्थाने ‘विद्रोहा’ची गरच असते.

सत्ताधार्‍यांच्या असत्य प्रस्थापित करण्याला ललकारण, आव्हान देणं, प्रश्न विचारण्याची आता खरी गरज आहे. ते प्रश्नांची ‘नाकेबंदी’ करतील. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून प्रश्नांची ‘नसबंदी’ही करतील. या अन्यायाविरोधात यापुढे प्रखर असा लढा उभारावा लागेल. तोच खरा विद्रोह असेल आणि विद्रोही संमेलनाची फलश्रुतीही.

'देव' कल्पनेतली ताकद

ज्ञानेश्वरांची एक ओवी अशाच आशयाची आहे. संत गाडगेबाबा पंढरपूरला जायचे; पण कधी मंदिरात गेले नाही. तुमच्या देवावर कुत्रं टांग करून मुतते असं जाहीरपणे ते म्हणायचे आणि लोकही ते ऐकून घ्यायचे. कारण गाडगेबाबांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ ही टॅग लाईन धरून ठेवली होती. समाजातून देव रिटायर्ड करायला निघालेल्या डॉ. श्रीराम लागूंना आपल्या घरातले देव रिटायर्ड करता आले नाहीत.

समाजातले देव रिटायर्ड करण्याची गोष्ट तर खूप दूरची. समाजात माझी बर्‍यापैकी ओळख आहे. ज्या कॉलनीत मी राहतो तिथंही बर्‍यापैकी लोक ओळखतात. तरीही एखाद वेळेला पाच-दहा गुंड माणसं मला सडकेवर खेचून मारतायत हे पाहून कॉलनीतील माणसं माझ्या बचावासाठी धावून येतील, याची खात्री मला नाही.

त्याच कॉलनीतल्या एका झाडाखाली दगडाला शेंदूर फासलेला देव आहे. त्या देवाची कोणी विटंबना करतो आहे, हे दिसताच त्या कॉलनीतली तीच माणसं विटंबना करणार्‍याच्या अंगावर धावून जातील, याची मला खात्री आहे आणि हीच ‘देव’ या कल्पनेतली ताकद आहे. हे ओळखून रणनीती आखण्यात आपण कमी पडलो की काय असंही वाटतं.

परस्परांवर प्रेम हासुद्धा विद्रोह

कोणत्याही देशात जा. देश प्रगत वा अप्रगत असू द्या. मागासलेला वा पुढारलेला असू द्या. साक्षर-निरक्षर असू द्या. त्या देशातल्या राष्ट्रध्वजाबद्दल म्हणा, ‘या फडक्याने मी माझ्या घराची फरशी पुसतो.’ तुम्ही कोणत्याही देशात असा तुमचा मुडदा पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे शेंदूर फासलेल्या दगडाला दगड म्हणून चालत नाही. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहिरातीत, कार्यक्रमात ‘आम्ही कोणत्याही देवा धर्माच्या विरोधात नाही’ या वाक्यानेच सुरवात करावी लागते. यातलं गमक ‘विद्रोही’ म्हणवणार्‍यांनी वेळीच ओळखलेलं बरं, असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं.

गाडगे महाराजांनी कठोरपणे देवावर टीका केली असेल. पंढरपुरात जाऊन ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरातही गेले नसतील. पण, तिथं येणार्‍या वारकर्‍याला ‘कशाला इथं येतोस मरायला?’ असं कधी म्हणाले नाही. त्याची त्या गर्दीतली गैरसोय बघून, निवार्‍याला जागा नाही बघून त्यांनी त्यांच्यासाठी करुणेतून धर्मशाळा बांधली. विद्रोहातून, क्रांतीतून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं याचही भान ‘विद्रोही’नी बाळगलं पाहिजे.

द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं हासुद्धा विद्रोह ठरू शकतो, याची मला जाणीव आहे. माणसा-माणसांनी दंगलीत केलेल्या परस्परांच्या कत्तलीतून झालेल्या रक्तमांसाच्या चिखलातूनच कमळ चांगला फुलतो, याची कमळीवाल्यांना चांगलीच जाणीव आहे आणि द्वेषाच्या वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विषाणूचं पोषण होतं, याची कल्पना रेशीमबागेतल्या भागमभाग करणार्‍याला आहे. त्यामुळे त्या विषाणूंना पोषक ठरणार्‍या द्वेषाला दूर सारत प्रेमाचा अंगीकार करणं, हाच सध्याच्या काळातला ‘विद्रोह’ ठरणार आहे, याची मला खात्री आहे.

हेही वाचाः 

सुवार्ता दिब्रिटोंची अन् पत्थरांचा मारा सनातन

दीपिकाच्या मौनातही जय हिंदचा नारा घुमतो!

आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

सिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो!