दबंग बृजभूषण यांच्याविरोधातल्या कुस्तीचं काय होणार?

२१ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना चितपट करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट आता कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांसोबतच कुस्ती खेळतेय. कुस्ती महासंघांचे अध्यक्ष असलेले बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत, बाबरी मशिद प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, खुनाचा प्रयत्न, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप झालेत. आता त्यांच्यावर विनेश हिनं लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. ही कुस्ती विनेशला जिंकता येईल?

राज ठाकरे अयोध्येला निघाले होते, तेव्हा त्यांचा अयोध्या दौरा रोखणारे उत्तर प्रदेशातल्या केसरगंजचे भाजप खासदार बृजभूषण सिंह आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पुन्हा एकदा असं लिहिण्याचं कारण म्हणजे आरोप आणि त्यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी नवीन नाही. याआधीही खोटी शपथपत्रं देण्यापासून बाबरी पाडण्यापर्यंत आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनपासून सरकारी अधिकाऱ्याला पळवण्यापर्यंतचे अनेक आरोप त्यांच्यावर लागलेले आहेत.

आता हे बृजभूषण भारतीय कुस्ती महासंघांचे अध्यक्षही आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं केला आहे. तिच्या समर्थनार्थ देशातल्या प्रसिद्ध कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन केलं आणि त्यांना पदावरून काढण्याची जोरदार मागणी केली. पण समिती नेमून चौकशी करण्याची सरकारी परंपरा राखून, आंदोलन दाबण्यात आलंय.

विनेश फोगाटचं नक्की म्हणणं काय?

पुरुष प्रशिक्षकांकडून महिला खेळाडूंना आणि महिला प्रशिक्षकांना त्रास दिला जात आहे. तसंच जे फेडरेशनच्या मर्जीतले प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडून महिला प्रशिक्षकांशी गैरवर्तनही केलं गेलं आहे. त्यांनी महिला खेळाडुंचं लैंगिक शोषण केलं आहे, खुद्द फेडरेशनच्या अध्यक्षांनीच अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे, असा आरोप कुस्तीपटू विनेश फोगाटनं केलाय.

कुस्ती फेडरेशन आपल्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत असून यावरुन आम्हाला त्रास दिला जात असून छळही केला जात आहे. आम्ही ज्यावेळी ऑलिम्पिकमधे गेले होतो तेव्हा आम्हाला फिजिओथेरपिस्ट आणि कोचही दिला गेला नाही. त्यावेळेपासून आम्ही आवाज उठवत आहोत. यानंतर आम्हाला धमक्याही दिल्या गेल्या आहेत, असंही तिचं म्हणणं आहे.

नुकत्याच सप्टेंबर २०२२ मधे बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमधे विनेश फोगाट हिने ब्राँझपदक जिंकलं. प्रतिष्ठेच्या स्पर्धेमधे दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. यावेळीही तिनं देशातल्या क्रीडाक्षेत्रातल्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, ‘आम्ही खेळाडू आहोत, रोबोट नाहीत. इतर देशांमधे अशा पद्धतीने काम करून घेतलं जात नाही.’

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

बृजभूषण ऐकायला तयारच नाहीत

विनेश फोगाट हिनं केलेल्या आरोपानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. बजरंग पुनिया, रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंदर किन्हा आणि कॉमनवेल्थ पदक विजेता सुमित मलिक यांच्यासह ३० कुस्तीपटू बृजभूषण यांच्याविरोधात जंतरमंतर इथं जमले. क्रीडामंत्र्यांनीही याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

पण, दुसरीकडे बृजभूषण सिंह यांनी आपल्याविरुद्ध हे कारस्थान रचण्यात आलं असून आपण राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नसल्याचं म्हटलंय. त्यांनी उलट दावा केला आहे की, कुस्तीत सर्वोत्तम कामगिरी ही २२ ते २८ या वयादरम्यान करू शकता. जे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत ते ऑलिम्पिक पदक जिंकू शकत नाहीत. त्यामुळे ते रागात आहेत म्हणून ते आंदोलन करत आहेत.

बृजभूषण यांचं वक्तव्य विरोधाभास निर्माण करणारं आहे. कारण दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन केलेल्या ३० कुस्तीपटूंमधे टोकियो ओलिम्पिक कांस्य पकदविजेता बजरंग पुनिया, रिओ ऑलिम्पिक पकद विजेती साक्षी मलिक आणि दोनवेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणारी विनेश फोगाट हिचाही समावेश आहे. त्यामुळे एवढं बेसिकही माहित नसलेल्या बृजभूषण यांना अध्यक्षपदी राहण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न विचारला जातोय.

आधी लावला टाडा, मग क्लीन चिट

सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिलेल्या बृजभूषण सिंह हे सध्या भाजपचे खासदार आहेत. गेल्या १९ वर्षांपासून ते कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष असून, देशभर ते आपल्या दबंग कारवायांसाठी ओळखले जातात. मध्यंतरी त्यांनी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रोखला होता. त्यानंतर ते महाराष्ट्राला परिचित झाले. मात्र बृजभूषण सिंहांनी यापेक्षाही अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनादेखील आपला निर्णय मागे घ्यायला लावला होता.

हा किस्सा आहे २००४ मधला. त्यावेळच्या मुख्यमंत्री मायावती यांनी गोंडा जिल्ह्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उघड उघड विरोध केला होता. ब्रृजभूषण सिंह हे हजारो लोकांसह रस्त्यावर उतरले. कडवा विरोध पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

बृजभूषण हे कट्टर रामभक्त आहेत. ते राम मंदिर आंदोलनातला एक प्रमुख चेहरा आहेत. बाबरी मशिद वादग्रस्त ढाचा विध्वंसप्रकरणी लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंह, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ४० जणांना अटक करण्यात आलं होतं. त्यात बजभूषण यांचंही नाव होतं. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०२० मधे दोषमुक्त करण्यात आलं.

टाडा लागलेले बृजभूषण सिंह यांचे संबंध अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचे आरोप झाले होते. त्यांना या प्रकरणी टाडाही लागला होता. दाऊद इब्राहिमचा मेवणा इब्राहिम कसकरची हत्या करणार्‍या अरुण गवळी गँगमधल्या शूटर शैलेश हळदणकर आणि विबीन यांची हत्या करणाऱ्या शार्पशूटर्सना आश्रय दिल्याचाही बृजभूषण यांच्यावर आरोप होता. मात्र, सीबीआय तपासात बृजभूषण यांना क्लीन चिट देण्यात आली.

हेही वाचा: प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले

सहा वेळा खासदार आणि चार गुन्हे

स्वतः कुस्तीपटू असलेल्या बृजभूषण सिंह हे १९९१ मधे पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकले. त्यानंतर त्यांनी १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मधे वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघांतून निवडणूक जिंकली. त्यांनी भाजप आणि समाजवादी पक्षाकडूनही निवडणूक लढवली आहे. ते २०११ मधे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले. त्यांचा तिसरा कार्यकाळ आता संपतो आहे.

बृजभूषण यांनी २०१९ मधे लोकसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्यावर चार गुन्हे नोंद आहेत, मात्र यातल्या एकाही गुन्ह्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. या चार गुन्ह्यांपैकी एक गुन्हा हा अयोध्येतल्या बाबरी विवादीत ढाचा पाडण्यासंबंधातला गुन्हा आहे. दुसरा गुन्हा हा गोंडाच्या नवाबगंजमधे खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातही त्यांना दोषमुक्त करण्यात आलंय.

तिसरा गुन्हा हा राम जन्मभूमी अयोध्या पोलिस ठाण्यात सरकारी आदेशाचं पालन न करण्याचा आहे. एका सरकारी अधिकार्‍याला बंदी बनवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी अजून निर्णय झालेला नाही. बृजभूषण हे खेळाडूला थप्पड मारल्याप्रकरणीही चर्चेत आले होते. रांचीमधल्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपदरम्यान बजभूषण सिंह यांनी एका युवा पैलवानाला कानशिलात लगावली होती.

आलिशान गाड्या, सोनं आणि सत्तेची ताकद

भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. २०१९ला आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सिंह यांच्याकडे १० कोटीहून अधिकची संपत्ती आहे. त्यांच्याकडे ९ कोटी, ८९ लाख ५ हजार ४०२ रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय सिंह यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. सिंह यांच्या पत्नीकडे ६ कोटी, ३४ लाख, ४४ हजार ५४१ रुपयांची संपत्ती आहे. पत्नीच्या नावावर दोन लक्झरी गाड्याही आहेत.

सिंह यांच्याकडे एंडेवर, महिंद्रा स्कॉर्पिओ तर पत्नीकडे टोयोटा आणि फॉर्च्युनर कार आहे. सिंह यांच्याकडे ५० ग्रॅम सोनं आणि पत्नीकडे २०० ग्रॅम सोनं आहे. गाड्या आणि सोन्याशिवाय सिंह यांना शस्त्रं बाळगण्याचा शौक आहे. सिंह यांच्या नावावर ५ बंदुका आहेत, तर पत्नीच्या नावावरही काही शस्त्रं आहेत. बृजभूषण सिंह यांच्याकडे ९ कोटीची शेती, २ कोटींची नॉन अँग्रीकल्चर जमीन, २५ लाखांची व्यावसायिक इमारत आणि २ कोटींची रहिवाशी इमारत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बसपच्या प्रमुख मायावती यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

सत्ता, ताकद आणि पैसा यांचं खतरनाक कॉम्बिनेशन काय असतं, हे वरचं सगळं वाचलं की कळतं. अशी कारकीर्द असलेल्या बृजभूषण सिंह यांच्या पाठीवर कोणाचा वरदहस्त आहे, हे सांगता येत नाही. पण आजवर तरी कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोचू शकलेले नाहीत. कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं अशा माणसाविरोधात शड्डू तर ठोकलेत, पण तिचं पुढे काय होतं ते पाहायला काळाच्या निकालाची वाट पाहावी लागेल.

हेही वाचा: 

इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय

अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?

भारत माता की जय म्हणणं हा माझा अधिकार, जावेद अख्तर यांचं वायरल भाषण