विरा साथीदार : सिनेमातही चळवळ जगणारा कार्यकर्ता

१५ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘कोर्ट’ सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. मी अभिनेता नाही तर चळवळीतला कार्यकर्ता आहे, असंच विरा नेहमी सांगायचे. ते सिनेमांबद्दल फार बोलायचे नाहीत. ते बोलायचे ते चळवळींबद्दल. त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी होता आणि दुसरा मार्क्सवादाचा.

त्यांच्या आजीचं नाव होतं मंजुळा. कष्ट तिच्या पाचवीला पुजलेले. तिच्यासारखंच राबताना त्यांनी त्यांच्या आईला पाहिलं आणि आसपासच्या सगळ्या बायकांनाही पाहिलं. पिढ्या ओलांडून मंजुळा कायम राहिली. त्यातून त्यांनी लिहिलं, 

‘तिचं पाहुन गा हाल 
येती काळजाले कळा, 
उन्हा पावसात राबे 
माझी सावळी मंजुळा’

त्यांची गाणी व्यवस्थेतल्या उतरंडीत सगळ्यात शेवटी असणाऱ्या माणसाबद्दल होती. तशाच, त्यांच्या कविता, त्यांचं लिखाण, त्यांची चित्रं, त्यांची शिल्पसुद्धा. त्यांनी आंदोलनं केली तीही शेवटच्या माणसासाठीच. सिनेमे केले तेही त्या शेवटच्या माणसाला समोर ठेवूनच. ते स्वतःही त्यांच्यातलेच राहिले. शेवटच्या माणसाचा त्यांचा एक सिनेमा ऑस्करलाही गेला, ‘कोर्ट’.

या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणारे डाव्या आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते विरा साथीदार यांचं १३ एप्रिलला निधन झालं. आठवड्याभरापूर्वी ते कोरोना पॉझिटिव आले होते. परिघावरच्या कष्टकऱ्यांच्या न्यायाबाबत व्यवस्थेची उदासिनता दाखवणाऱ्या या सिनेमात एका सफाई कामगाराला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या शाहीर नारायण कांबळे या कार्यकर्त्याची भूमिका साथीदार यांनी साकारलीय.

डाव्या आणि आंबेडकरी विचारांचं मॉडेल

खऱ्या आयुष्यातही साथीदार कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या, विद्रोही गाणी गाणाऱ्या, मुलांच्या घरी शिकवण्या घेणाऱ्या नारायण कांबळेसारखेच होते. आयुष्यात अनेक चळवळींचं नेतृत्व त्यांनी केलं. इंडियन पिपल्स थेटर असोसिएशनचे संयोजक आणि महिला, शेतमजूर, जातीय अत्याचार असे विषय हाताळणाऱ्या ‘विद्रोही’ या मासिकाचे ते संपादक होते.

साहित्यिक कार्यकर्ते आणि प्रगतीशील लेखक संघाचे उपाध्यक्ष प्रसेनजित तेलंग सांगतात, 'मुळात विरा हा मुळात अभिनेता वगैरे असलेला माणूस अजिबात नव्हता. कोर्टमधल्या नायकाचं आयुष्य विरा स्वतः जगलेत. नागपूरमधे जयभीम नगर भागात ते रहायचे. त्याचं अगदी छोटंसं घर होतं. बहुतेक भाड्याचंच. पण पुस्तकांनी भरगच्च भरलेलं. यात मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकं होती. या पुस्तकांवर विरांचं चिंतनही होतं आणि तेवढ्याच ताकदीचं ते लिखाणही करायचे.'

'विरा सिनेमांबद्दल फार काही बोलायचेच नाहीत. ते बोलायचे ते डाव्या चळवळींबद्दल. सोबतच त्यांनी आंबेडकरी चळवळींचा हात घट्ट धरून ठेवला होता. डाव्या आणि आंबेडकरी विचारांना हातात हात घालून कसं लढता येईल याचं मॉडेल म्हणून आपण विरांकडे पाहू शकतो,' असंही ते कोलाजशी बोलताना म्हणाले.

हेही वाचा : माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!

धर्मातंराला जाण्यासाठी भांडी विकली

एका फेसबुक पोस्टमधे आंदोलन अभ्यासक कार्यकर्ते सुरेश सावंत लिहितात, ‘मी विरा साथीदारला ओळखतो ते विजय वैरागडे म्हणून. १९९८ च्या सुमारास रेशनिंग कृती समितीच्या चळवळीत त्याची भेट झाली. तो त्यावेळी ‘युवा’ संस्थेत काम करत होता. मूळ क्रांतिकारक चळवळीशी संबंधित विजय उपजीविकेच्या काही अडचणींसाठी बहुधा त्यावेळी एनजीओत असावा. त्याच्या या क्रांतिकारक वैचारिक बांधिलकीमुळे आणि वागण्यातल्या सौजन्यामुळे विजयशी मैत्र अधिक जुळलं.’

विरा साथीदार हे नाव त्यांनी १९७० च्या आसपास घेतलं होतं. त्याआधीचा विजय हा म्हणजे गुरं चालणारा साधा पोरगा. ते जन्मायच्या आधी बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याच्या आईवडलांनी घरातली भांडी विकली. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गानं आपल्या पोरांनं जावं म्हणून रामदास वैरागडेंनी फार प्रयत्न केले. पण विरा दहावी पेक्षा जास्त शिकले नाहीत. त्यावरून ऐकाव्या लागणाऱ्या बापाच्या शिव्या त्यांना खुपायच्या. ‘साला बाबासाहेब बनला असता, आता गुरं चारते,’ असं वडील एका रात्री म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी विरांनी गाव सोडलं आणि नागपुरात येऊन एका फॅक्टरीत काम सुरू केलं.

बाबासाहेबांचा लाल झेंडा

पिपल्स फिल्म कलेक्टिवच्या कोलकत्ता विभागाला दिलेल्या एका मुलाखतीत विरा सांगतात, ‘नागपूरमधल्या एका पुस्तक बाजारातून ५० पैशाला मी एक पुस्तक विकत घेतलं. रशियन सोविएत लेखक मॅक्झिम गॉर्की यांचं ‘मदर’. रशियातल्या परिस्थितीवर लिहिलेल्या या पुस्तकातल्या पॅवेलचं आयुष्य माझ्यासारख्या आंबेडकरी समाजात वाढलेल्या मुलाच्या आयुष्याशी इतकं मिळतं कसं जुळतं, या विचारानं मी अस्वस्थ झालो. त्याच्यासारखंच ट्रेड युनियनकडे जायची ओढ मला लागली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी फॅक्टरीत कामगारांची युनियन काढली आणि त्याचं नेतृत्व केलं.’

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पहिल्या ट्रेड युनियनचा झेंडा हा लाल होता, याचं उदाहरण ते नेहमी द्यायचे. ‘मी जय भीम सोबत लाल सलाम म्हणतो तेव्हा त्या झेंड्याचा लाल रंग माझ्या मनात असतो,’ असं ते म्हणायचे.

भीमाचा पाळणा आणि वामनदादा कर्डक यांचा ‘बिर्ला, टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो?’ ही सगळी गाणी त्यांच्या मनावर लहानपणापासून गारूड घालून होती. यातूनच त्यांच्या मनातल्या संघर्षाच्या गोधडीचा एक धागा आंबेडकरी विचारांचा झाला आणि दुसरा मार्क्सवादाचा.

हेही वाचा : मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

जेलर सो गया

नागपूरमधले प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत विरा साथीदार यांचे जवळचे दोस्त होते. कोलाजशी बोलातना ते सांगतात, ‘शेवटपर्यंत विरांनी माती सोडली नाही. मातीचे पाय असलेला, मातीतच न्हालेला तो माणूस होता. दीक्षाभूमी कार्यक्रमात माझी पुस्तकं त्यांनी स्टॉलवर विकायला ठेवली होती. पुस्तकांचे ३६३ रुपये त्यांनी मला द्यायचे होते. तीन रूपये त्यांच्याकडे सुट्टे नव्हते. मलाही उशीर होत होता. पण व्यवहारातला सच्चेपणा इतका की या तीन रुपयांसाठी मला त्यांनी १० मिनिटं थांबवलं. कुठून कुठून शोधून तीन रुपये दिल्याशिवाय त्यांनी मला सोडलंच नाही.'

'विद्रोही मासिकात माझ्या कविता यायच्या. विरा माझ्या कवितेचे फार चाहते होते. त्यांना माझी 'जेलर' ही कविता फार आवडायची. 'जेलर बिन्धास्त झोपी गेला, आता कैदी एकमेकांवर नजर ठेवून आहेत.' काहीही मोठी सामाजिक घटना झाली की माझ्याकडे येऊन 'जेलर सो गया' असं ते म्हणायचे.' 

बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगणारा नक्षली?

१९८४ ला नागपूरात दलितांना संघटीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पारधी तरुणाचा खून झाल्यानंतर भटक्या विमुक्तांसाठी संघर्ष समिती स्थापन करणारे विराच होते. खैरलांजी प्रकरणानंतर सगळ्या साहित्यिक कार्यक्रमांमधे जाऊन ते गोंधळ घालायचे. फक्त बसून चर्चा करणारे साहित्यिक कधी खैरलांजीबद्दल बोलणार की नाही? हा त्यांचा नेहमीचा प्रश्न. त्यांच्या पॉलिटिकल ऍक्टिविझमने त्यांना नेहमीच सरकारच्या रडारवर ठेवलं.

२०१३ ला ‘कोर्ट’चं शुटिंग चालू असताना गोदिंयावरून पोलिसांचं एक स्पेशल पथकच सेटवर आलं होतं. नागपूरमधल्या एका नक्षलवादी विरा साथीदार कुठेय असं त्यांनी विरानाच विचारलं होतं. विरांचंही उत्तर होतं, मला माहीत नाही, मी तर ‘एक्स्ट्रा’ आहे. सिनेमाचे अभ्यासक नरेंद्र बंडबे यांनी हा किस्सा कोलाजला सांगितला. 

‘कोर्ट’ ऑस्करला गेल्यानंतरही २०१५ मधे त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. पण आपल्या गाण्यांमधून बुद्धाचं तत्त्वज्ञान सांगणारा हा कलाकार कार्यकर्ता नक्षलवादी कसा असेल, असा प्रश्न कुणालाही पडला नाही.

हेही वाचा : भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

लोकांनी बनवलेला लोकांचा सिनेमा

विरांच्या घरात पोलिसांना कोणतीही हत्यारं सापडली नाहीत. कारण संघर्षाची त्यांची हत्यारं जगावेगळी होती. गाणी, पथनाट्य आणि नंतर सिनेमाचं हत्यारही त्यांनी स्वीकारलं. त्यातून लोकांना एकत्र केलं. ‘कोर्ट’शिवायही त्यांनी काही सिनेमात, काही शॉर्ट फिल्ममधे काम केलं. पण मी अभिनेता नाही. मी आंदोलनातला कार्यकर्ता आहे, असंच ते म्हणायचे.

सिनेमा ही फक्त एकत्र येऊन बघायची नाही तर बनवायचीही गोष्ट आहे असं ते म्हणायचे. आजच्या भांडवलशाही जगात सिनेमा ही एका व्यक्तीची निर्मिती असते. पण तीच निर्मिती सामूहिक उत्पादनातून व्हायला हवी. त्यासाठी कोटी रुपये देऊन अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा अशा हिरोंना घेतलं नाही तरी चालेल. त्यापेक्षा जास्त ताकद, जास्त कौशल्य समाजातल्या अनेक कलाकारांकडे आहे, असं त्यांनी इंडियन कल्चर फोरमला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. असा लोकांचा सिनेमा त्यांना बनवायचा होता. आणि तो मल्टीप्लेक्समधे नाही तर खेड्यात, जत्रेतल्या तंबूत दाखवायचा होता.

अखेरचा जय भीम, लाल सलाम

तरुणांशीही विरा तरुण होऊन वागत होते. ‘विरा गेले त्यानंतर मला त्यांचं वय कळालं. ते चळवळीतले इतके ज्येष्ठ कार्यकर्ते असतील याची कल्पनाही केली नव्हती. त्यांच्याशी असणारं आम्हा तरुणांचं नातं हे फार मैत्रीचं होतं. वयाचं, पदाचं कसलंही बंधनं त्यांच्याशी बोलताना येत नसे. ते कॉम्रेड होते. चळवळीतले साथीदार होतेच. पण त्यापेक्षा जास्त मित्र होते,’ असं कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्या रूपाली जाधव यांनी सांगितलं.

‘मी डिझाईन करत असलेल्या शर्टांचं मॉडेलिंग विरांनी करायचं, असं आमचं ठरलं होतं. हा माणूस फार हटके होता. स्वतःची विचारधारा तर त्यांच्याकडे होतीच. पण त्याचसोबत वेगवेगळ्या विचारधारेतल्या लोकांना, समूहांना आणि विशेषतः तरुणांना एकत्र बांधून ठेवायचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. आम्ही तरुण त्यांना आमचे प्रश्न सतत सांगायचो. ते अशा पद्धतीनं बोलायचे की प्रश्नाचं उत्तर तर मिळायचंच. पण ते मिळवण्यासाठी केलेली चर्चाही फार महत्त्वाची वाटायची,’ असंही त्यांनी कोलाजला सांगितलं.

विरा यांच्या ठाम मतांमुळे तयार झालेला त्यांचा चाहता वर्ग होता. तसेच काही टीकाकरही होते. पण या टीकाकारांनाही विरा यांचा द्वेष करणं कधीही जमलं नाही. त्यांच्या प्रेमळ स्वभावानं आणि छाप पाडणाऱ्या व्यक्तिमत्त्वानं त्यांनी जास्तीत जास्त हितचिंतकच कमवले.

त्यामुळेच त्यांच्या निधनाची बातमी मंगळीवारी आली तेव्हा संपूर्ण देश, सोशल मीडिया, बातम्या त्यांना अखेरचा ‘जय भीम’ आणि अखेरचा ‘लाल सलाम’ म्हणण्यासाठी पुढे आला होता. प्रत्येकाकडेच त्यांच्यासोबतच्या काही खास आठवणींचे प्रसंग होते. आता या प्रसंगातूनच विरा साथीदार आपल्याला पुढेही साथ देणार आहेत.

हेही वाचा : 

 

समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक