गांधीजी पुन्हा वायरल झालेत

०६ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.

३० जानेवारीला महात्मा गांधींची पुण्यतिथी होती. तेव्हा अलीगढ येथील हिंदू महासभेच्या सचिव पूजा पांडे यांनी गांधीजींच्या पुतळ्यालाच गोळ्या घातल्या. त्यातून लाल पाणी बाहेर येईल अशी किळसवाणी व्यवस्थाही केली. रस्त्यावर आणून पुतळ्याला आग लावली. गांधीजींचा खुनी नथुराम गोडसे याच्या फोटोवर फुलं उधळून त्याच्या नावाचा जयजयकार केला.

याचा वीडियो लगेगच वायरल झाला. सगळ्या टीवी चॅनलवरही त्याला जागा मिळाली. दुसऱ्या दिवशी यातल्या काही जणांना अटकही झाली. मात्र हे सारं होत असताना सोशळ मीडियावर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यात आश्चर्यकारक उद्गार कवींचा होता. त्या भयंकर कृत्याने चिडलेल्या कवींनी आपल्या कवितांतून निषेध केला. अशा आठ दहा कविता कोलाजला सोशल मीडियावर सापडल्यात. त्या अशा,

 

गांडू महासभा – महेश केळुसकर 

 

चालू द्या तुमची

गांडू महासभा

हुंगत रहा जातीधर्मांचे उकीरडे

झिंगत ठेवा नथुराम

आपापल्या गुत्त्यांवर

चालू द्यात तुमचा

गंधटिळ्यांचा कत्तलखाना

लटकत ठेवा शेंड्या

आणि जानवी

अवकाळाच्या खुंटीवर.

काही फरक पडत नाही

त्या अंतर्बाह्य नागड्या

हिंदू म्हाताऱ्याला.

जो अजुनही जिवंत

प्रत्यक्ष गोळी खाऊनही

त्याच्या कागदी

पुतळ्यावर गोळ्या

झाडून काय होणार?

 

तो खरा होता हिंदू

तुम्हीही खरेच आहात

आंडूपांडू.

गांडू...

 

गांधीला टाळून मला... – संतोष पद्माकर

 

गांधीला टाळून मला भारत म्हणता येत नाही

गांधीला वगळून मी आफ्रिका म्हणू शकत नाही

 

पोरबंदरची दिवादांडी गांधींच्या निरोपाची

मी पुतळाबाईच्या संस्काराला कमी लेखू शकत नाही

 

मी गांधींशिवाय सत्याग्रह आणि स्वातंत्र्याची व्याख्या लिहू शकत नाही

मला एकट्याने मार्टिन ल्युथरकडे आणि पुढे नेल्सन मंडेलाकडेही सरकता येत नाही

 

मला गांधींचे नाव घेऊन पाकिस्तानात जाता येत नाही

आणि भारतातही राहता येत नाहीय

मला गांधींच्या चष्मा चोरीचा नाही त्यांच्या हरवलेल्या दृष्टीचा तपास आहे

गांधींचे घड्याळ कुणी चोरले मला त्यात रस नाही गांधींची वेळ या देशात कुठे हरवली, मी शोधतोय

 

मला गांधींच्या नोटेवर असण्याचे कौतुक नाही ते चलनात नसल्याचा खेद आहे

इव्हन गांधीला कोणी कसे का मारले याचेही घेणे नाही

 

मला त्या मारेकऱ्याची बंदूक अद्याप जिवंत असल्याचे दुःख मात्र आहे

नवे गांधी जन्मले – विजय चोरमारे

 

त्यांनी गांधींना गोळ्या घातल्या

गांधींच्या रक्ताच्या एकेका थेंबातून

नवे गांधी जन्मले

लोक त्यांना दाभोलकर पानसरे

कलबुर्गी गौरी लंकेश अशा

वेगवेगळ्या नावांनी ओळखू लागले

त्यांनी मग दाभोलकर पानसरे

कलबुर्गी गौरी लंकेश यांनाही

गोळ्या घातल्या

त्यांचा नेम बरोबर लागायचा तरी

अंदाज दरवेळी चुकत गेला

एक दाभोलकर मारले शंभर

दाभोलकर पुढे आले

तसेच हजार पानसरे

दहा हजार कलबुर्गी आणि

लाख गौरी लंकेश

सगळे मिळून पुन्हा गांधीच

मारणाऱ्यांना मोजता येईनात

एवढे गांधी

वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी आपली खरी हत्यारे

लपवून ठेवली गृहमंत्र्यांच्या

निवासस्थानी बिनघोर

गांधी मारायचा किडा काही मरत

नाही त्यांच्या डोक्यातला

म्हणून मग ते दर तीस जानेवारीला

गांधी मारण्याचा खोटा खेळ खेळू लागले

 

हा इतिहास – गुरुप्रसाद जाधव

 

गांधीजींचा प्रतिकात्मक पुतळा जळतो आहे...

अगदी शांतपणे...

आगीचे लोळ इतरत्र पसरणार नाहीत, या खबरदारीसहीत.

जळतानाही तो कुणी भाजू नये म्हणून घेतोय काळजी...

आणखी कुठला पुरावा द्यावा?

म्हणजे तुम्ही मनापासून त्यांना ‘महात्मा’ म्हणाल?

राष्ट्रपिता मानाल...

स्वयंघोषित नथुरामांनो,

तुम्ही गांधीजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला,

खोट्या बंदूकीतून

खोट्या देशभक्तीसाठी

खोट्या गोळ्या झाडून

खोटं रक्त सांडून,असुरी आनंद साजरा करु पाहताय..

तुम्ही जेव्हा जेव्हा हे कृत्य कराल

तेव्हा तेव्हा सत्याचाच विजय होईल!

 

कारण,

नथुरामाने गांधींजींवर गोळ्या झाडल्या,ही केवळ घटना आहे.

आणि तरीही गांधींना तो संपवू शकला नाही,

हा इतिहास!

 

पुन:पुन्हा – मेघराज मेश्राम

 

ते

झाडतात गोळ्या

पुन:पुन्हा

 

होतात परेशान

पुन:पुन्हा-

 

हा बुढा

हसतोच कसा

पुन:पुन्हा?

 

जिकडे तिकडे गांधीच गांधी – नामदेव अंजना

 

गांधी हा प्राणीच डेन्जर होता.

त्याला वगळून पुढे जाताच येत नाही.

 

गांधी मेला नाही.

गांधी मरणारही नाही.

मुळात गांधी मरतच नाही.

 

इकडे गांधी तिकडे गांधी

जिकडे तिकडे गांधीच गांधी

 

काँग्रेसच्या पोस्टरवर गांधी

मोदींच्या भाषणात गांधी

केजरीवालच्या टोपीवर गांधी

अण्णांच्या उपोषणात गांधी

हॉलिवूडच्या पिक्चरात गांधी

पोंक्षेच्या नाटकात गांधी

वर्ध्याच्या आश्रमात गांधी

आश्रमातल्या विश्रामात गांधी

 

इकडे गांधी तिकडे गांधी

जिकडे तिकडे गांधीच गांधी.

 

कुणाला पक्षाच्या बॅनरवर गांधी हवा असतो.

तर कुणाला स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून.

कुणाला विचारांसाठी, तर कुणाला टीकेसाठी.

कुणाला वैचारिक खाद्य म्हणून हवा असतो.

तर पोंक्षेंसारख्यांना पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी.

कारण काहीही असो.

गांधी लागतोच.

 

किती आले किती गेले.

काहींनी जमेल तितकी जमेल तशी बदनामी केली.

तर काहींनी हव्या तेवढ्या हव्या तशा शिव्या दिल्या.

काहीजण टकल्या म्हणाले.

काहीजण उघडा म्हातारा म्हणाले.

काल-परवा तर कुणीतरी देशद्रोही म्हणाले.

 

एवढ्या टीकेनंतरही गांधी मिश्किल हसतो.

या म्हाताऱ्याच्या मनात राग कधीच नसतो.

 

जिथे जन्मला गांधी, तिथेच हरला गांधी.

जिथे लढला गांधी, तिथे कणभर उरला गांधी.

पण सातासमुद्रापार मना-मनात शिरला गांधी.

 

आईनस्टाईनला विश्वास बसेना, कुणी होता गांधी!

मंडेलाचा तर आदर्श ठरला गांधी!

ओबामाचा तर संघर्ष बनला गांधी!

बच्चा खान तर स्वत:च झाला गांधी!

 

इकडे गांधी तिकडे गांधी

जिकडे तिकडे गांधीच गांधी

 

ऐक पोरा - प्रा. अनिल सोनार

 

मी बापाला म्हणालो,

'मी मोथेपनी महात्मा गांधी होनार.'

बाप म्हणाला 'होशील, होशील.

माझं अन् देशाचं नाव काढशील.'

 

वय वाढलं, काळ बदलला.

बाप कळता सवरता झाला.

मला म्हणाला, 'ऐक पोरा,

भलतं काही करू नकोस,

मुळीच गांधी होऊ नकोस.

किती वाईट दिवस आले आहेत

बातम्या पाहतोयस ना तू?

मला सांग, कोणासाठी आणि

कोणता गांधी होणार आहेस तू?

 

गांधी नावाशीच ज्यांचं वैर

त्यांना नेहमी भिऊन वाग.

गांधी होण्याचं वेड पोरा

डोक्यातून काढून टाक.

 

तो मरून अमर झाला,

एवढं पुरेसं नाही काय?

मरशीलच, पण अमर होशील

ह्याचा आता भरवसा काय?

 

न ऐकल्यास आता सुद्धा

तुलाही 'हे राम' म्हणावं लागेल,

तुझ्या मारेकऱ्याला हुतात्मा बनवून

पुजलेले पाहावं लागेल.

 

आम्हाला विसर, इतिहासामधून

'गांधी नाव पुसून टाक,

तुझ्या सोनुल्याचा मेंदूसुद्धा

काळजीपूर्वक धुवून टाक.

 

मानवतेचं राहू दे, त्याला

दानवांमध्येच जगायचं आहे.

पारतंत्र्याशी नाही रे, त्याला

स्वातंत्र्याशीच लढायचं आहे.

 

३० जानेवारी १९४८ - शृंखला

 

३० जानेवारी १९४८

सायंकाळी सव्वा पाच वाजता

नथुराम गोडसे याने गोळी झाडली.

वाटले संपले सारे.

खूप प्रयत्न केला महात्म्याला संपवण्याचा.

ऐतिहासिक घटनांचे विकृतीकरण केले.

चूकीचे संदर्भ लावून संभ्रम निर्माण केला.

प्रश्नचिन्ह निर्माण केले.

गांधी वध हा शब्द वापरला.

मजबूरी का नाम गांधी

असा खडा टाकून पाहिला.

अनेकांनी, अनेक विचारांनी, अनेक मार्गांनी

७१ - ७२ वर्षात महात्म्याला

वारंवार संपवण्याचा प्रयत्न केला.

गांधी मार्गाने जाणाऱ्या

दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश

यांना संपवले.

कन्हैयाकुमार, नसीरउद्दीन शाह, नयनतारा सहगल यांच्यावर

शाब्दिक विषारी बाण फेकले

तरीदेखील

गांधी संपला नाही.

तुम्हाला वाटले,

दहशतीच्या टाचेखाली

विचार संपवाल.

तरीदेखील

गांधी रूजलाच

हिंसेने भूमी जिंकाल

फारतर शरीर... पण मन नाही

म्हणूनच

गांधी अधिकाधिक जागतिक बनला

इतिहासाची पाने पलटा...

मार्टिन ल्युथर किंग, मंडेलापासून

मलालापर्यंत

ठळक नावे दिसतील

आणि यापुढेही... प्रवाह वाहत राहील.

कदाचित

खोटं बोलून, रेटून बोलून

भारतातला गांधी संपवाल.

पण

ग्लोबल झालेल्या गांधींचं काय?

आता

मजबुती का नाम गांधी

म्हणूनच

गांधी विचार संपवण्याकरता

कोणती बंदूक वापरणार?

एके ४७ की अजून काही?

पण

तुमच्या दहशतीला न जुमानता

जगभर गांधी रूजलाय

 

प्रात:स्मरणीय – मोहन देस

 

प्रात:स्मरणीय

प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट

हत्येचेही प्रतिकं दणकट

गोडशाहुन मी जादा सटसट

 

तीव्र मात्र कळ उठे छातीत

मेलेला तो उठुन चालतो?

मना मनातुन रुतुनी बसतो?

 

पुढच्या वर्षी लवकर ये रे

हे महात्म्या, मरणा ये रे

वधास्तव तू, बापू, ये रे

 

नाहीतर कोणी दुसरा गांधी

प्रातःकाली शोधून काढीन

नि:शस्त्राला टिपून काढीन

 

नकोच चिन्हे नकोच प्रतिमा

प्रत्यक्षाची उत्कट हिंसा

अमर आत्मा अमर हत्यारा

 

प्रात:स्मरणीय होशील मग तू!

 

पुन्हा एकदा गांधी मला भेटला - अभिजित देशपांडे

 

गांधी मलाही भेटला

नथुरामांच्या गराड्यात

छातीवर गोळ्या झेलतांना

 

सवयीने नेहमीप्रमाणेच

'हे राम' म्हणाला

 

त्यावर त्वेषाने उसळत

ते म्हणाले,

‘रामाचे नाव घेण्याचा अधिकार

तुला नाही...

 

आम्ही तर अयोध्येत

रामाचे मंदीर बांधणार आहोत…

 

प्रसंगी, सर्वोच्च न्यायालयालादेखील

आव्हान देऊन...

 

आमचे वैचारिक वा व्यावहारिक विरोधक

उदाहरणार्थ, रामचंद्र गुहा, रघुराम राजन

यांच्या नावात देखील

'राम' खपवून घेणार नाही आम्ही...

 

रामावरील स्वामित्व हक्क

फक्त आमचाच

 

तू तर तहहयात काँग्रेसी

शिवाय मुस्लीमधार्जिणा

 

रामाचे नाव घेण्याचा अधिकार

तू गमावून बसला आहेस...

तो आता फक्त आम्हालाच’

 

गांधीजींनी पुन्हा

'हे राम' देखील म्हटले नाही

 

नथुरामाचा स्वर

इतका

तीव्र होण्याच्या काळात

 

इनमिन दहाच माकडांचा

गांधीजींना गोळ्या घालण्याचा इव्हेंट

दहा कोटी लोकांत व्हायरल होताना...

 

'राम नाम सत्य हैं'चे

अर्थ पार बदलताना…

 

नेमक्या काळात

गांधी मला भेटला...

 

या निमित्ताने का असेना

अधूनमधून भेटत राहीन म्हणाला…

 

गिरवत राहू आपण! - श्रीरंजन आवटे

 

गांधींच्या प्रतिमेवर घातल्या जाताहेत गोळ्या

उजळ माथ्याने दहन केलं जातंय संविधान

बाबासाहेब मुर्दाबादचे नारे देताहेत नराधम

नेहरूंचा वारसाच नष्ट करण्याचा होतोय प्रयत्न

पाडला जातोय लेनिनचा पुतळा

दहशतवादी नथुरामाच्या वंशजांचे सुरु आहे विकृत तांडवनृत्य

पण

बापू, तुमचा चष्मा कसा तोडता येईल यांना?

घाव घालता येईल शरीरावर; पण मनाचे काय!

बाबासाहेब, तुम्ही दिलेला शब्द कसा नष्ट करता येईल यांना?

पंडितजी, 'नियतीशी करार' यांना कसा समजेल?

लेनिन, तुझे क्रांतिगीत आकळेल यांना?

ते काहीही करोत, त्यांना हे कळो अथवा न कळो;

प्रेमाचा, सहिष्णुतेचा, सर्वसमावेशकतेचा, आस्थेचा, सहभावाचा,

समतेचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा, धर्मनिरपेक्षतेचा

शब्द गिरवत राहू आपण!